मायबोली मास्टरशेफ - मंजूडी - हवाईयन मॉकटेल

Submitted by मंजूडी on 14 September, 2016 - 00:29

पॅनकेक सँडविच, शाही रोल्स, याम ब्रेड आणि कटलेट, एम्पेनाडा, पम्पकिन रोल, मटकीचे वडे, बदामाचा ब्रेड वगैरे चाखून झाल्यावर येडा बनके बटाटा खाता खाता आपण गारेगार मॉकटेल पिऊया.

20160913_213439-600x800_1473822189491-480x667.jpg

४ ग्लास (मॉकटेलचे नव्हेत, घरातले नेहमीचे सरबताचे) मॉकटेलसाठी:

मोसंबी - ६, सोलून आणि गर काढून
लवंगा - ३, कोरड्या भाजून पूड करून
बटरस्कॉच सिरप - ४ चमचे आणि शिवाय टॉपिंगसाठी
पिस्ता आईसक्रिम - ७-८ स्कूप

मोसंब्यांच्या गरात लवंगेची पूड आणि ४ चमचे बटरस्कॉच सिरप घालून ब्लेंड करून घ्या आणि गाळून घ्या. त्यात पिस्ता आईसक्रिमचे स्कूप घालून स्लो स्पीडवर ३-४ मिनिटं ब्लेंड करा. ग्लासमध्ये ओतून बटरस्कॉच सिरपचं टॉपिंग करून मस्त गारेगार मॉकटेल चवीचवीने प्या.

2016-09-14_08.24.22_1473821987234-640x640.jpg

पग्यासारखाच गणपतीसमोर ठेवलेल्या आणि आलेल्या फळांचं काय करायचं हा प्रश्न पडला होताच. तशी फळं येताजाता खाऊन संपतात पण मास्टरशेफ स्पर्धेसाठी काही पाककृती करावी हे डोक्यात होतं. ठाण्याला सत्कार रेसिडेन्सीमधे लिंबूरस, स्प्राईट, दालचिनी पावडर आणि व्हॅनिला आईसक्रिम या सगळ्याचं 'लेमन कूलर' असं मॉकटेल मिळतं, टॉपिंगला पुदिना असतो. त्या धर्तीवर घरातली मोसंबी सत्कारणी लावत हे मॉकटेल तयार केलं. बटरस्कॉच सिरप घरी होतंच, दालचिनीऐवजी लवंगेची पूड घालून पाहावीशी वाटली, कारण स्पर्धेच्या नियमांत बसत होती. व्हॅनिला आईसक्रिमने लवंग आणि बटरस्कॉचचा स्वाद लपला जाईल असं वाटून सौम्य स्वादाचे पिस्ता आईसक्रिम वापरले. आणि मोसंबी, लवंग, बटरस्कॉच, पिस्ता असे सगळे स्वाद एकमेकांबरोबर मस्त मिळून आले.

20160913_213514-600x800_1473822672726-480x622.jpg

पिस्ता आईसक्रिमऐवजी टेन्डर कोकोनट आईसक्रिम वापरता येईल पण व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम नको. दोन तीन घोट घेऊन झाल्यावर लवंगेचा स्वाद जाणवायला सुरूवात होते. लवंगा जास्त झाल्या तर टाळूला त्याचा ऊग्रपणा जाणवतो त्यामुळे त्या जरा बेतानेच वापरा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

अहाहा! चला एवढं सगळं खाल्ल्यावर एक ड्रिंकचा उतारा हवाच!
मस्त तोंपासू पाकृ Happy

मस्त, मस्त !

ह्यावर्षीच्या गणेशोत्सवात खरंच इतक्या एकसे एक हटके पाककृती आलेल्या दिसत आहेत की मत कुणाला द्यायचं हा एक प्रश्नच आहे !!

Pages