माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 14 September, 2016 - 11:19

गेल्या वर्षी त्या दिवशी मी जरा जास्तच उत्साहात होतो. माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होत होती. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होत असताना पाहून कोणाचा उत्साह वाढणार नाही, नाही का! मागच्या वर्षी वाढदिवस दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आतून पाहायला जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीचा प्रवास जाता-येता मुंबईहून करण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन कारणे होती. एक तर पश्चिम एक्सप्रेस आणि दुसरी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस. मग त्याप्रमाणे नियोजन करून तीन महिने आधीच पाहिजे त्या गाड्यांचे आरक्षण करून ठेवले.

आरक्षणे कन्फर्म होती तरी हा प्रवास होईल की, नाही हे काही सांगू शकत नव्हतो. कारण प्रवासासाठी राजधानीची निवड केलेली होती. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये असेच घडले होते की, ज्याज्यावेळी मी दिल्लीला जाताना किंवा येताना राजधानीचा पर्याय निवडला आणि आरक्षण केले, तेव्हातेव्हा शेवटच्या क्षणी माझा प्रवासाचा बेतच रद्द झाला. म्हणूनच त्यावेळच्या प्रवासाबद्दल जरा धाकधूक होतीच. पण २०१५मध्ये तसे काहीच झाले नाही. ठरल्याप्रमाणे अगदी प्रवास सुरू झाला. मी दिल्लीला पोहचलो आणि मनातल्या मनात म्हणालोही की, आता राजधानीच्या प्रवासापासून मला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळेच त्या दिवशी खूप उत्साह संचारला होता. 'ऑगस्ट क्रांती' निवडण्यामागेही एक कारण होते. २ ऑक्टोबर २०१६ला या गाडीला राजधानीचा दर्जा मिळून २५वे वर्ष लागणार होते, तर तिची पूर्वाश्रमीची मुंबई सेंट्रल-ह. निझामुद्दीन वातानुकुलित एक्सप्रेस सुरू होऊन २०१६मध्ये २५ वर्षे पूर्ण होणार होती. म्हणूनच ती गाडी निवडली.

मग त्या दिवशी निजामुद्दीनवर दुपारी १२.४५ पर्यंत दाखल झालो. नेहमीच्या सवयीमुळे पुढच्या ४ तासांत स्टेशनवर सामानासकट इकडेतिकडे हिंडत राहिलो. कंटाळा येणार नव्हताच. 'ऑगस्ट क्रांती'ची वेळ होत आल्यावर सहा नंबरच्या फलाटावर गेलो. पण गाडी फलाटावर जेमतेम २० मिनिटे आधी आणल्यामुळे माझी तशी पंचाईतच झाली होती. साडेचार वाजता गाडी फलाटावर आल्यावर शेवटून दुसरा असलेल्या माझ्या डब्यात जाऊन जागेवर बसलो आणि खाली येऊन चार्ट पाहिला. हे मला नेहमी करावे लागते. कारण नेमके माझ्या आसपास महिला मंडळ किंवा ज्येष्ठ नागरिक असतात आणि मग माझ्या जागेवर ते डोळा ठेवून असतात. मग यावेळीही राजधानीच्या पहिल्या प्रवासातही तसे कोणी आहे माझ्याजवळ की मी सुरक्षित आहे हे चार्टमध्ये पाहिले. तर एक जण वयाने माझ्याबरोबरचाच होता मथुऱ्यापासून. हुश्श... बाहेर गेलो होतोच तर जरा राजधानीबरोबर सेल्फी काढून घेतला आणि ५ मिनिटे परत जागेवर येऊन बसलो. तोच रेल्वेचा कर्मचारी माझ्या म्हणजेच फलाटाच्या बाजूच्या खिडक्यांच्या काचा बाहेरून स्वच्छ करून गेला.

हल्ली दिल्लीसारख्या ठिकाणी गाडी फलाटावर आणताना त्या-त्या गाडीचा कार्यअश्वच पिटलाईनपासून आपल्या गाडीला घेऊन येतो. पूर्वी त्यासाठी शंटर्सचा वापर व्हायचा. पण गाडी फलाटावर आली की, आधी पिटलाईनवरच्या गाडीला शंटर जोडा, फलाटावर आल्यावर शंटर काढा, त्याला बाजूला न्या, पुन्हा लोको शेडपासूनचा रुट सेट करा, मग मुख्य कार्यअश्वाला फलाटावर न्या, परत त्याला गाडीशी जोडा आणि या सगळ्यामध्ये गाडीचे ब्रेक लवकर चार्ज होण्यासाठी प्रत्येक डब्याचे ब्रेक रिलीज करत जा. असे सर्व प्रकार करायला लागू नयेत आणि वेळ वाया जाऊ नये यासाठी आता हा पिटलाईनवरून प्रत्येक कार्यअश्वाने आपापल्या गाडीला फलाटावर आणण्याची प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे आमची ऑगस्ट क्रांती फलाटावर आली ती बरीच तयारी करूनच. त्यामुळेच तिने फलाटावर वेळेच्या आधी २० मिनिटे येणे पुरेसे होते. 'ऑगस्ट क्रांती' फलाटावर आल्यावर बॉक्स बॉयने गार्ड आणि लोको पायलटचे बॉक्सेस त्यांच्या ताब्यात दिले. ड्युटीवर येण्याच्या आधी लोको पायलट लॉबी आणि गार्ड लॉबीतून येताना आमच्या गार्डला ब्रेथ लायझर चाचणी द्यावी लागली होतीच. त्यानंतर दोघांनीही आपापल्या लॉब्यांमध्ये ठेवलेली इंजिनिरिंग विभागाची फायईल चाळली होती. कारण त्यावरून त्यांना वाटेत मार्गावर काही काम चालू आहे का, काही अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यासाठी सांगितले आहे का याची माहिती होणार होती. आणि गरज लागली तर त्यांच्याजवळ वर्कींग टाईम टेबल होतेच की.

गाडीची वेळ झाल्यावर निझामुद्दीनच्या असिस्टंट स्टेशन मास्तरने दिल्लीच्या सेक्शन कंट्रोलरकडून 'ऑगस्ट क्रांती'ला सोडण्यासाठी परवानगी घेतली. दरम्यानच्या काळात ब्रेक पॉवर सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रांवर लोको पायलट आणि गार्डच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही घेऊन झाल्या होत्या. येथून मथुऱ्यापर्यंतच्या मार्गावर ऑटोमटीक ब्लॉक सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. या सिस्टीममुळे पुढची गाडी जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसे मागच्या सिग्नलचे रंग बदलत जातात. पण निझामुद्दीनसारख्या मोठ्या किंवा मधल्या महत्त्वाच्या ब्लॉक स्टेशन्सवर सेमी-ऑटोमॅटीक यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे असिस्टंट स्टेशन मास्टरला आवश्यकतेनुसार सिग्नल बदलण्याची सोय उपलब्ध होते. आता सेक्शन कंट्रोलरनेही परवानगी दिलेली असल्यामुळे निझामुद्दीनच्या असिस्टंट स्टेशन मास्टरने फलाट क्र. ६ पासून निझामुद्दीनच्या मथुरेच्या दिशेने जाणाऱ्या लाईनपर्यंतचे सगळे पॉईंट्स केवळ दोन बटनांच्या मदतीने सेट करत स्टार्टर आणि निझामुद्दीनचा ॲडव्हान्स्ड स्टार्टर दोन्ही ऑफ (अनुक्रमे पिवळा आणि हिरवा) केले. स्टार्टर ऑफ मिळाल्याचे आमच्या गार्डलाही रिपिटरच्या मदतीने मागे दिसत होतेच. मग त्यानेही हिरवा बावटा दाखवल्यावर आमच्या लोको पायलटने हॉर्न वाजवला असणारच. या डब्ल्यूएपी-७ चे हॉर्न्स ऐकण्यासारखे असतात.

ठीक १६.५० झाले आणि गाझियाबादच्या कार्यअश्वाने (डब्ल्यूएपी-७ क्र. ३०२२०) माझ्या पहिल्या राजधानीच्या प्रवासाला सुरुवात केली. गाडी सुटताच सनईचे सूर गाडीत घुमू लागले आणि पाठोपाठ प्रवाशांना सूचनाही पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीमद्वारे केल्या गेल्या. निझामुद्दीन स्टेशनमधून गाडी बाहेर पडल्यावर जरा वेग घेत असल्यामुळे हलके जर्क्स बसू लागले होते. तेवढ्यात एक प्रवासी माझ्या शेजारून गेला. फोनवर पलीकडच्याला सांगत होता - इस गाड़ी में बहुत अच्छा खाना बना देते हैं।

ओखला हे आमच्या प्रवासातले पहिले महत्त्वाचे ब्लॉक स्टेशन. तसे हे क्रॉस करण्याची वेळ १६.५३ ची आहे, पण ऑगस्ट क्रांती अजून जरा हळुहळूच जात असल्यामुळे आम्ही ते १६.५८ ला क्रॉस केले. इथून पुढेच दक्षिण, पश्चिम, मध्य भारताकडे जाणाऱ्या गाड्या खऱ्या अर्थाने वेग धरायला लागतात. आमच्या बाबतीतही तसेच झाले. अटेंडंट कामाला लागला होता आणि प्रत्येकाला सीट क्र. विचारत नॅपकीनचे वाटप करू लागला होता. तेव्हाच केटरिंगवालाही त्याच्यापाठोपाठ येऊन पाण्याची बाटली देऊन गेला. ते करत असतानाच प्रत्येकाला सीट क्र. विचारून जेवणासाठी शाकाहारी की मांसाहारी हेही विचारून खात्री करून गेला.

आता इकडे 'ऑगस्ट क्रांती' आला वेग धरत होती. वेग इतका घेतला की, पुढच्या १७ किलोमीटरमध्ये आधीची वाया गेलेली ५ मिनिटं रिकव्हर केली होतीच, शिवाय पुढचे फरिदाबाद तर निर्धारित वेळेच्या ५ मिनिट आधीच क्रॉस केले. आता 'ऑगस्ट क्रांती' चांगलीच धावू लागली होती. दरम्यानच्या काळात पलीकडच्या खिडकीतून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या गाड्याही दिसत होत्या. आणि फरिदाबाद सोडत असतानाच पलवल निझामुद्दीन ईएमयू क्रॉस झाली. फरिदाबाद क्रॉस करतानाच दिल्लीच्या सेक्शन कंट्रोलरच्या सूचनेवरून तेथे पलवलच्या दिशेने जाणारी ईएमयू आणि पुढे फरिदाबाद न्यू टाऊनमध्ये मथुऱ्याच्या दिशेने जाणारी कंटेनर मालगाडी 'ऑगस्ट क्रांती'साठी डिटेन केलेल्या मला दिसल्या. पण फरिदाबाद न्यू टाऊन क्रॉस करताना 'ऑगस्ट क्रांती'चा वेग थोडा कमी झाला होता. पण लगेचच वेग वाढवत १७.१२ ला म्हणजे पुन्हा निर्धारित वेळेच्या १ मिनिट आधी बल्लभगड क्रॉस केले. तेथेही निझामुद्दीनच्या दिशेने जाणारी एक ईएमयू क्रॉस झाली. तिच्या मागोमाग मिनिट भराच्या अंतरावर निझामुद्दीनच्या दिशेने जाणारी बॉक्स-एन वाघिण्यांची लांबलचक मालगाडीही क्रॉस झाली. ऑटोमॅटीक ब्लॉक सिस्टीमचा हा फायदा. आता पियाला ब्लॉक हटपासून बहुतेक टेंपररी स्पीड रिस्ट्रिक्शनमुळे पलवलपर्यंत 'ऑगस्ट क्रांती' ६० च्याच वेगाने धावत राहिली. याची माहिती लोको पायलटला त्याच्या निझामुद्दीनच्या लॉबीतल्या इंजिनियरिंगविषयीच्या फाईलमध्ये मिळालेली असणारच.

असे असूनही परत पलवल निर्धारित वेळेच्या १ मिनिट आधी १७.२९ ला क्रॉस झाले होते. पलवल सोडताच झोन आणि विभाग बदलणार होता. त्यामुळे पलवलच्या थोड्याच पुढे - आग्रा मंडल आपका स्वागत करता है, उत्तर मध्य रेल्वे - हा बोर्ड खिडकीतून दिसला. आता 'ऑगस्ट क्रांती'वर नियंत्रण आग्र्याहून होणार होते. पण अजून वेग तसा कमीच होता. झोन/डिव्हीजन बदलत होते ना. अखेर १७.३२ ला मास्ट क्र. (इलेक्ट्रीक वायरचा खांब क्र) १४७७/१८ माझ्या डब्याने ओलांडला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. माझा डबा तो मास्ट ओलांडत असतानाच इंजिनानेही टी/पी चा फलक ओलांडला होता. म्हणूनच तर वेग वाढला. थंडीचे दिवस असल्यामुळे आता बाहेर अंधारू लागले होते. १७.३३ ला पलीकडच्या डाऊन लाईनवरून एक २४ डब्यांची एक्सप्रेस निझामुद्दीनच्या दिशेने जात असतानाच केटरिंगवाला चहा, थर्मासमध्ये पाणी घेऊन आला. तेवढ्यात आणखी एक कंटेनरची मालगाडी तुघलकाबादकडे निघून गेली. मी माझ्या निरीक्षणांमध्ये रमलेलो असताना गाडीत सगळीकडे गप्पाही रंगल्या होत्या. एक तरूण तर आमच्या डब्यापासून पुढच्या डब्यापर्यंत येरझऱ्या घालत मोबाईलवर कितीवेळ बोलत होता.

१७.३८ ला निर्धारित वेळेत रुंधी ओलांडत असताना बोस्ट आणि बीआरएन वाघिण्यांची मालगाडी क्रॉस झाली. १७.५० ला कंटेनर मालगाडी जोरात हॉर्न वाजवत तुघलकाबादच्या दिशेने गेलेली दिसली. तोच आमच्या डब्यातला केटरिंगवाला थर्मास गोळा शोधत आला. चहा पिऊन झाल्यांचे थर्मास घेऊन गेल्यावर तिकडे त्याचे गणित जुळत नव्हते म्हणून तो बेचैन होता.

१८.१२ ला अझई क्रॉस करून पुढे आलो होतो, तोच एक मालगाडी दिल्लीच्या दिशेने धडाडत क्रॉस झाली. त्यपाठोपाठ वृंदावन रोड आणि भुतेश्वर ओलांडले आणि मिनिटभरानंतर माझ्या बाजूने मला डबल यलो सिग्नल दिसला. तो होता मथुऱ्याचा डिस्टंट सिग्नल. त्यामुळे तो ओलांडल्यावर गाडीचा वेग कमी होऊ लागला. पुढे काही क्षणांमध्येच मथुऱ्याचा यलो असलेला होम सिग्नल क्रॉस करत 'ऑगस्ट क्रांती' हळूच फलाट क्र. ३ वर जाऊन थांबली. हा 'ऑगस्ट क्रांती'चा पहिला व्यावसायिक थांबा. घड्याळात पाहिलं आणि चक्रावलोच. १८.२६ झाले होते. मध्येमध्ये जरा रखडत पळणारी ऑगस्ट क्रांती नियोजित वेळेच्या १२ मिनिटं आधीच मथुऱ्यात दाखल झाली होती. खिडकीतून बाहेर नजर टाकली तर तिकडे २ नंबरच्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर १२७८१ हे आकडे झळकत असल्याचे दिसले. मनातल्या मनात म्हटलं, अरे सुवर्ण जयंती अजून गेलेली नाही. त्या दिवशी म्हैसुरूहून निजामुद्दीनला जाणारी ही गाडी पावणेचार तास लेट होती. पण मथुरा आले म्हटल्यावर मला गाडीच्या आतमध्येही जरा सावधपणे पाहणे गरजेचे वाटत होते. इथे बरीच गर्दी आत आली होती आणि माझ्या इथला एक जण इथेच येणार होता. तसा तो आला आणि क्षणाचाही विलंब न लावता मला त्यानं विचारलं, तुम्ही आमची तिकडची सीट घेता? आम्ही दोघं आहोत आणि बरोबर लहान मुलही आहे. मग मी विचारलं, किती नंबर? १५. हा नंबर ऐकल्यावर मग मला त्याच्या तिकडच्या सीटवर जायला काहीच हरकत नव्हती. पण मनातल्या मनात म्हटलं की, अगदी राजधानीतही माझ्या सीटवरून कोणाची नजर हटत नाहीए.

तिकडच्या सीटवर बसल्यावर एक ज्येष्ठ बाई जरा घुश्शानच माझ्याकडे पाहत आहेत असे वाटले. म्हटलं आता जेवणानंतर पुन्हा या माझी सीट मागणार. पण गाडी सुटल्यावर काही वेळातच न जेवता त्या वरच्या बर्थवर जाऊन झोपल्याही.

मथुरा जंक्शन असल्यामुळे इथून सहा वेगवेगळ्या दिशेने फाटे फुटतात. आम्हाला भरतपूरच्या दिशेने जायचे होते. त्यामुळे आता इथून पुढे झोन आणि डिव्हिजन दोन्ही बदलणार होते. त्यामुळे पुन्हा एकदा आग्र्याच्या सेक्शन कंट्रोलरने कोट्याच्या सेक्शन कंट्रोलरशी सांकेतिक देवाणघेवाण करून ऑगस्ट क्रांतीला त्याच्या झोन/डिव्हीजनमध्ये पाठवण्याची पूर्वतयारी करून ठेवली होतीच. तसे सांकेतिक निर्देशही त्याने मथुऱ्याच्या असिस्टंट स्टेशन मास्टरला देऊन ठेवले होते. पुढे नवीन झोन/डिव्हीजन असल्यामुळे जरी ऑगस्ट क्रांती १२ मिनिटं आधी मथुऱ्यात दाखल झाली असली तरी तिला तिच्या नियोजित वेळेपर्यंत (१८.४०) मथुऱ्यात थांबणे भाग होते. त्या दरम्यान लोको पायलट आणि गार्डला आग्र्याहून आलेल्या नव्या कॉशन ऑर्डर असतील, तर त्याही देऊन झाल्या होत्या. मथुऱ्यानंतर पुढे ॲब्सोल्यूट ब्लॉक सिस्टीम असल्यामुळे पुढे गाडीला आपोआप सिग्नल मिळणार नव्हते. त्यामुळे १८.४० पर्यंत मथुऱ्याच्या असिस्टंट स्टेशन मास्टरने मुरहेसी रामपूरच्या स्टेशन मास्टरकडून लाईन क्लिअर घेऊन आमच्या 'ऑगस्ट क्रांती'ला पुढच्या प्रवासासाठी निघण्याचे सिग्नल दिले होते.

आता आम्ही पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात प्रवेश केला होता. पुढचा प्रवास सुरू झाला आणि थोड्या वेळाने संध्याकाळी १९.०० वाजता सर्वांना आकाशवाणी दिल्ली केंद्राच्या हिंदी आणि इंग्रजी बातम्या लाईव्ह ऐकवल्या गेल्या. दरम्यानच्या काळात शेजारच्या डाऊन लाईनवरून मथुऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दिसत होत्याच.
----

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन. माझ्या कित्येक फेर्‍या झाल्या आहेत ह्या गाडीने ... राजधानी पेक्षा ह्या गाडीचे टायमिंग सोयीचे होते ... Happy

तुम्ही प्रवास करत होता का गाडीकडे लक्ष ठेऊन होता. तुमचा मिनिटाचा मिनिटांचा हिशेब रेल्वे वाले पण करत नसतील.

दिवे घेणे

भारी लिहिलंय

छान लिहिलंय नेहमी प्रमाणेच.
माझा एक मित्र होता अगदी मिनिटाग्णीक नोंदी करायचा, सी/फा, W/L अशा विविध सूचना फलकांचा अर्थ वगैरे सगळी माहिती असायचे त्याला, त्याची आठवण झाली.

रेल्वे प्रवास आवडतोच....
तुमच्या सारख्या जाणकारांसोबत योग आला पाहिजे..
मस्त लेख...

मंदार कात्रे, एकदा राजधानीने प्रवास करून पाहा. पण आता भाडे वाढले आहे. त्यामुळे पहिल्या १० टक्क्यांमध्ये यायचा प्रयत्न करायला हवा.

.

छान लिहिलय. मी पण या गाडीने बर्याचदा प्रवास केला आहे. पण ह्या गाडीला गुजरात मधे खुपच थांबे वाढवले आहेत. त्यामुळे खुप कंटाळा येतो. या बाबतीत राजधानी बेस्ट आहे. आता तर व्यवस्थीत प्लॅन केले तर विमानाचे तिकीट आणि २एसी तिकीटात फारसा फरक उरत नाही.

धन्यवाद जाई.
mandard २-एसी आणि विमानाच्या तिकिटात फारसा फरक राहिलेला नव्हताच, त्यातच आता फ्लेक्सी फेअर सिस्टीमने होता तो फरकही पार मिटवला आहे असे वाटते

.