लोकबिरादरी आश्रम शाळेमधले लेखन

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

गेल्या वीस वर्षांत मायबोलीचा या ना त्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणार्‍या, समाजासाठी काम करणार्‍या असंख्य व्यक्तींशी, संस्थांशी अतिशय जवळचा संबंध आला. ’महारोगी सेवा समिती’ ही संस्था त्यांपैकीच एक.

आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प (हेमलकसा), आमटे कुटुंबीय आणि तिथे कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते यांच्याबद्दल मायबोली.कॉमला आणि मायबोलीकरांना अतीव आदर आणि आत्मीयता आहे.

आज एकविसाव्या वर्षात पदार्पण करताना मायबोली.कॉम हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पाबरोबरचं नातं अधिक दृढ करणार आहे. ’मायबोली’नं लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेला रंगीबेरंगी विभागातलं पान भेट दिलं आहे. ’लोकबिरादरी आश्रम शाळा’ (दुवा लवकरच देऊ) या पानावर यापुढे हेमलकशाच्या लोकबिरादरी आश्रम शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या विषयांवर लिहिणार आहेत.

आमटे कुटुंबीय आणि लोकबिरादरी आश्रमशाळेतले शिक्षक श्री. मिथिल कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन तिथल्या विद्यार्थ्यांना नियमितपणे मराठीत लिहितं करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी ही या मुलांची मातृभाषा नाही. पण तरीही ही मुलं अतिशय ओघवत्या मराठीतून व्यक्त होतात. आपले विचार अत्यंत ठाम आणि परिपक्व भाषेत मांडतात. लवकरच हेमलकशाला शिकणार्‍या मुलांचं लेखन मायबोलीकरांना त्यांच्या रंगीबेरंगी पानावर वाचायला मिळेल. मायबोलीकर या लेखनाचं स्वागत करतील, मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतील याची खात्री आहे.

आमटे कुटुंबीय आणि आनंदवन व हेमलकसा इथले कार्यकर्ते यांच्या फार मोठ्या कामात मायबोली.कॉमला खारीचा वाटा उचलता येतोय, याचं आज एकविसाव्या वर्षात पदार्पण करताना समाधान आहे.

प्रकार: