"तिसरे बादशहा हम है ".... - 'काला पत्थर'च्या निमित्ताने ....

Submitted by अजातशत्रू on 6 September, 2016 - 02:25

जमिनीच्या उदराखाली भली मोठी खाण अजगरासारखी सुस्त पडली आहे अन वर लख्ख उन्हात वेगळाच डाव चालू आहे..अपंग मनमोहन कृष्णचे चहाचे छोटेसे टपरीवजा छप्पर आहे, तिथे बाहेर एक लाकडी फळकुटाचे टेबल आहे. त्याच्या आजूबाजूला दोन मरतुकडे बाकडे टाकलेले आहेत. या टपरीच्या बाजूला कोळशाचे ट्रक उभे आहेत. कळकटलेले कामगार डोक्याला पांढरे हेल्मेट घालून येजा करताहेत. सगळे कसे यंत्रवत चाललेले आहे, या टेबलावर काळपट चॉकलेटी रंगाच्या चहाचे काचेचे ग्लास आहेत, पांढुरक्या रंगाच्या टवके उडालेल्या बशीत मातकट फरसाण पडलेलं आहे अन पत्त्याचा डाव रंगात आलेला आहे. राणा (मॅकमोहन) त्याच्या मित्रांबरोबर तीन पत्तीचा डाव लावून बसलेलाय. 'एक चाल मेरी भी, एक और मेरी, एक और सही आणि शो ..' असे त्यांचे जुगारी डावपेच चालू आहेत. मागे पार्श्वसंगीतात गीता दत्तच्या आवाजातलं 'तदबीर से बिगड़ी हुई तक़दीर बना ले, तक़दीर बना ले अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले….' मंद ट्युनिंगमध्ये चालू आहे.. बेगम,गुलाम आणि देहला असे बिनीचे पत्ते दाखवून राणा डाव जिंकतो, समोरचा हारलेला ओशाळवाणा होऊन, 'धत तेरे की,सब पैसे हार गया … ' असं पुटपुटू लागतो… (repost)

त्या टेबलाला रेलून उभा असलेला, कंबरेचा जाड पिवळ्या हुकचा पट्टा गळ्यात अडकवलेला, मळकट खाकी कपड्यातला मंगल सिंह (शत्रुघ्न सिन्हा ) पत्त्याचा हा डाव बेरकीपणाने बघतोय, त्याला राणाचा डाव बघून चेव येतो अन तो त्याला विचारतो,"क्यों राजा नल हमसेभी एक हाथ खेलोगे ?" राणा उत्तरतो, "क्यो नही ?"

बाकड्यावर बसलेल्या कामगारांना एका फटक्यात सरकवत चुटकी वाजवत मंगलसिंह आता त्या बाकड्यावर राणाच्या समोरासमोर बसलेला आहे. राणा त्याच्याकडे मारक्या म्हशीगत बघत बघत पत्ते पिसू लागतो. राणा हा त्या भागातला मुरलेला अट्टल जुगारी म्हणून ख्याती पावलेला आहे तर मंगलसिंह हा एक बेरड गुन्हेगार आपली ओळख लपविण्यासाठी त्या खाणीत कामाला आलेला आहे. आता त्याचा तीन पत्तीचा डाव राणासोबत चालू आहे. मागे सुरु असलेल्या 'लगा ले दांव लगा ले …' चा आवाज आता चांगलाच वाढलेला आहे अन मंगलसिंह हुबेहूब गाण्याबरहुकुम त्या लाकडी टेबलावर दोन्ही तळहाताने चांगलाच ठेका धरून वाजवू लागला आहे. पत्ते पिसता पिसता राणा त्याचे पत्ते काट मारण्यासाठी मंगलसिंहच्या पुढ्यात हात करतो, टिचक्या वाजवत त्या पत्त्याच्या वरतीच टिचकी देतो, छद्मी पणाने हसतो. राणाचे आता तीन तीन पत्ते वाटून झाले आहेत. मंगल सिंह ते पत्ते उचलून दोन्ही हाताच्या ओंजळीत धरून एकेक पत्ता हळूहळू कोपरा उघडून सरकवत सरकवत तिन्ही पाने बघतो. राणा देखील पत्ते एका आड एक धरून त्याची तिन्ही पाने पाहतो. बदाम बादशहा, किलवर बादशहा आणि किलवर दुर्री अशी मंगलसिंहची पाने आहेत. पाने बघून तो एक चुरगळलेली नोट खिशातून काढत "एक चाल मोहब्बत मे ' असं म्हणत म्हणत टेबलावर टाकतो. मंगलसिंह कडे काहीशा संशयाने पाहत राणा देखील पत्ते एका आड एक धरून त्याची तिन्ही पाने बघतो. चौकट गुलाम, इस्पिक गुलाम आणि इस्पिक चौक अशी त्याची पाने आहेत. त्याने आधीच्या डावात जिंकलेल्या टेबलावरतीच पडलेल्या नोटातली एक नोट उचलून पुढे डावात टाकतो. मंगलसिंह अजून एक चुरगळलेली नोट काढून 'भाईचारे मे एक चाल और आगे ..' असं म्हणत डावात टाकतो.

'एक मेरी भी' असं म्हणत राणा आणखी एक नोट पुढे करतो, इतक्या वेळ बेरकीपणाने त्याच्याकडे पाहणारा मंगलसिंह आता सावध होऊन पुन्हा पत्ते बघतो, त्याचे लक्ष पत्त्यात आहे हे हेरून राणा त्याच्या शर्टच्या बाहीत लपवलेला बदामचा गुलाम वरती काढून हातातला पत्ता बदलतो अन "एक चाल मेरी भी !" असं आव्हान देतो. आता वैतागलेला मंगलसिंह पुढची चाल करतो.
"देखो राजा बनारस ये तेरी मेरी मे बहोत टाईम लग जायेगा, एक सौ का नोट है मेरे पास …" असं म्हणत तो खिशातून शंभराची नोट काढून डावात टाकतो. अन म्हणतो की "अब तुम भी डाल दो, अब जिसका बडा पत्ता होगा वो ले जायेगा !". राणा त्याचे आव्हान स्वीकारून शंभराची नोट पुढे करतो. या दोघांचे हे आवेशातले बोल ऐकून हॉटेलवाले मनमोहन कृष्ण मंगलला सांगतात की तू नवा आहेस, कशाला पैसे वाया घालवतोस, तू याचा नाद करू नकोस, हा नेहमीच जिंकत आलेला आहे यावर मंगल उत्तरतो - 'बडे भैय्या से आजतक कोई जीता नाही और हम आजतक किसीसे हारे नही, तो अब देख लेते है. हो जाये !"
त्याचे हे उद्गार ऐकून राणा त्याचे तीन पत्ते तीन गुलाम एकेक करून टेबलावर खुले टाकतो अन 'तीन गुलाम' असं म्हणत टेबलावरच्या नोटा आपल्याकडे ओढू लागतो. तेव्हढ्यात त्याला अगदीच धुत्कारत, हिणवत 'अरे बस्स.. हाड हांड करू लागतो.

" क्यो तुम्हारे पास क्या है ?' असं राणाने विचारताच मंगलसिंह उत्तरतो, "हमारे पास तीन बादशहा है !"
अधीर होऊन राणा विचारतो "दिखाओ, दिखाओ तीन बादशे !"
आता त्या टपरीच्या खांबाला अगदी आरामात रेलून बसत बसत त्याची पाने दाखवतो. तो आधी किलवर बादशहा टाकतो मग बदाम बादशहा टाकतो आणि थांबतो. अधीर झालेला राणा त्याला म्हणतो, "तिसरा ? तिसरा बादशहा दिखाओ ?"असं फर्मावतो.
"मेरे ताश के तिरपनवे पत्ते, तिसरे बादशहा हम है" असं आपल्या ठेवणीतल्या खर्जातल्या आवाजात हुकुमी संवादफेकीत मंगलसिंह हातातले तिसरे पान फाडून त्याचे चार तुकडे करतो अन राणाच्या तोंडावर फेकून "दिखाई नही देता ? तिसरे बादशहा हम है !!" असं म्हणत एका मुठीतच टेबलावरच्या सगळया नोटा कोंबून उठून चालता होतो देखील !
थियेटर मध्ये शिट्या अन आरोळ्यांचा नुसता कल्लोळ उठतो.

आणखी एका सीनमध्ये अमिताभ त्याच टपरीवजा हॉटेलमध्ये बसलेला असतो. तो सिगारेट शिलगावण्यासाठी समोरच्या कामगारास काडीपेटी मागतो, तो काडीपेटीतील एक काडी काढून पेटवून अमिताभच्या पुढे धरतो. इतक्यात तिथे आलेला शत्रुघ्न त्या कामगाराचा हात मागे ओढत त्याच्या काडीवर आपली सिगारेट पेटवतो न दुसरीकडे जाऊन बसतो. चिडलेला अमिताभ त्याची सिगारेट त्या काडीवर न शिलगावता शत्रू बसलेल्या टेबलाजवळ जातो अन त्याच्या हातातल्या जळत्या सिगारेटवर आपली सिगारेट शिलगावतो. शिवाय पुढे जाताना शत्रूची सिगारेट भिरकावून देतो . या नंतर दोघात जाम दण्णादन्नी होते ती पडद्यावर जाम खुन्नस देऊन जाते.

पुढच्या एका सीनमध्ये चहा आधी कोण पिणार या प्रश्नावर शत्रुघ्न (मंगलसिंह) आणि अमिताभ (विजय) यांच्यात होणारी खीचातानी बघण्यासारखी आहे. या दोघाच्या वादात शशी कपूर (इंजिनियर रवी ) पुढे येऊन चहा पिऊन वाद तिथेच थांबवतो.

वर्ष होते १९७९. सिनेमा होता काला पत्थर.यश चोप्रा कॅम्पमधील सिनेमा ! हा सिनेमा म्हणजे स्टार्सची मांदियाळी शोभावा असा होता. अनेक वैशिष्ट्ये अन अनेक आठवणी या सिनेमाच्या आहेत . यातली काही गाणी देखील गाजली, शशी कपूरची पत्नी जेनिफर हिचे लोभस असं काही क्षणाचे दर्शन देखील यात झाले होते. ‘टावरिंग इन्फर्नो’च्या यशानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९७९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते यश चोप्रा यांनी ‘काला पत्थर’ या चित्रपटाची निर्मिती केली. यापूर्वीचे त्यांचे चित्रपट प्रेम कथानकावरच आधारित होते परंतु या चित्रपटाच्या कथानकाची त्यांनी निवड केल्यानंतर चित्रसृष्टीतील अनेक दिग्गजांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. या चित्रपटाच्या पटकथेची जबाबदारी सलीम-जावेद या जोडगोळीवर सोपविण्यात आली होती. या जोडीने १९७५ मध्ये घडलेल्या ‘चसनाला खाण दुर्घटने’ला डोळ्यासमोर ठेवून पटकथेचे लिखाण केले. या दुर्घटनेत ३७२ खाण कामगारांना जलसमाधी मिळाली होती. यश चोप्रांच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटात गाणी आणि संगीतावर विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळेच आज तीन दशकानंतरही या चित्रपटातील गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. चांगले स्टार कास्ट, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कथानक आणि सुरेल संगीत या सर्वांचा उत्कृष्ट मिलाप झाल्याने अपेक्षेपेक्षा जास्त यश या चित्रपटाला मिळाले होते. सुरुवातीला शत्रुघ्नसिन्हा ही भूमिका करण्यास राजी नव्हते. पण त्यांनी ही भूमिका स्वीकारली अन त्यातले त्यांचे संवाद देखील हिट झाले.

प्रेम या विषयावर विविध कोनांतून पाहणारे चित्रपट ही यश चोप्रा यांची खासियत मानली गेली. परंतु, आपल्या कारकिर्दीत त्यांनी ‘काला पत्थर’ हा वेगळा चित्रपट केला आणि फारसा चालला नसला तरी हा चित्रपट ‘यश चोप्रा क्लासिक’ म्हणून गणला जातो. मागच्या वर्षी कोळसा खाणींच्या कथेवर आधारित आलेला 'गुंडे' हा सिनेमा त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याशी लेखक-दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी कथानक व पटकथा याबाबत चर्चा करून मंजुर करून घेतला होता. वास्तव स्थळी हा चित्रपट चित्रित करण्याची इच्छा त्या वेळी यश चोप्रा यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर कोळसा खाणी, कोळसा माफिया, तिथली परिस्थिती यांतील अनेक बारकावेही यशजींनी दिग्दर्शकाला सांगितले होते. या चित्रपटाची चित्रीकरणाची प्रक्रिया यश चोप्रा यांच्या निधनानंतरच सुरू झाली होती. ‘गुंडे’ हा कोळसा माफिया या विषयावरचा सिनेमा होता पण संकल्पना, चित्रीकरण स्थळनिश्चिती आणि गोष्ट या पातळीवरचा यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट म्हणता येईल. 'काला पत्थर' हा त्यांचा शैलीबाह्य सिनेमा होता अन 'गुंडे' हा लौकिक अर्थाने शेवटचा होता, पण दोन्ही सिनेमाची पार्श्वभूमी एकच होती.

काला पत्थरला इतर यशराज सिनेमांसारखे छप्परफाड यश न मिळाल्यामुळेच की काय यश चोप्रांनी असं हटके पाऊल पुन्हा हयातीत टाकले नाही. ज्या दुर्घटनेवर आधारित हा सिनेमा होता तिला आता ४० वर्षे झालीत. या दुर्घटनेत २६ डिसेंबर १९७५ ला बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले होते. काला पत्थरमधेही शेवटी मंगलसिंह सह अनेक कामगार पाण्यात बुडून मरतात असाच क्लायमॅक्स होता !

जुन्या आठवणींचा उजाळा कधी कधी एकाच वेळी सुखाचाही असतो पण त्याला अशी दुःखाची झालरही असते….

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in

kala1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. शिवाय ह्या आठवड्यात मराठी जालविश्वात वाचायला बरे फार कमी सापडते. म्हणून पेषल धन्यवाद. एक रास्ता है जिंदगी गाणे मस्त आहे. चित्रपट आला त्यानंतर काही वर्शांनी माझ्याकडे ह्याचे एको टाइप रेकॉर्डिंग होते. ऐसा गजब नही ढाना पिया जब जाना विदेसवा रे ह्या ठेकेदार इंटरल्यूड च्या आधी चार वेळा घुंगरू वाजते ते मस्त आहे. त्यात हिरू बाइक वरून जाताना गाणे म्हणतो म्हणून ते आमचे ही स्कूटर वरून भटकताना म्हणायचे फेवरिट गाणे आहे.

बाहोंमे तेरे मस्तिके ढेरे. गाणे रोम्हांटिक सुरेख आहे. त्यात परवीन बाबी. अहाहा. पण मराठी मनाला ते ढेरे वगिअरे काहीतरीच वाटायचे. डेरे असेल कदाचित.

धूम मची धूम पण छान आहे नीतू सिंग चूडियां विकत असते व सर्व फिल्मी पद्धतीने नाचतात ते.

राखी व अमिताभ ची रिलेशन शिप चांगली दाखिवली आहे. चासनाला दुर्घटने बद्दल प्रत्यक्ष वाचले व न्यूज टीव्हीवर पाहिली आहे. असे विषय फारसे हाताळले जात नाहीत. ह्यातला खाण मालक फारच वाइट
दुर्जन दाखवला आहे . बघूनच राग येतो.

आज घरी जाउन गाणे ऐकेन.

{{{ यश चोप्रा यांनी ‘काला पत्थर’ या चित्रपटाची निर्मिती केली. यापूर्वीचे त्यांचे चित्रपट प्रेम कथानकावरच आधारित होते }}}

असहमत.

काला पत्थर च्या आधी त्यांनी जे दहा चित्रपट दिग्दर्शित केले त्यापैकी धुल का फूल, वक्त, आदमी और इन्सान हे सामाजिक विषयांवरचे, इत्तेफाक हा रहस्यपट, जोशीला ही सूडकथा, तर दीवार ही सामाजिक सूडकथा आणि त्रिशूल ही कौटुंबिक सूडकथा म्हणता येईल. काला पत्थर पूर्वी त्यांनी खर्‍या अर्थाने प्रेमपट म्हणता येईल असे दाग आणि कभी कभी हे दोनच चित्रपट दिग्दर्शित केलेत. अर्थात पुढे काळ बदलल्यावर चांदनी, लम्हे, दिल तो पागल है, वीर झारा, इ. प्रेमपटांचे दिग्दर्शक व अनेक प्रेमपटांचे निर्माते अशीच स्वतःची ओळख बनविली.

काला पत्थर माझा अत्यंत आवडता सिनेमा.
बर्‍याच सिनेमांत काही पात्रं अगदी नसती तरी काही फरक पडला नसता अशी अवस्था असते, पण काही सिनेमे असे असतात ज्यातलं एकही पात्र अनाठायी वाटत नाही, त्यातलाच हा एक. (दुसरा शोले)
सर्वात आवडला तो अमिताभ बच्चन. स्वतःच्या कृत्याबद्दल स्वतःला जबर शिक्षा करणारं पात्र त्याने व्यवस्थित उभारलं आहे. त्याच्या पायाला मार लागल्यावर जेव्हा राखी त्याचे उपचार करत असते तो सिन अक्षरशः काटा आणतो अंगावर. कारण (नडगी) पायाचा भाग हा संपूर्ण सोलवटलेला असतो, माझ्या मते शरिराचा तो भाग अतिशय सेन्सिटिव्ह आणि दुखरा असतो, पण कोणत्याही भूलीशिवाय तो त्यावर उपचार करून घेतो. स्वतःला त्रास करून घेण्याचा एकही प्रकार सोडत नाही. शिवाय सिनेमात मला तरी तो एकदाही हसताना दिसलेला नाही.

अमिताभ इज ग्रेट.

छान लेख! आवडता सिनेमा आहे. फार पूर्वी पाहिला होता. नंतर अनिल बर्वेंची `अकरा कोट गॅलन पाणी' वाचताना याची आठवण झाली होती.

दक्षिणा, तुम्ही अगदी माझ्या मनातलं लिहिलंत. तो सीन अक्षरशः माझ्या स्मृतीत कोरला गेलाय. अमिताभ भूल घेत नाही आणि राखी त्याला इंग्रजीमधून ओरडते, त्यावर अमिताभ सुद्धा तिच्यावर इंग्रजीमधून उसळतो. तेव्हा राखीच नाही तर आपणही एकदम स्तब्ध होऊन जातो. कि अरे! हे तर काही वेगळेच प्रकरण दिसतेय. मला 'काला पत्थर' म्हटले कि हाच सीन डोळ्यासमोर उभा रहातो.

आवडला लेख. काला पत्थर माझ्या "कधीही आणि कितीही वेळा बघताना कंटाळा येत नाही" कॅटेगरी मधे आहे. अमिताभ आणि शत्रू, अमिताभ आणि शरत सक्सेना यांची खुन्नस जबरी आहेत त्यात. बच्चन च्या टॉप ५ रोल्स पैकी आहे माझ्या दृष्टीने.

सलीम जावेद च्या स्क्रिप्ट्स मधे अमिताभला भाव असला, तरी इतरांनाही महत्त्वाचे सीन्स किंवा संवाद दिलेले असत. त्यामुळे एकूण चित्रपटाची लेव्हल उचलली जात असेल. दीवार, त्रिशूल, कभी कभी ई. चित्रपटांत शशी कपूर व काला पत्थर मधे शशी आणि शत्रू दोघांनाही चांगले फुटेज आहे.

इथे वरती शत्रुघ्न चे जे सीन्स आहेत ते त्याच्या "कधीही हारणार नाही, कोणीही अडवून ठेवू शकत नाही" व्यक्तिरेखेचे बिल्ड-अप सीन्स आहेत - क्लायमॅक्स ला जे होते त्याचा इफेक्ट पूर्ण यावा म्हणून. खाणीत तो पहिल्यांदा येतो तेव्हाचाही संवाद आठवा.

माझे सर्वात फेवरिट सीन्स यातले:
१. बच्चन-शत्रुघ्न- कॅण्टीन मधली खुन्नस. एकदा सिगरेट व एकदा चहा वाले दोन्ही सीन्स.
२. बच्चन-शत्रुघ्न- ट्रक मधला खुन्नस सीन
३. बच्चन-शरत सक्सेना - "धन्ना, आज तू जान से गया"
४. शशी-परवीन - "कोयला दो तरह का होता है" वाला शशी चा पूर्ण मोनोलॉग
५. शत्रुघ्न चा वरती लिहीलेला "तीसरे बादशाह हम" वाला सीन
६. खाणकामगारांच्या रूटीन चे बॅकग्राउण्डला दिसणारे विविध सीन्स
७. तेव्हाच्या चित्रपटांत नेहमी दिसणारी मजदूर् लोकांबद्दलचा "नयी सुबह" वाला आशावाद जो सलीम जावेद च्या लेखणीतून व साहिर लुधियानवीच्या गाण्यांतून (धूम मचे धूम) सहज दिसतो.
८. अमिताभचे अन-ग्लॅमरस सीन्स - पायर्‍यांवर किंवा त्या कॅण्टीन च्या बाकड्यावर बसून नीतू सिंग, राखी व इतरांशी सहज मारलेल्या गप्पा.

हा चित्रपट म्हणजे खाणकामगारांचे प्रश्न उपस्थित करणारी आर्ट फिल्म नव्हे. तसा कमर्शियलच होता - व त्याकाळच्या कमर्शियल सिनेमांमधे दिसणार्‍या ठळक उणीवा ही आहेत - प्रेम चोप्राचे कॅरेक्टर अगदी सहज सोपे व्हिलन केलेले आहे अजिबात कसलीही माणूसकी नसलेले. प्रत्यक्षात यापेक्षा बरेच न्युआन्सेस असतात उद्योगपती व कामगार यातील संबंधात. पण ते त्या लेव्हलला दाखवणे हा चित्रपटाचा उद्देश नसावा.

हा तेव्हा का चालला नाही हे एक आश्चर्यच आहे. "ग्रिम्/सिरीयस" लूक हे कारण असेल.

फारेन्डा सुरेख पोस्ट, तु म्हणतोस तसं चित्रपटाचा सिरियस लूक चित्रपटाच्या अपयशाला कारणीभूत झाला असावा. मला चित्रपटाचं साल नक्की नाही आठवत. पण बहुधा त्या काळात अमिताभ अशा भुमिका नव्हता करत, आणि त्यामुळे वेगळ्या भुमिकेत लोकांनी स्विकारला नाही त्याला.

मस्त लेख आहे.
फारएण्डची पोस्ट पण मस्त. माझ्यासाठीही हा 'कधीही आणी कितीही वेळा बघू शकण्याच्या' कॅटॅगरीत.
बच्चन आणी शत्रुचे खुन्नसवाले सीन जबरी आहेत एकदम.

हा चित्रपट चालला नाही हे खरे नाही. अगदी धो धो नसेल पण त्याने त्या वेळच्या यशाच्या परिभाषेत सिल्वर जुबीली केली होती.

माझ्यासाठीही हा 'कधीही आणी कितीही वेळा बघू शकण्याच्या' कॅटॅगरीत.
>>> माझ्यासाठी पण.

अमिताभचा हा वन ऑफ द बेस्ट रोल म्हणायला हवा. प्रचंड ताकदीनं लिहिलेलं कॅरेक्टर आनि ते त्यानं तितक्याच ताकदीनं उभं केलंय.

छान लेख. काला पत्थर कधीही बघताना कंटाळा येत नाही. खरंतर चित्रपटाची कथा एका लईत सुरू राहते. आणि शेवटाला कथानक एकदम वेग पकडतो. आता काय होणार याची प्रेक्षकांना उत्सकुता लागून राहते.

तिसरे बादशहावाला सीन तर नेहमीच लक्षात राहणारा. त्यातही शत्रुघ्न सिन्हा जेव्हा त्याच्या खर्ज्यातल्या आवाजात बोलतो, "मेरे ताशके तिरपनवे पत्ते......" ते खुप आवडते.

एक सीन जेव्हा शेवटी लिफ्टमध्ये चारच जण जाऊ शकत असतात आणि पाच जण असतात तेव्हा मॅकमोहन पत्ते वाटतो. पहिल्या तिघांना मोठे पत्ते येतात आणि चौथ्याला तिरी येते तेव्हा तो मॅकमोहनवर आरोप करतो की मला माहित होते की तू मला जाणूनबुजून छोटे पान दिलेस तू पत्ते लावतोस. तेव्हा मॅकमोहन त्याला म्हणतो की, "मेरे दोस्त ताशका सबसे छोटा पत्ता तिया नही दुरी है." आणि मॅकमोहनकडे तेव्हा दुरी असते.

१९७८ व १९७९ हा अमिताभच्या सुपरस्टार म्हणून जो कालावधी होता त्याचे पीक असेल. मी असे ऐकले आहे की मुंबईत त्या वर्षी एकाच वेळेस बर्‍यापैकी जवळच्या ८-९ थिएटर्स मधे अमिताभचे पिक्चर्स चालू होते आणि जवळजवळ सगळे हिट होते.

त्याची "फिल्मोग्राफी" पाहिली तर या दोन वर्षांत डॉन, त्रिशूल, कस्मे वादे, मि. नटवरलाल, जुर्माना, मंजिल, सुहाग आणि यातील सर्वात मोठा हिट मुकद्दर का सिकंदर आले आणि यातले अनेक पिक्चर्स बरेच आठवडे चालले.

बहुधा या गर्दीत आलेले काला पत्थर आणि द ग्रेट गॅम्बलर तुलनेने चालले नाहीत. काला पत्थर बद्दल वरती चर्चा झालीच आहे. पण ग्रेट गॅम्बलर मी एकदाच पाहिला आहे टीव्हीवर कधीतरी आणि तो तेव्हा टाइमपास वाटला होता.

द ग्रेट गॅम्बलर अ‍ॅक्चुली चांगला आहे. लक्षपुर्वक पाहिला तर मनोरंजनमुल्य जबरदस्त असणारा सिनेमा आहे. (थोडा समजायला कॉम्प्लिकेटेड, तेव्हा मी लहान असेन :फिदी:) पण पहिल्यांदा पाहिला तर आवडला होता मला तरी.

{{{ मुंबईत त्या वर्षी एकाच वेळेस बर्‍यापैकी जवळच्या ८-९ थिएटर्स मधे अमिताभचे पिक्चर्स चालू होते आणि जवळजवळ सगळे हिट होते. }}}

बेशरम वगळता सारेच हिट होते. बेशरम हा एक हिडीस चित्रपट होता ज्यात देवेन वर्माने स्त्रीपात्र रंगविले होते. तसेच त्यात एके हंगलचे (अमिताभचे पिता) धोतर उतरविणे, अमजद खान (खलनायक) ने अमिताभला (नायक) निरुपा रॉय (त्याच्या आईच्या) अंगावर थुंकायला लावणे, अंध बहिणीवर बलात्कार, आईला व मुलाला भुकेल्या वाघाच्या पिंजर्‍यात टाकणे असले शिसारी आणणारे प्रसंग होते.

नशीब चांगलं की हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मुंबईत इतरत्र अमिताभचेच सात चित्रपट गर्दी खेचत होते त्यामुळे हा चित्रपट मागे पडला. जर त्यावेळी अमिताभचा दुसरा कुठला चित्रपट नसता तर हाही कदाचित सुपरहिट ठरला असता.