स्त्रीत्वाची कोंडी = आई !

Submitted by अजातशत्रू on 19 October, 2016 - 05:57

स्त्रीत्वाची कोंडी - आई ; प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केल्लेल्या 'आई' या पुस्तकाचा रसास्वाद ...

"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....
या परिच्छेदातील 'ती' म्हणजे स्मिता पाटील, 'तो' म्हणजे राज बब्बर, बाळ - प्रतिक बब्बर आणि लेखनकर्त्या 'मी' म्हणजे स्मिताच्या आई विद्या पाटील होत....

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवर्य प्रवीण बर्दापूरकर सर सोलापुरात आले होते. तेंव्हा त्यांचा बराच वेळ सहवास लाभला. बऱ्याच विषयावरील गप्पा झाल्या. बर्दापूरकरांना ऐकता आलं. त्यांच्या 'डायरी','दिवस असे की', 'नोंदी डायरीनंतरच्या', 'बाय द वे' आणि 'नोंदी डायरीनंतरच्या' माझ्या वाचनात आलेले असल्याने गप्पातील काही संदर्भ नेमके लागले. आपल्या ओघवत्या शैलीत प्रवीणजी अनुभवाच्या पोतडीतून एकेक रत्नं काढत होते अन ते घ्यायला माझे हात थिटे पडत होते. याच ओघात त्यांच्या 'आई' या पुस्तकातील काही अवतरणांचा उल्लेख आला. माझ्या वाचनात हे पुस्तक आलं नाही असं मी त्यांना बोलून गेलो. सोलापुरातील छोटासा दौरा आटोपून ते पुढे पुण्याला अन तिथून औरंगाबादला रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांचा निरोप आला, 'तुझा पत्ता पाठव मी तुला 'आई' पुस्तक पाठवतो.' चार दशके निस्पृह, सच्ची व तत्वाधीष्ठीत पत्रकारितेच्या तपस्येची साधना करणारया इतक्या मोठ्या माणसाने आपली छोटीशी गोष्ट ध्यानात ठेवली अन त्याची दखल घेऊन ते पुस्तक पाठवले याचा जो आनंद झाला तो शब्दातीत होता. दोनेक दिवसांत कुरियरने पुस्तक आले. एका दिवसांत वाचून पूर्ण झाले. सरांचा विजयादशमीच्या शुभेच्छा देणारा निरोप आला आणि त्यात त्यांनी पुस्तक वाचून झाले का ? अशी पृच्छा केली. वाचन झाल्याचे मी कळवले अन यावर काहीतरी लिहावे अशी उर्मी मनात दाटून आली. सरांची परवनागी आधी घेतली, कारण या पुस्तकावर मी लिहावे इतका काही माझा व्यासंग दांडगा नाही अन तितका व्यापक अभ्यास-अनुभव देखील माझ्याकडे नाही याची मला पक्की जाणीव होती. वर दिलेला उतारा याच पुस्तकातील आहे.....

आपल्या आईची महती सांगणारी विविध क्षेत्रातील अठरा दिग्गज असामींची आत्मकथनपर प्रकरणे यात समाविष्ट आहेत. शेवटचे एकोणिसावे प्रकरण माय - लेकीचे आहे. ते विद्या पाटील - स्मिता पाटील यांचे आहे. या दोघींनी एकमेकाबद्दल व्यक्त केलेले स्नेहगंध वाचकांना मोहोरून टाकतात.
'अभावग्रस्त परिस्थितीला न जुमानता मातृत्व खंबीरपणे निभावणारया आई नावाच्या संस्कारपीठाला...' हे पुस्तक समर्पित केल्याचं बर्दापूरकरांनी अर्पणपत्रिकेत नोंदवलंय. पुण्याच्या साधना प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची सध्या तिसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे अन तिला वाचकांचा लोकाश्रय मोठ्या प्रमाणात लाभला आहे.

"आई या विषयावर मराठीत भरपूर लेखन झालेलं आह ; पण त्यातील बहुसंख्य लेखन भक्तीभावानं ओसंडून वाहणारं आणि स्त्रीला आईपणाच्या ओझ्याखाली दाबून तिच्यातल्या स्त्रीचा गळा घोटणारं आहे. 'प्रेमस्वरूप आई' किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता' असे झापडबंद समज आपण संस्कार म्हणून सोयीस्करपणे करून घेतो. हीच आपली परंपरा आहे अशी समजूत अनेकदा करून घेणं, हा आपला एक प्रकारचा कावा असतो ; कारण ते सोयीचं असतं. स्त्रीच्या स्वातंत्र्याआड येणारी हीच खरी बेडी आहे, हे कोणी लक्षातच घेत नाही....खरं तर, आई केवळ आईच नसते, तर या चौकटीच्या बाहेर आई एक स्त्री असते...हाडांमासाचा एक जिताजागता जीव म्हणून तिच्या काही गरजा आहेत. स्वतंत्र भावविश्व आहे, तिची स्वतःची एक स्पेस आहे आणि ते सर्व जपण्याचं स्वातंत्र्य तिला आहे या जाणिवेपासून कोसो दूर असे बहुसंख्य लेखन (आजवर) झाले आहे." हे वास्तववादी विचार आहेत या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले. बर्दापूरकरांनी याच करिता काही पूर्वप्रकाशित तर काही खास या पुस्तकासाठी नव्याने लिहून घेतलेले लेख या पुस्तकात संपदित केले आहेत. लेखकांची वैश्विक पार्श्वभूमी आणि लेखांमधील आशयवैविध्य पाहून हे काम किती कठीण असावे याची प्रचिती येते.

कुमारीविधवा झाल्यानंतर पुनर्विवाह करणारया आपल्या आईच्या अंतरंगात डोकावताना गिरीश कार्नाडांनी जी स्थितप्रज्ञता दाखवली आहे त्याला तोड नाही. 'कुट्टाबाई' या पहिल्याच प्रकरणात कार्नाडांनी तत्कालीन समाजरचना, रूढी व स्त्री स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकला आहे. विवाहपूर्व एकत्र राहणं आणि त्यानंतर दोघांनीही पुनर्विवाह करणं, नव्याने केलेल्या विवाहावर काळाचा पडदा टाकणं या सर्व गोष्टी त्यांनी अतिशय नेमक्या पद्धतीने मांडल्या आहेत....

'पुनरागमनाय च' या प्रकरणात महेश एलकुंचवार यांनी लिहिलं आहे - 'पातिव्रत्य म्हणजे नवऱ्याला सतत भिणे व त्याचा प्रत्येक शब्द झेलणे, स्वतःचे मन सतत मारणे, मनातले कढ मनात जिरवून कुटुंबाचे हसतमुखाने करत राहणे - असा अर्थ असलेल्या समाजात ती (आई) जन्माला आली होती...देवासमोर दहा पैसे ठेवायचे तर जिला ते नवऱ्याला मागावे लागत, मुलांना तिने तेही मागितले नहीत. देवासमोर पैसे ठेवणेच तिने शांततेने बंद केले.... ' आपल्या आईच्या माहेरचा झालेला सर्वविनाश, तिच्या वडिलांचा झालेला पुनर्विवाह, तिच्या मनाची झालेली मूक घुसमट अन त्यानंतरही तिच्या वागण्यात असणारी पातिव्रत्य मुग्धता याचा देखणा शब्दपट एलकुंचवार हळुवारपणे उलगडतात तेंव्हा आपले डोळे कधी पाणावतात हे लक्षातही येत नाही. आपल्या आईचे आजोळ अपघाताने सापडते तेंव्हा मनाची अवस्था किती विविधांगी व्याकुळ होते याचे वर्णन यात आहे. लेखाच्या शेवटी खऱ्या लेखकाची आत्मभान जागवणारी जी लक्षणे एलकुंचवारांनी दिली आहेत ती अंतर्मुख करणारी आहेत....

ओळीने लावलेली चकचकीत भांडी, डबे यात आई कधी अडकलेली दिसलीच नाही असं सहज सांगून जाणारया आशा बगे यांच्या 'अंतस्थ'मधील आई आपल्याला चारचौघीतली वाटत नाही अन नकळत आपल्या परीचयाचीदेखील वाटते.
'माय देखणी होती. पिकल्या पानाच्या रंगाला तिचा रंग होण्यात धन्यता वाटली. माय खूपच नाजूक होती. हळवेपणाचे कायम ओथंबलेपण ती होती. तिचे डोळे खुपदा अश्रूंनी बोलताना मी पाहिले आहेत...'असं आपल्या आईचं लाघवी वर्णन करणारा यशवंत मनोहर यांचा 'ज्ञानपीठ' हा लेख काळजाचा ठाव घेऊन जातो. अश्रूंच्या भाषेचे मोल मला मायच्या ज्ञानपीठात कळले असं मार्मिक भाष्य ते करतात....
बालपणी आपल्या हातून चुका झाल्यावर आईने जर कडक शासन केले नसते तर आपण कुठल्या कुठे गेले असतो याची खंत व्यक्त करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या जडणघडणीत आईचा वाटा किती मोठा होता हे सांगताना शेवटी हळवे होतात. ते म्हणतात - 'आज माझ्याकडे सगळं काही आहे, पण हा पुढचा प्रवास पाहायला. माझं कौतुक करायला आई नाही, याचं दुख मात्र सतत असतं....'...

सुरेश द्वादशीवार यांनी आपल्या आईच्या माहेरचे व पुढच्या काळात सासरच्या संपन्नावस्थेचे मनोहर चित्रण केले आहे. किंबहुना त्याहून अधिक तन्मयतेने त्यांनी स्वतःच्या जन्माच्या पश्चात आपल्या आईसह सकळ घराला आलेल्या विपन्नावस्थेचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. आपल्या वेडसर झालेल्या आजीपासून सुरुवात करून, आईच्या साध्या पण अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नापर्यंत द्वादशीवारांनी इतकं तटस्थतेनं लिहिलंय की मन थक्क होऊन जातं. नास्तिकतचे अनेक पदर उलगडताना आईच्या धैर्याचा व अवीट गोडीच्या नितळ हास्याचा त्यांनी अत्यंत मोहक परिचय करून दिला आहे.

'माझी आई' मध्ये ह.मो.मराठे यांनी वर्णिलेली आई आणि तिचं आत्यंतिक हलाखीचं जिणं कमालीचं अस्वस्थ करून जातं. आपल्या आईच्या जीवनाची झालेली परवड, तिचे खंगत जाणे अन तिचा करुण अंत हमोंनी कॅनव्हासवरती जलरंगातले पोर्ट्रेट चितारावे तसे चितारले आहे. या लेखात आलेलं कोकणचं निसर्गवैभवही बोलकं आहे. दुर्दैवाचे दशावतार म्हणजे काय याची प्रचिती देणारा हा लेख अंतर्बाह्य हेलावून टाकतो....
'अ लेडी विथ सिल्व्हर क्राऊन'हा आपल्या आईबद्दलचा वडिलांचा शेरा नोंदवणारया रूपा कुळकर्णी यांच्या त्यागी आईचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व, नेटकी राहणी, अनोख्या आवडीनिवडी अन समृद्ध - आदबशीर व्यक्तिमत्व आपल्या मनात रुंजी घालत राहतं....
'आयदान'कार उर्मिला पवार यांच्या तरूण मुलाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांना नव्याने जाणवलेल्या मातृत्वाच्या संवेदना त्यांच्या आईशी पुन्हा एकतारीत जोडून गेल्या. आपल्या आईचा स्वभाव असा कसा काय याचे उत्तर जेंव्हा त्यांच्या पुत्रवियोगातून मिळते तो क्षण त्यांनी उत्कट रेखाटला आहे....

'गावावर सुराज्य करणारी तू माझ्या भाडयाच्या घरात कशी काय मावशील ? तशी तू निरक्षर आहेस.तुझ्या लहानपणी स्त्रियाच काय, पण पुरुषांनाही शिक्षण उपलब्ध नव्हतं. पण तुझी सांस्कृतिक समृद्धी आम्हा उच्चशिक्षितांनाही लाजवणारी आहे' - आपल्या आईबद्दल काशीबाईबद्दल असं लिहिणारया इंद्रजीत पवारांच्या लेखातून लोप पावलेले ग्राम्य शब्द येतात, तत्कालीन जीवनशैलीचे दाहक संदर्भ येतात. आपलं दुध कमी पडू लागल्यावर आपल्या तान्हुल्याला मांगिणीच्या स्तनाला लावणारी आई आणि शिवताशिवत पाळणारी आई या दोहोंचा शोध घेताना भालेराव तिच्या स्त्रीसुलभ देवभोळेपानावर नकळत प्रकाश टाकताना तिला संतुलित माप देतात हे विशेष आहे. इंद्रजीत भालेरावांची काव्यसंपदा इतकी नैसर्गिक व समृद्ध कशी याचे उत्तर या लेखात सहज गवसते....

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात सर्व शेती गहाण टाकून किंवा विकून उपचार करण्याचं पार्वतीमायने कधीच मान्य केलं नाही. अगदी कल्पनेच्या पातळीवर देखील मान्य केले नाही - 'माणूस काय आज हाये उद्या नाही... मरणारच आस्ते एक ना एक दिवस ; पण पुढच्या पिढीसाठी वावर पाह्यजे ना !.... वावराबगर कसं जगतील लेकरंबाळं ?" असा प्रश्न विचारणारी 'बारोमास'कार सदानंद देशमुखांची आई काळजात घर करून राहते.....
आपल्या आईने सारं आयुष्य काबाडकष्टात काढून देखील ती अनामिक उत्साहात जगत गेली हे सांगतानाच तिच्या मृत्यूने तिची सुटका केली याचे हायसं वाटलं असं सच्चेपणाने नमूद करणारा श्रद्धा बेलसरे यांचा 'माई' हा लेख भावपूर्ण वाटत असला तरी स्त्रीत्वाची दुखणी अणकुचीदार करणारा असाच आहे....

फिरस्ते पत्रकार म्हणून ख्यातनाम असणारे राजा शिरगुप्पे यांच्या 'आईसाठीचं अरण्यरुदन' या लेखात एक वाक्य आहे - "आई आमचा हक्क होती ; अप्पा (वडील) मेहेरबानी !'...आईनं कधी माझं बाळ म्हटल्याचे आठवत नाही पण तिनं दिलेला प्रत्येक घास 'माझ्या बाळासाठीच' असा गजर देहभर करतो असं खुल्या दिलाचे बोल लिहिणारया शिरगुप्पेंचा हा लेख इतका वास्तववादी आहे की प्रसंगी तो कडवट वाटतो. आई वडिलांच्या भांडणापासून ते समाज जीवनातील संघर्षात 'माघार घेऊ नका' अशी जिद्द पुरवणाऱ्या आईच्या ध्येयवादी स्वभावापर्यंतचे अनेक पदर यात उलगडले आहेत. 'आई हयात असताना आपण तिची सेवा केली नाही की तिची हौसमौज केली नाही' याचं शल्य वाटणारे शिरगुप्पे शेवटी हे अरण्यरुदन कोणासाठी व कशासाठी असं जेंव्हा विचारतात तेंव्हा मनोमन गलबलून येतं.

"भीक नाही मिळाली कि, आम्ही उपासी रहायाचो. थंड पाणी पेयाचो. भूक थांबायची नाही. जीव कालमील होयाचा. आम्ही भावंडं भाकरीसाठी आईकडे तगादा लावायचो. तवा आई म्हणायची - आभाळाकडे बघा, भूक थांबते. मग आम्ही समदी भावंडं आभाळाकडे बघायचो. वेळ निघून जायची. ...त्या वेळेस भूक थांबायची. आज आठवण आली की हसू येतं. माय कोणत्या विद्यापीठात हे गणित शिकली असेल, कोणाला ठावं !"असं कारुण्यपूर्ण वर्णन करणारे. भटक्या विमुक्तांची व्यथा आपला आत्मा समजणारे अशोक पवार आपल्या नकळत आपल्याला पालावरच्या बेफिकीर भग्न जीवनात घेऊन जातात अन आपल्या नकळत आपल्याला रडवतात.....

आपल्या बालवयातच वडिलांचे छत्र हरपलेल्या छायाचित्रकार विवेक रानडे यांनी आपल्या आईने आईपणासोबतच पितृत्व कसं पेललं याचे बारकाईने वर्णन करताना तिच्या मनातले विविध कंगोरे आगदी नजाकतदार पद्धतीने मांडले आहेत.....
आपल्या अशिक्षित आईने बालवयात दिलेला शिक्षणाचा मंत्र असो व फाटक्या संसाराला टाका टाका जोडताना तिने केलेली कसरत असो किंवा ज्या दिवसात कणी कोंडा मिळायची देखील वांधे होते त्या काळात देखील आई डगमगली नाही याचे वर्णन करताना आसाराम लोमटे यांनी आपली आई इतकी आखीव रेखीव रेखाटली आहे की त्यांचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते....
आपल्यात आणि आपल्या आईमध्ये असणारे आत्मैक्य जागवताना स्वतःचे अस्तित्व विसरून एकमेकाच्या गर्भातले हुंकार ऐकणारे आई आणि मुलीचे सुंदर नातं अरुणा सबाने यांनी शब्दबद्ध केलं आहे. आपल्या कठीणसमयी आपल्या मागे उभी राहणारी आई आणि तिच्या सुखदुःखातदेखील आढळणारी तिची तीच निश्चलता याचे नेटके वर्णन यात आहे.....

स्वतः प्रवीण बर्दापूरकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मोठ्या जिकिरीने अन हिंमतीने आपला संसार निभावून नेणारया आईचे जे शब्दांकन केले आहे ते अंगावर काटे आणणारे आहे. आपल्या देखण्या आईचे लोभस वर्णन त्यांनी केले आहे, तत्कालीन समाज जीवनात ग्रामीण भागात राहून नर्सची नोकरी करणारया आपल्या आईची महती सांगताना तेही हळवे होऊन जातात. 'डॉक्टरीन बाई'चा पट त्यांनी भावविभोर होऊन रेखाटला आहे. यातील काही प्रसंग अंगावर येणारे आहेत.....

पुस्तकाच्या अंती स्मिता पाटीलचे आपल्या आईविषयीची मते आहेत. 'काम कुठलेही असो मग झाडू मारण्याचे असो की अभिनय करण्याचे असो ते नीटच करायला पाहिजे' असा मार्मिक सल्ला देणारया समाजवादी विचारसरणीच्या विद्या पवार यांच्या स्वभावाचे अनेक पैलू या लेखात पाहायला मिळतात.

विविध स्तरातील नामवंत, प्रज्ञावंत व्यक्तींच्या आईविषयक भावना इतकंच त्रोटक स्वरूप असे या पुस्तकाचे वर्णन करता येणार नाही. कुठल्याही प्रतलातील सकल स्त्रीत्वाची 'आई'च्या चौकटीत झालेली विविधांगी घुसमट अन त्यावर समाजाने, रूढी परंपरांनी जाणीवपूर्वक बाळगलेले हिंसक मौन हे याचे टोकदार स्वरूप आहे. पुस्तक हातावेगळे केल्यावर जितकी तृप्ती मिळते तितकीच खिन्नता देखील मनी येते हे या पुस्तकाचे उत्कट यश म्हणावे लागेल....
इतके सुंदर पुस्तक मला पाठवल्याबद्दल आणि त्यावर लिहिण्याची परवानगी दिल्याबद्दल मी गुरुवर्य प्रवीण बर्दापूरकर सरांचा मनःपूर्वक आभारी आहे...

- समीर गायकवाड.

ब्लॉगलिंक
https://sameerbapu.blogspot.in/2016/10/blog-post_19.html

download (4).png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख करुन दिलि आता नक्कि वाचणार हे पुस्तक -- +१२३४५
पहिला स्मिता पाटील चा परिच्छेद वाचून उत्सुकता निर्माण झाली आहे.. अत्यंत आवडती अभिनेत्री म्हणून.. Happy