एक दिवस आठवणीतला

Submitted by vrushalraje007 on 14 October, 2016 - 04:46

परवा सहज तिला फोन केला.. येतोय पुण्यात कामानिमित्त. त्यावेळी नेमका तिचा एम.पी.एस.सी.चा पेपर होता.. आणि नंबर आला होता भोरला..
ती तिच्या बाबांना बोलावणार होती पेपरला जायला.. मोकळा असल्यामुळं मी म्हणलं "कशाला बाबांना एवढ्या लांब बोलावतीयेस. जाऊ ना आपण.. असही रविवारच आहे."

आता एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढाकार घ्यायचं कारण म्हणजे मला वाटलं असं किती लांब असेल भोर.. २५-३०किमी.. अन एखादा पेपर ३ तासांचा.. आणि रमतगमत परत पुणे. पण आदल्या दिवशी कळलं की अंतर ५५किमी आहे, २ पेपर आहेत आणि वेळ १०.३०-५..
माझ्या मनात आता कालवाकालव सुरु झाली. प्रवासाचा कधीच कंटाळा नव्हता पण पंचाईत अशी होती कि दिवसभर करायचं काय?? १००% भोरमध्ये आपल्याला बोर होणार. आता मैत्रीण जवळची, त्यामुळं नाही म्हणायचा विषय येत नाही. आणि दिलेला शब्द माघारी घेणं रक्तात नाही.
झालं. सकाळी ८-८.३०ला निघायचं ठरलं.. मनातली चलबिचल काही थांबायला तयार नव्हती. त्या परिस्थितीमध्ये घाईगडबडीत मनाची समजूत घालण्यासाठी २-३पिक्चर मोबाईल मध्ये भरून हेडफोन आणि पोर्टेबल चार्जर घेतला..
अन ठरल्याप्रमाणे निघालोही. गप्पा मारत पाऊण-एक तासात तिथं पोचलो.
पोचल्यावर पाहिलं परिक्षाकेंद्र पाहून घेतलं.. त्यानंतर तिथेच बाजूला एका छोट्या हॉटेलमध्ये कांदेपोह्यांचा नाश्ता झाला.. मनातला प्रश्न आणखी तसाच होता. तिथं एका सद्गृहस्थाला विचारलं इथे फिरायला काही आहे का? आदल्या दिवशी नेटवर वाचल्याप्रमाणे त्याने जुन्या राजवड्याबद्दलच सांगितलं.

आता पेपरची वेळ झाली होती. लगोलग परीक्षा केंद्रावर आम्ही पोचलो. ब्लॉक नंबर पाहून घेतला. बेल झाली. पेपरला आत जाताना तिने विचारलं "तुला बोर तर होणार नाही ना??" मी अतिआत्मसिश्वासामध्ये म्हणलं "मला बोर होत असतंय का कधी. मी आहे तो. जा तू पेपरला. ऑल द बेस्ट."

केंद्रापासून बाहेर आलो अन ठरल्याप्रमाणे भोरचा राजवाडा गाठला. गाडी लावून मुख्य दरवाजातून आत गेलो. भल्यामोठ्या दरवाजाच्या पोटदरवाजातून आत गेलो. भव्य व्हरांडा, जुनं ३ मजली बांधकाम, खांबावरील नक्षीकाम पाहून भारावून गेलो. पण तिथं गेल्यावर कळलं कि व्हरांड्यापुढं प्रवेश बंद आहे.. मग काय तिथंच फोटो सेशन चालू केला. असाही एकटाच होतो. त्यामुळे इमारतीचे फोटो काढल्यानंतर स्वतःचे फोटो काढण्यासाठी टाइमर लावून खटपट चालू केली. तोपर्यंत माझ्यासारखेच मित्रांबरोबर आलेले दोघेजण तिथं पोचले. बीडचे होते दोघेही अन मी बारामतीचा. मग तुम्ही तुमच्या साहेबांचे आणि आमच्या साहेबांचे म्हणून नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ५ मिनिटांमध्ये त्यांची ओळख करून घेतली. आता मनाला जरा आधार मिळाला कोणतरी आहे आपल्याबरोबर याच समाधान लाभलं होतं. मग फोटो सेशनला नव्याने सुरुवात झाली. एकमेकांचे फोटो काढत असताना लहान मुलांचा एक छोटेखानी क्रिकेट संघ व्हरांड्यात येऊन थडकला. त्यांना पाहून माझे डोळे चमकले. खूप दिवसांनी क्रिकेट खेळायची संधी समोर खुणावत होती. आणि अनोळखी गावात असही दुसरा काही टाईमपास दिसत नव्हता. असे सगळे योगायोग जुळून आल्यामुळं त्यांची खेळायची तयारी सुरु व्हायच्या आधी त्यांच्यातल्या दादाला मी पुढे होऊन म्हणलं, "भैया आम्हालापण घ्या कि राव तुमच्यात खेळायला." मग काय २ संघांमध्ये गडी वाटून सामना सुरु झाला. पहिली आमची बॉलिंग होती. एक इनिंग झाली. आमची बॅटिंग सुरु झाली तेवढ्यात तिथं वाडा व्यवस्थापकांनी मधे येऊन आमचा डाव थांबवला. आम्हाला मैदान बदलावं लागलं. दुसरं मैदानात पण तीच परिस्थिती, १ ओव्हर खेळून परत हाकललं केलं. शेवटी एका शाळेच्या मैदानावर डाव सुरु झाला. पहिला सामना आम्ही हरलो,अन दुसरा जिंकलो. लहानांना आम्ही पाहिलं खेळू द्यायचो आणि शेवटी आम्ही खेळायचो. त्यामुळं मुलं आमच्यावर खुश होती. अन शेवटी मॅच झाल्यावर सगळ्या चिल्लर पार्टीला आईस्क्रीम खायला घेऊन गेलो, मग तर त्या चिमुरड्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.. एक तर हळूच म्हणे "थँक्यू बर का दादा आईसक्रीमसाठी.." त्या थँक्यू बरोबर लहानग्यांच्या तोंडावरून कृतज्ञता ओसांडुन वाहत होती.. ना कधी आम्ही भेटलो होतो ना पुन्हा कधी भेटण्याची पुसटशी शक्यता पण ते २-३तास आम्ही एकमेकांचे एकदम जिगरी दोस्त झालो होतो.
एव्हाना १ वाजत आले होते मॅडमचा पेपर सुटणार होता, त्यामुळं जिगरी दोस्ताना पुन्हा नक्की यायचं आश्वासन देऊन टाटा, बाय बाय केला आणि पुन्हा परीक्षा केंद्राकडे निघालो. पेपर सुटला तसं आम्ही त्या गावात जेवायला हॉटेल शोधायला निघालो. बहुधा या गावात पहिल्यांदाच कसलीतरी परीक्षा तेही रविवारी असल्यामुळं जी काही २-४ हॉटेल्स होती ती तुडुंब भरली होती. रखरखत्या उन्हात आम्ही शेवटी एक हॉटेल शोधलंच. तिथेही गर्दी होतीच पण माझ्याबरोबर बाहेर अन तिच्याबरोबर परिक्षाकेंद्रात झालेल्या गमतीजमती सांगत आम्ही त्या चवदार जेवणाचा आस्वाद घेतला. मध्ये आमच्या एका मित्राचाही पेपर असल्याने त्याला फोन करून विचारलं कसा गेला वगैरे. अन पुन्हा परीक्षाकेंद्राकडे निघालो. तिने विचारलं जाताना मला कि महत्वाचे सूत्र वगैरे सांग काहीतरी. १५ मिनिटांत असा काय सांगणार होतो मी तिला. फक्त म्हणलं "डोकं शांत ठेवून पेपर सोडव आणि कोणत्या प्रश्नात अडकून राहू नकोस." ते ऐकून ती हळूच हसली अन तेवढ्यात पेपरची घंटा झाली व ती पेपरला गेली..
मघाशी भेटलेले २ अनोळखी आता मित्र झाले होते. ठरल्याप्रमाणे गेटवर आम्ही पुन्हा भेटलो. तिथून भाटघर धरण जवळ होतं ते पाहायला म्हणून आम्ही निघालो. पण पूर्ण महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ हिरव्यागार भोर तालुक्यालाही चुकला नव्हता. भाटघरमध्ये पाणी नव्हतं त्यामुळं आम्ही परत निघालो येताना एक अडव्हेंचर पार्कचा बोर्ड दिसला. तिघांनीपन कधी असलं काही पाहिलं नव्हतं. पण जिज्ञासेपोटी आम्ही त्याबोर्डपासून आत गेलो. जवळपास १किमी आत गेल्यावर अडव्हेंचर पार्क आम्हाला सापडलं. ऊन चांगलंच तापलेलं होतं त्यात गेल्याबरोबर आम्हाला थंडगार पाण्याचा माठ दिसला. तिघांनीपन मनसोक्त पाणी पिल्यानंतर मग विचारपूस केली काय असतंय इथे वगैरे. मला थोडा अंदाज होता कि खेळ वगैरे असतात पैसे देऊन खेळायचे. पण तिथल्या व्यवस्थापकाने ९०० प्रति व्यक्ती शुल्क सांगितल्यावर जरा तिघांच्याही डोक्यावर आभाळ आलं. पण पार्क तर पाहूनच जायचं होत. व्यवस्थापकबरोबर बोलत बोलत मी सर्व डिस्काउंट वगैरे विचारून घेतले. त्याला सांगितलं कि आपली शिक्षणसंस्था आहे एक त्याची ९०-१०० मुलांची ट्रिप इकडं काढायचा विचार आहे. पण तुमचा पार्क न बघता काही त्यांना बोलू शकणार नाही. ते गाजर पाहून व्यवस्थापक आम्हाला आत घेऊन गेला आणि पूर्ण पार्क तसेच त्यांच कॅन्टीन फिरून दाखवलं. १००एकर मध्ये वसलेलं ते पार्क होत. खूप सारे खेळ होते. एका कंपनीकडून आलेले ७०-८० लोक त्या खेळांचा आनंद लुटत होते, ४०-५०कामगारांचा स्टाफ तिथं कार्यरत होता.
सर्व पार्क फिरून आम्ही बाहेर आलो परत नक्की यायचं आश्वासन देऊन पुन्हा एकदा माठातील थंड पाण्याचा आस्वाद घेऊन निघालो ते परत थेट राजवाड्यात येऊन बसलो. तेवढ्यात तिथं त्यांचा वॉचमन आला. आम्ही त्याला ५-१०मिनिट मस्का मारला. भाऊंनी आम्हाला आतलं दार उघडून पूर्ण राजवाडा दाखवला. कसल्याही प्रकारचा फॅन किंवा ए.सी. नसताना ती वास्तू रणरणत्या उन्हातही एकदम थंड होती. पाहत पाहत तो आम्हाला वाड्याचं ऐतिहासिक महत्व सांगत होता तसेच तिथं झालेल्या हिंदी मराठी चित्रपटाच्या शूटिंगबद्दलही त्याने सांगितलं. त्यात प्रामुख्याने बाजीराव मस्तानी, मुंबई पुणे मुंबई २, गुरू इ. चित्रपटांचा समावेश होता. पूर्ण वास्तू कोरीव कामाने सजलेली होती. अत्युच्य दर्जाचे वास्तुशास्त्र होते . एवढं सगळं पाहून तृप्त झालेल्या मनाने आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला निघालो तर सकाळचे जिगरी दोस्त तिथं पुन्हा खेळायला आले होते. १ मॅच खेळण्याची विनंती त्यांनी आम्हाला केली, नाही म्हणायची इच्छा नव्हती.. पण वेळेअभावी आम्ही त्यांचा टाटा बाय बाय करून निरोप घेतला. परिक्षाकेंद्रावरून मैत्रिणीला घेऊन पुन्हा एकमेकांबरोबर झालेल्या गमतीजमती सांगत मावळत्या सुर्याबरोबर पुण्याच्या दिशेने वाटचाल आमची सुरु झाली होती.
खूप छान वाटत होत कारण सकाळी येताना डोक्यात असंख्य प्रश्नांचे काहूर माजलेले असताना जाताना मात्र चिमुरड्या जिगरी दोस्तांच्या आठवणी घेऊन, राजवाड्याचे सौन्दर्य मनात भरून आणि मैत्रिणीबरोबर मनसोक्त गप्पा मारत तृप्त मनाने घरी पोचलो होतो..

-वृषाल भोसले(Vrushal Bhosale on FB)
+91 7798809900

Group content visibility: 
Public - accessible to all site users