सलाम!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सलाम!

' Give them chance, not charity' 'त्यांना नको आहे दया, हवी आहे एक संधी'

'आनंदवन' हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचं. वंदनीय बाबा आमटेंनी अतिशय धाडसाने आणि कल्पनातीत परिश्रमाने समाजातल्या वाळीत टाकलेल्या माणसांना खरोखर जीवदान दिलं. पण हे कार्य नुसतं सुरू करून ते थांबले नाहीत. कुष्ठरोगी, अपंग, अंध, आणि आता एड्जबाधित रुग्ण या सगळ्यांना त्यांनी आपलसं केलं. ही सगळी सर्वप्रथम 'माणसं' आहेत आणि माणूस म्हणून जगण्याचा त्यांना हक्क आहे हे त्यांनी जाणलं आणि उभं राहिलं 'आनंदवन'. ज्या लोकांना जगाने त्यांच्या अपंगत्वाकडे, रोगाकडे पाहून बहिष्कृत केलं, त्यांना आनंदवनाने आपलसं केलं. आनंदवन हे एक गाव आहे. इथला प्रत्येक माणूस हा त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या अपंगत्वावर मात करून काही ना काही उद्योग करतो, आपलं आयुष्य आपल्या हिंमतीवर जगतो, आपलं योगदान देऊन जगतो. त्या लोकांना खरंच नको असते दया, हवा असतो फक्त थोडा विश्वास आणि एक संधी.. आपलं कौशल्य दाखवण्याची.

या संकल्पनेतूनच जन्म झाला 'स्वरानंदवन'चा! आनंदवनात जन्मलेली, किंवा तिथे आलेली अनाथ, अपंग, अंध, मूकबधीर मुलं, तरूण मिळून एकमेवाद्वितीय असा हा दृकश्राव्य कार्यक्रम करतात- 'स्वरानंदवन'. या कार्यक्रमातली १००हून जास्त सहभागी मुलं ही लौकिकदृष्ट्या अपंग आहेत. पोलियो, अस्थिव्यंग, अंधत्व, अपंगत्वाने गांजलेली आहेत. पण एका धाग्याने बांधलेली आहेत- तो म्हणजे संगीत! संगीत म्हणजे सूर, लय, ताल- अशी लय, असा ताल जो आपणा सर्वांमध्ये लपलेला असतो. संगीत म्हणजे केवळ गाणं नव्हे, तर तालाची, लयीची जाणीव.. देवदयेने ही जाणीव या सर्व मुलांना अगदी उत्तम आहे.. किमान संगीत तरी माणसाचं शरीर बघून रुजत नाही, ही देवाची कृपाच! 'स्वरानंदवन' या कार्यक्रमामध्ये या मुलांची गाणी, नृत्य, नकला आपल्याला बघायला, ऐकायला मिळतात. लौकिकदृष्ट्या ही मुलं 'सूराला चिकटून' गात नसतील, पण आज प्रचंड जनसमूहासमोर ते आत्मविश्वासाने उभं राहू शकतात. त्यांच्यासमोर न बिचकता आपली कला दाखवू शकतात. एक वेळ त्यांच्या जीवनात अशी आली होती की त्यांच्या सख्ख्या लोकांनीही त्यांना दूर लोटले आहे, किंवा काहींना तर 'आपली माणसं' म्हणजे काय हेच ठाऊक नाही! अश्या दुर्लक्षित, उपेक्षित मुलांना कुठून मिळतं इतकं धैर्य? कुठून संचारतं त्यांच्यात इतकं बळ? तर, स्वत:च्या वैगुण्याची जाणीव असूनही त्यांना त्याची लाज वाटत नाही, आणि आपल्या वैगुण्यावर मात करायची प्रबळ इच्छा त्यांना आहे, त्यामुळेच ते आपल्यासमोर निर्भयपणे उभे राहू शकतात!

swar1.jpg

'ठीक आहे, नाही दिसत आम्हाला तुमचं जग, पण आम्हाला आमच्या कल्पनेच्या जगात मुक्त विहरायला काहीच आडकाठी नाही, ना?' 'मी धावू शकत नाही, पण मला जमेल तसं, माझ्या पायावर चालू तर शकतो ना?' 'माझ्या तबल्याचे बोल ऐकता ऐकता, तुम्ही माझ्या दृष्टीहीनतेला विसरता ना?' असे प्रश्न जणू ते आपल्याला विचारत आहेत असा भास होतो. केवळ दिसायला अपंग, पण मनानी अभंग!

स्वरानंदवनातले हे स्वर आपल्याला आंतरबाह्य भिजवून टाकतात. त्यांचा आत्मविश्वास पाहून आपण थक्क होतो. आणि हा आत्मविश्वास, ही जिद्द त्यांना त्यांच्या हिंमतीवर जगण्याचं एक साधनही मिळवून देते. ही मुलं हौसेखतर, हसतखेळत हा कार्यक्रम करत नाहीत, तर आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण शक्ती पणाला लावून प्रत्येक सादरीकरण अगदी 'प्रोफेशनली' करतात. अंध मुलं गातात, हे एकवेळ सोपं, पण नाचतात? तेही सुरातालावर? आणि तेही एका जागी उभे राहून वगैरे नाही, तर व्यवस्थित सामुहिक नृत्य करतात! वेगवेगळे फॉर्मेशन्स घेऊन!! कसे शिकले असतील ते? कसा अंदाज घेतला असेल हालचालींचा? त्यांच्या शिक्षकांचं खरं कौतुक की त्यांनी या मुलांमध्ये ही जिद्द निर्माण केली. चुका झाल्या असतीलच, कदाचित नैराश्यही आलं असेल, पण त्याच्यापलिकडे ही मुलं पोचली हे किती स्पृहणीय!

sw2.jpg

खरे विस्मयचकित तर आपण पुढे होतो.. संपूर्णत: कर्ण आणि त्यामुळे मूकबधीर असलेली मुलं जेव्हा पॉप गाण्यावर थिरकतात तेव्हा! या मुलांना गाणं ऐकायला येत नाही, शंका आल्यास विचारता येत नाही, तरी इतक्या लयबद्ध हालचाली कश्या करतात? जे गाणं ऐकायलाच येत नाही, त्यावर नाच कसा करू शकतात? तेही त्या गाण्यांच्या बीट्सवर? कसं शक्य आहे? तर, ते गाणं जेव्हा आपल्यासारख्या सामान्यजनांच्या कानावर पडत असतं, तेव्हा ती मुलं फक्त त्यांच्या शिक्षकांकडे नजर ठेवून असतात. शिक्षकांच्या खुणेबरहुकुम ते शिकवलेल्या हालचाली करतात. आपल्याला एक क्षणही शंका येत नाही, की ही मुलं ऐकू-बोलू शकत नाहीत!

हे असे अनुभव, आपण स्वत: एक माणूस म्हणून किती अपंग आहोत हेच शिकवून जातात जणू. कोण ठरवतं अपंगत्व? केवळ दोन हात, पाय, डोळे आहेत म्हणून आपण निर्व्यंग? छोट्या छोट्या गोष्टीत होणारे आपले मानापमान, रुसवेफुगवे, अहमहमिका, स्पर्धा, मी-मी पणा, तक्रारी- या मानसिक व्यंगांचं काय? खुट्ट झालं की आपला मूड जातो, तब्येत बिघडते, कसंनुसं होतं, जीव गुदमरतो..! पण आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या ठिकाणी, अश्या अवस्थेत आज लोक रहात आहेत. आणि नुसतेच रहात नाहीयेत, तर त्यातून मार्ग काढत आहेत, जिद्दीने कार्यरत रहात आहेत.
sw3.jpg त्यांना बघितलं की अपंग शब्द उच्चारायचीही लाज वाटते. त्यांच्याही आयुष्यात नक्कीच अशी वेळ आली असेल, की तेही खचले असतील, देवाला दोष दिला असेल की 'मीच का सापडलो तुला?' पण कार्यक्रमाचा निवेदक जे म्हणाला ते ऐकून डोळ्यात पाणी येतं.. तो म्हणाला, 'उलट आम्ही देवाचे आभार मानतो की त्याने आमच्यात काही ना काही उणीव ठेवली, कारण त्यामुळेच आम्ही 'आनंदवनात' आलो, विकासभाऊंनी (डॉ. विकास आमटे) आम्हाला आयुष्य दिलं, आयुष्य जगायला कारण दिलं, एक दिशा दिली, एक प्रेरणा, एक ध्येय दिलं.' इतकं मोठं मन! अपंगत्वाचा उल्लेखही नाही, आहे तो स्वीकार. आणि देवावरची तरीही अतूट असलेली श्रद्धा! ना कुठली कटूता, ना खेद ना राग.

आपल्यासारखे तथाकथित निर्व्यंग, सशक्त लोक एकच करू शकतो- त्यांना सलाम!

(या लेखासाठी फोटो उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. शीतल आमटे यांचे मनःपूर्वक आभार.)

विषय: 
प्रकार: 

छान लिहिलं आहेस पूनम.

छोट्या छोट्या गोष्टीत होणारे आपले मानापमान, रुसवेफुगवे, अहममिका, स्पर्धा, मी-मी पणा, तक्रारी- या मानसिक व्यंगांचं काय? खुट्ट झालं की आपला मूड जातो, तब्येत बिघडते, कसंनुसं होतं, जीव गुदमरतो..! <<<<<<<<
हे किती खरं आहे!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

केवळ दिसायला अपंग, पण मनानी अभंग! >>>
अप्रतिम लिहीले आहेस. खरच का गेलो नाही या कार्यक्रमाला असे आता राहुनराहुन वाटत आहे.

पूनम,

खूप छान लिहिलं आहेस..

सुरेख....... Happy
खरंच सलाम करावासा वाटतो Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

हा कार्यक्रम ठाणे, डोंबिवली परिसरात का नाही होत Sad

कविता,

मुंबई व परिसरात हा कार्यक्रम असेल तेव्हा इथे मायबोलीवर नक्कीच कळवेन. Happy

किमान संगीत तरी माणसाचं शरीर बघून रुजत नाही, ही देवाची कृपाच! >>
आपण स्वत: एक माणूस म्हणून किती अपंग आहोत हेच शिकवून जातात जणू >>
आपल्यासारखे तथाकथित निर्व्यंग, सशक्त लोक एकच करू शकतो- त्यांना सलाम!
>>
दोन थपडा देऊन जागं केल्यासारखं वाटतंय.. खरंच, आपल्याजवळ काय आहे.. आपण किती सुखी आहोत याची कधीच जाणीव नाही होणार का आपल्याला? Sad
पूनम, शब्दच नाहीयेत गं.. सॉरी..

----------------------
एवढंच ना!

धन्यवाद चिन्मय, हा कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी काय करावे लागेल? म्हणजे, खर्च किती येईल त्याप्रमाणे स्पॉन्सर मिळवता येतात का ते कळू शकेल. (अर्थात ते एकट्याचे काम नाही पण अस करता येऊ शकेल का?)

काय जिद्द आहे ! बेनिटा, ही मुले, आमट्यांसारखे लोक हे एकाच मुशीतले... माणसांतले सर्वात जबरदस्त लढवय्ये. यांची छान ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    ***
    जय हो !

    खरचं खरचं...
    पुनम सुरेख लेखन Happy

    अप्रतिम !!! स्वत:ची लाज वाटते असं वाचलं की!! Sad
    त्यांच्या जिद्दीला खरोखर सलाम!

    (पूनम, लेख सही लिहीलायस.. फक्त एक दिसलं म्हणून सांगते.. पहील्या फोटो शेजारच्या दुसर्‍या परिच्छेदामधे स्वरांदवन लिहीले आहेस.. ते स्वरानंदवन कर.. )

    पूनम, छान लिहिलयस...
    हा कार्यक्रम खरच अतिशय सुंदर होता... मला तर नक्की काय वाटलं हे सांगताच येत नव्हतं... काहीतरी वेगळं feeling होतं नक्की...
    ज्यांना संधी मिळेल त्यांनी नक्की बघा.. !!!

    पूनम : सुरेख लिहिलं आहेस .........

    ~~~~~~~~~~~~~~
    शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
    प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले

    अप्रतीम!!!

    बी एम एम च्या अधीवेशनात ह्या (आणी अश्या) कार्यक्रमाचा सहभाग केला तर धडपडत यावसं वाटेल!

    चांगलं लिहिलंयस पूनम.

    पूनम, छान लिहीलयस. आशावादी दृष्टीकोन आवडला.

    अप्रतिम... विचार करायला लावणारा... प्रभावि लेख... खरच ह्या सार्‍या शुरांना सलाम Happy

    बी एम एम च्या अधीवेशनात ह्या (आणी अश्या) कार्यक्रमाचा सहभाग केला तर धडपडत यावसं वाटेल! >> अगदी अगदी !!!

    psg सलाम !!!

    मस्त लिहिलयस पूनम.

    शरद
    ["तुझं मत कदाचित माझ्या मताविरुद्ध असेल; पण ते मांडण्याचा तुझा अधिकार मी प्राणपणाने जपेन." वोल्तेयर]

    पूनम.... या कलाकारांची आणि कार्यक्रमाची ओळख करून दिल्याबद्दल सलाम...

    खरयं पूनम... विलक्षण आहे स्वरानंदवन.. क्षणाक्षणाला अचंबित व्हायला होते आपल्याला त्या 'माणसांचा' आत्मविश्वास, जिद्द पाहून खरेच... माणूस दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रोत्साहनाच्या बळावर काय काय करून दाखवू शकतो ह्याचे जिवंत उदाहरण आहे हे...

    चांगले लिहिले आहेस..

      -------
      स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
      स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

        किमान संगीत तरी माणसाचं शरीर बघून रुजत नाही, ही देवाची कृपाच! >>

        सुरेख. खुप छान लिहीले आहेस पुनम.

        हे असे अनुभव, आपण स्वत: एक माणूस म्हणून किती अपंग आहोत हेच शिकवून जातात जणू. कोण ठरवतं अपंगत्व? केवळ दोन हात, पाय, डोळे आहेत म्हणून आपण निर्व्यंग? छोट्या छोट्या गोष्टीत होणारे आपले मानापमान, रुसवेफुगवे, अहमहमिका, स्पर्धा, मी-मी पणा, तक्रारी- या मानसिक व्यंगांचं काय? खुट्ट झालं की आपला मूड जातो, तब्येत बिघडते, कसंनुसं होतं, जीव गुदमरतो..! पण आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या ठिकाणी, अश्या अवस्थेत आज लोक रहात आहेत. आणि नुसतेच रहात नाहीयेत, तर त्यातून मार्ग काढत आहेत, जिद्दीने कार्यरत रहात आहेत. <<<

        पूनम, अप्रतिम लिहिलं आहेस. हा वरचा परिच्छेद पुन्हा पुन्हा नीटच वाचावा असा आहे.
        या कलाकारांना सलाम.

        चिन्मय, नक्की माहिती द्या मुंबईत हा कार्यक्रम येईल तेव्हा.

        खरं आहे... त्यांचा उत्साह, जिद्द आपण अपंग, दुबळे असल्याची जाणीव करून देउन जाते. डेक्कन वर गुप्ते दवाखान्यामागे गोडबोलेंची 'प्रसन्न autism center' नावाची शाळा आहे. अतिशय सुंदर काम करतात ते लोक! महान आहेत.

        हे असे लोक बघितलं कि वाटतं आपण करतो ते अगदी क्षुल्लक आहे.....

        केवळ दिसायला अपंग, पण मनानी अभंग! >>> !!!! ह्या सार्‍यांना सलाम !!!
        छान लिहिलं आहेस पूनम.

        पूनम, अप्रतिम लिहिलं आहेस. हा वरचा परिच्छेद पुन्हा पुन्हा नीटच वाचावा असा आहे.
        या कलाकारांना सलाम. >> अनुमोदन जीडी .
        -----------------------------------------
        सह्हीच !

        पूनम तुला हे पोस्टल्याबद्दल धन्यवाद आणि ह्या मुलांच्या हार न मानण्याच्या वृत्तीला सलाम !!
        वाचता वाचता जाणवलं - अ‍ॅट पीस विथ वनसेल्फ म्हणतात - ते हेच असावं.

        Pages