Being Parents of अमुक तमुक

Submitted by विद्या भुतकर on 4 October, 2016 - 22:53

शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना प्रत्येकवर्षी ठरवायचे, यावर्षी एकदम सुरुवातीपासून मन लावून अभ्यास करायचा. कितीही केले तरी परीक्षेच्या वेळी होणारी धावपण व्हायचीच, विशेषतः कॉलेजमध्ये. त्याप्रमाणेच सानूची शाळा, म्हणजे ती बालवाडीत होती तेंव्हापासून दार वर्षी ठरवतो, तिच्या अभ्यासाकडे, बाकी ऍक्टिव्हिटी कडे अजून जास्त लक्ष द्यायचे, वेळ द्यायचा, तरीही एखादी पेरेंट-टीचर मिटिंग चुकलीच आहे, अनेक नोटिसा अगदी शेवटच्या दिवशी सह्या करून दिल्यात किंवा एखाद्या प्रोजेक्ट्च्या वेळी द्यायचे सामान राहून गेले आहे. आणि हो ज्या दिवशी 'रेड डे' म्हणून लाल रंगाचे कपडे घालायचे असतील तेव्हा हमखास निळे-हिरवे-पिवळे घालून गेलो आहे. ती ४-५ वर्षाची असताना बरेचवेळा पुण्याच्या शाळेत एखादा अंक किंवा अक्षर २५-३० वेळा लिहून आणायचं होमवर्क असायचं. मी म्हणायचे जाऊ दे, लिहिता येतंय ना, मग कशाला ३० वेळा काढायला लावायचं? अशा वेळी टिचरकडून 'होमवर्क पूर्ण करून पाठवा' अशा नोटही आलेल्या आहेत. एकूण काय की थोडे इकडे-तिकडे झालेच आहे.

बरं नुसते शाळेतला अभ्यास नाही. त्यासोबत एखादा खेळ किंवा कलाही शिकवावी म्हटलं. पोहायला सर्दी होते म्हणून दोन-तीन वेळा राहिलं, तर एकदा हात मोडला म्हणून. कधी घर बदलले म्हणून चित्रकलेचा क्लास मागे पडून गेला. अशा एक ना अनेक गोष्टी. जागरूक आई-वडील म्हणून कितीही धावपळ करायची म्हटलं तरी काहीतरी राहून जायचेच. पण यावेळी आम्ही अगदी ठामच ठरवले, वेळच्या वेळी सर्व कामे करून, पोरांचे अभ्यास घेऊन, बाकी सर्व क्लासही वेळेत करून घ्यायचे. त्याप्रमाणे शाळेतल्या सर्व नोटिसांना वेळेत सह्या करून पाठवल्या, शाळेत लागणाऱ्या मदतीलाही भाग घेतला (PTO मध्ये). ऍक्टिव्हिटी सेंटर ला गेलो तर पोहायचे, जिम्नॅस्टिकचे आणि सॉकरचे सर्व सेशन आधीच भरून गेले होते. ice skating हा आम्हाला हवा असलेला एकमेव क्लास वेळेत मिळाला त्यामुळे ते तरी काम पूर्ण झाले होते. सानूची चित्रकला छान आहे असे आम्हाला वाटते म्हणून तिचा मागच्या वर्षी अर्धवट राहिलेला क्लासही लवकरच सुरु होणार आहे. अशा रीतीने निदान मागच्या वर्षीपेक्षा बरीच प्रगती आहे म्हणायची.

आता यात पोरीला किती पिडणार? असे विचारही अनेक लोकांच्या मनात आले असतील. बरोबर! मलाही हे असेच वाटायचे. कशाला उगाच पोरांना ढीगभर क्लासला घालायचे आणि त्रास द्यायचा? त्यामुळे बरेच वेळा माहिती असूनही आम्ही बरेच क्लास लावले नाहीत. पण यावेळी म्हटले एक प्रयत्न तरी करून बघू. आता यात होते काय की आजपर्यंत तरी असे कुठलेही गुण आमच्या मुलांचे दिसले नाहीयेत ज्यामुळे आम्ही म्हणू शकू की 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात'. त्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीत प्रोत्साहन दिले पाहिजे हे कळत नाही. आता स्वनिकला वाचनाची आवड लवकर लागली आणि तो ५ वर्षाच्या आतच बरंच छान वाचू शकतो हे कळलं. तर कधी त्याला गाणी ऐकायला प्रचंड आवडतं हेही दिसतं. आम्ही काही कलाकार नाही, अशा वेळी त्याला एखाद्या क्लासला लावूनच त्याला त्यात आवड आहे की नाही हे पाहू शकतो ना? त्यामुळे एक अभ्यासाचं क्लास, एक खेळाचा आणि एक कलेचा असे तीन क्लास झालेच. बरोबर? आजकाल अनेक पालक जागरूक राहून मुलांच्या भल्यासाठी त्यांना या सर्व क्लासमध्ये घालून प्रोत्साहन देतात. त्यात 'मला हे सर्व करायला मिळालं नाही तर मुलाला तरी मिळू दे' अशी सदिच्छाही असतेच.

आता याची दुसरी बाजू अशी की हे सर्व केल्यामुळे मुलांची दमछाक होते असेही बोलले जाते. त्यांच्यावर नको इतके ओझे लादले जाते किंवा त्यांचं बालपणच हरवलंय हेही बोललं जातं. पण खरं सांगू? एक आई म्हणून आपल्या मुलाची काय आवड असेल हे लहान वयात ओळखणे अवघड आहे. पण त्याचसोबत त्याचा कल कशाकडे असेल हे पाहण्यासाठी त्याला सर्व संधी उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. कदाचित पुढे जाऊन मुलाचा कल पाहून त्यांना त्या त्या आवडीच्या गोष्टीला प्रोत्साहन देताही येईल. पण अशा अनेक गोष्टी असतात ज्या लहानपणापासून सुरु केल्यास त्यांचा सराव चांगला होतो किंवा हात चांगला बसतो असे असेल. उदा: झाकीर हुसैन, लता मंगेशकर यांनीही लहानपणापासूनच सराव केला असेल ना? त्यांच्या घरी संगीताचं वातावरण असेल, माझ्या घरी नाहीये तर मला कसं कळणार काय केलं पाहिजे?तर आपण पालक म्हणून आपल्या पाल्याची आवड निवड ओळखणं खरंच अवघड आहे आणि ती कळेपर्यंत तरी अशा अनेक संधी त्यांना आपण दिल्याच पाहिजेत असं मला आता वाटू लागलंय.

खरं सांगू का? अगदी बाळ पोटात असल्यापासून ते जन्मानंतर पुढे त्याची वाढ कशी होत आहे हे बघायला डॉक्टर तर असतातच. पण इंटरनेटवरही बरीच माहिती मिळते, एक पालक म्हणून आपण कसं वागलं पाहिजे किंवा नाही याच्यावर ढिगाने पुस्तकं मिळतील. पुढे एखादा खेळाडू, गायक, अभिनेता आपल्या आईवडिलांच्या मताविरुद्ध जाऊन कसा यशस्वी झाला हे सांगणारे अनेक चित्रपट आणि पुस्तकंही मिळतील. पण एखाद्या मोठया व्यक्तीच्या आई-वडिलांचं एखादं पुस्तक कुणाला आठवतंय का? आता PV Sindhu च्या आई-वडिलांनी तिच्यासाठी बरीच मेहनत घेतली असणार, पण त्यांच्यावर पुढे जाऊन पुस्तक थोडीच लिहिलं जाणार आहे? किंवा मी माझ्या मुलींसाठी कसे कष्ट घेतले यावर ते लिहितील का? मला शंकाच वाटते. कितीही मोठी व्यक्ती असली तरी तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर घेतलेली मेहनत कशी घेतली असेल हे नेहमी एक कोडेच राहते. त्यांना कसं कळलं आपल्या मुलाला हे शिकवलं पाहिजे, इ?

मला असं वाटतं की भारतातही अनेक आईवडील आहेत ज्यांना आपल्या मुलाला अशा संधी द्यायच्या असतात, त्यांनी ऑलम्पिक मध्ये चांगली कामगिरी करावी असं त्यांना वाटत असेल. पण सुरुवात कुठून आणि कशी करायची? कधी ठरवायचं की माझ्या मुलाला किंवा मुलीला केवळ सोबत राहून मदत करण्यासाठी मी आहे ते माझं सर्व करियरही सोडलं पाहिजे? कुठले तरी त्याग कुणीतरी केलेच असतील ना? कोण सांगणार हे सर्व? बरं, एखाद्या 'दीपा करमाकर' ला असं वाटलं असेल ना 'माझे आई वडील मला किती त्रास देत आहेत'. पण केवळ त्यांच्या आग्रहामुळे, 'तू हे करू शकतेस' या विश्वासामुळे तिने खेळ चालू ठेवला असेल? नक्की कुठल्या वेळेला आपण थांबायचं? आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे करू द्यायचं हे कसं कळणार? स्केटिंग क्लासच्या पायऱ्यांवर बसून मी आणि संदीप बोलत होतो,"हे मोठ्या खेळाडूंच्या आईवडिलांनाही असेच त्यांना वेळेत क्लास लावले असतील का?" कुठेतरी त्यांनीही सुरुवात केलीच असेल ना? कुणाला आवडेल आपल्या मुलाची एकच आवड असताना हजार क्लासेस लावायला?

खरंच असं कुणाचं एखादं पुस्तक मिळालं तर? अशा किती आईवडिलांची पुस्तकं असतील? समजा हिंदी, इंग्रजी, मराठी सर्व भाषा मिळून २००-३०० पुस्तकं जरी असती तर त्यातलं एखादं फायद्याचं झालं असतं. जगात अनेक प्रसिद्ध व्यक्तींची किंवा त्यांच्यावर लिहिलेली हजारो पुस्तकं असतील, पण आई वडिलांवर किंवा त्यांचे स्वतः लिहिलेले मात्र जवळ जवळ नाहीच? मी तर म्हणते भरपूर पाहिजेत. निदान आमच्यासारख्या पामराला त्याचा नक्कीच फायदा होईल. आमचे आणि पोरांचेही जरा भले होईल. होय ना? असो. लेख खूप मोठा झाला. तरीही साध्य काहीच नाही. आपल्याकडे मुलं इंजिनियर झाली म्हणून त्याच्या मागे लाखो होतात आणि त्यांना मार्गदर्शन करायला हजारो क्लासेस असतात. पण मग इतक्या आई-वडिलांमध्ये 'Being Parents of अमुक तमुक' हे लिहिणारे निदान हाताच्या बोटावर मोजण्याइतकी तरी पाहिजेत ना? तुम्हाला काय वाटतं?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला काय वाटतं?

>>

पुण्याला पालक नीती परिवार ची प्रकाशने छान आहेत.

सध्या फोनेटिक्स, मँडेरिन चायनीज, चेस चे क्लासेस लोकप्रिय आहेत.

टायगर मॉमचे पुस्तक वाचले आहे का? शेवटी तिला लीव्ह द किड्स अलोन असे म्हणावे असे वाटू लागते. आठ आठ तास पियानो प्रॅक्टिस मुलांवर लादलेली. इथे एक बाई आहेत त्या फिंगरप्रिंट का काय अ‍ॅनिलिसीस करून मुलांचा कल कुठे आहे ते सांगतात. तसले काही उपयोगी पडेल

हेलिकॉप्टर पेरेंटिंग वरचे लेख पण रंजक असतात. अमेरिकेत तर बंदुक चालवायला पण शिकवणे मस्ट आहे. आता कॉलेजात अलाउड आहे ना? मुलांनी टेक्सस मध्ये अ‍ॅडमिशन घेतली तर गन्न पाहिजे.

@ विद्या भुतकर, होय! तुम्ही चांगला मुद्दा मांडलात. एखादी यशस्वी व्यक्ती घडवताना त्याच्यावर आईवडील, गुरू आणि इतरांनी कधीपासून, किती आणि कसे प्रयत्न केलेत? त्यांनी त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या कुठल्या वळणावर कोणते निर्णय घेतलेत? तेच का निर्णय घेतलेत? हे सहसा कधी उजेडात येत नाही. आणि ते समजून घेण्यात कोणी रसही दाखवत नाही. वास्तविक याचे शब्दांकन नक्कीच व्हायला हवे. ज्याचा उपयोग इतर पालक आपल्या मुलांचे भविष्य घडवण्याकरीता करू शकतील.
चांगला लेख!!! आवडला.

सुनील गावसकरच्या आई मीनल गावस्कर यांनी 'पुत्र व्हावा ऐसा' लिहिलंय.
अजित तेंडुलकर(सचिनचा भाऊ) - मेकिंग ऑफ अ क्रिकेटर

डॉ. हातवळणे ह्यांनी आपल्या मुलांना कसे घडवले ह्यावर पुस्तक लिहिले आहे. नाव "यशाचा राजमार्ग" असे काहितरी आहे.

त्यांची दोन्ही मुले - मुलगी विनया आणि मुलगा आनंद (बहुतेक) १० वी मधे बोर्डात पहिली आली. मुलगी तर १२ वी लाही पहिली आली.

अवांतर - ती मुले सध्या काय करतात ह्याची मला कल्पना नाही.

वर दिल्यात दोन्हीही पुस्तके क्रिकेट वर आहेत. त्यासाठी आधीच इतके ट्रेनिन्ग आणि बाकी सुविधा आहेत. पण भारतात एखादी कला, किन्वा वेगळा खेळ किन्वा लेखक यावर त्याच्या आई वडीलानी लिहिलेले कमीच.
मी खूप प्रयत्न करून या पुस्तकाबद्दल लिहायचं टाळलं होतं>>>मी ही. कारण मला वाटत बोर्डात येणे यापेक्षा बर्याच गोश्ती आहेत आणि मुळात मला अभ्यासापेक्षा वेगळ्या विषयावर काही असेल तर हव होता. असो.

सर्वान्चे आभार. Happy

विद्या.

आईवडिलांनी मेहेनत घेण्याआधी मुलांना एखाद्या विषयाची/खेळाची मनापासून नाद म्हणावा तितकी आवड नको का पण? का आईवडिलांनीच निवडायची क्षेत्रे?
आणि मुलाच्या/मुलीच्या भवितव्यासाठी करियर सोडून देणे वगैरे जरा टोकाचे नाही का वाटत?

वरदा, बरेच्दा मुलाला एखादी गोष्ट आवडते की नाही ते त्यानी करुन बघितल्याशिवाय कळत नाही. पोहायला अवडते का हे कळ्न्यासाठी पाण्यापाशी नेलेच पाहीजे ना? त्यामूले अशा गोष्टिचा कल कसा आहे हे कळन्यासाठी काय करायचे? आणि मला अस वाटतय की मुलाच्या भवितव्यासाठी करियर सोडून देणे वगैरे जरा टोकाचे असले तरी ते कुणीतरी केलेच असेल ना? ज्यामुळे त्या मुलला गरज अस्ताना वेळ दिला जाईल. मी स्वतः करियर वगैरे सोडणे अवघद आहे पण कुणाच्या पालकानी खरेच केलेही असेल ना? प्रत्य्के मोठ्या खेळाडुच्या मागे त्याचे कश्ट अस्तात्च पण पालकान्चा सहभाग किती?

विद्या.

अंगात एखादी कला किंवा गुण असण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे ते त्याच्यापरी असलेले पॅशन ! ते दाबता येत नाही. दाबले तरी उसळून उठतेच. आपल्या पोरात तसे काही असले तर ते दिसल्यावाचून राहणार नाही. मग आपण सर्वप्रथम ईतकेच करायचे की उगाच ते दाबायचे नाही. बाकी मग त्यांच्या यशाचा प्रवास त्यांच्यातील टॅलेंट आणि पॅशनच घडवते.

मुलाच्या/मुलीच्या भवितव्यासाठी करियर सोडून देणे वगैरे जरा टोकाचे नाही का वाटत? << मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या चांगल्या करीअर साठी आपण आपल करीयर सोडायच आणि ते त्यांच्या मुलांच्या भविश्यासाठी त्यांचे करीअर सोडतिल, मग ह्या सगळ्यात नेमका फायदा कोणाचा होणार?

सद्ध्या दर रविवारच्या 'सकाळ'मध्ये क्रीडापटूंचे पालक त्यांचे अनुभव लिहितात. ही सगळी मुलं सिंधू किंवा तेंडुलकर नसतील आज, कदाचित पुढेही होऊ शकणार नाहीत. पण या पालकांना त्यांच्या मुलांच्या खेळाकडे एवढं लक्ष का द्यावंसं वाटलं, त्यासाठी त्यांनी काय काय केलं हे त्यात नक्की असतं.

@ विद्या भुतकर, खुप छान लेख लिहिला आहे. माझीही अवस्था काहीशी अशीच झालीये. मुलाल नक्की कुठल्या बाजुला घालाव?, त्याला उगाच भरमसाठ क्लास का लवावेत?, तो मोठा झाला की त्याच तो ठरवेल- अस वाटत. तर दुसरी कड आज पुढ धावनार्‍यांच्या लीस्ट मधे आपल मुल मागे नको पडायला म्हणुन त्याला सगळ शिकवाव अस पण वाटत.

मी आजवर अनेक खेळाडूंच्या आणि त्यांच्या आईबाबांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मला जाणवलेली गोष्ट म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. आपल्या मुलाचा कल कशात आहे हे कळायला काहीही खात्रीशीर मार्ग नाही.
काही खेळाडूंनी सांगितलं की आईवडिलांनी वेगळ्या खेळात घातलं होत आणि तिथे जात असताना दुसरा खेळ आवडायला लागला आणि तिथे एकदम क्लिक झलो. काहींनी तर आपल्याला सुरुवातीला चक्क जबरदस्ती केली पण नंतर तेच इतकं आवडायला लागलं की आता तेच ध्येय झालंय असे सांगितले.
त्यामुळे आहे तो खेळ खेळायची सक्ती करावी का त्याला त्याच्या आवडीचे करण्याची मुभा द्यावी हेच कळत नाही.

पालक एका लेव्हलच्या पुढे सपोर्ट देण्यापेक्षा जास्त काही करु शकत नाहीत. मुलांची डिटरमिनेशन जास्त महत्वाची. Watch M.S.Dhoni the untold story धोनीच्या जिद्दीला सलाम........

एकच आहे, जिथे घातलं आहे तिथे मात्र पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केले गले पाहिजेत. आज काय पाहुणे आले, उद्या काय घसा दुखतोय, परवा होमवर्क आहे अशा कुठल्याही सबबी ना सांगता काटेकोर पणे शस्त पाळली गेली पाहिजे.
आणि हे मुलांना पटले पाहिजे की हे आपल्याला अवडावे म्हणून आहे, आपल्यला पुढे फायदा व्हावा म्हणून. त्यांना तर ते शिक्षा दिल्यासारखे वाटत असेल तर ते त्यांतून हजार पळवाटा शोधनारच.

चांगला मुद्दा मांडला आहे. माझा मुलगा त्याच्या बाबांकडून कीबोर्ड वाजवायला शिकत आहे. कधीकधी वाटतं की त्याला systematic शिकवावं एखाद्या क्लासला घालून, तर कधी वाटतं की मग तो कंटाळा करेल का? कंपल्सरी १ तास तेच करायचं म्हटल्यावर. ड्रॉइंग क्लासला त्याला घातलं होतं गेल्यावर्षी. तेव्हा कधीकधी तो खेळण्यात गुंतलेला असला की जायचा कंटाळा करायचा. मग त्याच्या पाठीशी नाही, तयारी करा, याचा मलाही कधीकधी कंटाळा यायचा Happy
एकूण कठीण आहे ठरवणं.