माळशेज

Submitted by योगेश आहिरराव on 14 October, 2016 - 02:01

अचानक शुक्रवारी दुपारनंतर माळशेज घाटाची जुणी वाट करायचे ठरले. सध्या वापरात असलेला आताचा माळशेज गाडी मार्ग नसताना पुर्वीच्या काळी याच वाटेने ये जा केली जाई. तसेच मराठ्यांच्या वसई मोहिमेत याच पुरातन घाटाने खाली कोकणात कल्याण भिवंडीकडे सैन्य गेल्याचे ऐकिवात आहे.
पावसाचे प्रमाण तसे कमीच, चला तर पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाच आहे तर या ऊन पावसाच्या खेळात रानफुले पहात मनसोक्त फोटोग्राफी करू असा हि मनसुबा होताच.
ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी सात वाजता 'झेनोश' त्याचा मुलगा 'योहान' सोबत घरी आला. मी आणि छोटी 'चार्वी' तयारच होतो. 'अश्विनी' नसताना चार्वीचा माझ्यासोबतचा हा पहिलाच ट्रेक, आत्तापर्यंतच्या प्रत्येक ट्रेकला आई सोबतच पण या वेळी बाबा आणि चार्वी. चहापाणी करून झेनोशची गाडी माझ्या घरी ठेवून माझ्या गाडीतून निघालो. वाटेत शहाडच्या पुलाजवळ आमचे मित्र 'कुणाल भावे' आणि 'प्रसाद सामंत' आम्हाला जॉईन झाले. दोघेही भक्कम हार्ड कोअर ट्रेकर. मग काय "चार फुल्ल दोन हाफ" नुसताच गोंगाट अशी आमची स्वारी माळशेजच्या दिशेने निघाली. पण खऱ सांगायचे तर वातावरण मात्र फारसे उत्साहवर्धक नव्हते, आकाशात काळे मळभ दाटून आले होते. थोडं रायता गावाच्या पुढे गेलो असु तेवढ्यात मागच्या सीट वरून योहान हळुच म्हणाला, 'पापा इसने देखो क्या किया'. अरररं चार्वीने गाडीत उलटी करून योहान आणि कुणालचे कपडे भरून टाकले. नशिबाने पेट्रोल पंप जवळच होता तिथेच गाडी नेली. पेट्रोलपंपावरच्या भल्या माणसाने तिथला एक नळ उघडून दिला, पावसाच्या अंदाजाने कपड्यांचा एक सेट सोबत होताच. मग काय मुलांना फ्रेश करून कपडे बदलून, कुणालच्या मेडीकल किट मधल्या संतुर साबणाने खराब कपडे धुण्याचा माझा आणि झेनोशचा कार्यक्रम सुरू झाला या सर्व गडबडीत एक तास गेला. मामणोलीच्या पुढे जात नाही तर पुन्हा तेच, या वेळी प्रसादचे कपडे खऱाब झाले. आत्तापर्यंत चार्वी सोबत गाडीने भरपुर हिंडलोय पण असे कधी झाले नव्हते घरातून निघताना तर एकदम उत्साहात पण आता मात्र उलटी करून चेहरा एकदम उतरलेला सोबत अश्विनी पण नाही, आता मलाच कसेतरी वाटू लागले. पण सोबतच्या भिडूंनी जराही कुरबुर न करता तिला धीर देत सांभाळून घेतले. गाडीतला राखीव पाण्याचा साठा घेऊन पुन्हा कपडे आणि गाडीची सफाई यात आणखी पाऊण तास गेला. मुरबाड पार करून शिवळेला नाश्त्यासाठी थांबलो. चार्वी ला तर काहीच खाण्याची इच्छा नव्हती जबरदस्तीने खाऊ घालणे ही योग्य नव्हते. आम्ही पोहे, आम्लेट पाव, चहा असा भरपेट नाश्ता करून घेतला. काऊंटर जवळ 'किंडर जॉय' पाहून चार्वी हट्ट करू लागली. मला तर ते किंडर जॉय मुळीच पटत नाही. अगदीच नगण्य काय ते चॉकलेट आणि काहीतरी फुटकळ खेळणं, पण लहान मुलांना त्याच भारी आकर्षण. उलटीने हैराण झालेल्या तिच्याकडे पहात शेवटी तिला घेऊन दिले लागलीच योहानने पण एक घेतले. किंडर जॉय चॉकलेट आणि त्या खेळण्यामुळे तिचा उत्साह मात्र वाढला, हेच मला हवे होते नाहितर ट्रेक रद्द करावा लागतोय की काय असे मनोमन वाटू लागले होते.
अर्ध्या पाऊण तासात तिथून निघालो, या वेळी चार्वी ला झेनोशने सोबत पुढच्या सीट वर बसविले कारण बहुतेक मागच्या सीटवर काहींना हा त्रास होतो. अर्थातच त्याने खुपच फरक पडला, पुर्ण उत्साहात येत तिची अखंड बडबड सुरू झाली. ती नॉनस्टॉप बडबड इतकी होती की त्या योहानचे चक्क डोके दुखु लागले.

वैशाखरे च्या पुढे पावसाला सुरूवात झाली, वाटेत भोरांड्याच्या दाराचा फोटो घेतला. गेल्या वर्षी जून महिन्यात नाणेघाटातून चढाई करत याच वाटेने खाली उतरलो होतो त्यावेळी घाटाच्या सुरूवातीलाच पावसाने भयंकर झोडपले होते. हिरव्यागार जंगलातला मधोमध असा वळणावळणाचा डांबरी रस्ता कापत एकदाचे थितबी गावात पोहचलो.

इथेही पाऊस सोबतच होता, ऑक्टोबर मध्ये ट्रेक करतोय की जूलै आहे असेच वाटत होते.'साबळे' मामांच्या घरा अलीकडे गाडी उभी केली.
मागे २०१३ साली 'मी' आणि 'नारायण अंकल' इथे काळुचा वोघ धबधबा पहायला येऊन गेलो होतो. त्याच वेळी हि घाटवाट वेळेअभावी करता आली नाही.आधी बरासचा वेळ कोकणकडा नळीच्या वाटेची सुरूवात यामध्येच बेलपाड्यात गेला होता असो तर या वेळी तर जमले.
मामांचा मुलाने वाटेबद्दल माहिती दिली तसाच पुढचा कच्चा रस्ता पकडून निघालो. रिमझिम पावसात घाटाची रांग आणि माथा तर पार धुक्यात गुडुप.

त्याने सांगितल्याप्रमाणे वाटेतला ओढा पार करून उजवीकडे ओहोळात शिरायचे मग डावीकडे वाट चढणीला लागेल. अर्धा पाऊण तास चालीनंतर एक ओढा आला पण उजवीकडे ठोस अशी वाट दिसत नव्हती. पण आम्हालाही जे माहित होते त्या नुसार आणि दिशेप्रमाणे आम्हाला उजवीकडेच वळायचे होते. मग ठरवले की अजुन या मुख्य कच्च्या रस्त्याने थोड पुढे जाऊन पाहू न जाणो वळसा घेऊन पुढे उजवीकडे वाट मिळाली तर. तसेच पुढे निघालो पण रस्ता काही वळण घेत नव्हता मग अंदाज आला बहुतेक हा धबधब्याकडे जात असावा. लहान मुलांना सोबत घेऊन विनाकारण चुकीच्या वाटेचा फेरा नको होता, मग कुणाल आणि प्रसाद वाट शोधायला पुढे गेले आम्ही तिथेच थांबलो. दहा पंधरा मिनिटे झाली तरी दोघांचा पत्ता नाही. मी आणि झेनोशने ठरवले की ओढ्याच्या दिशेने उजवीकडे जाऊया पुढे वाट मिळेलच. मग कॉल द्यायला सुरूवात केली तो पर्यंत आम्ही त्या ओढ्याजवळ थांबलो. अचानक गावकरी समोर आले, त्यांच्याकडून वाटेची शहनिशा करून घेतली, ओढा ओलांडून लगेचच ओढ्यातून उजवीकडे थोड अंतर जात डावीकडे शिरायचे. झाडी आणि वाढलेल्या गवतामुळे ती वाट आम्हाला हेरता आली नाही.थोडक्यात दिशेप्रमाणे आम्ही योग्यच होतो.कुणाल माघारी धावत आला,"तुम्ही पुढे जा, मी प्रसादला घेऊन येतो." झाडीतून वाट काढत डावीकडे मुख्य वाटेला लागलो. छोटा टप्पा चढून वळसा घालून रानातल्या देवळाजवळ आलो, पुरातन मुर्तींवर छप्पर घालून बाजुला चौथरा, समोरच वनविभागाने बसायला बाकडे लावले आहेत. घटस्थापना आज पहिली माळ मुर्ती समोर घट मांडले होते.

आजुबाजूला झाडी पण भरपुर, देवाची ती जागा खऱच प्रसन्नच वाटली. काही वेळातच कुणाल आणि प्रसाद आले, इथेच चिक्की बिस्किटे गुळ चणे खाऊन निघालो. वाट तिरकी वळणे घेत पुढे निघाली नेहमीचेच सह्याद्रीतील महाकाय वृक्ष, पावसाने वाढलेले गवत त्यात काही खाज आणणारी आणि काटे टोचणारी छोटी झुडपे होतीच. काही अंतरावर एक मोठा ओढा आला.

पलीकडून उजवीकडे शिरलो इथे मात्र कारवी चांगलीच बहरली आढळली जोडीला सोनकीचा बहर, पाऊस चांगलीच सोबत करत असल्याने फोटो काढायला हवे तसे मिळाले नाही. बर्यापैकी प्रशस्त अशा वाटेवर वनविभागाने ठिक ठिकाणी विश्रांतीसाठी बाकडे लावले आहेत. डावीकडे मुख्य कातळकडा आणि उजवीकडे दरी अशीच तिरकी पण सौम्य अशी चढाई त्यामुळेच बच्चे कंपनी आरामात चालत होते.

ऐकेठिकाणी थोडे धुके हटले तर उजवीकडे माळशेज घाटातला बोगद्याजवळचा पॉईंट दिसला. तो पॉईंट आमच्या पासून दोन तीनशे फूट ऊंच असेल. आम्ही अंदाज लावला तर एकूण या अंदाजे सहाशे मीटरच्या चढाईत आम्ही आत्तापर्यंत निम्नेहून अधिक अंतर सर केले होते.
घाटातल्या गाड्यांचा आणि पॉईंटवर असलेल्या गर्दीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. पाऊसाचा जोर वाढून पुन्हा धुके दाटून आले, जरी रेनकोट होता तरी आतून घामाने बाहेरून पाण्याने सर्वच जण पार ओलेचिंब. पाऊस हा सुरूवातीला जरी हवाहवासा वाटतो तरी कालांतराने हाच पाऊस कधी कधी नकोसा होतो. थितबी सोडल्यापासून अडीच तास हा तर आमच्यासोबतच होता. थंडीगारठ्याने तर मुले ही वैतागली होती. सफरचंद, चिक्की, बॉईल अंडी, बिस्किटे खाऊन छोट्या ब्रेक नंतर निघालो.

उजवीकडे धबधब्याने हलकेसे दर्शन दिले. प्रसाद आणि माझे शेवटच्या टप्प्यातला धबधब्याबद्दल बोलणे झाले, पाऊसाचा जोर असाच वाढत राहिला तर तो शेवटचा कातळटप्पा पार करणे अवघड होईल. मनाची तयारी करून चढाई सुरू ठेवली. अवघड ठिकाणी चार्वीला उचलून घेत सांभाळत पुढे सरकत होतो. कुणाल आणि प्रसादची ही या बाबतीत बरीच मदत झाली. पंधरा मिनिटातच घाटातल्या मुख्य कातळातल्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहचलो डावीकडेच गणपती बाप्पा विराजमान.
आता इथुन खरी कसोटी होती, हाच तो उजवीकडून येणारा मुख्य धबधबा पार करून डावीकडे चढाई.

प्रसाद आधी उतरून पाण्याचा अंदाज घेत पुढे गेला, वाट थोडी ढासळली होती पण वर जाऊन पुढच्या वाटेची खात्री करून परत आला. मग सावकाश चार्वी आणि योहान ला सांभाळत ते दिव्य पार करून वरच्या वाटेवर आलो, इथुन वाट सरळ डावीकडे वळून वर चढू लागली, अगदी दगडी रचाईची प्रशस्त वाट. माथा समीप आला, घड्याळात पाहिले तर अडीच वाजून गेले होते.

कुणाल आणि प्रसाद गाडीची चावी घेऊन पुढे पळतच निघाले. दोघेही नियमित सायकल चालवणारे आणि मेरेथॉन रनर, फिटनेस आणि स्टेमिनाच्या बाबतीत तर वादच नाही. 'लिफ्ट मिळाली तर बघू नाहीतर पळतच थितबीत जाऊन गाडी घेऊन वर परत येतो' असे म्हणाले. मी तर मनोमन दोघांना दंडवतच घातले.पुढच्या दहा मिनिटांतच त्या मुख्य वाटेवरून आम्ही एम टी डी सी च्या क्रॉंक्रिट रोड वर आलो. पाऊस ओसरला पण धुके मात्र हजरच, घाटमाथा तर यांचे हक्काचे स्थान.
आश्चर्य म्हणजे आम्हाला तिथे पाहून एक डिझायर स्वत:हून थांबली कदाचित लहान मुलं पाहून असेल. सावर्णे पर्यंत सोडण्यास सांगून गाडीत बसलो. वाटेत पहातच होतो कुणाल आणि प्रसाद कुठे दिसतात काय? धुक्यातून हळूहळू गाडी घाट उतरू लागली, घाटातल्या धबधब्यांवर तुरळक गर्दी काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते. घाटात थितबी नावाची एक पाटी दिसते तिच्या बरोब्बर अलीकडे हे दोघे बहाद्दर पळताना दिसले, बरेच अंतर त्यांनी कापले होते. त्यांना बळजबरीने गाडीत बसवले आणि खाली आलो, गाडीवाल्या काकांना विनंती करून आतमध्ये थितबीत सोडायला सांगितले. बरोब्बर चार वाजेच्या सुमारास साबळे मामांच्या घरी परतलो.
मुलांचे ओले कपडे बदलून,साबळे मामांसोबत गप्पा मारत घरातून आणलेला जेवणाचा डबा संपवला. मामा पहिल्यापेक्षा हि अधिक उत्साही आणि तरूण वाटले, आता ते बैठकीत आणि स्वाध्याय मध्ये जास्त रमतात याचा परिणाम असावा. सर्व आवरते घेत पाचच्या सुमारास निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. टोकावडे पर्यंत रिमझिम पाऊस होताच गाडीतल्या गार एसीत बालगोपाळ मंडळ लगेच शांत झोपी गेले. दिवसभरची तंगडतोड त्यांच्या दृष्टीने खुप होती पण तरीही जास्त त्रास न देता त्यांनी खुपच छान साथ दिली. सह्याद्री आणि हिमालयातले ट्रेक तसेच झेनोशच्या परदेशी मोहिमेतल्या गप्पा हाणत,पुरातन माळशेजच्या वाटेची धुंदमय अनुभुती घेऊन सात च्या सुमारास कल्याणला परतलो.

योगेश चंद्रकात आहिरे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन छान आहे. लहान मुलांचे कधी कधी असे होते पण. माझ्या मुलीला पण घरुन निघतांना आँडेम दिले तरी वाटेत कुठेतरी मळमळतेच. लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी एकच उपाय सूतशेखर आणी कामदुधा या आयुर्वेदीक गोळ्या प्रवासा आधीच घ्याव्यात. ( अवांतर लिहील्याबद्द्ल सॉरी )

फोटो का नाहीत? फोटो टाका की.

उपाया बद्दल धन्यवाद रश्मीजी.

फोटो का नाही ? >>> गुगल आणि पिकासा धोरण बद्दल्यापासून काहितरी गडबड होतेय.

पुढिल वेळेस प्रयत्न करतो.

सध्या हि लिन्क पहा. http://ahireyogesh.blogspot.com/2016/10/malshej-ancient-route.html