मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग ३)

Submitted by दीपा जोशी on 11 September, 2016 - 05:59

(संदर्भासाठी: गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट, आणि दलाई लामा यांच्याबरोबर ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतल्या गेलेल्या परिषदेमधील काही वक्त्यांचे निवडक विचार येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’.
वक्ते- अजहन अमॅरो: १९७७ मध्ये सायकॉलॉजि आणि फिजिऑलॉजि यामध्ये लंडन युनिव्हर्सिटी मधून बी एस सी पदवी प्राप्त. नंतर इंग्लंड आणि अमेरिकेत बुद्ध मठात मठाधिपती म्हणून अनुभव. )

बुद्धाने सांगितलेली चार दिव्य सत्ये, बुद्ध पद्धतीच्या ध्यानातून मन आणि दुःख भावना यांच्यावर उपाय.

बुध्दाच्या शिकवणीमध्ये चार दिव्य सत्ये आहेत.
पहिलं सत्य म्हणजे दुःख, अशांती किंवा असमाधान वाटत राहणे हे एका आत्मिक आजाराचे लक्षण असते.
दुसरे सत्य म्हणजे या आजाराचे कारण आहे मनात पिंगा घालणाऱ्या स्वार्थ, मोह, लोभ, हाव व मत्सर अशांसारख्या नकारात्मक भावना अथवा विचार करायच्या सवयी. अशा प्रकारच्या भावना अथवा विचारांमध्ये मन गुंतले, की त्यांचा विषासारखा परिणाम सुरु होतो.
तिसरे सत्य आहे या आजाराची रोगचिकित्सा. म्हणजे हा बरा होणार की नाही याचा निर्णय. आणि महत्वाची गोष्टं अशी, की या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आहे. होय. हा आत्मिक आजार बरा होऊ शकतो.
चवथे सत्य म्हणजे बुद्धाने सांगितलेला या आजारावरचा उपाय आणि उपचार पद्धत. तीन मूलभूत मुद्यात हा उपाय मांडता येईल. १) योग्य, जबाबदारीची वागणूक आणि नैतिक आचरण २) मनाची एकाग्रता, मनाचे प्रशिक्षण आणि ध्यान ३) वस्तुस्थितीची यथार्थ जाण अथवा समज विकसित होणे म्हणजेच ज्ञान प्राप्ती होणे.
आपल्याला जेव्हा दुःखद अनुभव सहन करायला लागतो , तेव्हा त्याचे दोन आयाम असतात. पहिला म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या खऱ्याखुऱ्या शारीरिक अथवा मानसिक यातना. आपल्याला शरीर आणि मन असल्याने साहजिकच काही वेळा आपल्या वाट्याला येणाऱ्या शारीरिक आणि भावनिक यातनांपासून आपल्याला पळून जाता येणार नाही. याला आपण नैसर्गिक दुःख अथवा प्रारब्ध म्हणू शकतो.
दुसरा आयाम म्हणजे या नैसर्गिक दुःखाच्या नकारात्मक अनुभवावर आपले मन आणखी दुःख लादते. हे जास्तीचे दुःख बुद्धाच्या शिकवणीचा केंद्रबिंदू आहे. काळजी, अस्वीकार, निराशा, संताप, क्षोभ, राग, चिडचिड, या स्वरूपात हे जास्तीचे दुःख व्यक्तं होते. बुध्दाने याला बाणाची उपमा दिली आहे. खरोखरीच वाट्याला आलेली एखादी शारीरिक किंवा भावनिक यातना म्हणजे एखाद्या बाणाने घायाळ होण्यासारखे मानले तर, त्यात विरोध, अस्वीकार या स्वरूपात आपल्या मनाने लादलेली जास्तीची पीडा म्हणजे परत दुसऱ्या बाणाने घायाळ होण्यासारखे असते.
पहिल्या प्रकारच्या म्हणजे प्रारब्धाच्या दुःखातून आपली सुटका होणार नाही. पण त्यावर मनाने लादलेल्या दुसऱ्या प्रकारच्या दुःखातून माञ आपली पूर्ण सुटका होऊ शकते. हेच बुध्दाने सांगितलेले तिसरे दिव्य सत्य. एखाद्याला आजार किंवा अपघात यामुळे शारीरिक यातनांना तोंड द्यावे लागले असले; किंवा एखाद्याला जवळच्या व्यक्तीला गमवावे लागल्याने भावनिक दुःखाला सामोरे जावे लागले असले , तरी त्याच्या अंतर्यामी माञ पूर्ण शांती असू शकते. कोणताही अस्वीकार, क्षोभ, चिडचिड, निराशा न येता. ध्यानातून मनाला हेच शिकवायचे असते.
याचाच विस्तार करून ‘आपल्या जन्मजात, नैसर्गिक क्षमतांची शुध्धीक्रिया म्हणजे ध्यान’ अशी ध्यानाची व्याख्या करता येईल.
मनाच्या दोन प्रकारच्या क्षमता असतात. जरी वारंवार भटकत असले तरी एकाग्र होण्याची मनाची क्षमता असते. तसेच कोणत्याही अनुभवाचे मनन चिंतन करून त्याचं खरे स्वरूप शोधून काढण्याची दुसरी क्षमता. या क्षमतांचा विकास ध्यानाच्या सरावातून होतो. आणि हाच ध्यानाचा उद्देश आहे. बुद्ध तत्त्वज्ञानातील अध्यात्मिक आणि मानसिक प्रशिक्षणाचे हे मूलतत्व आहे.
उदाहरणच द्यायचं तर, शांतपणे डोळे मिटून बसून क्षणोक्षणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या तालबद्ध श्वासावर लक्ष एकाग्र करण्याचा, ध्यानाचा एक सामान्यतः केला जाणारा प्रकार आहे. यामध्ये अगदी साध्या, नैसर्गिक कामात मनाला गुंतवले जाते. अगदी साध्या, कोणतीही उत्तेजना नसणाऱ्या अनुभवाकडेही लक्ष देण्याचे, त्या ठिकाणी हजर राहण्याचे प्रशिक्षण मनाला दिले जाते . अशा पद्धतीने कोणताही उत्तेजक अनुभव येत नसतानाही जसजसे श्वासाला मन चिकटून राहते, तसतसा चालू क्षणावर लक्ष केंद्रीत करण्याचा आणि वर्तमान क्षणात जागरूक राहण्याचा मनाचा गुणधर्म विकसित केला जाऊ शकतो. अत्यंत सहजतेने मन चालू क्षणात, वर्तमानात स्थिर राहू लागते. मनाला वर्तमान क्षणात जागरूक राहण्याचे जितके जास्त प्रशिक्षण दिले जाते तितकी , इतरत्र सक्तीने खेचले जाण्याची, विचलित होण्याची मनाची सवय आपण मोडू शकतो. नाहीतर एरवी मन सतत भविष्यकाळाची चित्रे रंगवत असत , भूतकाळ परत परत उगाळत असते, पट्कन अस्थिर होते. एखाद्या विचलित करणाऱ्या विचारात हरवून जाते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही वेळेला असा अनुभवही आला असेल की, मनाला काही केल्या थांबवता येत नाही. विचारांची चक्रे आपली चालत राहतात, चालत राहतात, आणि चालतच राहतात.
दुसरी क्षमता -कोणत्याही अनुभवाचे मनन चिंतन करून त्याचं खरे स्वरूप शोधून काढण्याची - हिच्यामुळे आपली समज सुधारते. म्हणजे मन कसं काम करतंय, हे आपल्याला समजू लागते: त्याची पटकन प्रतिक्रिया देण्याची सवय, दुःखद अनुभवापासून पळ काढणे, सुखद अनुभवाच्या मागे धावणे; आणि एरवी कंटाळून जाणे , चिडचिडे अथवा अस्वस्थ होणे.
लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेमुळे या सवयींना आपण ओळखल्याने, त्यांच्या चक्रात नकळत, जबरदस्तीने ओढले जायचे कसे टाळायचे हे आपण शिकतो.
ध्यानाच्या अभ्यासामुळे मन चालू वर्तमान क्षणात दक्षतेने ,जागृततेने हजर राहते तेव्हा ते पूर्णपणे शांत असते आणि त्याच वेळी अत्यंत उर्जायुक्त देखील असते. ध्यानाच्या अभ्यासकांना नेहमी येणारा अनुभव म्हणजे अगदी शारीरिक यातना होत असतांनाही ते अगदी शांत राहू शकतात. हीच गोष्ट भावनिक दुःखाच्या बाबतीतही अनुभवायला येते. उदाहरणार्थ - समजा तुमचा मेहनतीने लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला नाही याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, अथवा खूप प्रयत्न करूनही तुमचा रुग्ण दगावल्याचं दुःख असेल … इतर कोणताही भावनिक दुःख असेल तरी तुम्ही ते सहजतेने पेलू शकता. अस्वस्थ करणाऱ्या अनुभवाबरोबर जगण्याचा, त्याला समजून घेण्याचा, आणि नंतर त्यातून पार होण्याचा तिथे मार्ग मिळतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या जन्मजात, नैसर्गिक क्षमतांची शुध्धीक्रिया म्हणजे ध्यान’ अशी ध्यानाची व्याख्या करता येईल

छान

छान लेख.
इतर भागांचा दुवा प्रत्येक भागात दिल्यास चांगले होईल.

पुढील भाग येणार आहेत का? ध्यानाच्या पद्धती, कसे करावे यावर?

अभिप्रायांबद्दल सर्वांचे आभार.
मानव पृथ्वीकर,
अजून काही भाग देणार आहे. हे लेखन म्हणजे, अनेक वर्षे ‘ध्यान’ या प्रांताचा अभ्यास आणि संशोधन असलेल्यांनी , परिषदेत मांडलेले त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांचे भाषांतर आहे. ध्यानाचे तंत्र (म्हणजे ध्यान नेमके कसे करावे ) यापेक्षा ध्यान कसे होणे अभिप्रेत आहे , आणि ध्यान रोजच्या जीवनात कसे उपयोगी पडते यावर या लेखात भाष्य असणार आहे.
या लेखनाचा मूळ हेतूच हा आहे , ध्यानाविषयी मला अधिक खोलवर मिळालेली आणि उपयोगी पडलेली माहिती वाचकांबरोबर ‘शेअर ‘ करावी!

स्तोत्रे म्हणताना खूप छान वाटते कारण ईश्वराच्या वर्णन-विशेषणांचा मनात अर्थ झिरपतो. तेव्हा प्रत्येकाची ध्यानाची पद्धत त्या व्यक्तीइतकीच एकमेव व विशेष असू शकते.