मायक्रोफोटोग्राफीचे अद्भुत विश्व - आंबोली - लेखक : कांदापोहे

Submitted by संयोजक on 10 September, 2016 - 14:11

मायबोलीकर विविध क्षेत्रांत पारंगत आहेत, हे आता आपण सगळे व्यवस्थित जाणतोच. आपल्या सर्वांनाच त्यांच्या क्षेत्रांबद्दल वाचायला, त्यांचे अनुभव ऐकायला आवडते. कांदापोहे हे मायबोलीकर नुकतेच 'मायक्रोफोटोग्राफी' करायला आंबोली या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आले. त्यांनी काढलेल्या फोटोंपैकी निवडक फोटोंचे हे फोटोफीचर आहे. संयोजकांच्या खास विनंतीला मान देऊन त्यांनी हे गणेशोत्सवानिमित्त आमच्याकडे सोपवले आहे. त्यांच्याच शब्दांत त्यांचा अनुभव आणि त्यांनी काढलेल्या सुंदर फोटोंचा आस्वाद, अशी दुहेरी मेजवानी मायबोलीकरांसाठी सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

तसे बघायला गेले तर, हा विषय मला अगदीच नवीन. एकदाही हा प्रकार कधी अनुभवला नव्हता. ना माझ्याकडे त्यासाठी आवश्यक साधने होती, ना काही माहिती. मायक्रोफोटोग्राफीचे विषयसुद्धा सगळे वेगळेच. कुणी सरपटणार्‍या प्राण्यांचे फोटो काढेल, तर कुणी खाद्यपदार्थांचे. कुणी पाण्यातील सूक्ष्मजीवसृष्टी तपासेल, तर कुणी टीचभरसुद्धा खूप मोठे म्हणता येईल, अशा फुलांचे फोटो काढेल.

मी या प्रकाराकडे आकर्षित झालो ते अनेक मित्रांचे जबरदस्त फोटो बघून. या प्रकाशचित्रांमध्ये सामायिक गोष्टी होत्या त्या म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉग, मलबार पिट व्हायपर व आंबोली. यापूर्वी अनेकदा आंबोलीमार्गे प्रवास केलाय व अधेमधे आंबोलीत राहिलोदेखील आहे, पण घाटातील निसर्ग व तेथील मोठा धबधबा एवढीच साधारण पर्यटकांना असते अशी ओळख होती.

अनेक वेळा आंबोलीतील जैवविविधता असलेली प्रकाशचित्रे बघून ’इथे एकदा तरी भेट द्यायचीच’, असे पक्के ठरवले होते. ओळखीतल्या मित्रांना ’यावर्षी येणार का?’ अशी निरनिराळ्या ग्रूपमध्ये विचारणा केली. त्याचवेळी हेपण ठरवले होते की, कुणी आले किंवा नाही आले तरी हा कँप करायचाच. तसेच काहीसे झाले. सर्व मित्रांनी जमत नसल्याचे कळवले. अगदी मायबोलीवरील छायाचित्रकारांनीसुद्धा नकारघंटा वाजवली. Happy

मायक्रोफोटोग्राफी करताना ’सब्जेक्ट’च्या अत्यंत जवळ जावे लागते व त्याकरता लागणारी लेन्स माझ्याकडे नव्हती. तसेच यात डेप्थ ऑफ फिल्ड अत्यंत कमी असते. याकरता तुमचा हात अत्यंत स्थिर लागतो. रात्री प्रकाशचित्रण करायचे असल्याने फ्लॅश व डिफ्युजर आवश्यक आहेत, अशी माहितीही समजली. पण एक मित्र मदतीला धावून आला. त्याने त्याची मायक्रो-लेन्स व फ्लॅश देण्याचे कबूल केल्याकेल्या चक्क लाल डब्याचे बूकिंग करून मोकळा झालो!

’घाटात उतरणारे ढग, धबधबे, खोल दरी, गच्च झाडेझुडुपे, पक्षी, सरसर व डुबुक डुबुक प्राणी, अस्ताचे रंग या सकलांची एक बोली आहे, तिलाच आंबोली म्हणतात! या हिरव्या भिंतीवर ती बोली लिहिली आहे! वाचा, पाखरांकडून शिका!!’ अशा शब्दांत काशिनाथ वाडेकर नावाच्या एका व्यक्तीने आंबोलीचे वर्णन केले आहे ते किती चपखल आहे याची अनुभूती पहाटे आंबोलीत पाऊल ठेवल्याठेवल्या आली.

1. आंबोली -
2016-Kandapohe-01.jpg

मी सामील झालो होतो काका भिसे या मलबार नेचर कंझर्व्हेशन क्लबच्या मेंबराने आयोजित केलेल्या कँपमध्ये. सकाळी ५ वाजता एसटी पोहोचली होती, पण सुरुवात दुपारी जेवणानंतरच होणार होती, त्यामुळे निवांत सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्यात वेळ घालवला. दुपारच्या जेवणानंतर सर्व लोकांच्या ओळखी झाल्या. या क्लबचे हेमंत ओगले यांचीही गाठ पडली. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यावर नंतर टेल्कोमध्ये थोडी वर्षे काम करून ते सगळे सोडून आता त्यांच्या मूळ गावी, आंबोलीला, सहकुटुंब राहत आहेत. ओगले यांचा फुलपाखरांचा अभ्यास आहे.

निघताना घरून ‘काय बावळटासारखा साप आणि बेडूक बघायला चालला आहेस, ते पण एकटा?’ अशी टर उडवण्यात आली होती, पण तिकडे पोहोचलो तेव्हा आपल्यासारखे अनेक वेडे दिसल्यावर हायसे वाटले. स्मित

दुपारी जेवणानंतर आंबोलीच्या जंगलाचे खरे दर्शन झाले. प्रचंड पाऊस व जोरदार धुके सगळीकडे पसरले होते. हॉटेलमागच्या जंगलात शिरल्यावर तिथे दिसणारी हिरवाई, हवेतील सर्दपणा... सोबतच काय काय दिसेल, ही अनामिक हुरहूरसुद्धा जोडीला होती. या छोट्याश्या भेटीत आम्हांला अनेक प्रकारच्या वनस्पती, मशरूम, किडे, छोटे बेडूक दिसले. एवढ्यात एकाला रस्त्यावर पोचल्यापोचल्या एक साप दिसला.

2. khaires black shieldtail -
2016-Kandapohe-02.jpg

सर्पतज्ज्ञ निलमकुमार खैरे यांचे नाव दिलेला 'Khaire's Black Shieldtail' हा साप जमिनीखालीच राहतो व फक्त पावसाळ्यात तो बाहेर येतो. हा साप बिनविषारी असून साधारण एका हाताच्या मुठीत बसेल एवढा लहान असतो. आपल्याकडे दुतोंडी साप म्हणतात, त्यातीलच एक प्रकार. जमिनीखालीच राहिल्याने याची त्वचा एकदम चकचकीत व सप्तरंगी असते.

त्याच दिवशी रात्री आंबोलीतील बोटॅनिकल गार्डनमध्ये मलबार पीट व्हायपर व ग्लायडिंग फ्रॉग यांच्या शोधात अत्यंत खतरनाक अशा पावसात शिरलो. इथे आम्हांला हवे ते बेडूक, वेगवेगळे सरडे व काही साप दिसले.

3. Malabar Gliding Frog -
2016-Kandapohe-03.jpg

4. Bicolor Frog -
2016-Kandapohe-04.jpg

5. Minervarya Sahyadris Frog -
2016-Kandapohe-10.jpg

पश्चिमघाटातील जैवविविधता संपन्न करण्यात उभयचरांचा, विशेषत: बेडकांचा सहभाग फार मोठा आहे. झाडावरचे हे बेडूक इतर बेडकांप्रमाणेच पाण्यात अंडी घालत नाहीत, तर पाण्यालगतच्या वनस्पतींच्या पानांवर अंडी घालतात. या अंडयांचा ओलसरपणा टिकावा म्हणून मादी त्यांवर वारंवार मूत्रविसर्जन करते. अंडी पक्व झाल्यावर, त्यांतून बेडकाची पिले पडतात ती सरळ खालच्या पाण्यामध्ये!

6. Wringkled Frog Eggs -
2016-Kandapohe-07a.jpg

मलबार ग्लायडिंग फ्रॉग (Malabar gliding frog) हे बेडूक एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारतात. त्यांच्या पायांची रचना ग्लाईड करून जाण्यासाठी योग्य अशी असते. झाडावरून ते कधीही खाली उतरत नाहीत आणि कधी उडी चुकलीच, तर त्यांचे पाय त्यांना वाचवतात. हे बेडूक झाडावरच घरटी बांधतात. अर्थात घरटी म्हटले की, तुमच्या डोळ्यांसमोर जे काही येते, तसे हे घरटे नसून एक पांढर्‍या फोमचा मोठा गोळा असतो, ज्यात अंडी असतात. कितीही धुवांधार पाऊस झाला, तरी हा फोम काही विरघळत नाही. ह्या अंड्यांत पिले तयार झाली, की ती फोममधून आपोआप खाली पडतात. यासाठी खाली तळे असणे आवश्यक आहे. कारण ही पिले पाण्यात जगतात. जून ते ऑगस्ट हा एवढाच काळ हे बेडूक दिसतात, व तेव्हाच त्यांचे प्रजनन होते. त्यानंतर ही मंडळी गायबतात ती थेट पुढच्या जूनपर्यंत.

7. Malabar Gliding Frog -
2016-Kandapohe-08.jpg

8. Amboli Bush Frog Eggs -
2016-Kandapohe-09.jpg

इथे वारंवार येणारा मलबार हा शब्द पश्चिमघाटासाठी प्रसिद्ध आहे. जगामध्ये फक्त इथेच सापडणार्‍या अनेक गोष्टींच्या पुढे तो लावला जातो. मलबार पाईड हॉर्नबिल, मलबार ग्लायडिंग फ्रॉग, मलबार पिट व्हायपर वगैरे अनेक उदाहरणे देता येतील. आंबोलीतील तीन दिवसांच्या वास्तव्यात असे दुर्मिळ, फक्त आंबोलीत दिसणारे अनेक उभयचर दिसतील, अशी अपेक्षा होती.

हॉक मॉथ पतंगाची मादी त्यांच्या अन्नझाडाच्या पानाखाली एकेकटे अंडे घालते. मात्र ही मादी एका हंगामात शंभरच्या आसपास अंडी घालते. हिरवट रंगाची ही अंडी जातीप्रमाणे ३ ते २१ दिवसात उबून त्यातून अळी बाहेर येते. ह्या अळ्याही मोठ्या, जाडजूड असतात. ह्या अळ्यांना ओळखायची सोपी खूण म्हणजे त्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागावर एक शेपटीसारखे शिंग असते. ही अळी दिसायला नितळ, गुळगुळीत, पण जाडजूड, आणि गुबगुबीत असते. त्यांचे रंग अगदी उठावदार असतात. त्यांच्यावर पट्ट्यापट्ट्यांची किंवा डोळ्यांची नक्षी असते. ह्या डोळ्यांच्या किंवा पट्ट्यांच्या नक्षीमुळे त्यांचा आविर्भाव एखाद्या सापासारखा किंवा भयावह असा दिसतो.

9. Hawk Moth ची अळी -
2016-Kandapohe-06.jpg

हरणटोळ हा आत्तापर्यंत फक्त ऐकलेला सापपण अचानक दिसला. साधारण हातभार लांबी असलेला हा Green Vine Snake किंवा हरणटोळ अगदी शेजारच्या फांदीवर दिसला तरी साप आहे हे कळत नाही.

10. हरणटोळ Green Vine Snake -
2016-Kandapohe-11.jpg

आंबोलीचे वैशिष्ट्य असलेले अनेक सरपटणारे प्राणी प्रत्येक भेटीत दिसत होते. मलबार पिट व्हायपर हा भारतातल्या दहा सर्वाधिक विषारी सापांच्या जातींपैकी एक असलेला साप मात्र दिसत नव्हता किंवा दिसला, तरी फोटो काढता येत नव्हता. थोडेसे हिरमुसलेलेले आम्ही शेवटच्या दिवशी मात्र याचे नक्कीच फोटो मिळतील, या आशेवर होतो. रात्री जेवण करून जेव्हा निघालो, तेव्हा पावसाकरताही सर्व तयारी करून निघालो होतो.

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले आंबोली हे समुद्रसपाटीपासून 2250 फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद (७५० सेमी) पावसाची नोंद इथे होते. ह्याबाबतीत भारतात चेरापुंजीनंतर दुसरा क्रमांक आंबोलीचा लागतो. इथे हे सांगायचे कारण म्हणजे अशा धोधो पावसात मायक्रोफोटोग्राफी हे एक आव्हान आहे. ह्याची तयारी म्हणून मी एक छत्री व पाँचो असे नेले होते, पण ते पावसापुढे टिकले नाहीत.

तर वाटेतच आम्हांला हवा तसा मलबार पिट व्हायपर हा साप मिळाला. सर्व लोकांनी आपापले कॅमेरे सज्ज केले आणि थोडी गडबड झाली. निवांतपणे फोटो काढता यावे म्हणून मी थोडा मागे थांबलो. जेव्हा संधी मिळाली, तेव्हा सेटींग करून फोटो काढताना धक्का लागतोय, पाऊस कोसळतोय या गडबडीत माझा कॅमेरा थोडा भिजला व बंद पडला. माझा एकदम मूडच गेला. ज्यासाठी अट्टहास केला, तोच फोटो नाही म्हणून हिरमुसलो. तसेच फ्लॅश काढून एकदा चालू झाल्यावर काही फोटो काढले. यातील तीनचारच फोटो चांगले आले होते, हे घरी परत आल्यावर कळले. हा त्यातलाच एक फोटो. वरुन धोधो पाऊस पडत असताना सापाच्या अंगावरचा थेंबही टिपता आला. Happy

11. Malabar Pit Viper -
2016-Kandapohe-05.jpg

या भेटीत अनेक उभयचर दिसले. मलबार ग्लायडिंग फ्रॉग, मलबार पिट व्हायपर, खैरे शिल्डटेल, आंबोली टोड, अँट मिमिकिंग स्पायडर, बँडेड गेको, जंगल गेको, बाँबे बुश फ्रॉग अशा अनेक प्रजाती बघितल्या.

12. Banded Gecko -
2016-Kandapohe-12.jpg

13. Amboli Toad -
2016-Kandapohe-13.jpg

बाँबे बुश फ्रॉग शोधणे हे कसब तिथले जाणकारच करू जाणे. अक्षरशः सुपारीपेक्षा बारीक असलेला हा बेडूक शोधणे खरंच खूप अवघड आहे. यालाच त्याच्या आवाजावरून 'टाईपरायटर फ्रॉग' पण म्हटले जाते. प्रजनन काळात हा आपला गळा फुगवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.

14. Bombay Bush Frog or Typewriter Frog -
2016-Kandapohe-14.jpg2016-Kandapohe-15.jpg

असे अनेक नानाविध सरपटणारे प्राणी बघून, आणि काहीशे छायाचित्रे काढून समाधानाने पुण्यात परतलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक!! Happy

green vine snake चे been vine snake झाले आहे ते कृपया दुरुस्त करा.

बाकी लोकहो धन्यवाद Happy

अप्रतिम फोटो.

हेमंत ओगल्यानी खूप धाडसी निर्णय घेतला, अगदी हाडाचे निसर्गप्रेमी. त्यांच्या घराच्या आवारातही वरचे काही प्राणी दिसतात.

मस्त रे.. तिसरा फोटू खासच.. हॉक मॉथ अळी पाहिली होती मागच्यावेळी आंबोलीलाच.. झाडांवर बसून मस्त आरामात रवंथ करत असते..

Pages