केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग २

Submitted by पद्मावति on 4 September, 2016 - 14:15

सकाळी उठून खिडकीच्या बाहेर बघितलं तर हवा छान वाटली. ब्रेकफास्ट रूम मधे खाली गेलो तर अरसुला तिच्या दोन सहायकांबरोबर स्वत: एप्रन बांधून कामे करत होती. हाताने कामे आणि तोंडाने अखंड गप्पा...

चार पिढ्यांपुर्वी तिचे कुटुंब स्वित्झर्लंड मधून केप टाउन मधे स्थायिक झाले. रक्ताने स्विस असली तरी मनाने ती पक्की साऊथ आफ्रिकन आहे. काहीही गोंधळ झाला, प्रॉब्लेम आला तरी रिलॅक्स..यू आर इन केप टाउन. टॅक्सी यायला उशीर होतोय...रिलॅक्स, आज हवामान चांगलं असेल का नाही, कार रेंटल वाला फोनच करत नाहीये, ब्रेकफास्ट जरा जास्तंच आरामात बनतोय....सगळ्याला उत्तर...रिलॅक्स...!!!

आम्हाला सांगत होती की ती स्विट्ज़र्लॅंडला फारशी जात नाही, तिला आवडत नाही तिथे. ती शिस्त, काटेकोर हिशोबाने चालणार्या ट्रेन्स्, बसेस... नको वाटतंं म्ह्णाली. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर '' चार दिवसातच वैताग येतो गं , काय ते मिनिटा सेकंदाला बांधून चालणं, काय ते रूल्स, नियम. आय जस्ट गेट फेड अप अँड वॉंट टू फ्लाय बॅक होम.....

येथील सगळ्याच लोकांना आपल्या या शहराचं अतिशय प्रेम आणि अभिमान आहे. कुठलाही माणूस म्हणजे गौरवर्णीय सुद्धा मी मुळचा स्विस आहे का ब्रिटीश आहे का जर्मन असे कधी बोलतांना मला दिसला नाही. मी साऊथ आफ्रिकन आहे हेच नेहमी सांगणार. पण आता दुर्दैवाने हळू हळू परीस्थती बदलतेय. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गोरे आणि कृष्णवर्णीय यांच्यामधे असंतोष वाढत चाललाय हे जाणवतं. याचं एक कारण या दोन समाजांमधली असलेली आर्थिक दरी हेही आहे. आम्हाला तरी असे आढळले की बहुतेक करून सगळे बेड अँड ब्रेकफस्ट, हॉटेल्स, रेस्टोरेंट्स, वाइनरीस ही सगळी गौरवर्णियांच्या मालकीची आहेत. जेवायला गेलो तरी गर्दी स्थानिकांपेक्षा जास्ती टूरिस्ट्सची. गुन्हेगारीचं प्रमाण बरंच आहे असेही ऐकलं. आमच्या सुदैवाने मात्र आम्हाला कधीच असुरक्षितता अशी वाटली नाही.

नाश्ता आटोपल्यावर टेबल माउंटन कडे निघालो. जाता जाता माउंटन कडे बघितले तर ढगांचा पडदा ज्याला इकडचे लोक टेबल क्लोथ म्हणतात तो नव्हता त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. गाड्या, बसेस, टॅक्सी केबल कार स्टेशन पर्यंत आपल्याला घेऊन जातात. हॉप ऑन हॉप ऑफ बसेस पण तिथपर्यन्त जातात. हा डोंगर शहरातच असल्यामुळे जाण्या येण्यात फार काही वेळ जात नाही. जातांनाचा रस्ताही मोठा सुरेख आहे.

केबल कार स्टेशन ला मात्र गर्दी खूप असते. दुपारच्या वेळी थोडीफार कमी गर्दी असते असे म्हणतात. केबल कार चे तिकीट घ्यायला खूप मोठी रांग होती. जे लोकं ऑनलाइन तिकीट काढतात ते थेट केबल कार च्या रांगेत जाऊ शकतात. आम्ही तिकिटे काढली नसल्यामुळे आम्हाला आधी तिकिटांच्या रांगेत उभे राहणं भाग होतं. पण तेथील शिस्त आणि नियोजन उत्तम होतं त्यामुळे रांग लांब जरी असली तरी पुढे सरकत होती. आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आणि हवा छान असल्यामुळे अजिबात कंटाळा येत नव्हता. तिकीट घेऊन पुन्हा केबल कार मधे चढे पर्यंत पुन्हा नागमोडी वळणे असलेली भलीमोठी रांग.

एक आहे मात्र या शहरात किंवा एकूणच या देशात आम्हाला लोक अतिशय आनंदी आणि नम्र वाटले. विमानतळे असो, टूर कंपनी चे लोक असु द्या, रेस्टौरेन्ट्स, दुकानं, सार्वजनिक ठीकाणे असोत की अशा साईट सीयिंग च्या जागी असलेले कर्मचारी असो सगळे खूप चांगले आणि मदतीला तत्पर असे होते. मुख्य म्हणजे इतक्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा नियोजन आणि सोयी अगदी उत्तम. तसेच सार्वजनिक स्वच्छताही खूप चांगली होती.

२०१२ मधे जगातील सात नैसर्गिक आश्चर्यापैकी एक म्हणून टेबल माउंटनची निवड करण्यात आली. स्थानिक रहिवासी याला माउंटन ऑफ द सी म्हणायचे. १५०३ मधे पहिल्या युरोपियन दर्यावर्दीने या डोंगरावर पाउल ठेवले आणि या डोंगराचा सपाट माथा पाहून त्याने याला टेबलाची उपमा दिली. याचं पठार जवळजवळ तीन किलोमीटर सपाट पसरलं आहे. इथे ऊभे राहीले की एका बाजूने डेविल्स पीक आणि दुसर्या बाजूने लायन्स हेड अशा दोन डोंगरांचे मोठे सुंदर दर्शन होते. डोंगराच्या कडा सरळसोट खाली ऊफाणणार्या अटलांटिक सागरात कोसळतात.

tm14.jpgtm5.jpg

टेबल माउंटन ला वरती काही जण हाइक करतही जातात पण बहुतेक लोक मात्र या केबल कार्स चा पर्याय घेतात.
एका कार मधे जवळपास पन्नास लोकं आरामात उभे राहू शकतात. अतिशय हळूवार पणे गोल फिरवत ही केबल कार आपल्याला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. खरंतर मला उंचीवरुन खाली पाहायला नको वाटतं. पण या केबल कार मधे मात्र मी भीती बीती साफ विसरून मंत्रमुग्ध झाल्यासारखी बाहेर पाहात होते. जमीनीवरुन क्षणार्धात उचलून ही केबल कार आपल्याला डोंगराच्या सरळसोट कडेवरून सरसरत वरती घेऊन जात असते आणि समोर खाली पसरलेला असतो नीळाशार, शुभ्र फेसाळत्या लाटांचा समुद्र.......

tm.jpgtm8.jpgtm7.jpg

वरती खालच्या पेक्षा तापमान बरंच कमी असतं आणि वाराही खूप असतो त्यामुळे एक जॅकेट नेहमी बरोबर ठेवावं. सर्व जागी चालायला आखून दिलेले मार्ग आहेत. फ्री वॉकिंग टूर्स पण असतात. या टूर्स मधे इथे आढळणार्‍या वनस्पती, झुडुपे, फूले आणि वन्यजीवना बाबत खूप चांगली माहिती दिली जाते. काही विशिष्ठ प्रकारच्या वनस्पती तर जगात फक्त याच डोंगरावर बघायला मिळतात. इथल्या खडक, दगडांवरून असा निष्कर्ष केला जातो की टेबल माउंटन हा सहाशे मिलियन वर्षे जुना आहे.

फिरतांना वेळेचं भान अजिबात राहात नाही. भन्नाट वारा, आजूबाजूच्या पर्वत रांगा, स्वच्छ सुंदर आकाश, खाली पाहिल्यास दिसणारं, डोंगराने आणि समुद्राने अर्ध गोलाकार वेढलेलं केप टाउन एखाद्या खोलगट बशीत सूबकपणे रचून ठेवल्यासारखं दिसतं....म्हणून याला सिटी बोल असेही म्हणतात.

tm13.jpg

वरती कॅफे आणि एक छोटंसं गिफ्ट शॉप पण आहे. टेबल माउंटन च्या वरती आजूबाजूचा निसर्ग पाहात आरामात लंच करणे अगदी मस्तं वाटतं.
चालतांना पठार सोपं आहे. रस्ते आखलेले आणि उत्तम स्थीतीत आहेत. कडे पण व्यवस्थीत बांधले आहेत. पण तरीही चालतांना आणि मुख्य म्हणजे फोटो काढतांना आपण थोडी खबरदारी घेतलेली नेहमीच चांगली. काही अती उत्साही पर्यटक खास करून तरुण मूले फारच बेपर्वाइने वागतांना बघितले.
एक माणूस डोंगराच्या अगदी कडेला तोंडावर पुस्तक घेऊन गाढ झोपी गेला होता. एक किंचित सुद्धा धक्का लागला असता तर हा मुलगा सरळ खाली समुद्रात...स्ट्रेट ड्रॉप. चार मुलं, मुलींचा ग्रूप तिथेच काठावर बाहेरच्या बाजूने पाय सोडून बसले होते. कर्मचारी शक्यतो लक्ष ठेवून असतात पण ते सुध्द्धा किती बघणार? तो कडा उंच करावा किंवा तितक्या कडेपर्यंत कोणाला जाऊच देऊ नये असे मनाला वाटून गेले.

tm1.jpg

या ठिकाणी कितीही वेळ झाला तरी मन भरत नाहीच पण एकतर वारा आता बोचरा व्हायला लागला होता आणि दुसरे म्हणजे परतीची रांग वाढायला लागली होती म्हणून दिल मांगे प्रचंड मोअर असतांना सुध्हा केवळ नाइलाजाने आम्ही त्या रांगेत जाऊन उभे राहिलो.

निसर्गाचं हे अफाट रूप फक्त मनात आणि डोळ्यात साठवायचं, शब्दात आणि कॅमेरात त्याला बांधणे फार अवघड आहे....

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users