कात्रज ते सिंहगड : पहिला अनुभव

Submitted by खानाबदोश on 2 September, 2016 - 06:49

"आपल्यातलं कुणी आधी गेलेलं नाही, रात्रीची वेळ, रस्ता माहीत नाही, आपल्याकडे काही सामान नाही, कसं काय जमणार राव?" विकास ने सगळ्यांच्याच डोक्यात असलेला प्रश्न विचारला.

"काय नाय रे, सरळ निघायचं. कात्रज बोगद्यापासून कुठूनतरी चढतात. आणि थोडं वर गेल्याव सिंहगडावच्या टावरची लाल लाईट दिसली की चालत सुटायचं.

आणि गड्यासारखे गडी आपण चौघं... काय होत नसतय. लोकं किती वेळा जातात...

आणि सामान लागून लागून काय लागतं रे? पायात बूट आणि पाठीवर पाण्याच्या बाटल्या घेतल्या की झालं काम!"

मी माझ्यापरीने कन्विन्स करायचा नुसता आटापीटा करत होतो. कारण बऱ्याचदा सिंहगड चढून बोर झालतो. आणि वन डे ट्रेकसाठी हाच चांगला अॉप्शन होता. आमचे मराठवाडा-विदर्भातले मित्र बिचारे सिंहागड सुद्धा चढले नव्हते कधी. त्यांना डायरेक्ट k2s करायला तयार करणे म्हणजे माझ्या मुद्सद्देगिरीचा कस लागणार होता.

"अरे एकट्या दुकट्याने करण्यासारखा हा ट्रेक नाही. कुठल्यातरी गृपचं k2s चं नोटिफिकेशन आलं फेसबूकवर तर त्यांच्याबरोबर जाऊया..."
विकास प्रॕक्टिकल बोलत होता.

"हे बघ... खरं सांगू तर माझी पैसा घेऊन ट्रेक अॉर्गनाईझ करणाऱ्या कुठल्याही गृपसोबत जायची ईच्छा नाही. कारण आपण काही बाहेरचे नाही. आपले पूर्वज याच दरीखोऱ्यांतून रात्री अपरात्री नुसता ट्रेक सोडा, लढाया करायचे आणि आपल्याला फक्त या टोकापासून त्या टोकाला जायला या अॉर्गनायझर्सना पैसे द्यावे लागतात! मावळ्याचं रक्त असेल ना तर स्वतःच कुणाची मदत न घेता हे डोंगर चढून जाऊ!"

मावळ्याचं रक्त हा माझा शेवटचा पत्ता होता. एक शिलेदार तयार झाला. सुपडासिंग चौहान (ह्या अजब नावाची फार वेगळी स्टोरी आहे). जाग्यावर उठला कारण आता विषय रक्ताचा होता! मग बाकीची मंडळीही सामील झाली आणि प्लान ठरला. आज रात्री निघायचं, उद्या सकाळी पोहोचायचं.

रात्री आठ वाजता मी आणि सुपडासिंग ३-३ पाण्याच्या बाटल्या आणि शूज घालून स्वारगेटला हजर. पण बाकीचे कुणीच नव्हते. मग विकासचा फोन,

"अरे यार मला जमेल का रे एवढ्या लांब चालणं? माझी तब्येत जरा नाजूकय रे..."
त्याला परत बराचवेळ समजावलं की ऐनवेळी नको राव दगा देऊस. तो परत तयार झाला.

थोड्यावेळाने परत फोन,
" अरे माझा एक मित्र जाऊन आलेलाय तिकडे, तो म्हणतोय की दोघं तिघं नका जाऊ...आणि माहिती असलेला कुणीतरी घेऊन जा..."
परत त्याला समजावत बसलो. परत तो तयार झाला.

आणि परत त्याचा फोन आला, "अरे माझा मित्र म्हणे की त्या भागात बिबट्या फिरतोय त्यामुळे पोलिस जाऊ देत नाहीत सध्या..."
मी आता समजावून थकलो होतो. त्याला म्हणलं 'बरं जाऊदे बघू परत कधीतरी.'

आता सुपडासिंगकडे वळलो. तोही एवढी तयारी करून आलोय आणि परत जावं लागणार म्हणून वैतागला होता. त्याच्याकडे बघत म्हणलं, "जाऊया काय दोघंच?"

त्यानी फक्त एक क्षण विचार केला आणि म्हणाला,"चल".

मी एकदम खुश. चलो, चार नही तो दो सही. स्वारगेटवरून कोंढाणपूरची बस पकडली. आमचा अवतार पाहून सगळ्या 'कोंढाणपूरकरांना' समजलं की पोरं सिंहगडाला चाल्ल्यात. बस निघाली. जवळपास सगळी लोकं एकमेकांना ओळखत होती. एक मध्यमवयीन गृहस्थ आमच्यामागे बसले होते.

त्यांनी विचारलं, "कुठं निघालाय?" आणि नारंगीचा भपकारा आमच्या तोंडावर आला.

"सिंहगड", मोघम बोलून मी पुढे वळलो.

"दोघंच?"

"हो".

आमच्या सुपडासिंगनी त्याला विचारलं, "काही प्रॉब्लेम नाही ना दोघांनी जायला? आम्ही असं ऐकलं की बिबट्या फिरतोय..."

"काय नाय होणार... फक्त जिगर पायजे जिगर..."

मी दुर्लक्ष देत असलो तरी आपल्यात जिगर आहे असं वाटून उगाचच जरा ताठ होऊन बसलो. कंडक्टर नवीन होता. आम्ही बोगद्यापुढे थांबवा म्हणल्यावर त्याला कुठल्या स्टॉपचं तिकीट देऊ ते कळेना. मग आमच्या मागच्या-पुढच्या कोंढाणपूरकरांनी त्याला मदत केली. एव्हाना गाडी घाटाला लागली होती. चंद्र अर्धाच होता त्यामुळे उजेडही खास नव्हता. जसं जसं डोंगर, झाडी वाढायला लागली तसं तसं आमच्या मित्राच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. बोगदा संपला आणि आम्ही उतरलो. उतरल्यावर समोरचे एक आजोबा खिडकीतून म्हाणाले ,"पोरांनो दोघंचय का?"

आम्ही म्हटलं हो.

"बॕटरी हाय ना?" आम्ही म्हणलो "आहे काका"

"बर बर, जा सुरक्षित."

जशी बस पुढे निघाली, आमचे 'टाईट' मित्र ऊभा राहून जोरात म्हाणाले, "पोहोचा रे व्यवस्थित..."

आम्ही त्यांना हात हालवत गुडबाय केला. रात्रीचे बरोबर १० वाजले होते. मला वाटत होतं की लोक किती चांगले आहेत ह्या गावचे. आणि असही वाटत होतं की आपण खरंच काहीतरी विचित्र करतोय आणि लोकांना आपली काळजी वाटतेय का काय! पण सामोरचा चंद्रप्रकाशात अंधूकसा दिसणारा भव्य सह्याद्री पाहून सगळं विसारलो.

आता प्रश्न, डावीडून चढायचं का उजवीकडून? सिंहगड कुठल्या दिशेला असेल?

"हे इकडे कात्रज, त्या दिशेला सिंहगड रोड. मग त्या तिकडे असावा किल्ला."

"कात्रज तिकडेच कशावरून? घाटात किती वळणं झाली. आत्ता आपण कुठे तोंड करून आहोत काय माहिती?" सुपडा.

मग मी माझंच घोड दामटत म्हणलं
"आपण उजवीकडून वर जाऊ, सिंहगडाची लाल लाईट कुठे दिसते बघू, त्यावरून ठरवू". तो तयार झाला.

मग आम्ही सरळ काट्याकुट्यातनं वर शिरलो, थोडं पुढं गेल्यावर ढोरवाटा चालू झाल्या. चालत चालत वर गेल्यावर आम्हाला वाघजाईचं मंदिर लागलं. तिथून जरा पुढे गेल्यावार आम्हाला पुणे शहराचा झगमगाट दिसू लागला. डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखी रोशनाई होती. पण सिंहगड काही अजून दिसत नव्हता.

रूळलेली वाट होती. आम्ही त्यावारून चालत चालत बरेच पुढे आलो. मग आम्हाला पुणे बँगलोर हायवे दिसला पण सिंहगडाची लाईट काही दिसेना. आणि आमच्या लक्षात आलं की आम्ही भलतीकडेच आलोय! पण परत मागे जाऊन वाट शोधण्याची इच्छा नव्हती. जोरात वारं सुटलं होतं. आम्ही जरा बसलो. थोडं पाणी पिलं. लांब कुठेतरी सैराटची गाणी डिजे वर वाजत होती. मुंबईच्या दिशेला ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. सुपडाला म्हणलं असच तिरकं तिरकं खाली उतरू आणि समोरचा जरासा उंच डोंगर आहे तो चढू. तिथूनही लाईट दिसली नाही तर हायवेवर उतरून माघारी जाऊ. तो म्हणाला ठिकय. मग आमचं उतरणं चालू झालं. जाळलेलं गवत होत आणि खरबुडी माती होती. बूट काही टिकत न्हवता. तसचं खरचटत आपटत उतरलो आणि पुढचा डोंगर चढू लागलो. एव्हाना आम्ही नवीन कात्रज बोगद्याच्या पुण्याच्या दिशेच्या तोंडाजवळ पोहोचलो. आणि तसचं पुढचा डोंगर चढू लागलो. पहिल्यांदाच ट्रेकिंगला आलेला सुपडा धापा तर टाकतच होता पण त्यात रस्ता चुकल्यामुळे दोघांचाही मूड अॉफ झालता. आणि त्याच वेळी ढगांमधून अंधूकशी सिंहगडाची लाल लाईट दिसली आणि आमच्या जीवात जीव आला. आता कितीही चुकलो तरी लाल लाईटला फॉलो करत आपण आज ना उद्या पोहचू असा विश्वास वाटू लागला.

डाव्या हाताला टेकड्यांची रांग ठेऊनआम्ही त्या पूर्ण न चढता बाजूने वळसे घालत जात होतो. गुरांच्या वाटांमुळे फारसं अडत न्हवतं. पण अजून आम्हाला प्रॉपर रस्ता सापडला न्हवता. आता पुणे मागं पडलं होत. फक्त पानांचा सळसळ आवाज आणि मधे मधे गवतातून खुसफूस ऐकू यायची. आम्ही त्या भयाण सन्नाट्यात दोघंच पाला पाचोळा तुडवत चालत होतो. चंद्र असला तरी टॉर्चची गरज लागत होती. सहा वर्ष झाले ती माझ्या जुन्या सामानात होती. मला माहिती होतं सेल संपू शकतात पण मी नवीन सेल घ्यायला विसारलो होतो. मधूनचं झाडात खुट्ट व्हायचं आणि आम्ही जाग्यावर स्तब्ध उभे राहून आवाजाचा कानोसा घ्यायचो. तेव्हा सगळी इंद्रिये त्यांच्या पूर्ण क्षमतेने धोक्याचा अंदाज घ्यायची. मग असेल एखादा ससा म्हणून आम्ही पुढे चालायचो.

बराच वेळ चालत होतो तरी अजून १५ टक्केच झालय असं वाटत होतं. लाल दिवा होता तेवढ्याच अंतरावर होता! एकमेकाला धीर देत, होईल होईल म्हणतं तसच पुढे जात राहीलो. आचानक झाडांतून भांड्यांचा आवाज आला. पुन्हा आम्ही स्तब्ध. अंधारात नीट पाहिले तर जरा वर एक घर होतं लाईट वगैरे काहीच दिसत नव्हती. पण माणूस असल्याचा बारीक आवाज येत होता. कुणी बांधलं असेल बाबा ह्या जंगलात घर? असेल आपल्यासारखाच येडा म्हणत आम्ही पुढे चालू लागलो. थोड पुढे पुन्हा झाडांच्या जाळीत खुसफूस ऐकू आली. जरा मोठा आवाज होता म्हणून आम्ही आपलं सुरक्षितता म्हणून दगड हातात घेऊन जरा लांबूनच पुढे गेलो. झाडं आता गर्द झाली होती. अर्धवट प्रकाशात ठेचकाळत चालत होतो. आणि आचानक माझ्या पायाखालच्या दगडातून फर्रर्रर्रर्र.. आवज करत काहीतरी उडालं. त्या भयाण वातावरणात अचानक झालेल्या आवाजानं माझं पाणी पाणी झालं. पण नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ती रानकोंबडी किंवा अडई होती. बिचारी तीही माझ्याइतकीच घाबरली असेल असा विचार करून पुढे निघालो.

थोड्या वेळाने आम्ही वाळलेल्या झाडाच्या दोन काठ्या मोडल्या. केवढा आवाज झाला! आता जरा काठीने चालायला मजा येत होती. पण गुरांच्या वाटा माथ्यावर काही जात नव्हत्या. प्रत्येक टेकडीला वळसा मारत बसलो तर उद्या पण पोहोचायचो नाय, असा विचार करून आम्ही सरळ माथ्यावर जायचं ठरवलं. मग ती दाट झाडी चिरत आम्ही चढू लागलो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या काट्यांनी हातावर नक्षी काढली होती. टि शर्टही फाटला होता. पण वर आलो आणि आम्हाला कात्रज-सिंहगडची मुख्य वाट सापडली. कोणाला ओरडून सांगू इतका आनंद झालता आम्हाला दोघांना. मग जरा बसलो. पाण्याने घसा ओला केला. आता आम्हाला दिसलं की सगळ्या टेकड्यांच्या वरूनच ही वाट आली होती आणि पुढेही टेकड्यांच्या माथ्यावरूनच जात होती. वळसा घालून जाण्यात जरा चढणं कमी होतं पण अंतर बरच होत. एव्हाना २ वाजले होते आणि आम्ही ३०% पुढे आलतो. त्याही टेकडीवर मला मित्राचा फोन आला. फुल रेंज होती! मग तिथे आम्ही डबा उघडला. चपाती आणि कोबीची भाजी आणली होती. अजून बरेच पदार्थ येणार होते पण ते घेऊन येणारे मित्रच आले नाहीत! मी मात्र फक्त पाणी पिलं. कारण जेवल्यावर चढणं जड जाईल असा विचार मी केला होता. जेवण संपवून परत निघालो. आता जरा झपाझप पावले उचलत होतो. टेकड्या उतरताना दोनदा घसरून आपटलो. काठीने चढताना बरीच मदत होत होती.

पहिल्यांदा ट्रेकिंगला आलेला सुपडासिंग जेवल्यामुळे दमत होता. ४-५ टेकड्या राहिल्या होत्या. परंतु एक टेकडी चढून गेल्यावर दिसलं ४-५ नाही, अजून बऱ्याच टेकड्या शिल्लक आहेत. मग मात्र तो बसला. म्हणला आपण काही पोहोचणार नाही. हे जे खाली गाव दिसतय तिथेच मुक्काम करू. त्याला म्हणलं एक तर खाली उतरायला परत अंधारात रस्ता शोधावा लागेल. आणि आरामच करायचाय तर इथेच थांब थोडावेळ. फ्रेश वाटलं की निघू. मी त्याला जास्त फोर्स करत नव्हतो. कारण तो आलाय हेच माझ्यासाठी भरपूर होतं. पण तो पुन्हा उठला आणि चालू लागला. दम लागला की थांबायचा. पुन्हा निघायचा. परंतु भरपूर वेळा थांबल्यामुळे त्याला आता काही चालू वाटेना. तरी ढकलत ढकलत अजून पुढे आणला.

आता फक्त तीन टेकड्या दिसत होत्या पण फार चढण होती. पहिली टेकडी अर्धी चढलो असेल हा भाऊ माझ्यावर उसळला. म्हणला मी काही इथूनपुढे चढू शकत नाही. आणि तिथेच झोपला. त्याला बाबापुता करत उठवलं. म्हणलं वर जाऊन झोपू. वारं पण असेल आणि एवढी झाडीपण नसेल. मग हळूहळू आम्ही माथ्यावर पोहोचलो. आता फक्त दोन टेकड्या उरल्या होत्या. पण आम्ही तिथेच एका दगडाला टेकून बसलो. हा तर लगेच घोरायला लागला. मी बुट काढून बुटातली माती काढत बसलो. मस्त शांतता होती. आकाशात फार छान तारे दिसत होते. मनात कसलिच चिंता नव्हती. रोजच्या आयुष्यातील थातूर-मातूर अडचणी तर नुसत्या डोंगराच्या वाऱ्याने उडून जात होत्या. एकांत होता. वाटत होतं की असंच भटकत रहावं आयुष्यभर! त्या चांदण्यात माझा मूड एकदम फ्रेश झाला होता. १५ मिनिटांनी तो उठला आणि आम्ही चालू लागलो. दुसरी टेकडी चढतानाही कस निघाला. आता साडेचार वाजले होते. खालचं कोंढाणपूर जाग होत होतं.

आम्ही दुसरी टेकडी उतरताना आमची बॕटरी बंद पडली. आणि एव्हाना चंद्रही डोंगराआड गेलता. काळाबुडूक अंधार पडला. मग मात्र आम्ही तिथेच पहाटेच्या सूर्यप्रकाशाची वाट पाहत बसलो. माझा तिथे जरा डोळा लागला. पण दहाच मिनिटांत उठलो, पहातो तर काय सगळीकडे हलकं हलकं उजाडत होत. लगेच काठ्या घेऊन आम्ही सुटलो! आता कसलाच थकवा जाणवत न्हवता. पटापट शेवटची टेकडी उतरलो. पुढे अजून एक छोटी टेकडी होती.

त्या टेकडीवर जाऊन समोर पाहिलं. दिमाखात उभा आसलेला राकट सिंहगड सकाळच्या पिवळ्या-तांबूस उन्हात न्हाऊन निघत होता. त्यावर उगवलेलं सोनेरी गवत म्हणजे सिंहाची आयाळच जणू. त्याच्याच कडेला विस्तीर्ण खडकवासला धरण सिंहगडाची शोभा अजूनच खुलवत होत. आम्ही डांबरी रस्त्यावर उतरलो. सुपडासिंगच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. तो ओरडत होता, शिट्ट्या मारत होता. आम्ही रस्त्यानेच वरती निघालो. थोडच अंतर बाकी असताना मागून येणाऱ्या जीपने आम्हाला वर सोडलं.

किल्ल्यावर उतरलो तेव्हा सव्वासात वाजले होते. आमचं k2s पूर्ण झालं होतं. मनाचं समाधान झालं होतं. आणि मरणाची भूक लागली होती. जीपवाल्याचंच हॉटेल होत. भज्यांची अॉर्डर दिली. एक एक ताक सांगितलं. आमची अवस्था बघून त्याने दह्याची सात-आठ बारकी मडकी पण समोर ठेवली. काही न बोलता नुसता तुटून पडलो. भजी तर मस्तच होती पण दही अमृतासारखं गोड लागत होत. पोट फुटेपर्यंत खाल्लं.

किल्ल्यावर जरा भटकलो. लोक भेटत होते, चौकशी करत होते. मुरलेले वयस्कर ट्रेकर्स नुसतं बघूनच विचारायचे 'कात्रज वरून आला ना?'. आमची कथा ऐकून बऱ्याच टिप्स देत होते. आणि मळलेले कपडे, धूळ उडालेलं तोंड, चेहऱ्यावरचं समाधान बघून, नजरेतूनच कौतुकाची थापही टाकत होते...बस्स...अजून काय पाहिजे?

_________________________________

IMG_20160519_065122444.jpg

हा प्रवास ह्यावर्षीच्या मे महिन्यात (उन्हाळ्यात) केला होता. हिरवळीची मजा पाहण्यासाठी लवकरच पुन्हा जायचा विचार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मस्त. दोघांनीच केला म्हणजे भारीच. आमचा कात्रज ते सिंहगड आठवला. पण आम्ही बर्‍याच मोठ्या ग्रुप बरोबर केला होता. त्यांना बरोबर रस्ता माहिती होता. आणि पौर्णिमेला केला होता त्यामुळे डोंगरभर मस्त उजेड होता. सकाळी गडावर पोहोचल्यावर असेच भजे हाणले होते. आणि मग एका झाडाच्या सावलीत ताणून दिली होती.

एकदा तर उलट सिंहगड ते कात्रज पण केलेला आहे. तो मात्र दिवसा केला होता आणि गरमीत जवळचे पाणी संपून हाल झाले होते Lol