मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग २)
(संदर्भासाठी: गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट, आणि दलाई लामा यांच्याबरोबर ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतल्या गेलेल्या परिषदेमधील काही वक्त्यांचे निवडक विचार येथे देण्याचा प्रयत्न करत आहे. परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’.)
वक्ते -मॅथ्यू रिकार्ड : १९७२ मध्ये पास्चर इन्स्टिटयूट मधून सेल जेनिटिकस मध्ये पी एच डी. नंतर पुढील आयुष्य ‘हिमालयातील बुद्धिझम ‘ च्या अभ्यासास व नेपाळ मध्ये ‘साधू’ (मंक ) म्हणून वाहिले. ध्यान आणि मेंदूचे कार्य यावरील शास्त्रीय संशोधनात सहभाग. ‘ध्यान’ यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध.
ध्यान: स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी.
ध्यान म्हणजे मनाला द्यायचे एक प्रकारचे प्रशिक्षण आहे. मनाला वळण लावायचे त्यात बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे.
’मानसिक आरोग्य’ म्हणजे फक्तं ‘मानसिक आजाराचा अभाव’ असे नाही. तर वस्तुस्थितीचे योग्य, स्पष्ट आकलन होण्याची क्षमता निरोगी मनामध्ये असायला हवी, ती नसणे. आपण जीवनातील घटनांचा, आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याचा अर्थ बऱ्याचदा विकृत लावतो. गोष्टी खरोखरच जशा आहेत तशा आपण पाहत नाही. द्वेष, मत्सर, उद्धटपणा, मन व्यापून टाकणाऱ्या इच्छा, अहंकार इत्यादींचे विखारी डंख आपल्या मनाला झालेले असतात. अशा मनाला इतरांच्या वागण्याचे, घटनांचे, परिस्थितीचे यथार्थ ज्ञान होईल का? आपली इत्तरांशी वागणूक त्यामुळे योग्य असेल असे नाही. त्यातूनच मग मानसिक अशांतीचा जन्मं होतो.
कधीतरी आपण शुद्ध प्रेमाने, सहृदयतेने इतरांशी वागतो- पण मनाची स्थिती कायम तशी नसते. खुपदा आपल्याला असे वाटते कि ‘आज आपण उगाचच रागावलो… किंवा ...अमुक एका व्यक्तीशी आपण असं वागायला नको होतं ..’ म्हणूनच आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी आपल्यातच बदल घडवून आणणे गरजेचे असते. ही गोष्ट ध्यानाने शक्यं होते.
ध्यान करायचे म्हणजे वेळ घालवत नुसते बसून राहणे असे नसून कोणत्या तरी गोष्टीवर लक्ष एकाग्र केले जाते. कधी श्वासावर, एखाद्या मंत्रावर वगैरे. ध्यानाचा पौर्वात्य अर्थ आहे नवीन गुणांची जोपासना. त्यांची जोपासना करायची प्रत्येकात क्षमता असते. उदाहरणच द्यायचे तर सहृदयता, अनुकंपा, प्रेम, आंतरिक शांती.
खूपदा आपल्या मनामध्ये विचारांचा नुसता कल्लोळ असतो. आपण माञ खूपच कमी वेळा मनात काय चाललंय याची दखल घेतो. ध्यान म्हणजे एका प्रकारे मनातल्या विचारांबद्दल जागरूक राहायचे, आपल्या मनाचीच ओळख करून घ्यायची, आपल्या विचारांच्या पाठीमागे आहे तरी काय हे जाणून घ्यायचे. त्यातूनच मग माणूस दुःखमुक्त होऊ शकतो.ध्यान हा काही नुसता लागलेला छंद किंवा नाद नसून खरोखरीच सातत्याने केलेल्या ध्यानामुळे मनात घडवून आणलेले आंतरिक बदल हे आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा दर्जा ठरवतात.
ध्यानाचा पौर्वात्य अर्थ आहे
ध्यानाचा पौर्वात्य अर्थ आहे नवीन गुणांची जोपासना.<<<<< व्यक्तीनुसार बदलणार्या अर्थामुळे हा विषय गूढ राहतो
ध्यानाचा पौर्वात्य अर्थ आहे
ध्यानाचा पौर्वात्य अर्थ आहे नवीन गुणांची जोपासना.<<<<< व्यक्तीनुसार बदलणार्या अर्थामुळे हा विषय गूढ राहतो