बोलायला पैसे पडत नाहीत !

Submitted by विद्या भुतकर on 26 September, 2016 - 10:15

माझं कामच असं आहे, प्रश्न विचारण्याचं. मी बिझनेस ऍनालिस्ट म्हणून काम करते. त्यात करायचं काय असतं? तर एखाद्या नवीन किंवा जुन्याच सॉफ्टवेरसाठी त्याच्या यूजर्सच्या ज्या काही मागण्या आहेत, अपेक्षा आहेत ते सर्व समजून घ्यायचं, लिहायचं आणि पुढे डेव्हलपर्स आणि टेस्टर्सना समजवायचं. बरं ते तिथे थांबत नाही, पुढे जाऊन आपण जे काही समजून घेतलंय तेच क्लायंटला मिळालं का नाही हे तपासून पाहणे. आता या सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे 'प्रश्न विचारणे'. कुठलीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही. उदाहरणार्थ, 'अरे आता याला घर हवंय म्हणजे पूर्वेला तोंड असलेलंच बघत असेल'. तर आता पूर्वेला दरवाजा असलेलं घर ही मागणी कितीही कॉमन वाटली तरी विचारलेलं बरं असतं. कोण जाणे एखादा रात्री काम करणारा असेल आणि त्याला सकाळी घरात उजेड नको असेल तर? विचारलेलं बरं ना? त्यामुळे छोट्या छोट्या बाबतीतही प्रश्न विचारणे किंवा एखादी गोष्ट बोलणे, स्पष्ट विचारणे हे महत्वाचं.

तर मुद्दा असा की विचारायला पैसे पडत नाहीत. साधी गोष्ट, आता कित्येक कार्यक्रमात असं होतं की शेवटी एखादीच पोळी शिल्लक आहे किंवा थोडीच भाजी शिल्लक आहे, लोक अजूनही जेवतच आहेत. अनेकदा मग बाकी कुणाला हवी असेल म्हणून कुणीच ती थोडी राहिलेली पोळी किंवा भाजी घेत नाही आणि शेवटपर्यंत तशीच राहते. पण तुम्ही विचारू शकता ना,'कुणी घेणार आहे की मी घेऊ?' इतकी छोटीशी गोष्ट, पण विचारायला धजावत नाहीत. लोक काय म्हणतील? आता हे अगदीच घरगुती उदाहरण झालं. पण लहानपणापासूनच शाळेतही कित्येकदा मुलं प्रश्न विचारायला पुढे होत नाहीत. आपला प्रश्न चुकीचा असला तर? कुणी हसले तर? त्यामुळे मला वाटतं की प्रश्न विचारायलाही धाडस लागतं. पण अशावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बोलायला पैसे पडत नाहीत, विचारून टाकायचा. जास्तीत जास्त काय होईल? जरा वेळ हसतील किंवा काय प्रश्न विचारतो म्हणतील. पण निदान आपले समाधान तरी ना?

अनेकदा नात्यातही आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. तिला मी आवडतच नाही, मी काहीही केले तरी पटतच नाही इ इ. समजा तुम्ही त्या व्यक्तीला बोलावलंय आणि खरंच काही कारणाने तिला जमले नाही तर? अशावेळी स्पष्टपणे बोलून गैरसमज दूर करणेच योग्य वाटते. उगाच समोरच्याने कुठल्या कारणाने असे वर्तन केले हे गृहीत धरून आपण तसेच वागत राहतो. त्यावेळी वाटतं, काय ते बोलायचं ना सरळ, बोलायला पैसे पडत नाहीत! अनेकदा आपण हेही गृहीत धरतो की आपण कसे आहोत हे समोरच्याला माहित नाही का? आणि म्हणतो, 'मला काय वाटतं ते त्याला कळत नाही का?'. आता लग्नाच्या १० वर्षात तरी हे नक्कीच कळलंय मला, नाही कळत! 'त्याला कळत नाही का?' असे म्हणून स्वतःला त्रास का करून घ्यायचा? सरळ विचारून टाकायचं. जे काही असेल ते स्पष्ट होऊन जाईल ना? असो.

माझ्यासारख्या नोकरीत योग्य ठिकाणी योग्य प्रश्न विचारून, जास्तीत जास्त माहिती काढणे यातून पैसे मिळतात ही गोष्ट निराळी. पण, 'बोलायला पैसे पडत नाहीत' हे डोक्यात ठेवलं की अनेक प्रश्न सुटतात. जास्तीत जास्त काय होईल? 'नाही' म्हणतील? वेड्यासारखे प्रश्न विचारू नका म्हणतील. पण निदान आपली शंका तरी दूर होते ना? त्यामुळे मनात न ठेवता, वाटलं तर..... विचारून टाकायचं. Happy त्याने माझे तरी बरेच प्रश्न सुटलेले आहेत. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम पटेश. लैला मजनू रोमिओ ज्युलियट देवदास अश्या बऱ्याच ट्राजेड्यांचे मूळ नीट कम्युनिकेशन होऊ न शकणे/गोष्टी गृहीत धरणे हे आहे.

अनु Communication gap साठी तू इतकी महान उदा. दिलीस? Happy ते तूच लिहू शकतेस.
आपण कुठे एव्ह्ढे फेमस? पण बोलायला काय जातय? Happy

विद्या.

खरंय, प्रश्न विचारायला पैसे पडत नाही. थोडे धाडस जरूर लागते. संकोच झटकण्याचे.

पण कोणीतरी बडी असामी, कंपनीचा सीईओ वगैरे एखाद्या सभागृहात माहितीपुर्ण स्पीच देऊन एनी क्वेश्चन असे शेवटाला विचारतो तेव्हा.. जेव्हा दोन क्षणांसाठी शांतता पसरते आणि सारेच एकमेकांच्या तोंडाकडे बघतात तेव्हा.. हात वर करून येस्सर म्हणत शायनिंग मारत सर्वच लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधत आधीच ठरवून ठेवलेला प्रश्न विचारायला मजा येते Happy

खूप महत्वा चे आहे प्रश्न विचारणे..मुलाच्या लग्न ठरवण्याच्या वेळेस सा.बा. ने भावी सूनेला काय वाटेल म्हणून "तूला स्वयपाक येतो का?" हा एवढा बेसीक प्रश्न विचारायचे टाळले, आणि नन्तर कळले की, सूनबाईचा उजेडच होता स्वयपाकाच्या नावाने...नन्तर सा. बा. बसल्या चिड्चिड करत Uhoh

लेख आवडला.

स्वप्नाली, नसेल येत सुनेला स्वयंपाक पण म्हणून काय बिघडलं? Uhoh
त्यांच्या मुलाला येत होता का? नाही तर तो काय जेवायचा रोज? हो तर त्याने सुनेला का नाही शिकवला Uhoh

आणखी अनेक प्रश्न पडलेत. खरं तर जाऊ द्या आपल्याला काय करायच्या दुसर्‍यांच्या चांभार चौकश्या म्हणून इग्नोरणार होते पण लेखच प्रश्न विचारण्यावर आहे तेंव्हा म्हणलं विचारून घेऊ Proud

Thank you all.
Riya, yes no matter how silly it may sound, shouldnt hesitate to ask the question. Happy

VIdya.

Ekadam mast...maza problem toch aahe..Mi sadha adress pan vicharu shakat nahi kunala. .pan he vachlyanantr mi try karen lokanshi bolnyacha..thanks

Totally agree, communication is must . Asking questions can be just the start for a good conversation.

वरवर पहाता ,बऱ्याच गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. एक काव्य पंक्ती वाचनात आली होती---
" दोनो ओर प्रेम पलता है " त्यानुसार हे मान्य की काही गोष्टी आपण गृहीत धरीत असतो. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात . कालांतराने गैरसमज दूर करता येतात. पण किमान अपेक्षित प्रतिसाद जर हवा तसा मिळाला नाही , तर आपण एकट्यानेच काय म्हणून पुढाकार घ्यावा.उदा. माझे काही मित्र आहेत, त्यांना मी पत्र पाठविले , तर पत्रोत्तर तर जाऊच द्या, किमान पत्र मिळाले हे सुद्धा सांगण्याची तसदी घेत नाहीत. वस्तुतः इतराना मोबाईल वरून खूप फोन करीत असतील नक्कीच , पण मग एक फोन मलाही करण्यास काय हरकत आहे ? अशा वेळी " उं , गेला उडत " असे मी म्हटले तर काय चुकले ?
काही ठिकाणी ," विचारावयास काही पैसे लागतात काय ? " हा फॉर्म्युला मी सुद्धा वापरतो . ज्या ठिकाणाची माहिती नाही , तेथे सरळ आत घुसत जावे.फार झाले तर काय होईल , ' प्रवेश बंद ' असे कुणीतरी सांगेल . त्याने काय फरक पडतो ? जेथून अडविले, तेथून परत फिरावयाचे , एव्हढंच .' त्याला माझी तयारी असते .