रेड लाईट एरियातील गोष्टी - तायाप्पा आणि कावेरी .....

Submitted by अजातशत्रू on 25 September, 2016 - 07:27

आपल्याच हातून आपल्याच चुकीने आपल्या पत्नीला गमावून बसलेल्या आणि काळाच्या तडाख्याने पुन्हा तिच्याच शोधात निघालेल्या एका पतीची मनस्वी गाथा ...रेड लाईट एरियातील नरकाहून वाईट जिणं जगणारया एका अभागी स्त्रीची व्यथा .....
कर्नाटकमधील येळ्ळूरच्या काही किलोमीटर पुढे गेले की दसुर लागते. दसुरपासून जवळ असणारया नंदीहळळीपासून दोनेक किमी अंतरावर दावगेरी लागते. शंभर उंबरयाचे गाव. सगळे समाधानी लोक. आपआपल्या व्यापात दंग राहून कुणाच्या अधे मध्ये न करता एकमेकाला त्रास न देता आपले आयुष्य शांततेत व्यतीत करणारया लोकांच्या या गावात एक आक्रीत घडले त्याची ही गोष्ट. याच गावात मलकनगिरी गौडा पाटील राहत होते. त्यांना चार अपत्ये होती. लग्नानंतर दोन मुली आधी झाल्या आणि नंतर दोन पोरे. मोठा मुलगा शिवशरण आणि दुसरा तायाप्पा. शिवशरण जन्मानंतर काही वर्षातच पोलिओने बाधित झाला. त्याला पोलिओ झालाय हे उमगायला चारेक वर्षे लागली. या गोष्टीने त्याच्या आईने हाय खाल्ली. आधीच्या आजारपणात बेजार झालेल्या त्या माऊलीने काही दिवसात अंथरूण धरले अन काही काळात ती होत्याची नव्हती झाली. दिवस पुढे जात राहिले. मलकनगिरीच्या मुली मोठ्या झाल्या आणि एका पाठोपाठ एक त्याने दोन्ही मुलींची लग्ने लावून दिली. साठ सत्तर एकर शेती असलेला आणि जवळ बऱ्यापैकी पैसा बाळगून असलेल्या मलकनगिरीस आता मुलाचे हात पिवळे करून घरी सून आणण्याची घाई झाली होती. त्यासाठी त्याने मुली बघायला सुरुवात देखील केली.पण त्याला इतकी दौलत असूनही कुणी मुलगी देत नव्हते कारण त्याच्या मुलाचे वर्तन !

तायाप्पाच्या भावाला पोलिओ झालेला असल्याने तायाप्पाच्या वाडवडिलांनी त्याचे वारेमाप लाड केल्याने तो बिघडलेला पैसेवाला अन काहीसा माजोरडा झाला होता. त्याला पैशाची घमेंड असे, कुणाशी कधीच विनम्रतेने न बोलणारा तायाप्पा आईविना वाढलेला पोर असल्याने म्हणा वा भावाच्या अपंगत्वाने त्याच्यावर झालेल्या अतिव मायाप्रेमाच्या वर्षावाने हेकेखोर, उद्दाम व कामचुकार झाला होता. थोरामोठयांना उलटून बोलणारा अन सदैव आपल्याच तोऱ्यात असणारा तायाप्पा हा हाती आलेल्या पैशाने बिघडला होता. बाहेरख्याली झाला होता आणि त्याची वाच्यता कुजबुजीच्या स्वरूपात आसपासच्या पंचक्रोशीतले लोक करत असत. मात्र त्याच्या वडिलांच्या मलकनगिरीच्या आदर्श चांगुलपणामुळे सर्व जण शांत बसणं पसंत करत असत. अंगापिंडाने आडमाप असणारा तायाप्पा हा रोमनाळ गडी होता. डांबरासारखा काळा कुळकुळीत अन बुटकेल्या तायाप्पाला सर्व नाद लागल्याचे त्याच्या वडिलांना माहिती होते पण ते आता काही करू शकत नव्हते. गावकरयांची मने जिंकणारा हा देवमाणूस आपल्या पोरापुढे सपशेल हरला होता. आपल्या बायकोच्या पाठीमागे दोन्ही मुलींची चांगल्या ठिकाणी लग्ने करून देताना कुठेही हात आखडता न घेणारा मलकनगिरी हा हळव्या मनाचा माणूस होता. त्याने शिवशरणला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपताना त्याचे तायाप्पाकडे दुर्लक्ष झाले होते याची त्याला खंत होती. आता त्याला चिंता लागून राहिली होती की, 'आपल्या मागे आपल्या मुलांचे कसे होईल ?'

तायाप्पाची बायको चांगली असली तरच आपल्यापाठीमागे शिवशरणची देखभाल केली जाईल याची त्याला खात्री होती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात होता जी 'आपल्या वाहवत चाललेल्या मुलाला सांभाळू शकेल आणि अपंग दिराची आयुष्यभर मनापासून देखभाल करू शकेल'.....कुठलाही हुंडा वगैरे न घेता त्याला फक्त अशी मुलगी हवी होती आणि त्याकरिताच त्याने त्याच्या आत्येबहिणीच्या नात्यातली एक मुलगी तायाप्पासाठी पसंद केली. अत्यंत गरीब घरातल्या पण सर्व गुणाने संपन्न असणारया या मुलीवर घरंदाज घराण्यातील सर्व संस्कार झालेले होते. एकत्र कुटुंबात वावरलेली असल्याने ती शिवशरणला सांभाळू शकली असती अन तिचा सोशिक स्वभाव व विनम्रता पाहू जाता ती तायाप्पाला भविष्यात बदलवू शकेल याची त्याला खात्री वाटू लागली होती. शिवाय लग्नानंतर काही वर्षात पोटपाणी पिकलं की तायाप्पाच्या मनात देखील बदल घडेल, आपली शेतीवाडी सांभाळेल मग आपण श्रीशैलंमला जाऊन शिवाच्या सेवेत उर्वरित आयुष्य घालवायचे असे साधे सरळ हिशोब त्या देवमाणसाचे होते. पण परमेश्वराच्या मनात काही वेगळेच होते.

तायाप्पासाठी पसंत केलेली मुलगी कावेरी त्याला अजिबात पसंत नव्हती. तिचं रुपडं फारसं देखणं नव्हतं, त्याला हवाहवासा असणारा गोरा रंग तिच्याकडे नव्हता की कमनीय बांधा नव्हता. त्याला हव्याश्या असणारया कोणत्याच गोष्टी तिच्यात नव्हत्या. पण त्याच्या वडिलांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, सगळी भावकी गोळा केली आणि त्यांच्यासमोर त्याला चार गोष्टी सुनावल्या. त्याचे चुलते काके आणि चुलत भावंडे त्याला चिक्कार बोलली. शेवटी सर्वांच्या दडपणाखाली त्याला नमते घ्यावे लागले. 'भाऊ शिवशरणसाठी आपण हे करत आहोत' असा साळसूदपणा दाखवत तो अखेरीस कावेरीसोबत लग्नास तयार झाला. यथावकाश या दोघांचे लग्न झाले. कावेरीच्या गरीब मातापित्यास आभाळ ठेंगणे झाले. आपल्या पोरीच्या नशिबाचे पांग फिटले या भ्रमात त्यांचे सारे कुटुंब आपल्या गावी परत गेले. कृष्णेच्या काठी असणारी तिची वस्ती बेन्काळ या गावापासून काही अंतरावरच होती. रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग तालुक्यात हे नदीकाठचे गाव येते. अत्यंत निसर्गरम्य परिसरातून आलेली कावेरी निसर्गवेडी आणि देवभोळी होती. घरच्या गरिबीने आणि मोठ्या कुटुंबसंख्येमुळे मेटाकुटीस आलेल्या तिच्या घरातली ती सर्वात सोशिक आणि सहनशील मुलगी होती. तिच्या वाटयास नियतीने काय भोग लिहून ठेवले आहेत याची जर त्यांना कल्पनाही असती तर त्यांनी तिला एकवेळ विहिरीत ढकलले असते पण तायाप्पाशी लग्न लावून दिले नसते....

तायाप्पाचे लग्न झाले. कावेरीने अल्पावधीतच आपल्या सासऱ्याचे मन जिंकून घेतले. तिच्या दोन्ही नणंदा देखील तिच्यावर मनापासून खुश झाल्या. शिवशरणला आईसारखी माया लावणारी वाहिनी मिळाली. त्याला मोठाच आधार मिळाला. मात्र तायाप्पा काही तिला आपली मानत नव्हता. एकट्याने असताना तो तिच्याशी धुसफूस करत असे, तिला कधी प्रेमाचे चार शब्द न बोलणारया तायाप्पाने तिच्या अंगाला हात देखील लावला नव्हता. त्याला ती पत्नी म्हणून मान्य नव्हती. त्याचे सारे ध्यान हुबळी खानापूर हायवेवर असणारया नायकिणीकडे होते. रंगाने गव्हाळ वर्णाची, मुसमुसलेल्या देहाच्या देविकावर त्याचा जीव जडला होता. तिच्यावर दौलतजादा करणारया तायाप्पाच्या डोक्यात तिला घरात आणून ठेवायचे स्वप्न होते. मात्र कावेरीमुळे त्याच्या मनातले मांडे करपून गेले होते. लग्नानंतरही आपला मुलगा सुधारलेला नाही हे हळूहळू मलकनगिरीच्या कानावर येऊ लागले. आणि एके दिवशी त्याने आयुष्यात पहिल्यांदा त्याच्याशी पैशाच्या हिशोबावरून वादावादी घातली. आपला पोरगा पैसा उडवतो आणि घरच्या लक्ष्मीला उपाशी ठेवतो हे त्या संस्कारी माणसाच्या पचनी पडत नव्हते. आपल्या वडिलांनी आपल्याला बायकोदेखत चार शब्द सुनावल्याने तायाप्पाला संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात तो सकाळीच गाव सोडून देविकाच्या घरी येऊन बसला. तिथे आल्यावर देविकाच्या भावाने त्याच्या मनातली व्यथा जाणून घेतली आणि त्यावर जालीम जहरी उपाय सुचवला. तब्बल दोन दिवस तो देविकाकडे राहून आपल्या गावी परतला तोच मुळी आपण बदललो असल्याचे सोंग करून परतला. गावी आल्यानंतर त्याचे वागणे पूर्ण बदलले. तो कावेरीशी गोडगोड बोलू लागला. त्याने आपल्या वडिलांची माफी मागितली आणि त्यांच्यापाशी इच्छा व्यक्त केली की, 'आपल्याला पत्नीला फिरावयास बाहेर घेऊन जायचे आहे.' आपला मुलगा सुधारला आणि त्याला आपल्या सुनेस घेऊन बाहेर जायचे आहे याचा त्या भोळ्या माणसाला आणि कावेरीलाही फार आनंद झाला. कावेरी मात्र परगावी जाण्यास तयार नव्हती कारण तिला शिवशरणची काळजी घेण्यास योग्य माणूस नजरेस पडत नव्हता. अखेर तिच्या सासऱ्यांनी त्यांच्या भावाच्या सुनेस व पुतण्यास आपल्या घरी राहण्यासाठी बोलवले. तेंव्हा कुठे हे दोघे परगावी रवाना झाले. गोव्यावरून मुंबईस जाऊन परत येतो असे सांगून गेलेला तायाप्पा गोव्याला गेला खरा मात्र तिथून त्याने मुंबई न गाठता कोल्हापूर मार्गे सांगली गाठले. अशिक्षित आणि भोळ्याभाबड्या कावेरीला वाटत होते की आपला नवरा आपल्याला फिरायलाच घेऊन चालला आहे. सांगलीत एक दिवस घालवून त्या रात्री तो मिरजेच्या बाह्य वळण रस्त्यावर असणारया रेड लाईट भागात येऊन पोहोचला. रात्रीचे अकरा वाजण्याच्या सुमारास मित्राच्या घरी जायचे म्हणून तो तिला रिक्षात घेऊन रस्त्याला लागला. तिथे दोनेक तासापासून देविकाचा भाऊ वाट बघत थांबला होता. त्याकाळी मोबाईलचे इतके प्रस्थ नसूनदेखील यांनी आपली योजना जवळपास फत्ते करत आणली होती.

पावसाळी दिवस असल्याने आणि रात्र बरीच उलटून गेल्याने ती आधीच अंधारून गेलेली वस्ती पुरती निर्मनुष्य झाली होती. एका घरापाशी थांबून देविकाच्या भावाने तायाप्पाला खुणावले तसा तायाप्पा आणि कावेरी रिक्षातून उतरले आणि त्या घराच्या दिशेने चालू लागले. चिखलाने भरलेला रस्ता, बैठी घरे, बाहेर लावलेले पण बंद पडलेले दिवे, रस्त्यावरच्या दिव्यांचा भयाण पिवळसर उजेड आणि सर्व वातावरणात भरून राहिलेला एक उग्र दर्प नवख्या माणसाला शिसारी आणण्यासा पुरेसा होता. घरांची दारे अर्धउघडी होती, काही दारातून हळूच अचकट विचकट खिदळण्याचे आवाज मधूनच कानी येत होते. सिगारेट - दारू यांच्या वासाचा कैफ हवेला चढलेला होता आणि काही दारांच्या उंबरठ्यात बाहेर बारीक पाऊस पडत असूनही पोटाची आग थंड करण्यासाठी कुणी एक छाती दाखवत उभी होती. हे सारे बघून कावेरीने तायाप्पाचा हात गच्च आवळून धरला आणि कानडीतच त्याला विचारले की, "आपण कुठे चाललो आहोत ? इथे जाणे आवश्यक आहे का ?" तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होकारासाठी मान हलवत देविकाचा भाऊ ज्या दारापाशी थांबला होता तिथे हे दोघे आले. हळूच दार उघडून ते सगळे आत गेले. आतले वातावरण आणि त्या छोट्या छोट्या खोल्या आणि अर्धवट झोपेत असलेल्या अर्धउघड्या अवस्थेतल्या बायका बघून कावेरीला घाम फुटला. 'आपले इथले उधारीचे पैसे न्यायचे आहेत, तासभर थांबावे लागेल' असं कावेरीला सांगून ते तिघेजण तिथल्या मोडकळीस आलेल्या खुर्च्यांवर बसले. एव्हाना तिथल्या जाग्या झालेल्या मुली कावेरीकडे टक लावून बघत होत्या. त्यांची पुटपुट सुरु झाली होती. काही वेळानंतर तिथे आधीच सांगून ठेवलेले असल्याने बहुतेक कुठल्या तरी हॉटेलमधून पार्सल मागवून आणलेले जेवण त्यांना वाढण्यात आले. कावेरीच्या गळ्याखाली घास उतरत नव्हते, पण नवरयापुढे जायची तिची हिंम्मत नव्हती. अखेरीस ती बळेच काही घास जेवली. सर्वांचे जेवण उरकले. जेवणानंतर कावेरीला अस्वस्थ वाटू लागले, चक्कर आल्यासारखे वाटू लागले शेवटी तिला मोठी भोवळ आली आणि तिची शुद्ध हरपली. या बरोबरच तायाप्पा आणि देविकाच्या भावाच्या चेहऱयावर स्मित हास्य उमटले. दोघांनी एकमेकाला टाळी दिली. त्या गुत्त्याच्या मालकिणीने सर्वांच्या समक्ष कावेरीचे सर्व कपडे फेडले आणि 'ती कोरी करकरीत आहे का' याची खातरजमा केली. तिचे आडाखे तिने आजमावून पाहिले आणि तिच्या चेहऱयावर हलकी स्मितरेषा उमटली. 'माल डावा आहे पण अजून नथ उतरली नाही, सौदा मंजूर' असं सांगत तिने आतून नोटांची एक बारीक गड्डी आणून तायाप्पाच्या हाती ठेवली.

तायाप्पाला तिथून निघण्याची इतकी घाई झाली होती की त्याने ते पैसे मोजले सुद्धा नाहीत. ते दोघे तिथून बाहेर पडले, दुसरी रिक्षा पकडून बस स्थानकाजवळ असणारया लॉजवर गेले आणि तिथे त्याने ते पैसे देविकाच्या भावाच्या हवाली केले. लॉजवर त्याची वाट बघत असणारया देविकाला घेऊन तो जीवाची मुंबई करायला निघून गेला. इकडे जेवणातून गुंगीचे औषध दिल्याने कावेरीचे कपडे जे अंगावरून उतरले ते आठवडाभर अंगावर चढलेच नाहीत ! तिचे अतोनात हाल करण्यात आले, उपाशी ठेवण्यात आले. पाठीला आणि मांड्यांवर सिगारेटचे चटके देण्यात आले. तरीही ती 'धंदयाला' बसायला तयार होत नाही म्हटल्यावर तिला बेशुद्ध करूनच तिची 'नथ उतरवली' गेली. त्या नंतर अनेकांनी येऊन तिचे पुरते लचके तोडले. आपल्या नवऱ्याने आपल्याला दगा दिलाय हे तिला कळाले होते. पण आपल्याला इथली भाषा येत नाही, आपले ओळखीचे कोणी नाही, आपण कुठे आहोत हे देखील तिला माहिती नव्हते. नाही म्हणायला आठवडयाने तिच्या मालकिणीने तिच्याशी बोलायची परवानगी इतर बायकांना दिल्यानंतर कन्नड मातृभाषा असणारया काही जणी तिच्या भोवती गोळा झाल्या. तब्बल आठ दिवसांनी तिच्याशी कुणी तरी तिला समजेल अशा भाषेत बोलत होते. ती त्यांच्या गळ्यात धाय मोकलून रडत राहिली आणि त्या तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिल्या. आठ दिवसांनी तिच्या अंगावर साडी चोळी आली. अंगावर कपडे आले खरे पण जे शील झाकण्यासाठी कपडे आवश्यक होते ते शीलच लुटले गेल्याने कावेरीचे मन मरून गेले होते. तिथल्या बायकांनी तिला तिथले रिवाज समजून सांगितले. खरे तर तिला जगण्याची इच्छाच नव्हती पण कधी तरी आपण आपल्या गरीब आईबापांना डोळेभरून पाहावे आणि मग जीव द्यावा असे तिच्या मनाला वाटत होते.

देविकाबरोबर मजा मारून गावी एकटाच परतलेल्या तायाप्पाने 'कावेरी मुंबईच्या समुद्रकिनारयावर फिरायला गेल्यावर बुडाली' असल्याची बतावणी केली. पोलिसात नोंद केलेली मिसिंगची कम्प्लेंटदेखील दाखवली. त्याच्या वडिलांनी आणि गावाने काही त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही. यानेच तिच्या जीवाचे बरेवाईट केले असावे असे लोक पाठीमागे बोलू लागले. कावेरीचे आईवडील त्यांच्या गावाहून येऊन भेटून गेले, त्यांच्यावर तर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या मुलाने आपल्या पासून काहीतरी लपवले आहे याची जाणीव झालेला मलकनगिरी पाटील त्या दिवसापासून खंगत गेला आणि अंथरुणाला खिळला. शिवशरण आपल्या आजारी बापापाशी बसून राहू लागला. तायाप्पा जणू याच गोष्टीची वाट बघत होता. त्याने गावात आवई उठवली की, 'त्याचे पुन्हा लग्न केले तर त्याचे वडील पुन्हा बरे होतील आणि गावाची पूर्ववत सेवा करू लागतील.' त्याने हूल उठवली पण गावाने प्रश्न केला की नावाची इतकी बदनामी झालेला आणि ज्याच्या पहिल्या पत्नीचा ठावठिकाणा लागत नाही त्याला कोण मुलगी देणार ?'यावर तायाप्पाचे उत्तर तयार होते. त्याने आपल्या मित्राची एक बहिण आहे असं सांगत देविकाचेच नाव पुढे केले. तायाप्पाच्या वडिलांना त्याचा बनाव स्पष्ट ओळखू येत होता पण हाय खाल्लेल्या त्या माणसाचं अंगी आता कसलेच त्राण उरले नव्हते. विरोध करणे तर फार लांबची गोष्ट !

अखेरीस काही दिवसांतच तायाप्पाच्या अंगाला पुन्हा हळद लागली. शिवशरणची देखभाल करण्यासाठी का होईना कुणीतरी बाईमाणूस घरात येतंय याची आशा मनी ठेवून गावाने आणि मलकनगिरीने त्यांच्यावर अक्षता टाकल्या. देविका त्या घरची सून झाली. सुरुवातीचे काही दिवस ती नीट राहिली नंतर मात्र तिने आपले दात दाखवायला सुरुवात केली. तिला भेटायला तिचे अनेक यार तिच्या घरी येऊ लागले. एके दिवशी हा सर्व प्रकार तायाप्पाच्या वृद्ध बापाने आपल्या डोळ्याने पाहिला आणि जागेवरच धक्का बसून मरण पावला. आजारी असलेल्या मलकनगिरीची सुटका झाली म्हणून गावाने एक निश्वास सोडला आणि शिवशरणचे आता आणखी वाईट दिवस येणार याची कुजबुज सुरु झाली. तायाप्पाच्या बायकोची, देविकाची सर्व माहिती काही उत्साही तरुणांनी काढायला आणि तिला अनेकांच्या सोबत गुण उधळताना पकडायला एकच गाठ पडली. सगळा गाव तायाप्पाच्या घराबाहेर गोळा झाला, त्याची भावकी गोळा झाली आणि त्यांनी घरात घुसून देविका, तिचा भाऊ आणि तिचे आशिक या सर्वांची हाडे मोडेपर्यंत धुलाई करण्यात आली. तायाप्पाला पकडून झाडाला बांधण्यात आले. त्याला चाबकाचे फटके दिल्यावर तो सुतासारखा सरळ झाला. त्याने सर्व कहाणी इत्थंभूत सांगितली. गाव अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. त्या सरशी आपल्या सर्व कृत्यांचा पश्चात्ताप झालेल्या तायाप्पाने एक प्रस्ताव गावापुढे ठेवला. 'कावेरीला घेऊन परतलो नाही तर त्याला गावात घेऊ नये, सगळी दौलत शेतीवाडी जमीन जुमला वाडे सगळं काही शिवशरणच्या नावे करण्यात यावे आणि भावकीने त्याचा सांभाळ करावा.' लोकांनी त्याच्यावर विचार करून सकाळी पंचायात बोलावली. पंचांनी त्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि मग झाडाला बांधून ठेवलेल्या तायाप्पाला मोकळे करण्यात आले. त्या दिवशी खिशात होते तेव्हढे पैसे घेऊन तो पैलवान गडी गाव सोडून निघाला खरा पण तो पुन्हा गावी कधी परतणार नाही याची कदाचित त्यालासुद्धा कल्पना नसावी...

गावाहून थेट मिरजेला दाखल झालेल्या तायाप्पाला 'ते' घर शोधण्यात फारसे कष्ट पडले नाहीत. त्याने घर शोधले आणि घरात दाखल झाला. त्याची नजर सैरभैर झाली होती. आपल्या भावाला व वडिलांना जीव लावणारी कावेरी आपण तिला सोडायला आलो तेंव्हा तिने आपला हात कसा गच्च धरून ठेवला होता याची त्याला आठवण झाली तेंव्हा त्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. तो हमसून हमसून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून घराची मालकीण बाहेर आली. काय झाले असे तिने नजरेनेच विचारले. मोडक्या तोडक्या हिंदी मराठीत तो कावेरीबद्दल विचारू लागला तशी ती बया फिदीफिदी हसू लागली. तिने जे सांगितले ते ऐकून तायाप्पाच्या पायाखालची जमीन सरकली. तो मटकन खाली बसला. त्याच्या घशाला कोरड पडली, सर्वांगाला घाम फुटला. कावेरीला तीन महिन्यांपूर्वी दुसऱ्या दलालामार्फत मुंबईला विकण्यात आले होते !

तायाप्पा तिच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला तसे तिने पाय मागे घेतले आणि रोकडा आण आणि बाईल सोडवून घेऊन जा असे सुनवले. खिशात पैसा नाही आणि बायकोचा पत्ता नाही. शिवाय तिला सोडवून आणण्यासाठी दहावीस हजाराची बेगमी करावी लागणार या कल्पनेने त्याला भोवळ आली. दोन तीन दिवस त्याने विचार करण्यात घालवले. त्याने मनाशी निर्धार पक्का केला आणि काहीही झाले तरी कावेरीला शोधून काढून तिला गावी घेऊन जायचे असे मनाशी ठरवले. दिवसभर हमाली काम आणि रात्री त्या भागात पडेल ती कामे करून त्याने तीनेक महिन्यात हजारएक रुपये गोळा केले. साठ सत्तर एकर जमिनीचा मालक असणारा तायाप्पा रेल्वे स्टेशनवर झोपत होता, एकच विजार शर्ट अंगात घालून त्याचा रंग विटून गेला होता, केस पिंजारून गेले होते. अंग कळकटून गेले होते, खोल गेलेले डोळे आणि त्याखालची काळी वर्तुळे यामुळे तो अकाली प्रौढ वाटू लागला होता. तीन महिन्यात त्याची पार रया गेली होती. इतका मोठा गडी आता अंगाने सुकून चालला होता. हजार रुपये गोळा केल्यावर त्याने त्या दलालाला दिले. मग त्याने कावेरीचा कामाठीपुरयातला पत्ता तायाप्पाला दिला. तिथल्याच काही बायकांकडून मुंबईला जाण्याइतके तिकिटाचे पैसे उसने घेऊन तायाप्पा मुंबईला जाणारया रेल्वेत बसला खरा पण तिथल्या अडचणींचा डोंगर अजूनच मोठा होता...

तायाप्पाने कावेरीला मिरजेत सोडल्यानंतर दोनेक वर्षे ती तिथेच होती पण त्या छोट्याशा वस्तीत तिच्या सारख्या रंग रूपाने डाव्या असणारया बाईकडे कोण पुन्हापुन्हा येणार होते ? त्यामुळे तिची बोली घटत गेली आणि शेवटी तिच्या मालकिणीने तिला 'अमुक इतके पैसे दे तुला इथून सोडते' म्हणून सांगितल्यावर ती काहीच बोलली नाही. कारण तिच्या पदरी शंभराच्या काही नोटा सोडल्या तर काहीच नव्हते, शेवटी तिची रवानगी दलालामार्फत मुंबईला झाली. मिरजेतला नरक लहान होता तर कामाठीपूरयातला नरक विशालकाय होता इतकाच काय तो फरक ! बाकी सगळे सारखेच असल्याने तिला तिथे जुळवून घेण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. काही महिन्यात ती मुंबईत रुळली. तिच्या लेखी मुंबई म्हणजे काही गेट वे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेल किंवा राणीचा बाग काहीच नव्हतं. तिची मुंबई ही त्या गल्लीत सीमित होती, तिचे तीन बाय चार चे फळकुट मारलेले कंपार्टमेंट हीच तिची मुंबई होती. तिचा घुसमटलेला दिवस आणि घामेजलेली रात्र हेच तिचे सूर्यचंद्र होते आणि तिच्या देहाच्या सापळ्याची रोजची विक्री हीच तिची सच्चाई होती. आपल्या पाठीमागे शिवशरणचे आणि आपल्या सासऱ्याचे काय झाले असेल हा विचार अधून मधून तिच्या डोक्यात यायचा मात्र पुन्हा कोणीतरी दारू ढोसून तिच्यावर आरूढ झाला की तिचा मेंदूसुद्धा तिच्या सारखा निपचित पडून राही !

तायाप्पाने मुंबईत उतरल्याबरोबर कामाठीपुरा गाठला आणि तिथल्या त्या गल्ल्या आणि तिथली माणसं पाहून त्याचा ऊर दडपून गेला. 'या गर्दीत आपली कावेरी असेल का ? की इथून आणखी कुठे गेली असेल? ती जिवंत तरी असेल का ?' अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात गर्दी केली. अखेर त्याने एकेक गल्ली आणि एकेक घर पालथे घालायचे ठरवले. आधी पोटासाठी काम बघितले, पण त्याचा अवतार बघून त्याला कुणी कामावर ठेवेनासे झाले. शेवटी आठवडाभर तो ज्या चहाच्या टपरीबाहेर रात्रभर झोपत होता त्या टपरीमालकाने त्याला काम दिले कारण तोसुद्धा कन्नड भाषिकच होता. काम करून तिथेच झोपण्याची त्याने मुभा दिली पण आधी अवतार सुधारण्याची तंबी दिली. तायाप्पा दिवसभर काम करून रात्री कामाठीपुरयात जातो याची कुणकुण त्याच्या मालकाला लागल्यावर त्याने त्याची खातरजमा केली. तेंव्हा तायाप्पाने सगळी आपबिती त्याच्या कानी घातली. मग त्याच्या मालकाने त्याला पुन्हा अडवले नाही. सहा महिने झाले तरी तायाप्पाला कावेरीचा पत्ता लागला नाही, कारण अशा कळाखाऊ माणसाने आत यावे आणि झडत्या घ्याव्यात आत डोकावून बघावे हे त्या वेश्यावस्तीतही कुणी सहन करून घेत नव्हते. तब्बल सहा महिने झाल्यानंतर एका रात्री त्याला कावेरी भेटली. पण तिला पाहून तो दिग्मूढ झाला...

कावेरी कामाठीपुरयातला बाराव्या गल्लीतील 'रोशनी'बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर राहायला होती. सुरुवातीचे एक वर्ष व्यवस्थित गेल्यानंतर एका पिसाळलेल्या रात्री आलेल्या एका रानटी पुरुषाशी तिची वादावादी झाली आणि त्यात त्याचा धक्का लागून थेट जमिनीवर पडली होती. तिच्या डोक्याला मार लागला. तिचे दोन्ही पाय निकामी झाले. पुढे तिची हेळसांड होऊ लागली. शेवटी एनजीओच्या काही कार्यकर्त्यांनी तिला सरकारी रुग्णालयात भरती केले. तिच्या जखमा बरया झाल्या मात्र पाय लुळेच राहिले. रुग्णालयाने डिसचार्ज दिल्यावर ती किती तरी दिवस रुग्णालयाच्या आवारात बसून होती. लोक तिला भिकारी समजून जे काही देत त्यावर तिची गुजराण चाले. तिला दाखल केलेल्या एनजीओनेच तिला नंतर एका अनाथाश्रमात दाखल केले. पण इथेही तिचे दैव आडवे आले. कामाठीपुरयात असताना तिने आस्मा ह्या मुलीला फार जीव लावला होता. एके दिवशी तिचा पत्ता हुडकत हुडकत ही आस्मा अड्ड्यावरच्या आणखी एका मुलीसोबत नवजीवन आश्रमाच्या दारात दाखल झाली. तिथे कावेरीची खोली गाठून तिच्या समोर उभी ठाकली. किती तरी दिवसांनी कावेरीशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठी कुणीतरी आले होते ! काही गप्पा झाल्या, जुन्या आठवणी ताज्या झाल्या...भिंतीवर पाल रेंगत जावी तशी संध्याकाळ त्या तिघींच्या अंगावर उतरत गेली आणि कावेरीचा अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेऊन आस्मा तिथून गेली खरी मात्र तिथून कावेरीच्या भाग्याचे फासे पुन्हा उलटे पडले, आश्रमाच्या व्यवस्थापकांच्या कानी बातमी गेली की कामाठीपुरयातल्या दोन वेश्या येऊन एका बाईस भेटून गेल्या. तिथे इतर लोकांनी कावेरीशी उभा दावा मांडला. त्या रात्री तिथल्या वॉचमनकरवी कावेरीचा बाडबिस्तरा बांधून कामाठीपुरयात नेऊन सोडण्यात आले. तिला तिच्या नशिबाने पुन्हा त्याच नरकात आणून सोडले ...

पायाने खुरडत खुरडत कावेरी ती जिथे रहात होती त्या रोशनी बिल्डींगमध्ये दाखल झाली. मात्र जिने चढून वर जाणे तिला अशक्य होते व मुख्य म्हणजे तिचा तिथे कुणालाच उपयोग नव्हता. उपभोग घेऊन झालेली ती एक मानवी कचराकुंडी होती. सत्य असेच नागवे असते पण ते स्वीकारावेच लागते. शेवटी त्या इमारतीच्या जिन्याखाली असणाऱ्या कोपऱ्यात तिने पथारी टाकली आणि ती तिथेच पडून राहू लागली. डोक्याला मार लागल्याने काही काळाने तिला पक्षाघाताचा झटका येऊन गेला. तिची डावी बाजू निकामी झाली. आस्मा जागेवर नसली की तिथल्या बायकापैकी कुणीतरी तिला खायला आणून द्यायचे. तिचे कपडे आणि सर्वांगाची दुर्गंधी सुटल्याने खालच्या मजल्यावरील बायका तिला शिव्यागाळ करत आणि तिला तिथून दुसरीकडे फेकून देण्याच्या धमक्या वारंवार देत असत. आता कावेरीची एकच इच्छा होती की आपला मृत्यू लवकरात लवकर यावा. पण बहुधा तेही नियतीला मान्य नव्हते. ती अशा अवस्थेत असताना एका हळव्या रात्री तायाप्पाने तिला शोधून काढले. तिच्या घाण लागलेल्या अंगाला त्याने मिठी मारली आणि त्याने आपल्या अश्रूंना वाट करून दिली. त्याच्या मिठीला वा अश्रूंना कावेरीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. ती तशीच बसून राहिली, थिजलेल्या देहागत ! त्या दिवसानंतर तायाप्पा रोज तिथे येऊन तिची सेवा सुश्रुषा करू लागला. जवळपास पाच वर्षे याच अवस्थेत गेली. दरम्यानच्या काळात काही वेळा त्याला काही गुंडांनी, दलालांनी तर कधी गिर्हाईकांनी देखील मारहाण केली. कावेरी मात्र दिवसागणिक खंगत गेली. तिचा हाडाचा सापळा उरला होता. त्याला कातडी चिकटली होती, त्या सापळ्यापाशी येऊन बसणारा तायाप्पा तिथल्या दुनियेच्या खिजगणतीत नव्हता. ती मुडदयागत शून्यात नजर लावून बसायची अन हा रडत राहायचा तर बाजूच्या भिंतीआड वासनांचे पिशाच्च एखाद्या कोवळ्या देहाची लुसलुशीत मांस चुरगाळून टाकत असे. तिथली दुनियाच न्यारी होती, एकाच वेळी देवांची पूजा व्हायची अन एकाच वेळी अनेक शरीरे विवस्त्र व्हायची, स्टोव्ह भडकल्यासारखी वासना भडकलेली माणसे विस्तवाचा निखारा गिळावा तितक्या सहजतेने तिथल्या बायका आपल्या देहात विझवत असत. त्यामुळे त्यांच्या देहाची आस्ते कदम रोज थोडी थोडी राख रांगोळी होत असे. अशा या दुनियेत कुणी जगलं काय आणि मेलं काय याचा कुणाला फारसा फरक पडत नसतो. खास करून त्यांचा तर अजिबात पडत नसतो ज्यांचा पुरेपूर उपभोग घेऊन त्यांच्या देहाची चिपाडे देखील उरलेली नसतात ! कावेरी तर याच्याही पलीकडच्या अवस्थेत गेलेली होती. शेवटी तिच्या सुटकेचा दिवस देखील जवळ आला ......

२६ जुलै २००५ ! हा दिवस मुंबई कसा विसरेल बरे ? या दिवशी जो तुफान पाऊस पडला त्याने कावेरीची सुटका केली. दिवसभर धोधो पाऊस पडत होता. तायाप्पाचे कशात लक्ष लागत नव्हते. त्याने आस्माला फोन लावून पहिला पण तिचा फोन लागत नव्हता. कामाठीपुऱ्याकडे कसे आणि कधी जायचे याची त्याला विवंचना लागून राहिली, शेवटी तो अगदी घायकुतीला आला तेंव्हा त्याने त्याच्या मालकाची परवानगी घेतली. तो गुडघाभर पाण्यातून कामाठीपुरयाकडे चालतच निघाला. रात्रीच्या अकराच्या सुमारास तो तिथे पोहोचला. त्याच्या मनातली धाकधूक वाढत चालली होती. जिथे कावेरीला ठेवले होते त्या जिन्याखालील खड्ड्यात पाणी साठले होते. सगळ्याच तळघरात पाणी साठल्याने कुणाला कुणाकडे बघायला वेळ नव्हता. कावेरीकडे कोण बघणार ? त्या पाण्यात तिचे सामान सुमान तरंगत होते. त्या पाण्याने ती वाहून थोडी पुढे गेली होती आणि पुढच्या इमारतीच्या लोखंडी गेटमध्ये तिचे डोके अडकून बसल्याने तिचे श्वास चालू होते. कावेरी नजरेस पडताच तायाप्पा तिच्या जवळ गेला आणि तिला तिथून सोडवून बाजूच्या जिन्यात मांडीवर घेऊन बसला. तिचा श्वास मंदावत चालला होता. अंग थंड पडत चालले होते. तायाप्पा मोठमोठ्याने ओरडत रडू लागला, तेंव्हा कुठे तिने डोळे उघडले. आणि इतक्या वर्षात पहिल्यांदा आपली होती नव्हती ती सर्व ताकद एकवटून त्याच्या हातात तिने आपला उजवा हात गच्च पकडून ठेवला. त्या सरशी तायाप्पाच्या अंगावर काटा आला. त्याला मिरजेतली ती रात्र आठवली जेंव्हा तिने असाच हात गच्च पकडला होता. 'मला माफ कर गं कावेरी' असं म्हणत तो अक्षरशः तिच्या गळ्यात पडून रडू लागला. तेंव्हा तिच्या डोळ्यातून बाहेर पडलेले दोन उष्म थेंब त्याच्या गालावर पडले. त्याने मान वर करून बघितली तर कावेरीचे डोळे सताड उघडे पडले होते. कावेरीचे प्राणपाखरू निघून गेले होते. गिऱ्हाईका बरोबर पनवेलला गेलेली आस्मा सकाळी परतली आणि ती सुद्धा धाय मोकलून रडली. दुसऱ्या दिवशी कावेरीवर अग्नीसंस्कार करण्यात आले. रात्र होताच कामाठीपुरा पुन्हा त्याच्या बीभत्स रंगात न्हाऊन गेला आणि कुणासाठीही न थांबणारी मुंबई तर तिच्याच नादात जगत राहिली.

या घटनेनंतर दोनेक दिवसांनी मुंबईच्या लोकलखाली अपघाती मृत्यूने मरण पावलेल्या लोकांच्या नावांत तायाप्पाचे नाव आले. सामाजिक बांधिलकी जपताना तायाप्पासारखी माणसे माझ्या आयुष्यात मला भेटून गेली आणि माझ्या इतरांसाठी जगण्याच्या संवेदना अधिक बळकट करून गेली हे मी माझे नशीब समजतो. काळ कसाही येवो आपण आपली नियत बदलली की आपले पाऊल चुकते. त्याची भरपाई होते की नाही हे आपण सांगू शकत नाही, मग जमतील तेव्हढया सामाजिक जाणीवा प्रगल्भ करत राहणे इतकेच आपल्या हाती राहते.

कावेरी गेली त्या दिवशी कृष्णेच्या पाण्याला फार वेग आला होता, तिच्या मूक हुंदक्यांचा गहिरा स्पर्श तिच्या पाण्यात जाणवत होता.... शिवशरण आता त्याच्या चुलत भावापाशी राहतो... गावकरयांना थोडीफार माहिती कळली आहे पण आता कावेरी आणि तायाप्पा त्यांच्यासाठी भूतकाळ होऊन राहिले आहेत... कावेरीचे आई वडील मात्र अजूनही आपल्या जावयाच्या आणि मुलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना सत्य सांगण्याची हिंमत माझ्यामध्ये तर नाही ......

- समीर गायकवाड.

(समाजातील या पिचलेल्या घटकांसाठी काही करावे असे वाटत असेल वा काही योगदान द्यावे असे वाटत असेल तर मुंबई आणि परिसरात काम करणारया prerana ह्या एनजीओच्या www.preranaantitrafficking.org/ ह्या साईटला भेट देऊन आपल्याला जमेल ते योगदान देऊ शकता.....)

माझ्या ब्लॉगची लिंक -
https://sameerbapu.blogspot.in/2016/09/blog-post_25.html

kamathipura-mumbai_146784.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@समीर, मी अक्षरशः निशब्द झालोय. प्रत्येक वाक्य वाचताना असं वाटायचं कि बस् झालं! मी पुढे अजून वाचूच शकणार नाही. पण वाचल्याशिवाय राहवलंहि नाही. कावेरीच्या नशिबाला आता काय म्हणू? कथेत कावेरीने भोगलेल्या प्रसंगांचे फक्त उल्लेख येत जातात. त्यानेच एवढे हळहळायला झालं, तर तिला नायिका मध्यवर्ती धरून लिहीलेली कथा वाचणं अशक्यच आहे. तायाप्पाविषयी सुरुवातीला राग होता. पण नंतर त्याने कावेरीचा शोध घेणे. शक्य होईल तेवढा तिचा सांभाळ करणे. तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्याबरोबर असणे ह्याने जरासा निवळला.
बाकी, तुमच्या लिखाणाला सलाम!!!

सुन्न.... खरेच वाचवत नव्हते पण कदाचित किंचीत काहितरी चांगले घडले असावे अशी आशा ठेवून वाचत राहिलो.

मस्तच समीरभाऊ....!!! मन सुन्न झाले...!! तुमचे सगळेच लेख मनाला सुन्न करुन जातात...!!! तुमच्या सारख्या माणसाला प्रत्यक्ष भेटुन तुमच्या बरोबर समाजासाठी काहीतरी योगदान द्यावेसे वाटते...!!

डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारा...

सलाम तुमच्या लेखनाला..

आपण सगळे किती सुखी आहोत...

Sir..Mala kahitari karaychay ya lokansathi. Wifi 4G smartphones chya jagatun saral jaminivar aapltlyasarkh vatale. Tethil baghinichya sahanshaktichi dad dyavishi vatate.
Life madhye paisa kiti important asto he suddha janaval. Ata evdha paisa kamvaychay ki yatil kahi lokanchetari aayushya sukhkar banavu shaken. Totally..stunned

<<डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारा...>> अगदि
<<एवढे भयानक हाल कुणाच्या वाटेला येऊ नयेत... ही एकमेव प्रार्थना>>> +१