कामथे काका (भाग १९ वा )

Submitted by मिरिंडा on 22 September, 2016 - 11:04

सखारामने बेल वाजवली तेव्हा मिस्चिफ आतल्या खोलीत लपला होता. त्याने हळूच आतला दरवाज्या थोडासा उघडून बाहेर पाहिले. बेल वाजल्यावर हा ज्यू दरवाज्या का उघडत नाही त्याला कळेना , पण त्याने त्यात वेळ न घालवता प्रथम आपली ब्रीफकेस उघडली. आता त्याला पँटच्या खिशात आणि शर्टाच्या आत ठेवलेल्या पैशाच्या बंडलांची तसं ठेवण्याची गरज वाटली नाही. त्याने ती बंडलं काढून केसमध्ये पूर्वी प्रमाणे ठेवली. दुसरे पिस्तूल आत ठेवलं. हातातल्या पिस्तुलात गोळ्या भरून घेतल्या. बाकीच्या खिशात तशाच ठेवल्या. मग ब्रीफकेस तेथील एका कपाटाच्या सापटीत ठेवली. आणि तो सुटवंग झाला . पळण्याची संधी मिळाली की ब्रीफकेस घेऊन तो पळणार होता. त्याने आतल्या खोलीची खिडकी उघडून पाहिली. पाचव्या मजल्यावरच्या पाइपावरून किंवा इतर काही प्रकाराने एवढ्या उंचीवरून खाली उतरणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. तेही रात्रीच्या काळोखात. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला गोळ्या झाडीतच पुढच्या दरवाज्यामधून बाहेर जावं लागेल. आता बाहेरची बेल वाजणं बंद झालं. होतं. नुकतेच पोहोचलेले इन्स्पे. डावले, नेटके , देखणे आणि इतर कॉन्स्टेबल्सनी बेल वाजवण्यास सुरुवात केली. मग मात्र थोड्या वेळातच त्यांनी दरवाज्यावर धक्के मारायला सुरुवात केली. दरवाज्याचा मधला भाग कसातरी अर्धवट फुटला. खालचा भाग मात्र टेबल खिळवल्यामुळे तसाच राहिला. फुटलेल्या भागातून इन्स्पे. डावलेंनी डोकावून पाहीलं. खुर्चीत बसलेल्या डेविडच्या चेहऱ्यावर खवचट हास्य होते. आपण हाती लागणार नाही याची त्याला खात्री होती . मग त्याने हातातल्या पिस्तुलाचा बार काढला. गोळी चुकवण्यासाठी डावलेंनी पटकन आपलं डोकं बाजूला केलं. पण गोळी समोरच्या दिशेत उडलीच नाही.कानठळ्या बसवणारा आवाज येऊन त्याचं डोकं खुर्चीतच एका बाजूला झुकलं. रक्ताच्या चिळकांड्या समोरच्या टेबलावर उडाल्या आणि त्याचा प्राण गेला. ते पाहून एक पुरावा नष्ट झाल्याचं डावलेंना वाईट वाटलं. आपण दरवाज्या फोडायला नको होता असं ते सोबत असलेल्या नेटकेंना म्हणाले.हरामखोरने मागे उडणारी गन वापरली होती. त्यांच्या मनात आलं, काय यांच्या एकेक आयडिया असतात. त्यांनाच माहीत. ..... पण मिस्चिफ अजून कुठे होता त्यांना नक्की माहीत नव्हतं. बराच वेळानंतर दरवाज्याचा वरचा सगळाच भाग तुटला. खालचा भाग तोडण्यापेक्षा आत शिरलेलं बरं. असा विचार करून ते तिघे पिस्तुले रोखून आत शिरले. आत लपलेल्या मिस्चिफला यातून कशी सुटका करून घ्यावी कळेना. मग एकेक करीत सगळेच आत शिरले. दरवाज्याला खिळवलेलं टेबल काढण्याचा परत प्रयत्न चालू झाला.

आधी बाहेरची खोली बारकाईने तपासण्यास सुरुवात झाली. डेविडच्या अंगावर असलेले कपडे पण तपासून पाहिले. तिथली सगळीच कपाटं शोधली गेली. बारीक सारीक सगळ्याच वस्तूंची तपासणी झाली. गोळी अगदी जवळून मारली गेल्याने डोकं बरचसं फुटलं होतं. लवकरच डेविडचा चेहरा रक्ताने माखला. टेबलावर त्यांना कागद जाळल्याची राख मिळाली. ते कागद अर्धवट जळले होते. पण राहिलेल्या कागदांवरुन काहीही अनुमान काढणं कठिण होतं. कोणते तरी महत्त्वाचे कागद याने जाळले होते. कदाचित मिस्चिफचा खोटा पासपोर्ट बनवलेला असावा. त्यासाठी सॅमसनने पैसे दिले असावेत असा तर्क देखणेंना त्यांनी बोलून दाखवला. पडलेली राख त्यांनी जशीच्या तशी एका पेपरात गुंडाळून बरोबर घेतली. लॅबमधे पाठवण्याचा त्यांचा मानस होता....... नेटकेंनी ऍम्ब्युलन्स बोलावली , सगळा तांडा येईपर्यंत काही वेळ लागणार होता. डावले , नेटके, आणि देखणे बाकीच्यांना तिथेच लक्ष ठेवायला सांगून आतल्या खोलीत शिरले. त्याबरोबर मांजराच्या पावलाने मिस्चिफ दुसऱ्या खोलीत शिरला. त्याला अर्थातच पहिल्या खोलीत ठेवलेल्या ब्रीफकेसची काळजी होती. आतल्या खोलीचे सगळे पडदे बाजूला करून इतर तपास पूर्ण करता करता डावलेंना कपाट आणि भिंत याच्या मधल्या सापटीत ठेवलेली ब्रीफकेस दिसली. ती तेथील टीपॉयसारख्या टेबलावर ठेवून तिचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असताना नेटकेंच्या लक्षात आलं. बॅग उघडीच आहे. त्याबरोबर त्यांनी ती बटण दाबल्यावर फाटकन उघडली गेली. आतली पैशाची बंडलं आणि भरलेलं पिस्तूल पाहून डावले म्हणाले, " म्हणजे हा मिस्चिफ इथे येऊन गेलाय तर. " तो आतल्या खोलीतच असेल त्यांना कल्पना आली नाही. याची ही बॅग सॅमसनने डेविडकडे पाठवली असली पाहिजे. नाहीतर मिस्चिफ बरोबरही पाठवली असण्याची शक्यता आहे. म्हणजे सॅमसन पण यात गुंतलेला आहे. असा विचार करून ते म्हणाले, " बेंजामिनला फोन लावा आणि सॅमसनलाही आत घ्यायला सांगा " नेटकेंनी तसे केले. ..... आतल्या खोलीत लपलेल्या मिस्चिफला बॅग ताब्यात घेतल्याचा अंदाज आला. त्याने प्रथम त्याच्या खोलीतला लाइट बंद केला. तिथेही पडदे होते. मोठया दोन खिडक्या होत्या. ती एक बेडरुम होती. एक अजस्त्र पलंग तिथे होता. या बुटक्याला एवढा मोठा पलंग काय करायचाय याचा विचार मिस्चिफच्या मनात आला. इथे लपायला जागा नव्हती. म्हणजे आपल्याला फायर करीतच बाहेर पडावं लागेल. नाहीतरी आता पैसे गेलेलेच आहेत. त्याने आतल्या दरवाज्याच्या फटीतून पाहिलं. पुढचा दरवाज्याचं टेबल आता निघालेलं होतं. अजून तरी हे लोक आत येत नाहीत असं पाहूनच आपण निघावं.
असा विचार करून तो हातात पिस्तूल धरून अजिबात आवाज न करता. खालच्या मानेने निघाला. दरवाज्याजवळ दोन कॉन्स्टेबल होते पण त्यांचं लक्ष बाहेर होतं. बाकी दोघे ,डावले, नेटके आणि देखणे बॅगेभोवती होते. तो सावकाश मांजराच्या पावलाने चालत दरवाज्याजवळ पोहोचत होता. डावलेंना कसली तरी हालचाल जाणवल्याने त्यांनी बॅगेत घातलेली मान वर केली. आणि ते एकदम ओरडले, " अरे फायर
करा, तो पाहा मिस्चिफ पळतोय " हे ऐकल्यावर दरवाज्याबाहेरचे दोघे आत यायला वळले, पण मिस्चिफने त्यातल्या एकाला गोळी झाडून जखमी केले आणि दुसऱ्याला धक्का मारुन तो जिन्याकडे पळाला. मग आतले कॉन्स्टेबल त्याच्यामागे जिन्यावर धावले , पण चपळाईने उड्या मारीत मिस्चिफ चार पाच जिने उतरला. त्याला चांगलाच दम लागला होता. समोरच एका फ्लॅटच्या मालकाने दरवाज्याबाहेर बूट चपला ठेवण्याचं कपाट ठेवलेलं होतं , ते सरकवून त्याच्यामागे तो लपला. एकदा मागे लागलेले पोलीस खाली निघून गेले की सावकाश
चालत खाली जाण्याचा त्याचा प्लान होता.

डावले आणि नेटके बाकीच्यांना तिथेच थांबायला सांगून लिफ्टकडे धावले. लिफ्ट लगेचच आली. खाली जायला तिला जो काही वेळ लागला तेवढाच. मागून जिन्याने धावत येणारे दोघे कॉन्स्टेबल थोड्याच वेळात आले. मिस्चिफ एवढ्या लवकर बिल्डिंगच्या बाहेर जाऊ शकणार नाही याची डावलेंना खात्री होती. पण या लोकांचं काही सांगता येत नाही. दोघाही कॉन्स्टेबल्स आणि नेटेकेंना तिथेच
थांबवून ते पुन्हा लिफ्टने पाचव्या माळ्यावर निघाले. ज्या कपाटामागे मिस्चिफ लपला होता त्याच्या बाजूला राहणाऱ्या माणसाने दरवाज्या उघडला. गोळीचा आवाज ऐकून तो बाहेर आला होता. तो भेदरलेला दिसत होता. आता बरेच दरवाजे उघडतील मग आपली सुटका कठीण होऊन बसेल. तसा बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये बऱ्यापैकी काळोख होता. त्याचा फायदा घेऊन मिस्चिफ लिफ्टकडे सरकला. त्याची हालचाल पाहून दरवाज्या उघडणारा माणूस ओरडला, " अरे कौन है उधर ? " लिफ्टचे बटण दाबून मिस्चिफ म्हणाला, " पुलिस ! " असे म्हंटल्याबरोबर ऐकणारा ताबडतोब घरात शिरला आणि त्याने दरवाज्या धाडकन लावून घेतला. वर गेलेली लिफ्ट आली . मिस्चिफ लिफ्टम्धे शिरला. फक्त दोनच मजले होते पण त्याला ते अंतर फार वाटलं. खाली येणारी लिफ्ट पाहून तिथे लपून राहिलेल्या देखणे आणि इतर कॉन्स्टेबल्सनी आपापली पिस्तुले तिकडे रोखली. लिफ्टमधून कोणीच बाहेर आलं नाही. मिस्चिफने मुद्दामच दरवाज्या उघडला नाही. एकेक पाऊल पुढे
काळजीपूर्वक टाकीत कॉन्स्टेबल्सकडून फायर कव्हर घेत देखणे तळमजल्यावरच्या काळोख्या भागातून सरकत पुढे झाले. नेमकं त्यांच्या बाजूने लिफ्टचा जो भाग दिसत होता, तिथल्या कोपऱ्यात कोणीच नव्हतं. लिफ्ट ओलांडून पलीकडे जाणं धोक्याचं होतं. बरोबर कव्हर देणाऱ्या कॉन्स्टेबलला त्यांनी दबक्या आवाजात अर्धवर्तुळाकार लांबून चालत जायला सांगून लिफ्ट समोरच्या दुसऱ्या कोपऱ्यात जायला सांगितलं. म्हणजे त्याला लिफ्टच्या न दिसणाऱ्या कोपऱ्याचा भाग दिसेल. न दिसणाऱ्या कोपऱ्यात अंग चोरून उभ्या असलेल्या मिस्चिफला ती अस्पष्ट हालचाल दिसली, त्याने त्या अंदाजाने गोळी झाडली. लिफ्टच्या अंधुक प्रकाशातून लांबून जाणारा कॉन्स्टेबल जखमी होऊन तिथेच लोळला. शेवटी तो किशाचा शार्प शूटर होता. खरंतर ही मिस्चिफची चूक होती. पण त्याला आता पर्वा नव्हती. नाहीतरी पैसे गमावलेच होते. निदान जगलो तर परत प्रयत्न तरी करता येईल. (सिर सलामत तो .....) असा विचार करूनच त्याने गोळी झाडली होती. देखणेंची ही चाल अपयशी ठरली. मग मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या कॉन्स्टेबल्सना अंदाज आला. ते काळजीपूर्वक हालचाल करीत लिफ्टच्या दुसऱ्या बाजूला गेले, तेव्हा देखणेंनी मोठ्याने फायरचा हुकूम दिला. त्याबरोबर अनेक गोळ्या सुटल्या. लिफ्ट धुराने भरून गेली. .....पण मिस्चिफने वेगळीच चाल खेळली. त्याने पटकन लिफ्टमध्ये असलेल्या बल्बवर गोळी झाडली आणि अंधार केला. मग परत बऱ्याच गोळ्या पोलिसांनी झाडल्या. पण सावकाश अजिबात आवाज न करता मिस्चिफ जमिनीवरून सरकत लिफ्टच्या बाहेर आला. आणि उघड्या प्रवेशद्वारातून मागे गोळ्या झाडीत बिल्डिंगच्या बाहेर आला. नशीब बिल्डिंगचं मुख्य गेट बंद होतं. त्यामुळे तो बाहेर जाऊ शकला नाही . आता त्याला शोधणं जरी कठीण असलं तरी तो बाहेर जाऊ शकत नव्हता. जवळच्या पोलिस स्टेशनला खबर करून देखणेंनी आणखी कुमक मागवली.

आता आपण वाचत नाही अशी खात्री झाल्याने मिस्चिफ वाट फुटेल तिकडे पण बिल्डिंगच्या आवारात पळत सुटला. तो अधूनमधून गोळ्या झाडीत होता. मग त्याने गोळीबार बंद केला. आपण निष्कारण आपली जागा पोलिसांना दाखवीत असल्याची जाणीव त्याला झाली. सोसायटीच्या ऑफिसच्या मागे तो जाऊन लपला. जिथे कंपाउंड वॉल होती. वाचण्याचा आता त्याला एकच उपाय होता, तो म्हणजे कंपाउंड वॉलच्यावरून उडी मारणं. अचानक त्याला भयंकर तहान लागल्याचं जाणवलं. तोंडाला पडणारी कोरड त्याला जास्त खतरनाक वाटू लागली. पोटात केवळ थोडीशी व्हिस्की गेलेली होती . तेवढंच काय तो द्रव पदार्थ. आणि तोही अर्धवट. लवकरच बाहेरून येणारी कुमक आणि ऍम्ब्युलन्सही धडकली. जवळ जवळ सगळेच जण आपापल्या फ्लॅटच्या बाल्कनींतून किंवा खिडक्यांतून डोकावू लागले. आवारातले लाइटही लागले. पोलिसांचा मॅनहंट चालू झाला. एवढ्या घाईत आणि गर्दीतही मिस्चिफने फायदा घेण्याचं ठरवलं. प्रत्येक शिपाई त्याला ओळखत होता असं नव्हतं.बाहेर येऊन तोही हातात पिस्तूल घेऊन शोधण्याचं नाटक करू लागला. ही त्याने केलेली फार मोठी चूक होती. पण त्याच्या अस्तित्वाची लढाई होती. ......तेवढ्यात मागच्या बाजूने आवाज आला, " कोण आहे तिकडे ? ....... " असं म्हणताच मिस्चिफने पोलिसांसारखे उत्तर दिले. " यहां तो कोई नही है. " त्याने गोळी झाडण्यासाठी पिस्तूल वर केले. एकदम मोठा सर्च लाइट त्याच्यावर पडला. त्याचे डोळे दिपले. ..... उत्तर हिंदीत आल्याने विचारणाऱ्याचा संशय बळावला आणि त्याने चपळाईने गोळी झाडली. पाठीत गोळी लागल्याने कळवळून मिस्चिफ खाली कोसळला. वेदनांचं मोहोळ त्याच्या शरीरात उठलं. अचानक सगळ्या बाजूंना लाइट असूनही त्याला काळोखाने घेरलं आणि अस्पष्टसा डेविडचा चेहरा दिसू लागला. तो हसत होता. आणि कपाटाच्या सापटीत ठेवलेली बॅग आठवली. मग मात्र तो थंड पडला. जीव गेला होता. धावत आलेले डावले मारणाऱ्याला म्हणाले, " त्याला मारायला नको होतं, तसाच पकडायला हवा होता. " ....... अचानक मिस्चिफच्या खिशातला. मोबाईल वाजू लागला. तो गुड्डीचा होता. डावले पुढे होऊन त्याचा मोबाईल घेणार तेवढ्यात गुड्डीला आजूबाजूला बरेच आवाज ऐकू आल्याने त्याने फोन बंद केला. डावलेंनी तो मोबाईल ताब्यात घेतला आणि तपासासाठी देखणेंकडे दिला. एक महत्त्वाचा गुन्हेगार जो बऱ्याच गुन्ह्यांचा छडा लावण्यास उपयोगी ठरला होता, तो आता अस्तित्वात नव्हता. पण दरोड्याच्या आरोपाखाली बाहेर असलेल्या गुन्हेगारांपैकी एक कमी झाला होता, इतकंच. सगळं उरकेस्तोवर सकाळचे आठ वाजले. वातावरणातली भीतिदायक उत्तेजितता संपुष्टात आली होती. आता डावले आणि पार्टी पोलिस स्टेशनकडे निघाली. नाही म्हणायला आपण सॅमसनला पकडण्याचे आदेश वेळेवर दिले , म्हणून तो तरी ताब्यात असेल याचं त्यांना समाधान वाटलं. रिमांडसाठी उरलेले जेमतेम दोन दिवस त्यांना केसची तयारी करण्यासाठी मिळणार होते. ........अचानक त्यांना एका विचाराने घेरलं. मिस्चिफ मारला गेला ही चूक तर ठरणार नाही ? एक जिवंत पुरावा नष्ट झाला होता. पण त्याला मारण्याशिवाय दुसरा उपायही नव्हता. काहीही जरी असलं तरी केस त्यांनीच क्रॅक केली होती. श्रीकांतसरांपेक्षा ते वरचढ ठरले होते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्यांना बरं वाटत होतं. तसे ते श्रीकांतसरांचा कधीच द्वेष करीत नसत. त्यांना त्यांच्याबद्दल आदर होता. आता पुढचं प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता होती. नकळत त्यांची छाती थोडी का होईना फुगली. यशाची पण नशा येतेच. पो. स्टेशनला पोहोचायाला वेळ होता. त्यांनी समाधानाने डोळे मिटले. आणि त्यांना किंचित डुलकी लागली. दहा पंधरा मिनिटाच्या डुलकीने ते ताजेतवाने झाले. आणखी अर्धा तास असाच गेला. गाडी पोलिस स्टेशनला पोहोचल्यावर ते एक प्रकारच्या आत्मविश्वासाने खाली उतरले. ........

मिस्चिफला फोन लावून लावून गुड्डी कंटाळला होता. कोणाच्यातरी भक्कम मदतीशिवाय इथून सुटका होणार नाही आणि ही पोरगीही पचणार नाही. पेरियरची माणसं केव्हाही येऊन उभी राहू शकतात . असला टेन्शनवाला विचार आल्यापासून गुड्डीचं लक्ष लागेनासं झालं. त्याने मध्यंतरी जेवण मागवलं. पण त्याला ते फारसं गेलं नाही. इथून आपलं हॉटेल डिलाइट फार लांब नसलं तरी तिथे पोहोचणं सोपं नव्हतं. एकदा का आपल्या मोहोल्ल्यात गेलो की आपण सुरक्षित राहणार आहोत . समोरच्या पोरीच्या सततच्या प्रश्नांनी तो आता कावला होता. साला इसको लेके भागना नही चाहिये था. पण त्याला स्त्रीचं आकर्षण फार होतं , म्हणून तर त्याने ही चूक केली होती. बारचा मालक मुसलमान असला तरी धंदेवाला होता. फार दिवस तो आपल्याला ठेवून घेणार नाही, याचाच अर्थ ह्या पोरीचं टेस्टिंग करून घेऊन हिला विकून टाकली तर चार पैसेही मिळतील आणि काहीतरी करता येईल. दोन्ही मावश्यांकडे जाण्यात अर्थ नाही. म्हणजे हिला विकण्यासाठी दुसरं गिऱ्हाईक शोधावं लागेल. म्हणजे बाहेर पडावं लागेलच. बाहेर गेलं तर कोण पकडेल सांगता येत नाही. विक्षिप्त विचारांनी तो व्यापला . अजून सबंध रात्र काढायची म्हणजे कठीण आहे. मग त्याने आपल्या पांढऱ्या कोटाकडे पाहिलं. तो इतका मळका झाला होता की अंगावर ठेवण्याची त्याला आता लाज वाटू लागली होती. तो कोट काढू लागला. त्याबरोबर समोरच्या खिडकीशी उभी असलेली पोरगी सावध झाली. हा नक्कीच आपल्याला काहीतरी करणार. ते पाहून गुड्डी वैतागून म्हणाला, " डरती कायकू है ? मै कुछ नही करनेवाला. " त्याने मग अंगातला शर्टही काढला. आत घातलेल्या बनियन मधून त्याचं पोशिंदं शरीर दिसत होतं. व्यायाम नावाचा प्रकार त्याला माहीत नसावा. त्याचे व्यायाम वेगळेच असायचे, त्याला काय करणार ? पोरीची छाती धडधडू लागली. तिने पुन्हा घाबरून विचारले, " कपडा कायकू उतारता है, मेरे पास मत आना. यहां आनेके बजाय हम निकल जाते तो अभी तक आपून स्टेशन तक पहुंच जाते थे. " तिने घाबरून सुचवून पाहिलं. ते ऐकून गुड्डी म्हणाला, " देख अगर हम बाहर होते तो अबतक कितने लोग तेरे पीछे पडे होते तू जानती नही. और देख ये घडी घडी गाव जानेका नाम मत लेना, समझी ? " ती पुन्हा घाबरून म्हणाली, " वो मै नही जानती, अगर तुम कुछ उलटा सीधा करोगे , तो मै ये खिडकीसे कूद जाउंगी. " त्यावर तिला समजावण्याच्या उद्देशाने गुड्डी म्हणाला, " एक दो दिन यहां छुपनेके बाद हम चुपचाप निकल जायेंगे. पहले तो हम मेरे हॉटेलपर जायेंगे. अब चुपचाप खाना खा ले और सो जा. " त्याच्या मनात आलं अजून आपण हिला हातही लावला नाही. ..... तो तिच्याकडे लंपटपणे पाहत म्हणाला, " आज हम दोनोंको इसी बेडपर सोना पडेगा. " ....... तेवढ्यात खाली कसली तरी गडबड वाटली म्हणून गुड्डी बाहेर येऊन शिडीवजा जिन्यावरून खाली डोकावला. खालच्या बार मध्ये तीन चार माणसं चॉपर आणि पिस्तुलं घेऊन आत शिरली होती. काउंटरवरच्या मियाला ते धमकी देत होते , ती पेरियरची माणसं होती. त्यांना पाहून त्याची बोबडी वळली. तो तसाच उभा राहिला. त्यांचा नूर पाहून काही तरी करावं लागणार होतं. त्यातले दोघे मियाला म्हणाले, " क्यूं बे लांडे , यहां कोई लडकी आयी है ऐसी हमे खबर है. चुपचाप लडकी को हमारे हवाले कर दो, वरना तेरा ये ढाबा दो मिनिटमे उडा देंगे, " पहिल्यांदा तर मियाला आपल्या बारला ढाबा म्हंटलेलं आवडलं नाही आणि आपल्याला लांडा . त्याने पेरियरचं नाव ऐकलेलं होतं. वो खुदको बॉंबे किंग समझता है , याची त्याला माहिती होती. अजून त्याच्याशी मियाचा संबंध आला नव्हता. पण थोडा विचार केला आणि समोरचे खतरनाक गुंड पाहून त्याने कपाळावर हळूहळू जमणारा घाम पुसायला सुरुवात केली. लहानसा बार ढवळून काढायला यांना कितीसा वेळ लागणार ? त्यातून गुड्डी लपला ती एकमेव रूम होती. आपला जीवही वाचेल आणि बारही.. मग तो हळूच म्हणाला, " अगर मैने आपको बताया वो कहां है तो मेरेकू क्या मिलेगा. ? " इथेच त्याने चूक केली. समोरच उभा असलेला चॉपरवाला आपल्या सहकाऱ्याला म्हणाला, " मियाके पास लडकी है, लेकीन उसको बक्षिशी चाहिये, क्या करे ? दे देंगे क्या बक्षिशी ? " असं म्हणून त्याने सहकाऱ्याला डोळा मारला. पुढचा संवाद ऐकायला आणि त्यांचं काय डील झालं हे समजून घ्यायला गुड्डी थांबला नाही.

पोरगी न जेवता तशीच बेडवर बसून होती. ताट भरलेलं असलं तरी अन्न तोंडापर्यंत जायला पाहिजे ना . त्याने पटकन आपले कपडे करायला सुरुवात केली. ते पाहून पोरगी म्हणाली, " क्या हुवा ....? " तिचा श्वास वर खाली होऊ लागला. मग गुड्डीने तिचा हात धरला आणि म्हणाला, " बडा शौक है ना तेरेको भागनेका ? चल आज भागते ही रात गुजार देंगे. सोचा था सुबे तेरे लिये कपडा खरीदूंगा और थोडा जेवरभी. लेकीन तू अपनी तकदीर खुद लिखना चाहती है, अब लिख. " असं म्हणून तिला त्याने खसकन ओढून आपल्या जवळ खेचले आणि तो शिडीवजा जिना उतरू लागला. एवढ्या जवळिकीतही ती त्याला हवीहवीशी वाटली. दोन पायऱ्या उतरून तो खाली वाकून पाहत होता . आता मियाने समोर उभ्या असलेल्या दोघांना भटारखान्याकडे बोट दाखवून वर खोली असल्याचं सांगितलं. ते दोघे धावले. गुड्डी पोरीला घेऊन भीतीने तीन चार पायऱ्या घसरून खाली आला. भटारखान्यात आडवे तिडवे झोपलेल्या वेटर्सना लाथाडीत तो मागच्या दरवाज्याची कडी शोधू लागला. झोपलेल्या वेटर्सनी त्याला एकदोन शिव्या हासडल्या, पण ते उठले नाहीत. त्याला कडी दिसेना. पण समोरच त्याला मेनस्वीच दिसला. त्याने तो फटकन खाली ओढला. सगळीकडे अंधार पसरला. ......... आत शिरलेल्या चॉपरवाल्याने सणसणीत घाणेरडी शिवी देऊन शिडीवजा जिना चढायला सुरुवात केली. त्याने टॉर्च काढून लावला. वरच्या खोलीत अर्धवट का होईना उजेड पसरला. दुसरा शिडीच्या पहिल्या पायरीवर अगतिकपणे उभा होता. अंधारात गुड्डी पोरीला पाठीशी घेऊन भिंतीला हालचाल न करता चिकटून उभा होता. आता लवकरच पळालं पाहिजे असा विचार करून आणि समोरचा मार्ग मोकळा झाल्याने अंधारात बुडालेल्या बारमधून गुड्डी पोरीला घेऊन रस्त्यावर आला आणि विचार न करता धावू लागला. ...... अंधारात काहीच दिसत नसल्याने आलेल्या चौघा गुंडांना मियाचा संशय आला आणि त्यानेच लाइट घालवले आणि आपल्याला फसवले असे वाटून ते कौंटरवरच्या मियाकडे धावले व त्याचे बकोट धरून त्याच्या दोन तीन लगावल्या. अर्थात हे पाहायला गुड्डी नव्हताच. मियाची मरम्मत चालू होती. बाहेर गुड्डी वेगवेगळ्या गल्ल्यांमधून धावत होता.

आता मात्र पोरगी चुपचाप धावत होती. बाहेर असूनही तिने गुड्डीच्या मागे स्टेशनला जाण्याचा लकडा लावला नाही. आता ती त्याच्याबरोबर मनापासून धावू लागली. आपण वाचलो तरच घरी जाऊ शकतो आणि या माणसामुळेच वाचू शकतो. ती धावता धावता म्हणाली, " आपका हॉटेल कहां है , वहां चलिये ना " तिच्यातला बदल जाणवून गुड्डीला बरं वाटलं पण आपलं आयुष्य नक्की किती आहे याचा त्याला अंदाज नव्हता. त्याही अवस्थेत तिला म्हणाला, " सवेरा हो जायेगा तभी हम जायेंगे , अभी तो आसरा ढूंढना पडेगा. अंधारात त्याला कळलंच नाही तो कोणत्या चाळीत शिरतोय ते. तो नेमका समोर आलेल्या जिन्याने चाळीच्या पहिल्या मजल्यावर आला . समोर दिवानी मौसी पाठमोरी उभी होती. तिला न ओळखून त्याने विचारले, " मौसीजी , आजकी रात यहां हम रुक सकते है क्या ? " आवाज ओळखीचा वाटल्याने मौसीने आपले तोंड प्रश्नकर्त्याकडे वळवले आणि आश्चर्याने ती म्हणाली, " आ गया मेरा बनपाव , अब तू जायेगा कहां ? " आणि तिने समोर उभ्या असलेल्या दोघा दलालांना त्यांना पकडायला सांगितले. ........गुड्डीला बसलेला हा जबरदस्त धक्का होता. आपण अगदी नकळत मौसीच्या पंजात कसे आलो याचे त्याला आश्चर्य वाटले. तकदीर का तकाजा ,दुसरं काय ? आता त्याच्या लक्षात आलं की ही नक्कीच पोलिसांच्या ताब्यात देणार. पोरगी आता त्याला अगदी घट्ट चिकटून उभी होती. संकटात माणसं कोणाबरोबर आहोत हे पाहत नाहीत , हेच खर. दलालांनी मग दोघांना जबरदस्तीने एका लहानश्या रूम मध्ये बंद केले. आता फक्त मरणाची वाट पाहायची. इतकी कशी परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याला कळेना. मग त्याने जसं घडतंय तसं स्वीकारण्याचं ठरवलं. खिशातलं पिस्तूल मौसीने त्याच्याकडून काढवून घेतलं . सध्या काहीच करण्यासारखं नसल्याने त्याने पोरीकडे पाहिलं. तीन चार तासांनी दिवस उजाडणार होता. अर्थात या विभागात, दिवस उजाडेपर्यंत धंदा करण्याची पद्धत असल्याने विभाग निशाचरासारखा जागा राहत असे. इथे थांबला तो संपला, ऐवजी झोपला तो संपला, हेच योग्य होतं. चाळीतली वर्दळ चालू होती. पोटात अन्नाचा कण नसल्याने त्यांना धड झोप येत नव्हती. खोलीत आल्या आल्या आज अचानक पोरगी त्याला चिकटली आणि रडायलाच लागली. त्याने असला चान्स न सोडण्याचं ठरवलं. हळूहळू तिला उगी करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्या अंगोपांगांवरून हात फिरवायला सुरुवात केली. आस्ते आस्ते त्याने तिचे कपडे बाजूला केले. तिची उघडी जवानी पाहून गुड्डीला वासना अनावर झाल्या. ते तिच्याही लक्षात आलं पण दुसरा काहीही पर्याय नसल्याने त्याच्या मागणीला ती स्वतःहून बळी पडली. केव्हातरी पहाटे समाधानाने गुड्डी आणि ती एकमेकांना चिकटून झोपली. सकाळचे सात वाजत आले तरी ते दोघे विवस्त्र अवस्थेत बेडवर पडले होते. गुड्डी समाधानाने तिच्या अंगावरून हात फिरवीत तिला जवळ धरीत होता , तेवढ्यात दरवाज्यावर थापा पडू लागल्या. घाई गर्दीने त्याने प्रथम स्वतःचे कपडे केले आणि तिला उठवून कपडे करण्यास कपाटाच्या दाराआड जाण्यास सांगितले. मग तो दार उघडायला गेला. तोपर्यंत दरवाज्या ठोकून ठोकून बाहेरची व्यक्ती आता शिव्या हासडू लागली. ती होती दिवानी मौसी आणि तिच्या मागे होते. इन्स्पे. डावले, नेटके , दोन कॉन्स्टेबल्स आणि काकाजी. .... इतक्या लवकर पोलिसी यात्रा अनुभवावी लागेल याची गुड्डीला कल्पना नव्हती. डावले पुढे आले आणि त्यांनी त्याचं बकोट धरलं. बरोबर असलेल्या काकांना पाहून अन्वर मिया ऊर्फ गुड्डी म्हणाला, " अरे काकाजी , आप तो पुलिसवाले है . दादाको आपने फसाया.... " आतल्या पोरीला मात्र अटक न करण्याची विनंती मौसीने केली. ती म्हणाली, " गरीबके पेटपर लात मत मारना, साब, आजकल धंदा बहोत मंदा है. .... पण डावलेंनी तिचं न ऐकता तिलाही ताब्यात घेतली. विजयी मुद्रेने ते त्या दोघांना घेऊन स्टेशनकडे निघाले. श्रीकांतसरांना न विचारताही मुहूर्त चांगला लागला होता. काकांबद्दल मात्र गुड्डीचा गैरसमज झाला तो झालाच. पो‌. स्टेशनला आणल्यावर गुड्डीला सगळ्यांना ठेवलेलं होतं त्याच कोठडीत ढकलला. आणि डावले म्हणाले, " ये देख मिया , जो है वो सब बता देना, तू तो साला एक झापडका भी नही है. ज्यादा हिरोगिरी मत करना थोडीही देरमे आउंगा तेरा स्टेटमेंट लेने, तबतक गले लगाले अपने यार दोस्तोंको. " आत गेल्या गेल्या त्याला सोल्या दिसला. त्याने त्याला एखाद्या बाईला जवळ घेतात तसा जवळ घेतला . त्याच्या अंगावरून हात फिरवीत तो म्हणाला, " कितने अर्सोंके बाद आयारे तू , मेरे यार". .... मग बरोबर आणलेल्या पोरीला महिला इन्स्पेकटरच्या स्वाधीन करून ते समाधानाने खुर्चीत बसले. आजकाल काकांना कोठडीत ठेवीत नसत. तशी काकांकरता वेगळ्या कोठडीची मागणी मात्र मान्य केली नव्हती. आता डावले रिमांड संपत आला असला तरी काळजीत नव्हते. पूर्ण अहवाल तयार करणं हे एकच काम होत. तसच मीडियासाठी पण योग्य ती माहिती तयार करणं आवश्यक होतं. कशी कोण जाणे पण गुड्डीला वाळकेश्वरच्या फ्लॅटची माहिती होती. आता फक्त वाळकेश्वरच्या फ्लॅटमध्ये काकांना घेऊन जायचं बाकी होतं. त्यामुळे डावलेंचं काम पूर्ण होणार होतं....... एकूणच केस पूर्णपणे सादर करणं शक्य होणार होतं.

******** ************* **************** ******************* ********

सोना गेले दोन तीन दिवस खुशीत होती. ती मम्मीला न सांगता काकांना भेटून आली होती. तिला खात्री होती , मम्मीला सांगितलं असतं तर कधीच भेटता आलं नसतं. काका ज्या वातावरणात होते ते पाहून मात्र तिला वाईट वाटत होतं. पण तिने मम्मीला त्याबद्दल न सांगण्याचे ठरवले. उगाच कटकटी नकोत. साधनाला जरा संशय आलाच होता , की नेहमी प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारी सोना गेले दोन तीन दिवस अगदी शहाण्यांसारखी कशी काय वागत होती . पण तिने तिला मुद्दामच विचारले नाही. दोघी मायलेकींमध्ये त्यामुळे फारसा संवाद होत नव्हता. खरंतर साधना आता कंटाळली होती. तसं तिच्या वर्तुळात फक्त दोनच व्यक्ती सामील होत्या. नवीन काय शोधणार या विचाराने ती कंटाळून सोफ्यावर बसली होती. आज ती कामावर पण जाणार नव्हती. तिचा मुळी मूडच नव्हता. आणि बाहेर कुठे जावंसही तिला वाटत नव्हतं. तेवढ्यात सोना बाहेर आली. शाळेत जायची वेळ झाली होती. ती जरा इकडे तिकडे घोटाळली. काकांना भेटायला जायचं होतं. पण कारण काय सांगायचं तिला सुचेना. क्लासचं कारण सांगायला आज क्लास नव्हताच. हे मम्मीलाही माहीत होतं. तिला अचानक सुचलं. हातात विनाकारण घेतलेला फ्लॉवर पॉट जागेवर ठेवीत ती म्हणाली, " मम्मी , आज माझ्या मैत्रिणीचा बर्थ डे आहे. मला यायला जरा उशीर होईल. ..... " खरंतर तिला चालेल ना असे विचारयचं होतं. पण तिने बोलणं अर्धवट सोडलं. साधना डोळे मिटून सोफ्यावर आळसटल्यासारखी बसली होती. तिने पटकन होकार दिला. फक्त जाता जाता ती म्हणाली, " पण सोना तिला काही भेट नको का द्यायला ? " असं म्हणून तिने उठून घरातून पन्नास रुपये आणून दिले. सोनाला वाटलं नाही मम्मी एकदम हो म्हणेल ते. तिने एकदा साधनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आणि काळजीच्या सुरात म्हणाली, " मम्मी तुला बरं नाही का ? पाहिजे तर नाही जात मी. शाळा सुटल्यावर घरीच येईन. " मग मात्र तिला जवळ घेऊन साधना म्हणाली, " नाही बेटा तू जा, मी कंटाळले ना म्हणून तुला असं वाटलं. लवकर ये हं. " असं म्हंटल्यावर सोना निघाली. आजकाल तिला शाळेत पोचवायला जावं लागत नसे. कधी कधी बस पर्यंत जावं लागे. पण आज तेही जावं लागलं नाही . जाता जाता सोना विचार करू लागली. खरंच आपण तरी मम्मीला न सांगता कशाला जायचं काकांना भेटायला ? तिलाही काका आवडतात , पण न भेटण्याचं तिचं कारण काही तिच्या लक्षात येईना. बघू , शाळा सुटल्यावर ठरवू. नाही वाटलं तर नाही गेलं. आणि तसेही काका म्हणालेच होते, ही जागा चांगली नाही म्हणून , मग आपण तरी कशाला हट्ट करायचा. पण काकांचं आकर्षणही तिला स्वस्थ बसू देईना. अशा दोलायमान मनः स्थितीत ती शाळेत गेली. ती गेल्यावर साधनाने अगदी सावकाश लळत लोंबत जेवण तयार केलं. एकटीनं जेवायचं म्हणजे आणखीन कंटाळवाणं होतं. कुणाचाही फोन येत नव्हता. कुणालाही फोन करण्याची तिची इच्छा नव्हती. मग तिने झोपण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनात आलं , आपण तरी काकांना भेटायला जायला का तयार होत नाही ? नाही म्हंटलं तरी त्यांच्या बरोबर काही काळ तरी तिने चांगलाच घालवला होता. आणि माणूस इतका काही वाईट नाही. ते कधीही भांडले नाहीत, की ते कधी तिच्या मनाविरुद्ध वागलेही नाहीत. त्यांच्या जागी असणारा साधारण माणूस असाच वागला असता आणि ज्या वातावरणात ते जगत होते ते काही त्यांनी निर्माण केलेलं नव्हतं. त्यांचा स्वतःचा मुलगा आणी सून त्यांना स्वीकारायला फारसा तयार नाही , अशा परिस्थितीत जाऊन जीव तर देता येत नाही ना ? मनाने काकांच्या बाबतीत सहानुभूती निर्माण करण्याचा चंगच बांधला होता. तसंही आपल्या आयुष्यात दुसरं आहे तरी कोण ? मनाची जबरदस्ती एवढी वाढली की शेवटी मोठ्याने म्हणाली, " मी जाईन आज त्यांना भेटायला . " तरीही मन तिलाच दोष देत राहिलं. इतके दिवस का घालवलेस ? सोनाने जाऊ नये असं तुला का वाटलं . त्यांनी सोनाला जीव लावलाय. तसाच तुलाही. कितीही नाकारलंस तरी तू त्यांच्या येण्याची वाट पाहतेस . शरीरानेही तू त्यांच्या जवळ
आलेली आहेस , काय हरकत आहे लग्न करायला. तो काही गुन्हेगार नाही. माणसाच्या आयुष्यात सगळ्या प्रकारचे प्रसंग येतात. त्यांनी तुला किशाने बलात्कार केलेली म्हणून तुला झिडकारलं का ? .......... मन थांबायला तयार नव्हतं. कसे तरी पाच वाजेपर्यंत तिने वेळ काढला. मग पोलिस स्टेशनला जायची तिने तयारी केली. नाहीतरी सोना मैत्रिणीकडे जाणार आहे. आपण घरी बसून काय करणार आहोत ...........?

सहा वाजेपर्यंत ती रस्त्यावर अली. तिने बस पकडली. तिच्या सहजच मनात आलं. सोना लवकर घरी आली तर ? कशी येणार ? तिला आठ नक्की वाजतील. सातच्या सुमारास ती डावलेंपुढे येऊन उभी राहिली. पोलिस स्टेशन नावच्या इमारतीमध्ये जाण्याची तिच्या आयुष्यातली ही पहिली वेळ नव्हती. पण तिला तिथला प्रकाश नेहमीच अंधारमय वाटायचा. खरंतर पोलिस त्यांचं काम करीत असतात , वर्षानुवर्ष. पण त्यांना असं कधी वाटत नसावं. तिच्या मनात वेगवेगळ्या विचारांच मोहोळ उठलं. डावले साहेबांनी , कॉन्स्टेबलने सांगितल्यावर फायलीतून मान वर केली. आश्चर्याने ते पाहत राहिले. म्हणाले, " अरे आत्ताच तर काकांची मुलगी त्यांना भेटायला आली आणि आता तुम्ही ? " साधनाला आश्चर्य वाटलं. तिला वाटलं काकांची मुलगी म्हणजे निलू (जिच्या बद्दल ते एक दोनदा बोलले होते . आणि सध्या ती आलेली होती) इथे कधी आली ? तिचं आश्चर्य पाहून ते म्हणाले, " अहो मुलंच ती वडलांना भेटायला येणारच. तुम्हीही बरोबर आला असतात तर चाललं असतं नाही का ? " आता तर साधनाला आश्चर्यच वाटलं. मग साधनाला समोरच्या बाकड्यावर बसलेले काका आणि सोना दिसली. आधीच आलेल्या सोनाला पाहून साधनाला धक्काच बसला. ही तर बर्थडेला जाणार होती ना ? तिच्या मनातला प्रश्न तिने मनातच ठेवला.

काकांशी बोलणारी सोना मात्र मम्मीला पाहून घाबरली. काकांनाही आश्चर्य वाटलं . बोलणं अगदीच जुजबी स्वरूपाचं होतं कारण डावले आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांचं लक्ष होतं. काकांना मात्र साधनाने अशा ठिकाणी येणं आवडलं नाही. ते तिला तसं म्हणालेही. त्यावर ती म्हणाली, " तुमचा गैरसमज झाला असता म्हणून तर आले. " ते म्हणाले, " पण तुलाही यावसं वाटत होतंच ना ? आणि हो सोनाला रागावू नकोस हं. " तिच्याकडून त्यांना खात्री हवी होती. तिने न बोलताच काकांच्या म्हणण्याला होकार दिला. थोड्याच वेळात त्या दोघी निघाल्या. डावले सरांनी त्यांना निघताना दबक्या आवाजात सांगितलं. " लवकरच त्यांची सुटका होईल. फक्त लागला तर जामीन लागेल, तेवढी व्यवस्था करा. पण लागेलच असं नाही तुम्ही जर मंगळवारी कोर्टात याल तर तुम्हाला कळेलच. " त्यांनी तिला कोर्टाचा पत्ता दिला. त्या दोघी बाहेर आल्या .

बाहेर आल्या आल्या सोना म्हणाली, " सॉरी मम्मी , पण तू काकांना भेटायला नाही म्हणाली असतीस , म्हणून मी ......". तिने वाक्य अर्धवट सोडलं. तिला जवळ घेत साधना म्हणाली, " नाही बाळ , मला माहीत आहे की तुला ते आवडतात. आणि स्वतःशी बोलल्यासारखं म्हणाली, ......आणि मलाही." आता कोर्टात जावं लागेल नाहीतर गैरसमज व्हायचा. आपण त्यांची बायको असल्यासारखेच लोक आपल्याशी वागतायत. कमाल आहे. त्यांच्या सुटकेची बातमी सुखावह असली तरी सेलिब्रेट करण्यासारखी होती असं तिला वाटेना. तिने स्वतःच्या भावना स्वतःपासून लपवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मनाने तिला त्रास न देता माफ केलं असावं.

(क्र म श; )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. लगेच पुढचा भाग आला.. खरचं इंटरेस्टिंग..!
वाचकांची उत्सुकता न ताणता लवकर पुढचे भाग टाकता आहात.. हे खूप कौतुकास्पद आहे..
शेवट आता अपेक्षित असला तरी वाचायला उत्सुक आहे..

वाचकांची उत्सुकता न ताणता लवकर पुढचे भाग टाकता आहात.. हे खूप कौतुकास्पद आहे..> खरोखरच
कामथेकाका अंतिम भागही आजच टाकलेला आहे.> कौतुक करावे तेवढे कमी Happy