बदफैली - भाग 4

Submitted by निशा राकेश on 14 September, 2016 - 04:26

बदफैली - भाग 4

http://www.maayboli.com/node/60142 - भाग 3

"तू खरा वाटतोस...आणि तू खूप चांगला आहेस"

"बस्स इतकंच...."

"हो...म्हणजे...बरं तू सांग तुला काय वाट माझ्याबद्दल"

"बरच काही वाटत....पण ते मी असं फोन वर नाही सांगणार मला भेटशील"

हो - नाही करतच बघू तरी ह्याला काय सांगायचंय म्हणून दोघे पुन्हा एकदा अपर्णा सोहमला भेटली…

"बोल..काय इतकं महत्वाचं आहे ..जे मला भेटून सांगायचं होत तुला " अपर्णाने आल्या आल्या सोहमला विचारलं .
"सांगतो ग..जरा श्वास तर घेशील..."

"काय आहे ना सोहम..मला तुला हे असं भेटणं योग्य वाटत नाही…..पण तू एक सभ्य माणूस आहेस ....आणि तू मला नेहमी मदत केलीयेस फक्त म्हणून तुझं ऐकलं…..माझ्या नवऱ्याला जर कळलं ना तर त्याला हे अजिबात आवडणार नाही ...."

"तू काही गुन्हा करत नाहीस...आपण ह्या कॉफी शॉप मध्ये भेटतोय... काय प्रॉब्लेम असू शकेल त्याला..."

"त्याच सोड...तू सांग मला का बोलावलंस "

"अपर्णा...सांगायला थोडं ऑड वाटतंय ..पण मला हे गेले महिनाभर जाणवतंय....आपण एकमेकांशी बोलतो...खूप काही शेयर करतो.....असं मी ह्याआधी कधीच कुणासाठी अनुभवलं नाही....मला माहितीये कि कदाचित हे चुकीच्यावेळी बोलतोय..पण आता मला राहवत नाहीये तुला सांगण्यावाचून ..अपर्णा मला तू आवडतेस...माझं प्रेम बसलंय तुझ्यावर..." I Love you "

"काय?"

"हो ...अपर्णा प्लीज तू गैरसमज नको करून घेऊस पण. ”but i am serious .. i Really love you "

"अरे पण मी एक विवाहित स्त्री आहे ....आणि तुला काहीच वाटत नाही माझ्याशी हे सर्व बोलताना....तुला मी एक सभ्य माणूस समजत होते...पण तू मात्र...शी… ..."

"हो तू विवाहित आहेस तरी देखील....आणि मला माहितीये तुला देखील मी आवडतो,....म्हणून तर तू इतकं सगळं सांगतेस मला तुला आयुष्यातलं..."

"मूर्ख होते मी....पण आता नाही सांगणार तुला काही...इथून पुढे मला तुझं थोड देखील पाहायची इच्छा नाही”

"अपर्णा प्लिज रागावू नकोस..."i am sorry " माझं चुकलं....प्लिज मला सोडून जाऊ नकोस...मी नाही राहू शकत....आपण मित्रच राहू ह्यापुढे मी तुझ्याकडे हा विषय कधीच नाही काढणार.."

"बघ सोहम....तुला जे वाटलं ...ते तू बोललास...पण इथून पुढे तुझ्या बोलण्या वागण्यात मला हे असं काही दिसलं..तर मी तुला कायमच सोडून जाईल...."

"ओके.....मी लक्षात ठेवेन...चल तुला घरी सोडतो...."

"नको..माझी मी जाईन"

“बस ने ना...मी तुला टॅक्सीने सोडतो लवकर जाशील ...."

"नको...मी जाईल असंही लवकर पोहचून करणार काय मी.."

"अपर्णा प्लिज असंही तूला मी पुन्हा भेटायला नाही बोलवणार..."

अपर्णा काहीश्या अनिच्छेनेच तयार झाली..

दोघे टॅक्सी मध्ये असताना अपर्णा गप्प बसून खिडकी बाहेर बघत होती......सोहम मात्र अपर्णाकडे एकटक बघत होता....तीच लक्ष सोहमकडे जाताच त्याने पटकन नजर फिरवली...आणि तिच्या कडे न पाहताच तो म्हणाला..."अपर्णा..... तुला कधीच मी हे बोललो नाही ..पण आज सांगावस वाटतंय …लहानपणी मी पाच वर्षाचा असताना माझी आई देवाघरी गेली....वडिलांनी दुसरं लग्न केलं........सावत्र आईशी माझं कधीच पटलं नाही....ती सतत माझ्या दुस्वास करत आली.....कळायला लागल्यापासून माझं शिक्षण...नोकरी करून माझं मीच पूर्ण केलं.....कुणाकडे कधी हात नाही पसरले.....आज सर्व आहे माझ्याकडे…कश्याची कमी नाही...फक्त मला अजूनही कुणी समजून घेत नाही....सर्व असूनही मी एकटा आहे...एकाकी...आई सोडून गेली लहानपणी.....वडील तर माझे न्हवतेच कधी....आणि खूप दिवसाने मला असं कुणीतरी हक्कच माणूस भेटलं होत...ज्याला मी आपलं मानलं ...पण जाऊदे माझं नशीबच खराब आहे.."

अपर्णाचा घर आलं....अपर्णा टॅक्सितून उतरली....सोहम तिच्या कडे न बघताच त्याच टॅक्सितून पुढे निघून गेला....

सोहमच तिला फार वाईट वाटत होत....."बिच्चारा सोहम....पण मी तरी काय करणार.....लग्ना आधी भेटला असता तर विचार तरी केला असता मी....चांगला आहे तो… ..पण माझं कधीच जमू शकणार नाही त्याच्यासोबत .....आशा करते त्याला कुणीतरी चांगली मुलगी भेटावी...समजून घेणारी…..हो पण त्या नंतर सोहमला तुझी गरज नाही ना लागणार....दुसरी मुलगी..ह्या विचाराने. अपर्णाला उगीचच त्या अस्तित्वातच नसलेल्या मुली बद्दल असूया निर्माण झाली....का ?...मला ह्या गोष्टीचा का इतका त्रास होतोय...तो लग्न तर करणार ना कुणाशीतरी...मला देखील तो आवडायला लागलाय का ...माझं देखील प्रेम...नाही अपर्णा नाही तुझं प्रेम नाही तुला सोहमची सवय झालीये.....फक्त सवय...मग दुसऱ्या मुलीचा विचार येताच मला इतका राग का येतोय....जाऊदे ....काही समजत नाहीये....थोडं डोकं शांत ठेवायला हवं..."

संध्याकाळ झाली....अपर्णा नुसती बसून होती...तिने जेवण देखील बनवायला घेतलं नाही ...आणि नेमकं त्या दिवशी अशोक लवकर घरी आला....

"अपर्णा अशी अंधारात काय बसलीये...सात वाजून गेलेत..."

"काय ? माझ्या लक्षातच आलं नाही,,," अपर्णा गडबडीने उठून घड्याळ पाहायला लागली...

"अशोक...तू आज लवकर कसा आलास..."

"काही नाही माझ्या कंपनीत वर्कर्स स्ट्राईक वर गेलेत...पगारवाढी साठी...त्यामुळे आज काम बंद होत...म्हणून आलो लवकर..."

"बर...मी जेवणाची तयारी करते....."

"अपर्णा तू आज कमला न्हवती गेलीस...घरीच होतीस.."

"हो …...म्हणजे नाही मी देखील आज लवकर आले..." अपर्णाने चाचरत उत्तर दिलं

"का ...तब्बेत बरीये ना "

"हो...म्हणजे नाही थोडंसं डोकं दुखत होत..." अपर्णा त्याच्याकडे न पाहताच म्हणाली

"बर...तू पडतेस का जरा मी बाहेरून मागवतो काहीतरी...."

"नको...मी ठीकेय आता ..बनवते मी जेवायला....."

ती पूर्ण रात्र तिला झोप लागत न्हवती...सतत सोहम त्याचा तो उदास चेहरा डोळयासमोर येत होता....त्या रात्री अशोक ने तिला जवळ घेतलं...पण तिचा शून्य प्रतिसाद म्हणून तो कूस बदलून झोपून गेला...

हमचा मात्र तीनचार दिवस ना फोन ना मेसेज...तिने स्वतःहून केलेल्या मेसेजला तो उत्तर देत न्हवता....आणि तिचे फोन हि घेत न्हवता....अपर्णाला काही सुचत न्हवत ...कुठे शोधू मी ह्याला...ह्याच ना घर माहिती ...ना ऑफिस...ना कुणी मित्र ...त्या दिवसात अपर्णाला एक गोष्ट जाणवली… तिला सोहमबद्दल विशेष काही माहिती न्हवतीच…..तो काय काम करतो...तो कुठे राहतो...हे कधीच तिने त्याला विचारलं न्हवत..म्हणजे आता पर्यंत ती त्याच्याशी जितकं बोलली होती...त्यात जातीत जास्त ती स्वतःबद्दलच बोलायची....सोहमने देखील त्या दिवशी टॅक्सित बोलल्याचं सोडल्यास कधी त्याच्या घरच्यांबद्दल....त्याच्या कामाबद्दल अपर्णाला कधीच काही सांगितलं न्हवत....तिला खूप आश्चर्य वाटलं... आपण एखाद्याचा माणसाचा आधार शोधतो ...तो आधार मिळाला कि आपण त्या माणसाला देखील आधाराची गरज असू शकते...ह्याचा विचारच करत नाही...अगदी गृहीत धरून होते मी सोहमला...आणि तो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये..तर किती रिकामं रिकामं आयुष्य वाटतंय...एक पोकळी निर्माण झालीये…..सोहम कुठे आहेस तू......"

तब्बल आठ दिवसानंतर ती ऑफिस मधेच असताना तिच्या स्क्रीनवर मेसेज झळकला ...
"कशी आहेस"

"सोहम" ती जवळ जवळ किंचाळीचं....

तिला खूप आनंद झाला होता....तिने त्याला लगेच फोन केला...."सोहम...अरे आहेस कुठे तू "

"आहे...जिवंत आहे.."

"मूर्ख आहेस का...असं का बोलतोयस .."

"मला भेटशील..."

अपर्णा देखील न राहवून अनावधाने "हो भेटूया" असं म्हणाली...

फोन ठेवल्या नंतर मात्र तिला आपण उगीच हो म्हणालो...असं वाटलंय लागलं...पण हो म्हणालोय...तर जाऊया आज भेटायला...

संध्याकाळी...अपर्णा त्या तिच्या ऑफिस जवळच्या रेस्टोरंट मध्ये भेटली....

"सोहम ...कुठे होतास तू..."

"आजारी होतो...पण आता ठीक आहे.... जरा ताप आला होता...कमजोरी होती...म्हणून घरीच आराम करत होतो..."

"आता ठीकेस ना..."

"हो..कसा दिसतोय ...ठीकच दिसत असेल..."

"तू माझे फोन का न्हवता उचलत...."

"आजारी...होतो...म्हणून ... तू का करत होतीस फोन....आठवण येत होती का माझी"

"अपर्णाला कोंडीत पकडल्यासारखं झालं...तरीही तिने स्वतःला सावरलं...
"काळजी वाटत होती..तुझी..."

"खोटं .... साफ खोटं …तुझा चेहरा स्पष्ट सांगतोय...किती उतरलाय तुझा चेहरा ...आजारी दिसतेय तू...मिस केलंस ना मला खूप...."

"मी सांगितलं ना सोहम...त्या दिवशी तू मला जे काही सांगितलंस ...त्या नंतर तुझ्याशी माझं काहीच बोलणं न्हवत...म्हणून फक्त म्हणून बाकी काही नाही…..."

"किती स्वतःला फसवशील....खरं सांग तुला शप्पत आहे माझी ..."

"हे बघ सोहम...प्लिज असं तू मला शप्पत वैगेरे घालू नकोस....मला तुझ्याशी बोलायला आवडत...तुझी सवय झालीये मला ..पण तू बोलतोयस ते मला ज्या जन्मी तरी शक्य नाही" सोहमकडे न बघताच अपर्णा बोलत होती....

"तू जर मान्य केलस तर सहज शक्य आहे...अपर्णा तू जर माझ्या आयुष्यात आलीस..तर मी तुला खूप सुखी ठेवीन...तुला कसलीचं कमतरता भासू देणार नाही....तुझा नवरा त्याला तुझ्याकडे बघायला देखील वेळ नाही...का त्याला चिकटून बसलीयेस ... मी मान्य करतो …आधी मी त्याची बाजू घेऊन बोललो....पण अपर्णा खरं सांगू का....मला देखील वाटायचं ग त्याने तुला जरा तरी वेळ द्यावा....तुझी थोडीतरी किंमत ठेवावी...तू किती राबतेस त्याच्यासाठी ... त्याच घर संभाळतेस ..त्याला संभाळतेस...तो कधीतरी तुझं कौतुक करतो...तुझ्या जेवणाची कधी तारीफ करतो....त्याला फक्त एक मोलकरीण मिळालीये त्याच घर सांभाळणारी...अपर्णा माझ्याशी जर लग्न केलंस तर तुला तुझी ती फालतू कारकुनाची नोकरी पण करावी नाही लागणार...माझा बिसनेस आहे ...मी प्रॉपर्टी कंसल्टंट आहे....ह्याच बिसनेस मधून मी खूप ठिकाणी जागा घेऊन ठेवल्यात त्याच दर महिना मला भरपूर भाडं येत.....तू किंवा मी काहीही काम केलं नाही तरी देखील आपला इनकम हा चालू राहील अगदी आयुष्यभर...आणि आपण इतर देखील एक्सट्रा इनकम साठी खूप काही गोष्टी करू शकतो ...."

"तू प्रॉपर्टी कंसल्टंट आहेस म्हणूनच तू आमच्या घर मालकाला..."

"हो...ते तुला सांगायचं राहील ......तू जेव्हा मला तुझ्या घराबद्दल सांगितलंस...तेव्हा खरं तर मी तुझ्या घर मालकाला ..तुझ्याकडून पैसेघेण्या ऐवजी…...एक स्वस्ताली जागा जी माझ्याकडे आधीच अव्हेलेबल होती ती देणार होतो......म्हणजे माझं कमिशन मी त्याच्याकडून घेणार न्हवतो ...पण तुझा घर मालक नेमका माझ्या ओळखीचा निघाला ....त्याला एका बेकायदेशीर व्यवहारातून माझ्या ओळखीवर मी सोडवलं होत...आधी तो ऐकतच न्हवता...मी त्याला धमकी दिली...जर पुन्हा त्या दोघांना तू त्रास दिलास तर मी तुला त्याच प्रॉब्लेम मध्ये पुन्हा अडकवेल...मग तो घाबरला...आणि गप्प बसला . त्याने ना कधी तुम्हाला फोन केला ..ना तुमचे फोन अटेंड केले."

"अस्स....आहे तर....माझ्यावरच संकट खरोखर टळलं तुझ्यामुळे...पण तू मला आज जे तुझ्या प्रॉपर्टीचं, इनकमच इतकं सगळं सांगतोयस...तुला काय वाटत...माझ्यासाठी ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतील ...आणि तुझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून मी तुझ्याकडे यायचं..."

"अजिबात नाही ...ते फक्त तुला तुझ्या लक्सारियस फ्युचर बद्दल बोललो मी….तू माझ्यासोबत आनंदी राहावीस म्हणून बोललो...शेवटी आपण एकमेकांसाठीच आहोत..ह्याची मला जाणीव झाली...म्हणूच हे सगळं मी तुला आता सांगतोय ..ह्याआधी मी कधी हा विषय देखील काढला होता का ?"

"तरीही सोहम....मला नाही पटत "

"अपर्णा ...बघ नाहीतरी तुझ्या नवऱ्याला तुझ्यात काही इंटरेस्ट आहे असं मला नाही वाटत ..त्याला दुसरं कुणीही मिळेल....पण माझं काय मी वेडा होईल ग....आणि तुला पण हे असच आयुष्यभर.. पुस्तक वाचत आणि स्मिता पाटीलचे सिनेमे बघतच जगायचंय का ...तुला खूप स्कोप आहे पुढे तू काहीतरी करू शकशील आयुष्यात...नोकरीच्या बंधनातून मुक्त होशील... स्वतःची एक ओळख निर्माण करशील...आणि मी असेल ना तुझ्या सोबत....अपर्णा मला आयुष्यात खूप पुढे जायचंय तुझी साथ असेल तर मला खूप आधार मिळेल...."

अपर्णाचा घड्याळाकडे लक्ष गेलं..."बाप रे सात वाजले...सोहम मला घरी जावं लागेल अशोक हल्ली लवकर येतो घरी..."

अपर्णा तशीच पळत निघून गेली.....

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast !