'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा'ची कथा....

Submitted by अजातशत्रू on 9 September, 2016 - 22:21

आजही दहा ऑलटाईम ग्रेट लावणीमध्ये 'तिचा' समावेश होतो, मात्र ती लावणी ज्या सिनेमात होती तो सिनेमा जेंव्हा प्रदर्शित केला गेला तो सिनेमा दणकून पडला होता. या लावणीवरून संगीतकार, निर्माता- दिग्दर्शक यांच्यात मतभेद झाले परिणामी चित्रीकरण लांबले होते. शिवाय बजेट वाढले होते. चित्रपट पडल्यावर त्याची लांबी करून परगावी रिळे पाठवताना चक्क ही लावणीच कापून टाकली गेली अन सिनेमा उर्वरित ठिकाणी प्रदर्शित झाला पण डाळ शिजलीच नाही. पण कालांतराने लावणीने मात्र इतिहास घडवला. त्या लावणीची अन सिनेमाची रंजक कथा वाचायची आहे ? तर मग चला माझ्या या पोस्टसोबत जुन्या मराठी सिनेप्रवासाला ....

केशरी काताने रंगलेली एक हे रसाळ लावणी ओठावर मधाळ चालीत घोळत राहते. यातल्या पानाचा नाजूकपणा हा गोरया गालाच्या रेशमी कायेसारखा आहे. ही लावणी नुसती गुणगुणली तरी अंगीअंगी मोगरा दरवळतो अन मस्त केवडयाचा कैफ मनावर चढतो, पान न खाताही लाजेने ओठ लाल होतात ! अत्तर चुरगाळावं तसे यातले शब्द शृंगाराचा हळुवार चुरगळत जातात, देठ खुडणारया नखांनादेखील पानाची नशा हळूहळू चढत जावी तसे हे गाणे हळूहळू काळजात गुलाबी साखरपाकासारखे विरघळत जाते. काठोकाठ भरलेले शृंगाराचे गच्च रसकुंभ हळूच ओठाशी मस्ती करून जावेत तसे ह्या गाण्यातले आलाप मस्ती करतात. या लावणीचीही एक रसाळ कहानी आहे... पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवाची ही रंगतदार कथा ... ...

१९७६ - ७७ चा काळ होता. मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने त्यांच्या 'कलावंतीण' या सिनेमावर काम करत होते. कथा व पटकथा त्यांनीच लिहिली होती, संवाद शंकर पाटलांनी लिहिले होते, पायाभूत तयारी झाली होती. भाटीया बंधूंकडे त्यांनी निर्मितीची जबाबदारी दिली होती. उषा नाईक, अविनाश मसुरकर यांना मुख्य भूमिकेसाठी तर कुलदीप पवार अन रंजना पाहुणे कलाकार म्हणून निवडले होते. संगीतकार म्हणून राम कदमांना काम दिले होते अन गीतलेखनाची जबाबदारी त्यानी अर्थातच जगदीश खेबुडकरांवर टाकली होती. तमाशाप्रधान चित्रपट असल्याने अगदी जोरकस, ठसकेबाज गाणी देण्यासाठी त्यांना आग्रहही केला होता. जगदीश खेबुडकर आणि राम कदम यांच्याकडे गीत संगीताची जबाबदारी दिल्याने तमाशापटांचे निम्मे काम हलके होई असं तेंव्हा एक समीकरणच झाले होते. अनंत मानेंनी अभिनेते- अभिनेत्री देखील कसदार निवडले असल्याने त्यांना चित्रपटाच्या यशाची बरयापैकी खात्री होती. या कालखंडात भालजी पेंढारकर म्हणजे ऐतिहासिक, दत्ता धर्माधिकारी म्हणजे कौटुंबिक, राजा परांजपे म्हणजे विनोदी आणि दिनकर द. पाटील व अनंत माने म्हणजे ग्रामीण चित्रपट, हे समीकरण मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या मनात ठसलेलं होतं. तसेच अशा सुसज्ज कास्टिंगमुळे सिनेमा तिकीट बारीवर यश मिळवेल असं मानेंचं मत होतं.

तेंव्हा सिनेमाची आतासारखी कोटीच्या कोटी उड्डाणे आणि मल्टीप्लेक्सचे गाजरगवतही उगवलेले नव्हते. ग्रामीण भागातला प्रेक्षक अन गावोगावच्या यात्रा जत्रा मध्ये सिनेमे बघणारा टुरिंग थेटर मधल्या प्रेक्षकाची वा तंबू टॉकिजच्या प्रेक्षकाची आवड, महिला वर्गाची आवड, शहरी भागात सिनेमाला किती प्रतिसाद मिळेल याचा एक आडाखा, समकालीन संभाव्य रिलीज होणारे इतर सिनेमे, हिंदी सिनेमांना देऊन शिल्लक राहिले तर मराठी चित्रपटाला मिळणारया थियेटरची संख्या, रिलीजचा महिना अशी अनेक गणिते घालून चित्रपटाच्या यशापयशाची समीकरणे मांडली जात. मराठी सिनेमाचा निर्माता हा आधीच गरीब असल्याने अशा नानाविध कारणाने त्याचे बजेट आणखीन आकसून जाई. मग जमेल तिथे जमेल तितकी काटछाट करून सिनेमाचे चित्रीकरण दिग्दर्शकाला करावे लागत असे. या सर्व गोष्टींमुळे चित्रपटाच्या तांत्रिक बाजू कमजोर होण्यात आणि इनडोअर सेटसचे गेटअप दुय्यम बनून जात. शिवाय हिंदी गाण्यांच्या तुलनेत मराठी चित्रपट गीते समान लोकप्रियता मिळवायला नेहमी कमी पडत, यामुळे निर्मात्याचा जास्तीत कल गाणी आउटडोअर शूट करावीत, सेट उभारून खड्ड्यात पडू नये याकडे असायचा.

इनडोअर सेट्स उभे करताना तमाशातील गाण्याचे दृश्य असेल तर ते त्यातल्या त्यात परवडणारया सेटचेच असे. कारण बंदिस्त स्टेज, त्यामागे रंगीत चित्राचा पडदा, कडेला विंग, समोरून मोठाले फोकस आणि स्टेजसमोरील मोकळ्या जागेत दहाबारा रांगेत मांडलेल्या पत्र्याच्या खुर्च्या, पूर्ण तमाशाच्या तंबूवजा सेटला आतल्या बाजूने मारलेली मंडपाच्या कापडाची चौकोनी कनात असं त्याचं एक साचेबद्ध स्वरूप असे. या स्टेजवर मग नर्तिका, ढोलकीपटू, नाच्या, सोबतीला गवळणी अन पेटीमास्तर (हार्मोनियम वादक) असा लवाजमा असे. मग काही रिटेकमध्येच तीन ते दहा मिनिटांची लावणी चित्रित केली जाई. 'कलावंतीण'हा तमाशाप्रधान सिनेमा असल्याने त्यात लावण्या होत्याच. नाव कुणाचे घेऊ मी सांगा कसा उचकीने घातलाय पिंगा, रात झुरतीय चंद्रासाठी, आली बरसत रंग बहार, कुणी चुरडीले फुल गुलाबी जसा रंगला गाल तसा विडा रंगला लाल व पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ह्या लावण्या यात होत्या. मी एकरूप व्हावे हे युगल गीत, नमोस्तुते नमोस्तुते हे नृत्य आराधना गीत अशी एकूण सात गाणी या दिड तासाच्या सिनेमात होती. यातील लावण्यांसाठी बरयापैकी तमाशाचे सेट उभे केले होते. यशाच्या अंदाजाच्या आधारे चित्रपटासाठी हात थोडा मोकळा करून त्यातल्या चांगल्या तांत्रिक बाजू वापरून सिनेमा जास्तीत जास्त चांगला व्हावा ही अनंत मानेंची इच्छा होती.

चित्रीकरणाआधी सर्व गाणी, लावण्या रेकॉर्ड करून झाल्या, राहिले होते फक्त पिकल्या पानाचा देठ हे गाणे ! राम कदमांचे म्हणणे होते की ही लावणी अगदी अदाकारीने ठासून भरलेली आहे, तिची गायकीही नखरेल ढंगात व्हावी ; त्यासाठी सुलोचना बाईंना हे गाणे गायला द्यावे असे त्यांचे म्हणणे होते. तर अनंत मानेंचे मत होते की या लावणीत शृंगारतला पोक्तपणा आहे, गेयतेची एक संथ लय या लावणीत अंगचीच आहे अन त्यातली शब्दोच्चार हे घोळवत घोळवत तालात यावेत. अनंत मानेंचा सुलोचना बाईना नकार नव्हता पण त्यांनी होकारदेखील दिला नव्हता. पण ते याच्यासाठी सवडीने आवाज शोधत होते. एका कार्यक्रमात दिनकर पाटलांच्याजवळ त्यांनी या गाण्याचा विषय काढला. त्यावर त्यांनी शोभा गुर्टू यांचे नाव सुचवले. दिनकर पाटलांच्या धन्य ते संताजी धनाजी ह्या १९६८ मधील ऐतिहासिक चित्रपटात 'पाहुनी प्यारभरी मुसकान तुझ्यावर जान करीन कुर्बान..' या लावणीसाठी शोभाताई गायल्या होत्या अन ती लावणीही काहीशी संथ लयीतली होती.

'पिकल्या पानाचा...' हे गाणे शोभा ताईंनी गावे म्हणून अनंत मानेंनी त्यांची भेट घेतली. शोभाताईंनी १९६८ मधल्या दिनकर पाटलांच्या सिनेमानंतर मराठी सिनेमासाठी पार्श्वगायनच केलेले नव्हते. इतक्या मोठ्या ज्ञानी अन गुणी गायिकेकडून आपल्या 'कलावंतीण'मधले एक सुरेख गाणे गायले जाणार या कल्पनेने ते हरखून गेले. राम कदमांनी सुलोचना बाईच्या ऐवजी हे गाणे कोणासही देण्यास आधी नाराजी व्यक्त केली पण नन्तर अगदी तन्मयतेने हे गाणे त्यांनी संगीतबद्ध केले. शोभा गुर्टूनी अगदी प्रसन्न अशी झाक गाण्याला दिली. चित्रपट पूर्ण झाला. १९७८ मध्ये रिलीज झाला. मात्र 'कलावंतीण' तिकीट बारीवर साफ अपयशी ठरला. अनंत माने नाराज झाले, पिकल्या पानाचा देठमुळे चित्रपटास उशीर झाला अन प्रदर्शन लांबले त्यातून निर्मात्याला नाहक फटका बसला असं त्यांना वाटू लागले. राम कदमांनी कामात कुसूर केलेली नव्हती, सिनेमातल्या लावण्या अगदी फक्कड होत्या मग आपण उषा नाईक - अविनाश मसुरेकर यांना लीड रोल देऊन उगाच रिस्क घेतली असं त्यांना वाटू लागलं.

आजच्या काळासारखी मनोरंजनाची व दळणवळणाची साधने त्याकाळात औषधाला देखील नव्हती. तेंव्हा आधी सिनेमा येई व गाणी नंतर लोकप्रिय होत. त्यातून जर का सिनेमा अपयशी ठरला की गाणी आपोआप विस्मृतीत जात, त्यामुळे इतर सर्व बाबींवर व्यावसायिक परिणाम होत असत. 'कलावंतीण'चेही असेच झाले. चित्रपट थोडा बरा चालावा म्हणून नाराज झालेल्या मानेंनी चित्रपटावर कात्री चालवली, त्याची लांबी कमी करून उर्वरित रिळे बाहेर गावी पाठवण्यास सुरवात झाली. पिकल्या पानाचा देठ साठी आपला निर्णय चुकला असं समजून अनंत मानेंनी 'पिकल्या...' लावणीसह वीसेक मिनिटांचा भाग कापून टाकला. अर्थात सिनेमाची रिळे आधी काही ठिकाणी ह्या गाण्यासहच पाठवली गेली होती, यथावकाश सिनेमा लोकांच्या विस्मृतीत गेला. १९८६ मध्ये एक अस्सल मराठमोळा तमाशाचा फड अस्तित्वात आला त्याने मात्र या गाण्याचे पुनरुज्जीवन केले, या फडाचे नाव होते - 'लता - सुरेखा पुणेकर'. यात सुरेखा पुणेकरांनी 'पिकल्या पानाचा देठ की हिरवा'चे अप्रतिम अदाकारीने सादरीकरण केले आणि ही लावणी पुन्हा चर्चेत आली अन तिची लोकप्रियता शिगेस पोहोचली. आजही पहिल्या दहा लोकप्रिय लावणीत या गीताचा समावेश होतो.

दरबार जुना ह्यो हे हंड्या झुंबर नवं,
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगाअंगी मी रंग खेळते,
केसामधी मरवा पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

लावणीचा हा मुखडा असा काही जीवघेणा लिहिला आहे अन तितक्याच समर्थपणे गायला गेला आहे की त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडावेत. ह्यातील प्रत्येक शब्द शोभाताईंनी असा काही घोळवला आहे की कलेजा खलास होऊन जावा न ऐकणारा कितीही पिकलेल्या पानासारखा असला तरी त्याच्यातले हिरवेपणाला नवे कोंब फुटावेत इतकं रसायन यात ठासून भरलेले आहे. यातील नवं, दिवं आणि हिरवा हे शब्द त्यांनी वारयावर पिसे तरंगावीत तसे अलगद उच्चारले आहेत.
नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन्‌ कात केवडा
लई दिसानं रंगल्‌ विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया मुखडा
असा फिरवापिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

ह्या पंक्तीत काही ठिकाणी घेतलेला पॉज ऐकणारयाचा श्वास फुलवून जातो, तर काही शब्द असे काही संवादी स्वरात गायले आहेत की ऐकणारया प्रत्येकाला असा भास होतो की गाणे आपल्यालाच उद्देशून गायले आहे.
थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर, लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमची माझी हौस इश्काची
हळूहळू पुरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

आपल्या समोर कुणी तरी सौंदर्यवती नटरंगी नार बसली आहे, अगदी लडीवाळपणे हे गाणे गात तिच्या कोमल हाताने आपल्या गालांना कुरवाळते आहे व आपल्या लाल झालेल्या ओठांवरून पानाचे रसदार दोनेक थेंब नकळत ठिबकत आहेत याची अनुभूती शेवटच्या कडव्यात येते...
लोक नाचगाण्यापायी उगाच जिंदगी बरबाद करत नाहीत याचा नशीला प्रत्यय हे गाणे मन लावून ऐकले की येतोच ....

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/01/blog-post_42.html

lavani.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख लिहिलेय. माझ्या आवडत्या लावण्यांपैकी हि एक लावणी आहे. शोभाताईंनी खूप कमी पार्श्वगायन केले पण जे केले त्यातले एकुण एक गाणे अगदी सुवर्ण झळाळी असल्यासारखे आहे.

दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवलेला तेव्हा ही लावणीही त्यात होती. मराठी छायागीतातही हि लावणी अनेकदा पाहिलीय. हि लावणीच कलावंतीण चित्रपटाची ओळख आहे माझ्या डोक्यात.

सुरेखा पुणेकरांमुळे लावणी पुन्हा चर्चेत आली हे माहीत नव्हते. धन्यवाद.

छान लेख.

मला देखील हि लावणी दूरदर्शन वर चित्रपट दाखवला तेव्हा बघितल्याचे आठवतेय.

सुरेखा पुणेकर ने लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली यात वादच नाही. पण ती जेवढी गाजली तेवढ्या बाकीच्या कलाकार गाजल्या नाहीत.

माझ्या आठवणीत मधु कांबीकर पण पेशवाई लावणी असा कार्यक्रम सादर करत असे. त्यातली तिची नेसली पितांबर जरी.... खासच होती.

दूरदर्शनवर हा चित्रपट दाखवलेला तेव्हा ही लावणीही त्यात होती >>> + १

सिनेमातले तिचे सादरीकरण अगदी चपखल होते. लावणीत एक करुण रसाचा under current आहे तो बरोबर पकडला होता सिनेमात.

सुरेखा पुणेकरांचे सादरीकरणही बघितले आहे. खूप लाऊड होते ते. तो करुण रस अजीबातच दिसला नव्हता त्यात. अजिबातच आवडले नव्हते ते.

गायकवाड साहेब - तुमचे लेख वाचनीय असतात ( म्हणजे वाचायला घेतल्यावर पूर्ण वाचणे शक्य होते ).

पण तुम्ही "मल्टीप्लेक्सचे गाजरगवतही " असल्या काहीतरी कॉमेंट टाळल्या पाहिजेत. गाजरगवत ही उपमा माझ्या मते तरी निगेटीव्ह आहे. हे एक उदाहरण झाले पण तुमच्या प्रत्येक लेखात अश्या अनेक व्हॅल्यु जजमेंटल कॉमेंट दिसतात. तुमचे लेख वाचुन तुमच्या बद्दल "बदलत्या काळाबरोबर जमवुन न घेऊ शकलेला अयश्स्वी माणुस" अशी प्रतिमा निर्माण होते. तसे तुम्ही नक्की नसाल. कजाग सासु किंवा ग्रंपी म्हातारा "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत दुसर्‍यांची मुस्कटदाबी करत असतात तसे काही तरी वाटते.

मला वाटते तुम्ही एकदा तुमच्या लेखांकडे त्रयस्थ वृत्तीने पहावे.

---
प्रतिसाद व्यक्तीगत असला तरी वाईट हेतू नी नाही.