स्फुट २९ - उद्या येईल तो

Submitted by बेफ़िकीर on 1 September, 2016 - 10:50

उद्या येईल तो
तू दाखवशील त्याला काहीतरी अद्भुत
तो चक्रावेल
मग आवरून ठेवेल पसारा
तू न्याहाळशील
त्याच्या चेहर्‍यावरचा गोंधळ
किंवा नसलेला गोंधळ!!
क्षणभर तुला वाटेल
कैक क्षणांची शिदोरी बनली
पण प्रत्यक्षात
तो तुझ्यासाठी गोंधळ ठरेल!!
मग तू आवरशील,
शॉवरच्या धारांबरोबर
ड्रेनेजमध्ये जातील
कित्येक व्यक्तिमत्वे तुझी
एक लखलखीत निरर्थकता
परफ्यूमने गंधीत करशील तू
आणि किक मारशील
नव्या दिवसाला
पण त्यापूर्वी
नवे कपडेही घालशील
आणि नवा मुखवटाही चढवशील!!
गंजलेली गात्रे
करकरत
पोचतील मुक्कामाला!!
एक ग्लानी
तेलपाणी करेल
तुझ्या अस्तित्वाचे!!
सकाळचा परफ्यूम
क्षीणपणे आठवण देत राहील
वाहिलेल्या थरांची
आणि हतबलतेची!!
पुन्हा उसळी घेईल
तुझी निखळ निरर्थकता!!
काही तासांसाठी
तुला एक अर्थ देईल!!
त्या तासांमध्ये,
दिसतील फुले विकायला ठेवलेली,
कर्कश्य हॉर्न वाजवणारे त्रस्तसमंध,
बंद झालेल्या बँका,
कामावरून परतताना,
मुलांसाठी वडापाव घेऊन जाणार्‍या,
लक्षाधीश बायका!!
तुला काहीतरी खूप बोचेल
काहीतरी खूप हसवेल!!
तुझा बाप म्हणत असेल
आज हा काही बोललाच नाही!!
आणि तुझ्या बापाशी,
रोजच्याप्रमाणेच,
तुझे एकमत होईल,
की आज,
तू काही बोललाच नाहीस!!
कोणाशीच!
स्वतःशीही!

===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users