जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १०): डीडवाना- एक दुर्दैवी दिवस

Submitted by आशुचँप on 2 October, 2016 - 18:10

http://www.maayboli.com/node/60334 - (भाग 9): सरदारशहर - वालुकामय वेदना
======================================================================

नवा दिवस उजाडला, आणि कालची मरगळ झटकून टाकत मनाला सज्ज करत उठलो. आज त्यातल्या त्यात कमी त्रास व्हावा अशी मनापासून प्रार्थना केली. पण असे लक्षात आले की त्या जगन्नियंत्याला माझी परिक्षा संपवायची काय फारशी घाई नसावी.

याचे कारण प्रातविधींच्या दरम्यान मला जोरदार ब्लीडींग झाले. इतके की अक्षरश धास्तावलो मी हे काय प्रकरण?. बाहेर आल्यावर कुणालाच काही बोललो नाही पण तातडीने गुगलबाबाला विचारले. म्हणले रे बाबा, सायकलीस्टना असे होते का?
तर बाबा उवाच -
वत्सा, शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने तसेच आहारात फायबर पुरेसे न गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. तरी वेळीच योग्य ती उपाययोजना करावी.

आणि असे होणारा मी एकटाच नाही असे पण कळून आले कारण बरेच लोकांनी हे विचारले होते. ठीक आहे, फार काळजीचे कारण नाही, आज भरपूर पाणी प्यायचे आणि फायबर युक्त पदार्थ खायचे. चहा, कॉफी शक्यतो टाळायची. राजस्थानातली शुष्क हवामान कदाचित कारणीभूत असावे, त्यामुळे आता कसलाही धोका पत्करायचा नाही.

याच विचारात खाली आलो आज चक्क वेळेवर. पण हाय रे कर्मा, बाकी सगळे सुद्धा एकत्रच जमले, त्यामुळे आज बळीचा बकरा कोणच नव्हता. हॉटेलवाला मॅनेजर इतक्या पहाटेसुद्धा प्रसन्नचित्त होता. त्याने आज कुठे मुक्काम करणार, वाटेत काय काय लागेल याची साद्यंत माहीती दिली. (काय काय म्हणजे गावे, असेही प्रेक्षणीय काय नव्हतेच). आमचा एक मस्त ग्रुप फोटोही काढून दिला. चक्क चहासोबत ब्रेड बटर पण मिळाले. खरेतर मी ठरवले होते की आजपासून चहा प्यायचा नाही. पण त्या वेळी गरमागरम चहाचा कप नाकारण्याचे धाडस झाले नाही.

बाहेर पडलो, मस्त धुकट सकाळ, गार हवेची झुळुक शिरशिरी आणत होती आणि हेमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी वॉर्मअप केले. तो एखाद्या कडक शाळामास्तरासारखा सगळ्यांकडून सगळे प्रकार करून घ्यायचा आणि त्याचा उपयोग होत असल्यामुळे आम्हीही आदर्श विद्यार्थ्याप्रमाणे करायचो. (अर्थातच मास्तरांची टिंगलटवाळी करत).

इतक्या छान वातावरणात मला पायाच्या दुखण्याचा विसर पडल्यासारखेच झाले होते. आणि सुरुवातीच्या काही किमी मध्ये तर दुखले नाही त्यामुळे असा खुशीत होतो. आणि झपाझप पॅडल मारत सुसाट गँगला गाठायचा प्रयत्न करत होतो. पण लुसलुशीत हिरव्यागार गवतातून जात असताना भुजंग फणा काढून उभा रहावा तसे दुखण्याने अचानक उग्र स्वरूप धारण केले. इतके की कळ अक्षरश डोक्यात गेली.
आईग..असे करत मी सायकल बाजूला घेतली, कसाबसा उतरलो आणि सायकल सोडून चक्क रस्त्यावर लोळण घेतली. काका मागून येत होतेच आणि मी असा वेदनेने गडाबडा लोळताना पाहून ते एक क्षण भांबावलेच. काय करावे हे त्यांना समजेच ना. त्यांनी पटापट सायकल लावली आणि मला पायाला मालिश करायला पुढे सरसावले, पण मला पायाला हात लावला तरी कळ जात होती.

त्यांना म्हणल, मला तातडीने रेलीस्प्रे द्या, एक पेनकिलर द्या, काहीतरी द्या पण दुखायचे थांबवा. त्यांनी मग घाईगडबडीने स्प्रे शोधून दिला, मी तो भसाभस मारला पण दुखायचे थांबेना. गोळी घेतली आणि तसाच रस्त्यावर उताणा पडून राहीलो. नशिबाने एकही गाडी त्यावेळी जात नव्हती. किती वेळ असा पडलो लक्षात नाही पण डोळे उघडले तेव्हा काकांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरलेले पाहून मी सावरलो, उठून बसलो. पाय तपासला, क्रेप बँडेज बांधले.

पेनकिलरच्या प्रभावाखाली होतो तोपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापायचा माझा मानस होता. पण वाटेत डावीकडे एक सुंदर मंदिर दिसले. त्याचे बांधणी इतकी घाटदार होती की मला थांबल्याशिवाय राहवलेच नाही.
फार जुने नसावे, कारण रंग नवाच वाटत होता, पण प्रवेशद्वारावर मस्त शिल्पे वगैरे एकंदरीतच थाट मस्त होता. ते मंदिर होते इच्छापूर्ण बालाजीचे. आता आमचे कुलदैवतच बालाजी त्यामुळे मला फारच छान वाटले. म्हणलं,
"देवा रे ही इच्छा पूर्ण कर की काही विघ्न येऊ नयेत."
बूट काढावे लागले असते आणि वेळही गेला असता म्हणून आत न जाता बाहेरूनच काही फोटो मारले.

तिथे शेजारीच एक स्वी़टमार्ट होते, काका म्हणे त्यांच्याकडे ब्रेड बटर मिळाले तर पहा, आपल्याला मधल्या वेळेत होईल. पण हाय, कट्टर स्वीट मार्टवाला होता तो. फक्त मिठाई, गुलाबजाम आणि बर्फी. घ्यावे तरी एक पाप. त्याला तरी सुनावलेच, म्हणलं
"हमारे यहा पुणे मे स्वीटमार्टवाले ब्रेड, बटर, जॅम के साथ कोल्ड्रींक्स भी बेचते है. जरा कुछ तो व्हरायटी रख्खा करो भय्या."

त्यावर त्याने ओशाळे हसून नुसतीच मान डोलावली. अर्थात त्याचेही बरोबर होते, तिथल्या वैराण प्रदेशात च्यायला लोक दिसायची मारामार. तिथे रोज ताजा ब्रेड आणि बटर घ्यायला कोण येणार. मंदिराच्या शेजारी असल्यामुळे प्रशाद म्हणून मिठाई घेत असणार लोक.
शहरात रहात असल्यामुळे आपल्याला कितीतरी गोष्ट गृहीत धरायची सवय असते याची त्यावेळी प्रकर्षाने जाणीव झाली.

त्यानंतरचा पुढचा प्रवास हा कालचीच पुनरावृत्ती होती. तेच रुक्ष उजाड माळरान, तीच खुरटी झुडपे, तशीच घरे आणि तसलाच उकाडा. राजस्थानातून येण्याची चूक केली का असे प्रकर्षाने वाटून गेले. कारण आज फक्त तिसराच दिवस होता, आणि या उन्हाला विटलो होतो. अजून तीन दिवस याच फुफाट्यात सायकल चालवायची होती. आता सायकलिंग हा मजेमजेचा प्रवास न राहता कुठून आलो इथे, गप्प घरी फॅन लावून पडलो असतो, नस्ती खाज या वळणावर चालला होता. पण प्रवासाची हिच गंमत असते, त्यावेळी असे प्रकर्षाने वाटून जाते कशासाठी हे सगळं, पण तो खडतर प्रवास संपून घरी आल्यावर मन पुन्हा पुन्हा तिकडेच धाव घेते. आत्ताही हे लिहताना मला तो प्रवास, तीच धूळभरली घरे, तोच उन्हाचा तडाखा, डोळ्यात घामाच्या धारा जाऊन होणारी चुरचुर, फुलून आलेली छाती, भरून आलेल्या मांड्या आणि ऐकू जाणारे दिर्घ श्वासोश्वास सगळे काही आठवतयं. जणू ते सगळं अनुभवतोय.

तर याच विचारात असताना पाय ओढत चाललो होतो. आज माझा भरवशाचा साथीदार हेम माझ्यासोबत नव्हता. तो आज एकदम बांगबुंग करत पुढे गेलेला. काकाही मला आता बरे वाटत आहे बघून हळूहळू पुढे गेले. मी मग माझ्या गतीने रमतगमत सायकल चालवत राहीलो. तर कोण भेटावा तर सुह्द. त्याचा फिटनेस कमालीचा होता त्यामुळे तो इतक्या मागे कसा असा मला प्रश्न पडणार तोच त्याने मला बोटाने रस्त्याच्या बाजूला दाखवले. एक मोर निवांत धुळीत किडे टीपत चालला होता.

आता राजस्थानात मोर आणि चिंकारा दिसणे फार नाविन्याचे नाही असे मला त्याला सांगायचे होते. हे दोन्ही तिथे अतिशय पवित्र समजले जातात त्यामुळे त्यांना माणसांचे भय नसते आणि अक्षरश कळपाच्या संख्येत हरणे दिसतात हे मला माहीती होते. अर्थात त्याच्या चेहऱ्यावर इतका उत्साह ओसंडून चालला होता, मग काहीच बोललो नाही आणि हळूहळू पुढे सरकत राहीलो. पुढे ४० एक किमीवर रतनगढ ओले. इथे जैसलमेर- बिकानेर मार्गे फतेपुर (राजस्थानातले फतेपुर, फतेहपुर सिक्रीवाले नव्हे) जाणारा नॅशनल हायवे पार झाला तिथल्या तिठ्यावर सगळी गँग वाट पाहत थांबली होती.

धाबा इतक्या आत होता की वाळूतून मला सायकल आत नेताच येईना आणि मग तिथेच पार्क करून जायला लागलो तेव्हा लक्षात आले की आता सायकलसोबत चालणेही अवघड होत चालले आहे. पावलागणिक पाय दुखत होता आणि वाळूत पावले रुतवत चालताना अजूनच अवघड होते. कसाबसा धाबा गाठला आणि तिथल्या बाजल्यावर अंग टाकले.

खायला काय आहे विचारले तर सगळेजण चिप्स, कुरकरे तत्सम काहीतरी पदार्थ पोटात भरत होते आणि वर मसालेदार चहा. मी वैतागलोच, एकतर इतके सायकलींग करा आणि पोटात भरायला हा असला कचरा. सकाळचे ब्लींडींग आठवून मी चहा नकारून दुध प्यालो ग्लासभर. आणि पुढचा प्रवास आता फळांवर काढावा लागणार याची खूणगाठ बांधली कारण फायबर अजूनही काहीही पोटात गेलेले नव्हते. पाणीही वाटेत कुठे नसल्याने पुरवूनच पीत होतो.

त्या तिठ्यावर चुकण्याची शक्यता असल्याने आम्ही सुह्द येईपर्यंत थांबायचे ठरवले, पण बेटा त्या मोराच्या नादात चांगलाच गुंगला होता कारण बराच वेळ तो उगवालाच नाही. त्याला फोन करणार तोच ओबीचा फोन वाजला. आम्ही हनुमानगडला ज्या आरके पॅलेसला मुक्काम केला होता त्याच्या मॅनेजरचा फोन.
तो म्हणे "सर तुमच्याबरोबर एका रुमची चावी आलीये चुकून."
आयला, हा किस्साच झाला म्हणत सगळ्यांनी आपापले सामान तपासले तर ती वेदांगकडे निघावी का. आम्हाला खात्री होती की हे काम सुह्दचे असणार कारण तो वेंधळेपणा करण्यात पटाईत होता. असेही तो त्याच्या या खासीयतीमुळे हमखास बकरा व्हायचाच. तो अमृतसरला सायकलचे लॉक विसरला होता. ते तिथल्या मॅनेजरला फोन करून मुक्तसरला पाठवायला सांगितले. पण ते पोचायच्या आधीच आम्ही मुक्तसर सोडले मग तिथल्या माणसाला अजून पुढे कुठे पाठवता येईल का याची चाचपणी चालली होती.

बिचारा तो मॅनेजर त्याची टूव्हीलर घेऊन निघाला होता पण आम्ही रतनग़ढ गाठल्याचे कळताच पुन्हा माघारी गेला. पण आमची भंकस चालली होती त्यात सुह्दची खेचणे मेन होते. आम्ही सुहदच्या वेंधळेपणावर भरपूर तोंडसुख घेतले. आमच्या या हशाच्या खकाण्यात एक व्यक्ती आज सामिल नाहीये याची त्यावेळी जाणिव झाली नाही. ते होते घाटपांडे काका. एरवी ते खिलाडूवृत्तीने हसून दाद द्यायचे पण आज ते काहीच बोलत नव्हते.
सुह्द आला तो पण थोडा तणतणत. म्हणे मी इतका मागे राहीलो होतो तर कुणीतरी थांबयला हवं होतं पण कुणीच थांबले नाही. म्हणलं सगळ्यात शेवटी मी होतो, मी थांबलो असतो तर अजून उशीर झाला असता. त्यावर तो काहीच बोलला नाही.

रतनगढ तसे बऱ्यापैकी फेमस असावे कारण तिथे बऱ्याच जुन्या हवेल्या आणि वाडे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर देवळेही आहेत. इतकी की राजस्थानची वाराणसी असा उल्लेख आंतरजालावर सापडला. बिकानेरच्या महाराजांनी आपला मुलगा रतन याच्यानावे इथे किल्ला बांधला आणि गावाचे नाव पडले रतनगढ. अर्थात किल्ला नामक काही तिथे शिल्लक नाही. मला हे सगळे बघायला जाम आवडले असते, पण आजही १४० चा पल्ला होता. वेळही नव्हता आणि आता उत्साहही नव्हता.

त्यामुळे गावाला बायपासकरून पुढे निघालो. आता हेम माझ्या सोबत होता. पुढे २० एक किमी अंतरावर एक वळण लागले, तिथे छापर गावाच्या इथे वेदांग आणि सुह्द थांबून फोटो काढताना दिसले. बघितले तर काळवीटांचा एक कळप निवांत चरत होता.

सोबत चिंकाराचाही कळप होता

तशी बरीच लांब होती त्यामुळे फोटो काढायचा निष्फळ प्रयत्न केला आणि माझ्या विश्रांतीदरम्यानच्या उद्योगाला लागलो. ते म्हणजे बँडेज सोडणे, पायाला मोकळा श्वास घेऊ देणे, जरा हलक्या हाताने मसाज आणि मग पुन्हा रेलिस्प्रे मारून, बँडेज बांधून शुज चढवून पुढच्या टप्प्यासाठी सज्ज व्हायचे.

असेच थांबत चालवत लळत लोंबत सायकल चालवत राहीलो. पुढे सुजनगढच्या अलीकडे एका धाब्यावर गँग थांबलेली दिसली. चला काहीतरी खायला मिळेल याआशेने मी ही गेलो तर पुन्हा तोच प्रकार. चिप्स, फरसाण. च्या गावात असलं डोकं सणकलं. म्हणलं हे काय आहे, वैताग. दुध द्या म्हणलं तर नाहीये म्हणे. आधीच उन्हाने जीव नकोसा झाला होता, पायाच्या दुखण्याने हैराण आणि त्यातून नीट खायला नाही मग या त्रिवेणीसंगमाचा परिणाम झालाच. तडकाफडकी उठलो आणि सायकल काढून निघालो सुद्धा.
काका मागून आले, म्हणे "अरे थांब सगळेच निघू." मी रागाच्या भरातच होतो, म्हणलं "तुम्हाला काय करायचे ते करा, मी चाललोय. या पद्धतीने मी सायकल चालवू नाही शकत उपाशीपोटी."

आणि त्या सणकीतच सायकल चालवत निघालो. असा राग खदखदून आला होता की अजून कुणी काही बोलले असते तर भांडणेच झाली असती. मनात निगेटीव्ह विचारांनी पूर्ण गर्दी केली होती. झक मारली आणि आलो. अशाच मनस्थितीत एक मोठे रेल्वे क्रॉसिंग पार करून पुढे आलो. दहा-पंधरा किमी झाले असावेत. सुजनगढचा बायपास होता तो, आणि रस्त्याचा घोळ होता.
त्यामुळे झक्कत मला मागच्यांची वाट बघत थांबणे आले. रस्त्याच्या बाजूला सायकल लावली, तिथेच बसलो आणि आजूबाजूला कुणी नाही हे पाहिले आणि गुढग्यात मान घालून हमसून हमसून रडलो.
गेल्या दोन तीन दिवसांच्या तीव्र वेदना, अशा परिस्थितीत रोज १५० किमी सायकल चालवण्याचा शीण, अपुरी झोप, त्यातून ब्लिडींग, उष्णता वाढत चाललेली आणि मनावर या सगळ्याचा आलेला ताण, बाकी कुणाला नाही आपल्यालाच एवढा त्रास होतोय म्हणजे आपण अशा मोहीमा करायला योग्य नाही, अशी एक कमीपणाची भावना यामुळे मला अश्रू आवरताच येईनात.

हीच ती जागा, हाच तो क्षण

पण त्याने एक बरे झाले, मनावरचे मळभ साचले होते त्याचा निचरा व्हायला थोडी मदत झाली कारण डोळे पुसुन जेव्हा इकडे तिकडे पाहिले तेव्हा बरेच हलके हलके वाटले. घरच्यांची तीव्रपणे आठवण झाली आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावरच घरी कळवायचे हा नियम मोडून पहिल्यांदाच दुपारी घरी फोन लावला. तोपर्यंत मी माझ्या पायाच्या दुखण्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नव्हता. पण आज त्यांना परिस्थीती सांगितली आणि आमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारून काहीतरी उपाययोजना करता येईल का विचारले. आधीच रडून बिडून घेतल्यामुळे आता मी मोकळेपणे बोललो. कारण फोनवर असे काही केले असते तर स्ट्रेट घरी यायचा हुकुम मिळाला असता.

त्यानंतर माझ्या एका पुण्यातल्या मैत्रिणीला फोन लावला. तिचे डॉक्टर फेमस ऑर्थोपेडीक होते. तिलाही त्यांचा सल्ला विचारायला सांगितला. दरम्यान गँग आलीच आणि आम्ही पुढे निघालो. पण पुढे एक धाबा लागताच त्यांनी सायकली वळवल्या आणि मला म्हणे चल जेवण करून घेऊ.

त्याच्या लक्षात होतं तर. मलाच मग मघाशी उगाच चिडल्याबद्दल वाईट वाटलं. मग झकास तुंबडून जेवलो, इथेही राष्ट्रीय खाद्य पंजाबी जेवणच होतं. त्याला आता काय पर्याय नाही. पण सगळ्यात भारी होती ती हॉटेलची पाटी.

पाटी लिहीणाऱ्याची बाई पास झाली असणार परिक्षेत त्याचा आनंद त्याने पाटीवरच लिहून काढला असणार अशी आमची भंकस सुरु झाली. बर आम्ही का हसतोय याचा हॉटेल मालकाला पत्ता लागायचे काहीच कारण नव्हते त्यामुळे आम्हाला अजूनच हसायला येत होते.

आम्ही जेवायला थांबलो होतो तेव्हा आकाश असे मस्त दुलई घेऊन पहुडले होते

उरलेली भाजी पार्सल करून घेतली, वाटेत कुणी मिळाला तर द्यावी म्हणून. तर वल्ली म्हातारा भेटला. दिसताना गरीब वगैरे दिसत होता. मी त्याच्यापाशी थांबलो, त्याला म्हणलं,
"भैया ये थोडी सब्जी है, खराब नही है, ज्यादा वाली है, आप खायेंगे क्या?"
तर एक नाही दोन नाही, नुसताच टकामका माझ्याकडे बघत राहीला.
आयला, म्हणलं याला आता हिंदी कळत नसेल तर राजस्थानीत कसे समजाऊन सांगणार.
मी मनात वाक्य तयार करत होतो, भाजीला साग म्हणतात ते पंजाबीत पण मारवाडीत काय म्हणतात. आपणो सब्जी आपो के, नाही हे तर गुजराथी झालं. Lol
मरुंदे म्हणत त्याला पिशवी उघडून दाखवली आणि मुकाभिनयावर काम चालवलं. ती भाजी घेऊन पोळीबरोबर खाल्लाची अॅक्शन करून दाखवली. आणि घेऊन जाणार का असे विचारले. मला कन्याकुमारीच्या त्या हिरोची आठवण झाली. आपल्याच देशात आपण किती असहायय् होतो अशा वेळी.

असो, तर माझा हा डंबशेरज म्हातारबुवांना कळला असावा कारण त्यांनी चेहर्यावरची सुरकुतीही न हलवता पिशवी हस्तगत केली आणि दरम्यान तिथे जमलेल्या जनतेशी चाललेला संवाद ऐकत निवांत बसले.

लडनूनच्या इथे आम्ही नागूरमार्गे जोधपूरला जाणारा हायवे सोडून डावीकडे वळलो. माझ्या आधीच्या प्लॅनमध्ये हा रस्ता होता. पण त्यात पुढे माऊंट अबूच्या बाजूने जाणारी तीव्र चढाई होती म्हणून आम्ही अलीकडेच वळलो आणि चित्तोडगढलाही स्कीप करून मध्येच भिलवारा-नाथद्वारा करत गुजरातेत घुसणार होतो.

सावल्या लांब होऊ लागल्या तसे लक्षात आले की अजूनही २५ किमी अंतर बाकी होते. त्यामुळे आजचाही सूर्यास्त रस्त्यातच बघावा लागणार होता. त्यात लान्सची सायकल पुन्हा एकदा पंक्चर झाली. तेव्हा काकांनी तोडगा सुचवला, मला म्हणे तु पुढे हो, गावात कुठे कुणी डॉक्टर मिळाला तर पहा, तोपर्यंत आम्ही येतोच. मलाही ते पटले आणि एकटाच पुढे निघालो. एकटाच असल्याने मी असाही रमत गमत जात होतो. वाटेत भास्कररावांना बाय बाय केले आणि अंधार दाटून आला तसा गावाच्या वेशीवर एका चहाच्या टपरीवर थांबलो.

ही अशी पाट्यांवरची अंतरे वाचून पोटात गोळा यायचा. अजून लई जायचय ही भावना यायची

सूर्यास्त झाला की लगेच गार वारे सुरु व्हायचे त्यामुळे अशा वेळी गरमागरम चहा हवा हवासा वाटायचा. सकाळचे गार वारे आणि संध्याकाळचेही अशा मुळे मी सगळे गरम कपडे आत पॅनिअरमध्ये न टाकता कॅरीअरवरच ठेऊन बांधून टाकायचो. त्यात जॅकेट, कानटोपी, हँडग्लोव्हज, स्वेटर असे सगळे असायचे. तर मी तिथे मस्त चहाचा आस्वाद घेत असताना एक जण चालत आला आणि सायकलवरच्या कपड्यांना हात लावून पहायला लागला.
मी म्हणलं, "क्या है?"
तर म्हणे "कैसा दिया?"
"क्या कैसा दिया?"
"ये जॅकेट"
"कैसा दिया बोले तो?"
"अरे कितने में बेचोगे?"
"अरे ओय वो बेचने के लिये नही, मेरा खुदका है"
"तो ये बॅग मे क्या है, कपडे है क्या बेचने को?"

आयला हा मला काय दारावर येऊन कपडे विकणारा समजला का. च्यायला याच्या काकाने इतक्या महाग सायकलवर कपडे विकले असतील. मी मग शिस्तीत त्याला माझी ओळख दिली. तर एकदम शरमिंदा होऊन म्हणे, अरे मुझे लगा ऐसे शो केलीये कपडे रख्खे है, आणि पसार झाला. Lol

तोपर्यंत सगळे आलेच आणि आम्ही पुनश्च एकवार अंधाऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करू लागलो. डीडवाना आले तरी आमचे मुक्कामाचे हॉटेल काही येईना. थोडे राहीले थोडे राहीले करत पूर्ण शहर पार झाले तरी च्यायला हॉटेलचे नाव नाही. आता पुन्हा हायवे सुरु झाला आणि शहरातले दिवे जाऊन पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले. रस्ता चुकलो का काय अशी शंकाही यायला लागली. त्यात लान्स, वेदांग आणि ओबी हॉटेल शोधायचे म्हणून पुढे निघून गेले. मागे राहीलो, मी काका, हेम आणि सुह्द. आम्ही आपले दोन दोनच्या जोड्या करत कसेतरी पाय ओढत निघालो. पुढे तब्बल तीन एक किमी बाजूला हॉटेल दिसले पण या ओढाताणीमुळे सगळेच वैतागले होते. त्यात ते हॉटेल अतिशय दिव्य निघाले.

इतके कळकट मळकट हॉटेल होते. त्यात सायकली बाजूला कशातरी लावल्या आणि वरच्या मजल्यावर गेलो. लक्षात आले की वरचा पूर्ण मजला आमचाच होता. कारण एक भला मोठा डायनिंग हॉल आणि त्याच्या तीन कोपऱ्यात तीन खोल्या. खात्रीने हा लग्नासमारंभांचे ठिकाण होत आणि वर आणि वधुच्या खोल्या रहायला म्हणून दिल्या होत्या.

सुह्द आणि त्याचे बाबा एका खोलीत, हेम आणि ओबी एका आणि उरलेले आम्ही एक अशी वाटणी झाली. आमच्या वाटेला आलेली खोली इतकी दिव्य होती की माझ्याकडे अक्षरश शब्द नाहीत तिचे वर्णन करायला. त्याहून दिव्य होते तिथले टॉयलेट. ज्याने कुणी हे बांधले असेल त्याला भे़टून लकडीपुलावर जाहीर सत्कार करण्याची नितांत आवश्यकता होती. एका अरुंद (इतके अरुंद की सरळ न चालता आडवे जावे लागेल इतके अरुंद) बोळकांडी, तिच्या एका टोकाला कमोड आणि या टोकाला दार. आणि तिथेच बाथरुम, एक बारकी बादली, आणि नळ आणि गिजरही. दारही पूर्ण उघडत नव्हतेच. त्या सांदटीतून आत गेलो आणि आतून कडी कशी लावावी हेच कळेना, कारण त्याचा निम्मा भाग इकडे निम्मा तिकडे असा काहीतरी होता.

मी लान्सला मदतीला बोलावले, म्हणलं जरा ही कडी कशी लावायची याचे जरा मार्गदर्शन कर पाहू. आम्ही कसेबसे आत मावलो आणि कडी लावण्याचे प्रात्यक्षिक करायला लागलो तर दारच जाम बसले. हायला, आता आम्ही दोघे आत आणि दार घट्ट बंद. जोराने ओढू म्हणले तर मागे जायला जागाच नव्हती. भिंतीला पाठ लावली तर पोट दरवाजावर येत होते. शेवटी शक्य तितके बोळकांडीत सरकलो आणि वेदांगला हाक मारून लाथ मारायला सांगितली, त्याने ताकदीने दरवाजा उघडून दिला म्हणून बरे. तेव्हाच खूणगाठ बांधली म्हणलं काहीही झालं तरी परत इथे आत येणार नाही.

काकांच्या खोलीत जाऊन मग विधी अंघोळ आदी उरकले आणि जेवायला खाली निघालो. तत्पूर्वी त्या डायनिंग हॉलचा सगळ्यांनी कपडे वाळत घालून धोबीघाट केला. असेही आमच्याशिवाय तिथे कुणी नव्हतेच त्यामुळे काहीच चिंता नव्हती.

खाली निघालो तर काकांच्या खोलीत जोरदार भांडणाचे आवाज. सुह्द आणि काका दोघांचेही आवाज एकदम चढलेले होते. बर काय झाले याचा काही पत्ताच लागत नव्हता. दारही बंद होते, त्यामुळे काय करावे हेच कळेना तसेच चुळबुळत थांबलो. मग ओबी म्हणला की आपण खाली जाऊन वाट पाहू. त्याप्रमाणे जेवायला म्हणून खाली गेलो.

दरम्यान, मला घरून फोन आला, आमच्या डॉक्टरांना नुसत्या सांगण्यावरून निदान करणे अवघड होते, पण वर्णनावरून त्यांनी अकीलीज टेंडन (achilles tendon) असावे असे सांगितले.

म्हणलं, याला उपाय काय तर म्हणे विश्रांती हेच सध्या प्रमुख. आता माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहीला किंबहुना मोहीमेतल्या सहभागावरच प्रश्नचिन्ह उभे राहीले. कारण अशा प्रकारे अजून ११ दिवस रेटून नेणे सर्वथा अशक्य होते. आणि जास्तीचा ताण दिला असता आणि काही मेजर दुखापत झाली असती तर पुढे आयुष्यभर ते बाळगत रहावे लागले असते. माझे डोळे पुन्हा डबडबायाला आले, कारण कुठल्याही परिस्थितीत मला अर्धवट मोहीम सोडून माघारी जायचे नव्हते. आजतागायत मी हे कधीच केलेले नव्हते. भले त्याला माझा अघोरी अहंकार म्हणा, पण असे अर्धवट सोडणे मला वैयक्तिक पराभव झाल्यासारखे वाटत होते. आणि दुसरे म्हणजे ही संधी परत येणार नाही हे मला माहीती होते. पण मी इतका पक्का कोंडीत सापडलो होतो की काय करावे सुचत नव्हते.

दरम्यान, काका आणि सुह्द खाली आले, निवळले असावेत असे वाटले कारण त्यांनी मग तोडगा सुचवला की आख्खी मोहीम ड्रॉप करण्यापेक्षा मी उद्या टेंपो करून डायरेक्ट अजमेर गाठावे, तिथल्या डॉक्टरला दाखवावे आणि पूर्ण दिवस आणि रात्र विश्रांती घ्यावी. जर त्याने बरे वाटले तर ठीक आहे नाहीतर मग तिथून पुण्याला जाणारी गाडी मिळवणे हाच एक पर्याय होता. अर्थात हेही मला फारसे मान्य नव्हते कारण तो बट्टा शेवटपर्यंत राहीलाच असता पण आता आख्खी मोहीम जाण्यापेक्षा ते बरे म्हणून मी तो पर्याय स्वीकारला.

त्यावर ओबी आणि वेदांगचे खेचणे सुरु झाले, म्हणे उद्या मॅच आहे, तु काय आख्खा दिवस लोळून मॅच बघत राहशील आणि आम्ही उन्हातान्हाचे सायकल चालवत राहू. तर तुला सोबत म्हणून आम्ही येतो, असेही तुला डॉक्टरकडे जायला मदत लागेलच. मलाही त्यांची गंमत कळत होती म्हणून आम्ही त्यावर भरपूर हसून घेतले. पण काका गंभीरच होते आणि जेवणानंतर मिटींग घेणार असल्याचे जाहीर केले.

वादळापूर्वीची शांतता

वरती गेलो खुर्च्या मांडल्या आणि गोल करून बसलो. आणि इतक्या दिवसात प्रथमच काकांचे एक नवीन रुप पाहिले. कितीही चेष्टा केली तरी खिलाडूपणे ती घेणारे काका आज प्रथमच चिडलेले पाहिले. पहिल्यांदा त्यांनी त्याचे व सुह्दचे काय वाजले ते सांगितले. सुह्द कायम सुसाट गँगमध्ये असायचा आणि त्यावरून काकांची बोलणी खायचा की तो मागच्या लोकांसाठी थांबत नाही. आणि आज तो मागे राहीला होता आणि त्यासाठी कुणीच थांबले नाही, त्यामुळे त्याचे म्हणणे होते की सगळ्यांना एकच नियम का नाही. मी जर रोज ओरडा खातो तर आज तुम्ही बाकीच्यांना का नाही ओरडत. त्याचेही बरोबर होते पण रोख अप्रत्यक्षपणे वेदांग आणि लान्सवर गेल्यामुळे तेही वादात उतरले. त्यांनी हिरीरीने आपली बाजू मांडली आणि शब्दाने शब्द वाढत गेला आणि आवाजही.

कन्याकुमारीच्या आधीपासून आम्ही एकत्र होतो आणि कितीही वाद झाले तरी असे आवाज, आरोप प्रत्यारोप कधीच झालेले नव्हते. आख्खा टीमच्या एकसंघपणालाच एक तडा जात असल्याचे जाणवत होते. वेदांग आणि लान्सचा फिटनेस प्रचंड होता आणि सातत्याने सराव करत असल्याने त्यांचा वेग चांगलाच होता. त्यांना गाठता गाठता आमची दमछाक होत होती. यावर त्यांचे म्हणणे होते की आम्ही प्रॅक्टीस केली आणि बाकीच्यांनी नाही केली ही आमची चूक कशी. आम्ही अजून किती हळू चालवायची सायकल. जर माहीती होते की इतके लांब जायचे तर प्रॅक्टीस करायला नको का. आता हे माझ्यावर आले. कारण मी आणि ओबीच सर्वात कमी प्रॅक्टीस करणारे. पण ओबीचा फिटनेस चांगला होता त्यामुळे तो वेग राखू शकत होता. सो, सगळ्यात दुबळा घटक मीच आणि मी ते खूपच वैयक्तिकरित्या घेतले.

आधीच मी दुखण्याने हैराण, त्यातून मोहीम सोडायची वेळ आल्याने चिड आली होती त्यात हे आरोप त्यामुळे सारासार विवेकाने सोडचिठ्ठी घेतली आणि मी मग मागचे सगळे उकरून काढले. त्यात सुह्द बाजू मांडायला लागला तर अतिशय हार्शपणे त्याला गप्प बसवले. एकंदरीतच जे चालले होते ते अतिशय वाईट होते. आम्ही इतक्या जीवाभावाचे मित्र असे एकमेकांना आरोपीच्या पिजंऱ्यात उभे करत होतो ते काळजाला चरे पाडणारे होते. Sad

काकांनी मग सुह्दवरून पण झापले, म्हणले तो काय लाफिंग स्टॉक नाहीये, सारखा बकरा करायला. तो काही बोलत नाही याचा अर्थ त्याला वाईट वाटत नाही असा नाही. ते बरोबरच होते आणि मग ओबीने वातावरण निवळण्यासाठी सुह्दची माफी मागीतली आणि यापुढे त्याची चेष्टा करणार नाही असे आश्वासन दिले, पाठोपाठ वेदांगने माघार घेतली आणि मग मी देखील. कारण कितीही झाले तरी अजून पुढे मोहीम शिल्लक होती आणि एकत्र जाणे ही आमची गरज होती आणि मूळ स्वभाव देखील. सगळ्यांनी मग गळाभेट घेऊन झालेगेले विसरायचा प्रयत्न केला.

मग मी माझ्या खदखदत्या विषयावर तोंड फोडले म्हणलं आपण काहीतरी पौष्टिक आणि भरपूर खाणे आवश्यक आहे. हे असे उपाशी पोटी मी १५० किमी सायकल चालवू शकत नाही. मला खायला द्या आणि मगच पुढे येईन मी. त्यावर वातावरण एकदमच निवळले आणि हशाचे कारंजे उसळले. Lol

मिटींग नाही म्हणली तरी इतका वेळ चालल्यामुळे ओबीची चुळबुळ सुरु झाली. त्याला झोप प्रचंड प्रिय आणि तिचा वेळ कमी होत चालल्याने त्याने सांगता केली आणि रुमकडे पसार झाला. त्याच्याकडे एक केरळीय तेल असल्याचे म्हणाला होता म्हणून ते घ्यायचा तिकडे गेलो तर हॉटेलचा एक पोरगा हजर. म्हणे ते रुमचा हिशेब करायाला मॅनेजरनी बोलावले आहे. ओबी तोपर्यंत बेडवर पसरला होता. म्हणे उद्या सकाळी करू आता. बरं, म्हणून गेला,आणि थोड्यावेळाने परत हजर, म्हणे आत्ताच बोलावले आहे. ओबीने परत त्याला पाठवले आणि दहा मिनिटात परत हजर.

आता ओबीचा फ्युज उडाला. च्यायला म्हणला या मॅनेजरच्या बघतोच त्याचा हिशेब. तिरमिरीत गेला आणि तब्बल १५-२० मिनिटांनी उगवला म्हणला मॅनेजरला चांगलेच महागत पडले मला खाली बोलावणे.
काय झाले तर म्हणे, "मी इतका घसघशीत डिस्काऊंट घेतलाय की आता खाली रडत बसला असेल. रुम प्रत्येकी दोन हजार आणि त्यात आठ लोकांचे जेवण इतके बील मागत होता. मी त्याला सगळे मिळून तीन हजार दिलेत."

हायला मी आणि हेम पडायचेच शिल्लक राहीलो, म्हणलं अरे काय मारामारी केलीस का काय.

तर म्हणे "नाही त्याला धमकी दिली आत्ताच्या आत्ता एकही पैसा न देता रुम सोडतो. इतके भिकार हॉटेल, इतके भिकार जेवण आणि लाज वाटत नाही इतके पैसे मागायला. मी जे दिले ते घेतले मुकाट्याने." Lol Lol

मी केवळ दंडवत घालायचेच बाकी ठेवले होते त्याला.

असो, तर अशा प्रकारे आजचा दिवस बराच इव्हेंटफुल झाला होता आणि उद्याची चिंता भेडसावत होतीच. पण उद्या आता मला टेंपो करून जायचे होते त्यामुळे निवांत झोपलो. उद्या परिस्थिती कशी आणि काय वळण घेईल याबद्दल मला त्यावेळी मुळीच कल्पना नव्हती.

=================================================

आजचा हिशेब....

आजही आम्ही चढावरच होतो. अगदी मंद चढ म्हणला तरी कस काढत होता. उन्ह, चढ आणि दुखणे मिळून सुपर कॉम्बो होते.

============================================

http://www.maayboli.com/node/60472 - (भाग ११): अजमेर - चमत्कार झाला की हो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली! रस्त्यावर असलेल्या चढउतारांसारखेच मोहीमेतही चढउतार येणारच म्हणा. पण तुमच्या दुखण्याबद्दल वाचून वाईट वाटल. पुढचे भाग पाठोपाठ येऊद्या.

वाचतानाच सगळे ताण तणाव जाणवत होते. पुढे कुणी मोहिम आखली तर काय काळजी घ्यायची याची मात्र माहिती झाली.
मायबोली वरचे निवडक लेख इंग्रजीतपण भाषांतरीत झाले पाहिजेत, असे आवर्जून वाटते.

बापरे फारच वाईट अवस्था आजची! पुढे काय होतेय याची उत्सुकता!

वादावादीचे ऐकूनही वाईट वाटले. पण चालायचेच! बाकी लिखाण नेहेमीप्रमाणेच मस्त व उत्सुकतावर्धक!!!

आशुचँप जितके सायकल गतीचे मास्टर आहेत तितकेच लेखणीचेही. त्यांच्या बोटातून कीबोर्डवर उमटणारी अक्षरे अक्षरशः जिवंत रुपडे घेऊन वाचणार्‍याच्या समोर येतात आणि घरी बसलेली माझ्यासारखी व्यक्तीही आपसूकच त्यांच्या पाठोपाठ चालली आहे....दुरून निरीक्षण करीत आहे त्यांच्या रोमहर्षक प्रवासाचे क्षण असेच मला वाटत गेले.

विशेषतः त्या "अकिलिज टेन्डन रप्चर" च्या त्रासाने आशुचँप यानी रस्त्यावर अक्षरशः लोळण घेतली वेदनेने ते दृश्य नजरेसमोर आल्यावर सारेच वाचक कळवळले असणार याची खात्री आहेच मला. मला तर 'ट्रॉय" मधील तो ब्रॅड पिट या अभिनेत्याने साकारलेला योद्धा अकिलिस आठवला....असाच टाचेमध्ये बाण घुसल्यावर प्राणांकित वेदनेने विव्हळणारा....[त्याच्याच नावाने या विकाराला अकिलिज टेन्डन नाव पडले]. आशुचॅम्प याचे नशीब बलवत्तर की त्यांच्या सोबतीला काकांसारखे सहकारी होते, ज्यानी अत्यंत जबाबदारीपूर्वक आपल्या सहकार्‍याची औषधपाणी पुरवून काळजी घेतली.

बाकी (मैत्रीपूर्ण म्हणावी अशी) जी वादावादी झाली त्याचेही सविस्तर वर्णन आवश्यक वाटले लेखकाला याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल. अशा प्रकारच्या सफारीमधील अनुभवांचा तो एक आवश्यक भाग बनलेला असतो.

चांगले लिहीता.
प्रवासात असे प्रसंग येतातच.कोणी चूक नसतण, पण सगळे एकमेकांवर अटॅक मोड मध्ये येतात.
तुमचा पाय आता बरा आहे का? इन सोल्स वापरताय का?

हा भाग पण छानच... एवढ्या वेदना घेऊन सुद्धा आपण आवडीचं कामाचं पूर्ण करू शकतो हे दिसल या भागात Happy ते डंबशेराज बऱ्याच ठिकाणी करायला लागत असेल ना भाषे शिवाय भावना पोहचवणे अवघड नाही आणि ते करताना पण खूप मज्जा येत असेल.

"कैसा दिया?"
"क्या कैसा दिया?"
"ये जॅकेट">>>> भन्नाट Lol Lol Lol

पुढच्या दिवसांत तरी तुम्हाला पौष्टिक जेवण मिळालं असेल अशी अपेक्षा.... Lol

धन्यवाद सर्वांना...

रस्त्यावर असलेल्या चढउतारांसारखेच मोहीमेतही चढउतार येणारच म्हणा.

>>>>>खरयं अगदी

चांगलीच परिक्षा चालू आहे की तुझी

>>>>>>हो ना, पण सांगायला आनंद वाटतो की पास झालो एकदाचा चांगल्या मार्कांनी

वाचतानाच सगळे ताण तणाव जाणवत होते. पुढे कुणी मोहिम आखली तर काय काळजी घ्यायची याची मात्र माहिती झाली.
मायबोली वरचे निवडक लेख इंग्रजीतपण भाषांतरीत झाले पाहिजेत, असे आवर्जून वाटते.

>>>>>>मलाही एका सायकल फोरमवर सांगितले होते एकाने. कन्याकुमारीचे भाग टाकले होते. बऱ्याच लोकांना उत्सुकता होती, विशेषता बँगलोर, चेन्नईच्या पण त्यांना एक अक्षर कळेना मराठीचे. म्हणे हेच आता इंग्लिशमध्ये टाका. म्हणलं, तेवढी पावर नाय. जितक्या पद्धतीने मातृभाषेत व्यक्त होता येतं तितक परक्या भाषेत नाही.

किती पारदर्शकतेने लिहिलायस हा भाग

>>>>>धन्यवाद रे

अशोकमामा - तुमचा प्रतिसाद फारच सुंदर...काय बोलू यावर आता. तुम्ही आणि सोन्याबापू याबाबतीत मास्टर लोक आहात.

कोणी चूक नसतण, पण सगळे एकमेकांवर अटॅक मोड मध्ये येतात.

>>>>होय, तो ताणच असतो जो सारासारविवेकावर मात करतो

तुमचा पाय आता बरा आहे का? इन सोल्स वापरताय का?

>>>>पाय आता बरा आहे, इनसोल वापरायचा सल्ला दिला होता पण मी कंटाळा केला. सध्या तरी कुठे मोहीम नसल्याने आरामच आहे.

एवढ्या वेदना घेऊन सुद्धा आपण आवडीचं कामाचं पूर्ण करू शकतो हे दिसल या भागात

>>>>आवडीचे असल्यामुळेच वेदना सहन करू शकलो. अन्यथा केव्हाच टाटा बाय बाय करून पसार झालो असतो.

पुढच्या दिवसांत तरी तुम्हाला पौष्टिक जेवण मिळालं असेल अशी अपेक्षा..

>>>आगे आगे देखीये होता है क्या :प

भारी लिहिला आहेस हा भाग. अगदी स्पष्टपणे इतकी मोठी मोहीम म्हणजे सगळे काही गुडी गुडी नसते तर भरपूर अडचणी येत राहतात हे प्रांजळपणे सांगितलेले आवडले. हे वाचताना काही काही वेळा आमचे लाँग रन्स ना होणारे संभाषण आठवले. इतर वेळेस आपण असे काही बोलत नसतो पण जेव्हा सगळेच जण आपल्यासारखेच कधी ना कधी त्रस्त असतात असे कळलेले असते की जरा ताण हलका होतो आणि नुसता संवाद होतो.

पुढचा भाग येऊ दे! आणि पायाचं काय झालं ते पण सांगा.

भाऊ एकच सांगतो, इतकं करुनही बघा तुम्ही लोकं पुढल्यावेळी परत पायटे हाणत परत कुठंतरी सायकली हाणणार(च) इतके मी म्हणु शकतो. आम्ही काही बोलावे अन सायकलीतले तुम्हाला काही सांगावे इतकी तर आमची लायकी खचितच नाही Happy . मला वाटते तुम्ही लोकं तंत्रशुद्ध आहातच, ह्यासोबत तुम्ही सॉफ्टस्किल्स वर सुद्धा जास्त जोर द्यावा लागेल असे सांगतो, आमच्या गां*फाड ट्रेनिंग मधे आम्ही काही सगळे हनुमान गोत्री नव्हतो सगळे ट्रेनिंग चुटकीत पार करायला, आमची ही भांडणे भें*** से शुरु अन एकमेकांवरच अनआर्म्ड काँबॅट वापरण्यापर्यंत जात असत, ज्या दिवशी असे काही होई त्या दिवशी पहिले म्हणजे उस्तादच आम्हाला ढाळ होऊस्तोवर रगडत असे, अन नंतर देत असे तो पेपटॉक. ह्यातले फिजीकल सगळे तुम्ही केले आहेतच, तरी आता पेपटॉक्स वर भर द्या, सह्रुदची तुम्ही केलेली चेष्टा ही डेलीबरेट कधीच नव्हती पण इट रिप्रेझेंट्स अ लॅक ऑफ पेपटॉक्स, त्याची चेष्टा तुम्हाला सहज एखाद्या रविवारी सकाळी दुर्गाची कॉफी पीत पण करता आली असती, कदाचित केली पण असेल तुम्हा लोकांनी, पण ट्रिप्स वर कोणाचीच चेष्टा करायची नाही हा कटाक्ष तुम्ही ह्यापुढे पाळावात ही कळकळीची विनंती.

आता प्रश्न उरतो, ट्रिप्स मधे बोलायचे काय ? तर आजुबाजुच्या प्रदेशाचा ट्रिव्हिया बोला, आपापल्या सायकलेतर छंदांबद्दल बोला, गेला बाजार स्वत:चे झालेले जुने पोपट उगाळा अन पोट दुखुस्तोवर हसा, बट नेव्हर लाफ ऑन अ बडी. आमचे आयुष्य आमच्या बडीज वर अवलंबुन असते तुमची मोहीम असते. टीम वर्कचे मर्म असते टिम. ती कायम जपायची हे मी माझ्या उस्ताद माझ्या प्लॅटुन अन माझ्या प्या-या फोर्स कडुन शिकलोय. मी काही फार जगावेगळे शिकलो नाही किंवा जगावेगळे कामही करत नाही. आज तुमची आमची पेन्/मोहीम/ टिम/ असे काही मुद्दे असलेली वेव्हलेंग्थ जुळली म्हणुन हे सांगते झालोय, राग मानु नका. बट वी सिंप्ली डोंट गो ऑन मिशन्स / टुर्स टु डिस्कस पेटी इश्युज. तिथे चर्चा कराव्यात सकस, नाही काही तर एकमेकांचे व्यावसायिक अनुभव शेयर करावेत. देवजाणे आपल्याला आपल्याच कामी येणारी एखादी खल्लास टिप मिळेल.

तुमच्या वेदनेवर मी काय बोलणार, ज्याचे त्याला भोगावेच लागते, तुमचे कौतुक आहे की ती वेदना असुनही तुम्ही अतिशय नेटाने मोहीमेचा विचार करत होतात. विलपॉवर बद्दल तुम्हाला पुर्ण मार्क्स आमच्यातर्फे , तुम्हाला कायमच एक जवळचा मित्र मानत आलोय म्हणुन हक्काने तुम्हाला काय करायला लागेल तितकेच बोललोय, बाकी टिम मेंबर्सच्या लकबी सुद्धा तुमच्या लिखाणातुन अतिशय स्वतंत्रपणे विना बायस लक्षात येतातच फक्त कोणाला (त्याची इच्छा आहे की नाही हे माहीती नसताना) उगाच ज्ञानामृत पाजत बसायला मी काही अजुन बुआ बापु झालेलो नाही. संघ भावनेविषयी आम्हाला खास प्रशिक्षणे असतात, पुढे मागे जर एखादी मोहीम असली, अन तुमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर(च) मी अश्या प्रचंड शारिरीक अन मानसिक स्ट्रेसच्या क्षणी त्या पळाला कसे हँडल करायचे ह्यावर उगा २ शब्द एक मित्र म्हणुन नक्कीच सांगु शकेन.

उणेअधिक माफी असावी

आगाऊपणा जरा जास्तच झालाय,
पण उस्फुर्त आलाय

(आगाऊ) बाप्या

मला तुमच्या दोन्ही मोहिमा आवडल्या. तुमचे कौतुक आहेच. पण मी थोडे मला काय वाटते ते प्रामाणिकपणे लिहितोय.

अ‍ॅज अ सायकलिस्ट - इतर लोकांच्या तुझ्या राईड कडे बघण्याचा आणि माझा ह्या राईड कडे बघण्याच्या दृष्टी मध्ये खूप फरक आहे. इतरांना तू रोज १५० किमी पार केले हेच मुळी मोठे कारण आहे कौतुकाचे. आणि ते बरोबरही आहे. कारण सलग १५ दिवस रोज १५० किमी चालवणे म्हणजे जोक नाहीच. पण मी लिहितोय ते थोडे गुडी गुडी नाही, कारण मी ही ह्याच क्षेत्रातला आहे.

मला वाटते अनेकांनी, स्पेशली तू ह्या दोन्ही राईड साठी फारसे शारिरीक प्रिपरेशन केले नाही. का? तर ते १५० किमी तुम्ही सकाळी सकाळी चालू करून पार संध्याकाळ, कधी कधी रात्री मुक्कामावर पोचायचा. शिवाय खाणे निट नसल्यामुळे शरीराची रिकुपमेंट नीट व्हायची नाही. तश्यात परत आणखी १५०, मग परत उशीर, दुखापत वगैरे हे चक्र चालू.

मे बी मी असलो असतो ते हे १५० किमी ५:४५ - ६ - सव्वसहा तासात पार करायचा प्रयत्न केला असता. ( निव्वळ राईड टाईम ) किंवा जे १०० किमीचे टप्पे आहेत, ते ४ ते ४:३० तास. ( अर्थात तुमच्या सोबत सामान असते, हे मान्य, ते धरुनच मी मला आयडियल वाटलेले वेळ लिहित आहे. )

मुख्य म्हणजे ह्यातील ऑलमोस्ट अनेक वाक्यं मागच्या राईड मधलेच आहेत असे वाटतात. फास्ट गँग पुढे, तू मागे वगैरे . त्यामुळे तर आणखी थोडा त्रास झाला वाचायला. कारण त्या मागच्या राईडच्या चुकांमधून शिकणे आवश्यक होते. जे निदान सायकलच्या स्पीड मध्ये झाले नाही

तू पुढची जी राईड करशील तिच्या निदान ३ महिने आधी सरावाला सुरूवात केलीस. (सिरियसली) तर अशक्य नाही. उल्ट तुम्ही उरलेला वेळ जास्त आनंदात घालवू शकता. शारिरीकआणि मानसिक ताण कमी होईल ( मल्टी डे चे उदाहरणच द्यायचे तर माझ्या कैलास ट्रेक मध्ये मी अन पग्या सकाळी बर्‍याच वेळा १०-११ पर्यंत मुक्कामी पोचायचो. पण उरलेले पब्लिक पार संध्याकाळच्या चहा पर्यंत येत राहायचे. दुसरे दिवशी परत ते थकलेले असायचे अन आम्ही ५-६ लोकं एकदम फ्रेश - सो बिन देअर ड्न दॅट Happy )

सॉरी फॉर द नॉट सो पॉझिटिव्ह कॉमेंट.

तुम्ही लोकं अश्याच अनके राईड खरच करत राहा. पण तू मात्र हे वाचून नाराज व्हायच्या ऐवजी आणखी तयारी करशील तर पुढच्या राईड मध्ये आम्हाला, तू तिथे पहिले पोचलास, व तिठ्यावर लोकांची वाट बघत बसलास, हे लिहिलेले वाचायला आवडेल.

-

तुझे प्रामाणिक लेखन आवडले. असेच अनुभव नंतर पुढे आयुष्यामध्येही निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा रोल बजावजात.

सोन्याबापू आणि केदार दोघांचेही प्रतिसाद (वेगवेगळ्या कारणांकरता पण) अतिशयच आवडले आहेत.

अगदी निखळ लिहिलंयस. खूप चिकाटी आहे तुझ्यात. तुमचा प्रवास इंटरेस्टींग होत चाललाय. सफरींचा बेत ठरवताना तुम्ही कोणकोणत्या बाबी ध्यानात घेऊन आखणी करता, त्याबद्दलही एकदा लिही.

सोन्याबापू आणि केदारचे इंपुट्स खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या पुढच्या सफरी आणखी आनंदाच्या होतील त्यामुळे.

खूप आवडला भाग.

ही एक सायकलमोहीम होती, शर्यत नव्हती. त्यामुळे नेहमीच सेम पर्सन मागे असणं, सेम पर्सन पुढे असणं हे मॅटर करत नसावं. मुक्कामाला पोचणं महत्त्वाचं. आणि नुसतंच रप्पारप सायकल हाणत मुक्कामावर जाणं हेही अतिरेकीच. जाताजाता फोटो काढत जाणं, थोडे थांबे घेत जाणं हेही हवंच, असं मला वाटतं.

प्लॅनिंग रॉ असू शकेल, पण एवढ्या दीर्घ अंतराच्या मोहीमा एंजॉय करत झाल्या तरच चिरस्मरणीय राहतात.

अहो काय हे . तब्येतीस त्रास म्हणजे अवघडच की. असे होते पण. छान लिहीले आहे. मी अश्या एकाकी वेळा रडण्याच्या खूप अनुभवल्या आहेत. व पुढे जाउन काम केले आहे. त्यामुळे एकदम अगदी अगदी झाले.

बाप्पु कसलं भारी लिवलय तुम्ही. जबराट....तुमचा एका प्रतिसाद नाही आख्खा लेखच आहे टीम मॅनेजमेंटसाठीचा.
लिहीलेला शब्द न शब्द पटला.

पण ट्रिप्स वर कोणाचीच चेष्टा करायची नाही हा कटाक्ष तुम्ही ह्यापुढे पाळावात ही कळकळीची विनंती. नेव्हर लाफ ऑन अ बडी. आमचे आयुष्य आमच्या बडीज वर अवलंबुन असते तुमची मोहीम असते. टीम वर्कचे मर्म असते टिम.

अर्थात तुम्ही म्हणताय ते आम्ही अनुभवातून शिकलो, पण सुदैवाने आमच्या मैत्रीचा धागा इतका बळकट आहे की कसल्या वेगळ्या उपाययोजनांची गरज पडली नाही. एक एकत्र कुटुंब असेही म्हणता येईल. त्यामुळे आम्ही सर्व बडी अजूनही एक टीमच आहोत आणि नुकतेच पुणे अलीबाग पुणे अशी एक तीन दिवसांची छोटेखानी मोहीमही करून आलो. पण तुमचे हे पेपटॉक नक्कीच लक्षात राहण्यासारखे.

केवळ सायकल मोहीमेत नाही, तर भटकंतीदरम्यान, आणि अॉफिस कलिग्ससोबतही अंमलात आणण्याची आवश्यकत आहे. आणि मित्र मानताय तर मित्राच्याच नात्याने खात्री देतो की हे माझ्याकडून यापुढे जरूर पाळले जाईल.

संघ भावनेविषयी आम्हाला खास प्रशिक्षणे असतात, पुढे मागे जर एखादी मोहीम असली, अन तुमच्या सगळ्यांचे एकमत झाले तर(च) मी अश्या प्रचंड शारिरीक अन मानसिक स्ट्रेसच्या क्षणी त्या पळाला कसे हँडल करायचे ह्यावर उगा २ शब्द एक मित्र म्हणुन नक्कीच सांगु शकेन.

होय आता तुम्हाला यावेच लागेल. मी हक्काने बोलावून घेणार आहेच तुम्हाला. तुमच्या लिखाणातून उलगडलेले बापू मला प्रत्यक्ष भेटून बघायचे आहेत. यु आर मोस्ट वेलकम बडी. एनी टाईम.

आगाऊपणा जरा जास्तच झालाय,
पण उस्फुर्त आलाय

या उस्फुर्त आगाऊपणाची पेनल्टी योग्यवेळी वसूल करण्यात येईल. काळजी नसावी. Happy

केदार - मी नाराज मुळीच नाही. काही कारण नाहीच नाराज व्हायचे पण तुझा राईड कडे बघण्याचा आणि माझा ह्या राईड कडे बघण्याच्या दृष्टी मध्ये खूप फरक आहे.

जेव्हा आपण एखादी मल्टी डे एक्पीडीशन करतो तेव्हा उ्ददीष्ट असते की तिथला अनुभव घेण्याचे. या राईड सायकलवरून करण्याचे मु्ख्य ध्येयच ते आहे की निवांतपणे जात, सभोताल अनुभवत, लोकांची भेटत, बोलत, तिथल्या स्थानिक बाबी न्याहाळत जाता यावे. जर नुसतेच जम्मु पुणे करायचे असते तर मग सायकल कशाला, बाईक, कारने सुद्धा करता आले असते.

मे बी मी असलो असतो ते हे १५० किमी ५:४५ - ६ - सव्वसहा तासात पार करायचा प्रयत्न केला असता. ( निव्वळ राईड टाईम ) किंवा जे १०० किमीचे टप्पे आहेत, ते ४ ते ४:३० तास.

मी किंवा आमचे बाकी मेंबर्स काय एक्सपीडीशन कडे एक्पीडीशन म्हणूनच पाहतो. नुसतेच वेगाने जायचे असते तेव्हा आमचे लोक शर्यतीत भाग घेतात किंवा बीआरएम करतात. तिथे तु म्हणतोस ते बरोबर आहे. इकडे तिकडे न बघता, मान खाली घालून ६ तासात जर मुक्कामाला पोचायचे असेल तर जम्मु पुणे करण्याला किंवा कन्याकुमारीला जाण्याचा उपयोग काय. त्यापेक्षा मग दहा दिवस नुसते पुणे कराड पुणे करत रहावे ना.

मुख्य म्हणजे ह्यातील ऑलमोस्ट अनेक वाक्यं मागच्या राईड मधलेच आहेत असे वाटतात. फास्ट गँग पुढे, तू मागे वगैरे . त्यामुळे तर आणखी थोडा त्रास झाला वाचायला. कारण त्या मागच्या राईडच्या चुकांमधून शिकणे आवश्यक होते. जे निदान सायकलच्या स्पीड मध्ये झाले नाही

बेसिकलीच मी सावकाश, रमत गमत जाण्याला प्राधान्य देतो. इथेच असे नाही ट्रेक्सलाही. माझे आजवर १००च्या वर किल्ले झालेत, पण मी एकदाही धावत पळत भोज्जा शिवल्यासारखा ट्रेक केला नाही. तेवढी धावाधाव आपण नेहमीच्या आयुष्यात करतोच की. मग निसर्गात जाऊन पण धावाधावच करायच असेल तर मग आपण तिथे जाऊन काय मिळवले असा प्रश्न मनात येतो.

माझ्या कैलास ट्रेक मध्ये मी अन पग्या सकाळी बर्‍याच वेळा १०-११ पर्यंत मुक्कामी पोचायचो. पण उरलेले पब्लिक पार संध्याकाळच्या चहा पर्यंत येत राहायचे.

दिवसभराचा ट्रेक सकाळच्या काही तासात संपवून उरलेला वेळ रुमवर घालवण्यात तुम्हाला काय मिळाले आणि दिवसभर थकून भागून का होईना पण त्यांनी काय मिळवले हा एक संशोधनाचा विषय आहे. कदाचित त्यांच्याकडे लक्षात राहणारे आणि सांगण्यासारखे जास्त प्रसंग असू शकतील.

थोडक्यात सांगायचे झाले तर आम्ही असे लोक आहोत की ज्यांच्यासाठी

जर्नी इटसेल्फ इज ए डेस्टीनेशन हा मोटो आहे.

शारिरीक प्रिपरेशन बद्दल बोलायचे झाले तर माझ्या परीने जितके शक्य तितके केले. आणि जरी पुढे फिटनेस वाढला तरी मी उगाचच बांगबुंग जाऊन लवकरात लवकर राईड संपवेन याची शक्यता नाही.

तू तिथे पहिले पोचलास, व तिठ्यावर लोकांची वाट बघत बसलास, हे लिहिलेले वाचायला आवडेल.

राग मानू नकोस पण मला हे नाही आवडणार. जरी मी हे केलेल असलं (गोवा राईडला त्यातल्या त्यात लेटेस्ट) आणि कदाचित पुढेही केलं तरी मी कसा वेळेच्या आधी आलो, मग मागून बाकीचे कसे धापा टाकत आले, आणि मला कसे वाट पाहत राहवे लागले, बाकीचे कसे कमी प्रिपेअर्ड होते असे सेल्फ बोस्टींग लिखाण माझ्याकडून होणार नाही. आणि मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीची नावे टाकून तर मुळीच नाही. त्यापेक्षा मी न लिहीणे पसंत करीन. शेवटी स्वभाव ज्याचा त्याचा.

तुझ्या सुचना चांगल्या आहेत पण माझ्या आत्ताच्या परिघात त्या अंमलात आणण्यासारख्या नाहीत. पुढे मागे कधी बीआरएम वगैरे केली तर नक्कीच विचार करीन.

धन्यवाद.

आमचे जासूस तुमच्या घरापर्यंत पोचू शकतात.

मी पण जासूस लाऊन तुम्ही कोण असावे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. Happy नाहीच जमले. ओबीच्या दुकानात भेटलेले ते तुम्हीच होता का. पण तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही लंडनस्थीत असल्याचे दाखवले आहे. मी सॉलीडच बुचकळ्यात पडलो आहे.


अगदी स्पष्टपणे इतकी मोठी मोहीम म्हणजे सगळे काही गुडी गुडी नसते तर भरपूर अडचणी येत राहतात हे प्रांजळपणे सांगितलेले आवडले.

अगदी अगदी, हा भाग इतका तपशीलवार लिहीण्याचे हेच प्रमुख कारण होते.

सफरींचा बेत ठरवताना तुम्ही कोणकोणत्या बाबी ध्यानात घेऊन आखणी करता, त्याबद्दलही एकदा लिही.

पहिल्या दोन भागात त्याबद्दलच सविस्तर दिले आहे.

आणि नुसतंच रप्पारप सायकल हाणत मुक्कामावर जाणं हेही अतिरेकीच. जाताजाता फोटो काढत जाणं, थोडे थांबे घेत जाणं हेही हवंच, असं मला वाटतं. प्लॅनिंग रॉ असू शकेल, पण एवढ्या दीर्घ अंतराच्या मोहीमा एंजॉय करत झाल्या तरच चिरस्मरणीय राहतात.

यु सेड इट, नची

ह्यात निव्वळ राईड टाईम हे मुद्दाम स्पेसिफाय केले आहे. तू जे टाईमिंग देतो आहेस, ते सायकल थांबली की थांबणारे आहे. मी जेंव्हा निव्वळ राईड टाईम लिहिले आहे तेंव्हा, फोटो काढू नका, इकडे तिकडे बघू नका असे त्यात अभिप्रेत नाही. कारण ते अ‍ॅपच तसे आहे, जे आपण थांबलो की ते ही क्लॉ़क थांबवते.

त्यामुळे रस्त्यावरचे अनुभव घेणे, थांबणे ह्याला मुळी ना नाहीच.

आनंदयात्रीचे ठिक आहे कारण त्याला हे अ‍ॅप माहिती आहे की नाही, तो कसे वापरतो हे मला माहिती नाही, पण
स्टराव्हा अ‍ॅटो पॉ़ज क्लॉक थांबवते हे तुलाही माहिती आहे नी मलाही. त्यामूळे "यु सेड इट, नची"ला तसा काही अर्थ नाही. कारण तो वेळ त्यात गृहित धरलाच जात नाही. हवे तेवढे थांबावे, हवे तेवढे फोटो काढले तरी राईड क्लॉक मध्ये तो वेळ नसतोच.

मग मागून बाकीचे कसे धापा टाकत आले, आणि मला कसे वाट पाहत राहवे लागले, बाकीचे कसे कमी प्रिपेअर्ड होते असे सेल्फ बोस्टींग लिखाण माझ्याकडून होणार नाही.

>> इट इज नेव्हर अबाउट बोस्टिंग, इट इज अबाउट सेल्फ रिलायंस. मी आधी आलो, हे म्हणण्यात, "दुसरे कमी प्रिपेअर्ड आहेत" असा अर्थ होत नाही.

असो ! पुढच्या राईड साठी शुभेच्छा !

मीही राईड टाईम बद्दलच बोलत होतो. सहा तासात १५० किमी करण्यासाठी ताशी २५ चा सरासरी वेग पाहिजे. आणि मी याचबद्दल बोललो की इतका किंवा यापेक्षा जास्त वेग बीआरएम साठी ठीक आहे.

सायकलवर १२ किलोपेक्षा जास्त वजन असताना, राजस्थानसारख्या कमालीच्या रुक्ष, कडक उन्हाच्या प्रदेशात, कमालीचे हेडविंड्स असताना २५ किमी चा वेग हा जास्त आहे.

रप्पारप सायकल मारत जाणे, आणि निवांत पणे गप्पा मारत, सायकल चालवण्याचा आनंद घेत जाणे यात फरक आहे. इथे तुम्ही किती वेगात गेला किंवा किती राईड टाईममध्ये पूर्ण केले याला महत्व नसून तुम्ही त्यादरम्यान काय अनुभवले याला आहे.

मी आधी आलो, हे म्हणण्यात, "दुसरे कमी प्रिपेअर्ड आहेत" असा अर्थ होत नाही.

माझ्या कैलास ट्रेक मध्ये मी अन पग्या सकाळी बर्‍याच वेळा १०-११ पर्यंत मुक्कामी पोचायचो. पण उरलेले पब्लिक पार संध्याकाळच्या चहा पर्यंत येत राहायचे. दुसरे दिवशी परत ते थकलेले असायचे अन आम्ही ५-६ लोकं एकदम फ्रेश

या वाक्याचा मला उलगडलेला अर्थ तोच आहे. आता अजून काही वेगळा असेल तर माहीती नाही.

Pages