१/१/२१०२, स.न.वि.वि.

Submitted by कुमार१ on 1 September, 2016 - 00:25

बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे. आज २१०२ साली ती अस्तित्वात आहे हेच एक मोठे आश्चर्य आहे.

कुठल्या पेटीचे वर्णन वाटतंय हे ? अर्थात, ही आहे एका जुन्यापुराण्या घरावरची पत्रपेटी !

सध्या आपल्यापैकी बहुतेकांकडे आपल्या तळहातात मावणारे प्रगत संगणक आहेत आणि आपली संदेशवहनाची कामे आपण त्यांच्याद्वारेच करतोय. त्यामुळे आता टपालसेवेला फारसे कामच राहिलेले नाही. आताशा जी घरे नव्याने बांधली जात आहेत त्यांच्या प्रवेशद्वाराशी टपालपेट्या कोणी बसवतही नाही. जी घरे पाउणशे वर्षांपूर्वीची आहेत त्याच घरांच्या बाहेर मोडकळीस आलेल्या व गंजलेल्या टपालपेट्या दिसतात .त्यांचा वापर कोणी करतच नाहीये. पण जणू एखादा ऐतिहासिक वारसा जपावा त्याप्रमाणे त्या घरांनी त्या पेट्याना अजून ठेवलेले आहे. अधूनमधून तशा घरातला एखादा सणकी तरूण त्या जुन्यापुराण्या पेटीचे उच्चाटन करतानाही दिसतो. आपल्या हाताने ‘पत्र’ लिहून ते कोणाला टपालाने पाठवणे हा केव्हाच इतिहास झालेला आहे. नाही म्हणायला देशात ‘पोस्ट’ नामक खाते आहे खरे, पण त्याचा उपयोग लोक कधीकधी एखादी वस्तू (पार्सल ) दुसऱ्याला पाठवण्यासाठी करतात. क्वचित एखादा नवा उद्योजक त्याच्या उत्पादनाची जाहिरातपत्रके टपालाने पाठवतो.

सध्याच्या इतिहासाच्या शालेय पुस्तकांमध्ये ‘टपाल : संदेशवहनाचे पूर्वीचे साधन ‘ या नावाचा एक धडा आहे आणि तो मुले कुतुहलाने वाचतात. आंतरजालावर शोध घेतला असता ‘टपाल व तारखाते ‘या संबंधी ऐतिहासिक माहिती देणारी काही संकेतस्थळे सापडतात. बघूयात जरा अशा एखाद्या स्थळात डोकावून म्हणजे कळेल तरी आपल्याला की काय यंत्रणा होती ही ‘टपाल’ नावाची.
..
अठराव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात अधिकृत टपाल यंत्रणा जगात अस्तित्वात आली. तेव्हा परगावच्या माणसाशी संपर्क साधण्याचे पत्र हे मुख्य साधन होते. सुरवातीस एका ठिकाणचे पत्रांचे गठ्ठे घोड्यांच्या पाठीवर टाकून दुसरीकडे नेले जात.

त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये टपाल खाती स्थापन झाली आणि मग हळूहळू लहान गावांमध्ये त्यांचा विस्तार झाला. लिहिलेले पत्र टाकण्यासाठी गावाच्या निरनिराळ्या भागांमध्ये लाल रंगाच्या मोठ्या पेट्या बसवलेल्या असत. त्यामधून दिवसाच्या ठराविक वेळांत पत्रे काढली जात. नंतर ती टपाल कार्यालयात नेऊन त्यांची छाननी व वर्गीकरण होई. नंतर ती सार्वजनिक वाहतुकीने इच्छित गावांना पोचवली जात.
मग ती पोस्टमनद्वारे नागरिकांना घरपोच दिली जात. सुरवातीच्या काळात पोस्टमन प्रत्येक घरात जाऊन पत्रे देत असे. त्याकाळी आपल्याला एखादे पत्र येणे ही एक उत्सुकतेची बाब होती. आपल्या परिचिताच्या हस्ताक्षरातले पत्र वाचताना जणू काही तो आपल्याशी बोलतोय असे वाटे. त्या काळी अनेक लोक निरक्षर होते. अशा लोकांना आलेले पत्र पोस्टमन स्वतः वाचून दाखवी. ‘डाकिया डाक लाया’ यासारखी गाणी त्याकाळी प्रसिद्ध होती. एकूणच पोस्टमन व नागरिक यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. सुरवातीस पत्रांचे वितरण हे एखाद्या देशापुरतेच मर्यादित होते. नंतर विमानाचा शोध लागला आणि मग आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहार सुलभ झाला.

तेव्हाच्या पत्रांमध्ये विविध प्रकार उपलब्ध होते. अगदी कमी मजकूर लिहिण्यासाठी ‘पोस्टकार्ड’ असे. ते पाठवण्याचा खर्च वर्षानुवर्षे खूप कमी ठेवलेला होता. गरीबातल्या गरिबालाही तो परवडावा हा त्यामागचा हेतू. अर्थात या उघड्या कार्डावर लिहिलेला मजकूर गुप्त राहत नसे, पण तो लिहिणाऱ्यालाही त्याची फिकीर नसे. जरा अधिक मजकूर लिहिण्यासाठी ‘अंतर्देशीय पत्र’ असे. त्या पत्रावर लिहिल्यावर त्याचीच घडी करून एका बाजूने चिकटवून ते पाठवत असत. ते पत्र त्याची चिकटवलेली बाजू न फाडता थोड्या कष्टाने चोरून वाचता येई. असे चोरून वाचणारे महाभाग वाढल्यावर टपाल खात्याने त्या पत्रात सुधारणा केली व ते सर्व बाजूंनी चिकटवून पूर्ण बंद होऊ लागले.

एखाद्याला २-४ पानी मजकूर पाठवायचा असला तर ती पाने पाकिटात घालून पाठवत. मग त्या पाकिटावर ठराविक रकमेची तिकीटे चिकटवत. त्या तिकीटांवर निरनिराळी चित्रे अथवा थोर व्यक्तींचे फोटो असत. अशा वापरलेल्या तिकिटांचा संग्रह करणारे बरेच लोक तेव्हा होते. हे संग्राहक देशविदेशातील अधिकाधिक तिकीटे मिळवण्यासाठी खूप धडपड करीत. त्यांच्या संग्रहाची ते अधूनमधून प्रदर्शने भरवित.
त्याकाळी विविध सणांच्या वेळी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी रंगीबेरंगी छापील भेटकार्डेही पाठवत. वर्षातील मोठ्या सणाचे वेळीस लोकांच्या पत्रपेट्या अशा पत्रांनी ओसंडून वाहत असत.
काही पत्रे तर अजून खास असत.ती म्हणजे ‘प्रेमपत्रे’. दोन प्रेमिक एकमेकांना जी पत्रे पाठवत ती रंगीबेरंगी कागदांवर लिहिलेली असत. त्याना ‘गुलाबी पत्रे’ असे म्हटले जाई.

त्याकाळच्या वृत्तपत्रांमध्ये ‘पत्रमैत्री’ नावाचा जाहिरात विभाग असे. त्याद्वारे इच्छुक लोक पत्रमित्र मिळवत. अशा तरुणांमध्ये विरुद्धलिंगी पत्रमैत्रीचे आकर्षण असे. पत्रमैत्रीतून मन मोकळे करण्यासाठी एखादा जिवलग मिळून जाई. परदेशस्थ पत्रमैत्रीतून वेगळ्या संस्कृतीची ओळख होई.

त्याकाळी चांगले पत्र लिहिणे ही एक कला समजली जाई. पत्रांतून अनेकांची विविध प्रकारची हस्ताक्षरे बघताना मजा येई. पुरूष, स्र्त्री व मुले या प्रत्येकाचे अक्षर वैशिष्ट्यपूर्ण असे. एखाद्याचे पत्रातील वळणदार अक्षर वाचताना डोळे अगदी सुखावत तर एखाद्याच्या लेखनातील लांब फरकाटे त्या पत्राला वेगळीच शोभा आणत. पत्रातील थोडेफार अशुद्धलेखन कधीकधी छान विनोद निर्माण करे. एकंदरीत पत्रव्यवहार हा प्रकार माणसामाणसांत जिव्हाळा निर्माण करीत होता, असे दिसते.

टपालखात्यासंबंधी काही सुरस व चमत्कारिक कथा इथे एका संस्थळावर नोंदवलेल्या दिसतात. त्या काळी आपल्याच गावातील एखाद्याला लिहिलेले पत्र २-३ दिवसात मिळे तर देशभरातले पत्र साधारण ८ दिवसात. पण कधीकधी मात्र पत्रे खूप विलंबाने मिळत. त्यामुळे संबंधीताचे नुकसान होई. एखाद्याला त्याच्या नोकरीच्या मुलाखतीचे पत्र तो दिवस उलटून गेल्यावर मिळे तर कधी एखादी लग्नपत्रिका लग्न होऊन गेल्यावर पोचे. पत्र विलंबाने पोचण्याचे काही विक्रम टपालखात्याच्या नावावर जमा आहेत. एकाने परीचीतास लिहिलेले पत्र तब्बल २६ वर्षांनंतर पोचले जेव्हा तो परिचित हयात नव्हता. एका गावातील अनेक पत्रे बराच काळ गहाळ होत होती. त्या प्रकरणाचा तपास केल्यावर एक भलताच प्रकार उघडकीस आला. तिथला पोस्टमन हा विकृत होता व तो त्याच्या वाटपाची सर्व पत्रे चक्क नदीत फेकून देत होता.

अधूनमधून काही समाजकंटक विचित्र पत्रे लिहून अनेकांना त्रास देत. त्या पत्रांमध्ये असे लिहिलेले असे की हाच मजकूर तुम्ही पुन्हा लिहून तुमच्या १० परीचीताना पाठवावा. तसे न केल्यास तुमच्यावर देवीचा कोप होईल, वगैरे. अशा पत्रांनी काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. म्हणजे, समाजाला अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवायचे काम आजच्याप्रमाणेच त्याकाळीही चालत होते, असे दिसते.

संदेशवहनाच्या संदर्भात टपाल यंत्रणेने सुमारे दोन शतके तिचा प्रभाव पाडला होता. तातडीच्या संदेशवहनासाठी तिच्या जोडीला तिचे ‘तारखाते’ हे भावंड होते. तातडीची परीस्थिती वगळता टपाल यंत्रणा हीच समाजातील प्रमुख संदेशवाहक होती. त्याकाळी खरोखरच पत्र हे दूरसंवादाचे सोपे, स्वस्त आणि प्रभावी माध्यम होते.
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात टेलीफोन वापरात आला आणि एक संपर्क क्रांती झाली. तेव्हा आपल्याला दुसऱ्याशी यंत्राद्वारे बोलता येणे ही नवलाई होती. हळूहळू फोन यंत्रणेचे जाळे व व्याप्ती वाढत गेली. मग जगभरात कुठूनही कुठे बोलायची सोय झाली. अर्थातच त्याचा परिणाम पत्रलेखनावर झाला.
आता नागरिकांचे व्यक्तिगत पत्रलेखन कमी होऊ लागले. तरीसुद्धा कार्यालयीन पत्रव्यवहार, माहितीपत्रके व छापील निमंत्रणे पाठविण्यासाठी टपालसेवेचा वापर भरपूर होता. फोनच्या शोधानंतरही सुमारे ७५ वर्षे टपाल व टेलीफोन यांचा सहप्रवास सुखात चालला होता.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माणसाच्या आयुष्यात संगणक अवतरला. यथावकाश त्याद्वारे संपर्क करण्याची आंतरजाल सेवाही उपलब्ध झाली. त्याद्वारे पाठवलेले ‘पत्र’ अर्थात इ-मेल आता जगात कुठेही क्षणार्धात पोचू लागले. याचा जबरदस्त दणका टपालसेवेस बसला. सुरवातीस संगणकावर फक्त इंग्लीशमध्ये टंकता येई. नंतर अनेक भाषांमध्ये टंकण्याची सोय झाली. त्यामुळे हाताने पत्र लिहून पाठवणे बरेच कमी झाले आणि कधीतरी ते कालबाह्य होईल हा विचार पुढे आला. वेगाने पोचणाऱ्या इ-मेलच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक टपालाला आता ‘स्नेल-मेल’ असे म्हटले जाऊ लागले. संदेश वहनातील हे क्रांतीकारी बदल जगातील विकसित देशात झटपट स्वीकारले गेले. गरीब देशांना मात्र या परिवर्तनासाठी बराच काळ लागणार होता.

दरम्यान दूरभाष यंत्रणेमध्ये अजून एक क्रांती झाली अन त्यातून आगमन झाले भ्रमणभाष अर्थात सेलफोन्सचे. आपल्या बरोबर बाळगायच्या या यंत्रांमुळे संदेशवहन अधिक गतीमान झाले. त्यानंतर या जादुई यंत्राद्वारे टंकलिखित संदेश पाठविण्याची सोय उपलब्ध झाली. असा संदेश क्षणार्धात दुसऱ्यास पोचू लागल्यावर टपाल खात्याचे पोस्टकार्ड आता खरेच अनावश्यक ठरले व ‘गरीब बिचारे’ भासू लागले.

भ्रमणभाष यंत्रणेचा प्रसार झपाट्याने होत गेला आणि जगातील बहुसंख्य लोक ‘मोबाईलधारक’ बनले. आता या फोनद्वारा कोणीही कोणाशीही कुठूनही व कितीही बोलू लागला. संदेशाची कामे फटाफट होऊ लागली. बोलणे हे लिहीण्यापेक्षा सोपे व कमी कष्टाचे असते. त्यामुळे आता पत्रलेखनाला जबरदस्त ओहोटी लागली. किंबहुना पत्र लिहिणे व ते वाचणे यांसाठी वेळ घालवणे बहुतेकांना अनावश्यक वाटू लागले.

आता टपालखात्याचे काम खूपच कमी झाले होते. पूर्वी शहरांमध्ये दर अर्ध्या किलोमीटरवर पत्र टाकण्यासाठी टपाल पेट्या बसवलेल्या असत. त्यातल्या कित्येक रिकाम्या राहू लागल्याने काढून टाकण्यात आल्या. लोकांच्या घरावरच्या पेट्यांमध्ये आता पत्रे पडेनाशी झाली.
आता अधूनमधून येणारे टपाल काय असे तर निरनिराळ्या संस्थांचे छापील अहवाल व विविध जाहिरातपत्रके. थोडेफार लोक एखाद्या नियतकालिकाची वर्गणी भरत व त्यांना ते टपालाने मिळे. कालांतराने छापील नियतकालिकेही बंद पडली व त्यांच्या इ-आवृत्त्या संगणकावर उपलब्ध झाल्या. एकंदरीत टपालसेवेलां आता घरघर लागली होती. एकेकाळच्या ‘पत्रपेट्या’ आता उपेक्षित ‘पत्र्याच्या पेट्या’ होऊन बसल्या होत्या!

एव्हाना एकविसावे शतक संपत आले होते. टपालखाते आता खरेच क्षीण झाले होते. महानगरांमध्ये जेमतेम ४-५ पत्रपेट्या शिल्लक राहिल्या होत्या तर लहान गावांत अशी एखादीच पेटी आपले अस्तित्व टिकवून होती. या पेट्या आता आठवड्यातून एकदाच उघडल्या जात. बऱ्याच टपाल कर्मचाऱ्यांना इतर खात्यांमध्ये सामावून घेतले होते.
जगातील बहुसंख्य लोक एव्हाना संगणकसाक्षर झाले होते. संदेशवहन आता खरोखरच ‘इ’ झालेले होते. या गतिमान युगातील टंकलिखित संदेशांची भाषा अगदी ठराविक व औपचारिक असे. त्यांमध्ये एकेकाळच्या हस्तलिखित पत्रांमधून जाणवणारा भावनिक ओलावा आता दिसेनासा झाला होता.

पूर्वीच्या एखाद्या पत्रातील "तब्बेतीची काळजी घे. औषधे वेळच्यावेळी घेत जा. पैशांची गरज लागल्यास हक्काने सांग’’ यासारख्या मजकुरातून पाझरणारी माया आता अनुभवता येत नव्हती. आता ‘मिस यू अन टेक केअर’ यांसारखे छापील तयार संदेश हजारो किलोमीटर अंतरावरून क्षणार्धात येऊन धडकत होते आणि ते वाचल्यावर पुढच्याच क्षणी सफाईने ‘डीलीट’ केले जात होते.
. .
आज २१०२ साली म्हणजेच बाविसाव्या शतकात ही टपालखात्याबाद्द्लची ऐतिहासिक माहिती संस्थळावर वाचून मजा वाटली. आज आपण संदेशवहनाची कामे अत्याधुनिक संगणकाद्वारे करतोय. हे संगणक आपल्या तोंडी आदेशावरूनही आपली कामे करताहेत. त्यामुळे आता आपण फारसे लिहीतही नाही.
हातात पेन घेऊन ३-४ पाने लिहायची या कल्पनेनेच अंगावर काटा येतो! अजून एखाद्या शतकानंतर कोणी स्वतःच्या हाताने पानभर तरी लिहीत असेल का ? कारण तेव्हा अगदी बालवाडीच्या प्रवेशापासूनच मुलांची बोटे संगणकावर आपटू लागली असतील.

म्हणजे हळूहळू माणूस आपल्या हाताने लिहिण्याची एक सुंदर कला विसरून जाईल की काय ? या कल्पनेने मात्र खूप अस्वस्थ वाटतेय. नको रे बाबा, इतक्या टोकाचे यांत्रिकीकरण नको. आपल्या हाताच्या बोटांना जरा वाकवूयात अन वळवूयात. स्वतःच्या हाताने लिहीण्यातसुद्धा जो वेगळाच आनंद असतो तो अनुभवूयात.

चला तर मग, उचलूयात का एक पेन व लिहूयात का एकमेकांना एखादे पत्र ? आपल्याला आलेले एखादे पत्र उघडून वाचण्यातली उत्सुकता काही औरच असते, बरं का !
***************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

उदाहरणार्थ त्या काळात शाळेतल्या मुलांना पत्रलेखन नावाचा बोअरिंग प्रकार असायचा आणि त्यात सुरूवातच 'मायना' नावाच्या भयाण प्रकाराने व्हायची.
कुणाला तीर्थरूप, कुणाला तीर्थस्वरूप, कुणाला तीर्थरूप सौभाग्यवती, कुणाला गंगाभागिरथी तर कुणाला चिरंजीव असे शब्द वापरावे लागत मायन्यात. त्यावरून मार्क्स वगैरे कमी व्हायचे म्हणे मुलांचे. (मार्क्स म्हणजे काय हे आपण पुढच्या लेखात पाहू.)
पण या शब्दांचे अर्थ काय आणि ते कशासंदर्भात वापरले जात या हा पत्ता अजूनही पुराणभाषा संशोधकांना लागला नाही.

तसेच पत्राचा शेवटही आपला कृपाभिलाषी, आपला विश्वासू असा व्हायचा.

विश्वासू शब्दाचा अर्थ ऑनेस्ट असा आहे. पण कृपाभिलाषी हा काय प्रकार आहे यावर अजून तज्ज्ञांचे एकमत नाही.

उदाहरणार्थ तेव्हा म्हणे 'पत्र' या विषयावर अनेक गाणी असत आणि पत्र पोहोचविणार्‍या निरोप्याला, डाकबाबू /डाकिया नावाच्या माणसाला पत्रे आणून टाकावी म्हणूनही अनेक विनंत्या करणारी गाणी असत.

प्रियकराला पत्र लिहूनही त्याने दिलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे पत्र परत आलेल्या नायिकेचे गाणे म्हणे तेव्हा अनेकांना हळवे करून जायचे.
या गाण्याचे काहीच शब्द सध्या उपलब्ध आहे. 'पत्र पाठवणे' या उपक्रमाविषयी अगदी मायन्यापासून ते पत्र पत्ता लिहून पोस्ट करणे आणि ते परत येणे याबद्दल या गाण्याने अत्यंत महत्त्वाचा प्रकाशझोत टाकल्याने पत्रॉलॉजी नावाच्या ब्रांचचे तज्ज्ञ या गाण्याला अगदी महत्त्वाचा ऐतिहासिक ऐवज समजतात.

मध्यंतरी एका मित्राने सांगितलेला अनुभव.
देशी व परदेशी विद्यापीठांचा विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम चालू असतो. त्या अंतर्गत त्याच्याकडे दोन अमेरिकी विद्यार्थी वर्षासाठी राहायला होते. ते दोघे महिन्यातून एक हस्तलिखित पत्र त्यांच्या अमेरिकेतील कुटुंबांना चक्क टपालाने पाठवत होते. ते पाहून मित्र आश्चर्यचकित झाला. त्यावर त्यांनी सांगितले की आमचे टपाल खाते काही प्रमाणात तरी चालू राहवे असे आम्हास मनापासून वाटते.
.....सध्याच्या ‘’ युगात हा रोचक किस्सा ऐकून मजा वाटली खरी.

छान वाटले...

माझे चक्क काही परदेशी पत्रमित्र मैत्रिणी होते तरुणपणी Happy त्यावेळी आय आर सी, म्हणजे इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स मिळत, ती पहिल्या पत्रातून पाठवत असे मी. मग व्यवस्थित पत्रव्यवहार होत असे.

आणि साती म्हणतेय तसे गाणे पण होते, सप्रेम नमस्कार विनंति विशेष.. बहुतेक वसंतराव देशपांडे आणि मधुबाला चावला नी गायले होते... तशी पत्रावरून कितीतरी सुंदर गाणी होती.

१) फूल तूम्हे भेजा है खत में ( नूतन )
२) आयेगी जरुर चिठ्ठी मेरे नामकी, सब देख ना ( हेमा मालिनी )
३) चिठ्ठी आयी है, आयी है ( गैरफिल्मी होते )
४) ये मेरा प्रेमपत्र पढकर ( राजेन्द्र कुमार )
५) खत लिखदे सावरीया के नाम बाबू ( आशा पारेख )
६) डकिया डाक लाया ( राजेश खन्ना )
७) मैने तूझे खत लिखा ( रेखा )

माझी परदेशातली पहिली काही वर्षे, इंटर नेट्च नव्हे तर स्वस्त टेलिफोन युगाच्याही आधीची होती... त्यावेळी घरी पत्र पाठवण्यासाठी आणि घरची पत्र मिळवण्यासाठी.. काय यातायात केली, ती माझी मलाच माहित.

३) चिठ्ठी आयी है, आयी है ( गैरफिल्मी होते )>> हे गाणे नाम नावाच्या संजय दत्त आणि कुमार गौरव यांच्या भयाण अभिनयाने नटलेल्या सिनेमात होते.

दिनेश, एवढ्या हिंदी गाण्यांची यादी बघून मस्त स्मरणरंजन झाले. धन्यवाद.

पत्रमैत्रीचा अजून एक किस्सा. हे गृहस्थ त्यांच्या तरूणपणी मासिकातून नियमित कथालेखन करत. एक तरुणी त्या कथा नियमित वाचे. तिला त्या खूप आवडत. मग तिने त्यांना पत्राने प्रतिसाद द्यायला सुरवात केली. मग हळूहळू त्यातून घट्ट मैत्री > प्रेम > लग्न असा सुखद प्रवास झाला !

असा प्रवास कुणा माबोकराचा झाला असल्यास वाचायला आवडेल.

मस्त लेख. मला पत्रलेखनाची खूप आवड असल्याने भावला.

पूर्वीच्या एखाद्या पत्रातील "तब्बेतीची काळजी घे. औषधे वेळच्यावेळी घेत जा. पैशांची गरज लागल्यास हक्काने सांग’’ यासारख्या मजकुरातून पाझरणारी माया आता अनुभवता येत नव्हती. आता ‘मिस यू अन टेक केअर’ यांसारखे छापील तयार संदेश हजारो किलोमीटर अंतरावरून क्षणार्धात येऊन धडकत होते आणि ते वाचल्यावर पुढच्याच क्षणी सफाईने ‘डीलीट’ केले जात होते. >>> अहो, हे तर आताच किती जाणवते आहे !

आपल्याला आलेले एखादे पत्र उघडून वाचण्यातली उत्सुकता काही औरच असते, बरं का !>>> हे तर मी कितीदा अनुभवले आहे त्याची गणतीच नाही. पहिली नोकरी मिळाल्याचे पत्र, 'तिने' मला लिहीलेले पहिले पत्र, बदलीच्या गावी एकटा असताना माझ्या छोट्या मुलीने लिहीलेले रंगीबेरंगी पत्र...... न संपणारी यादी.
. .

पत्रं लिहीणं, पत्राची वाट बघणं हे खरंच उत्कंठावर्धक असलं तरी आधी टेलिफोन नंतर मोबाइल्स आणि आता फेस्बुक्क, व्हाट्स्सप यांमुळे आमच्या पिढीला पत्राची ओळख फक्त परिक्षेपुरतीच मर्यादित राहिली आणि दुर्दैवानं आम्ही हा असला पत्रप्रपंच अनुभवला नाही... Sad

आमच्या पिढीला पत्राची ओळख फक्त परिक्षेपुरतीच मर्यादित राहिली >>> राहुल, अगदी खरंय. पत्राची वाट बघण्यातली मजा काही औरच असायची.

अजूनही टपाल खाते चांगले सक्रिय आहे हे दर्शविणारी बातमी:
https://www.oneindia.com/india
बंगलोर मधील एक पोस्टमन रोज ६०० साधी पत्रे आणि अजून काही रजिस्टर्ड आणि गतिमान पत्रे रोज वितरीत करतो.

पत्रमैत्री प्रकाराबद्धल माहिती नव्हती.>>> च्रप्स, त्याला Penfriend असं म्हणायचे. पेनफ्रेंड असलेल्यांचा आम्हाला नेहमी हेवा वाटायचा.

खूपच मस्त लिहिले आहे.
१८-१९ वर्षांची असताना एकदा आईला पत्र लिहिताना गोलाकृतीत लिहिले होते म्हणजे वाचताना आईला पत्र गोल फिरवावे लागले.त्यावेळी तिला ही कल्पना आवडली होती.

वाचताना आईला पत्र गोल फिरवावे लागले >>>> मस्त ! आवडली कल्पना.

पेनफ्रेंड असलेल्यांचा आम्हाला नेहमी हेवा वाटायचा. >>> विशेषता विरुद्ध लिंगी !

विशेषता विरुद्ध लिंगी ! >>> हो! मला तेच म्हणायचं होतं. Wink
Lol

आणि विरुद्धलिंगी पेनफ्रेंड असलेली मुलेही आमच्याकडे पत्रातील मजकूराचे मुद्दाम वरचढ वर्णन करून आमची जळवायची. Biggrin

आणि परदेशातील पेनफ्रेंडच्या पांढऱ्याशुभ्र गुळगुळीत कागदांच्या पाकिटांवर परदेशी स्टॅम्प डकवलेले असत. ते स्टॅम्प मिळवण्याचेही त्याकाळी प्रचंड आकर्षण असे. ती पत्रे एअरमेलने (विमानाने) येत असत. एअरमेलच्या पाकिटांचे दर्शन घेणेही फार औत्सुक्यपूर्ण वाटत असे. कारण आम्हाला नेहमी पिवळी पोस्टकार्डे (पंधरा पैसे), निळी आंतरदेशीय पत्रे (वीस पैसे) किंवा झालीच तर बदामी रंगाची पोस्टपाकिटेच (पंचवीस पैसे) पहायला मिळत.

ते स्टॅम्प मिळवण्याचेही त्याकाळी प्रचंड आकर्षण असे. ती पत्रे एअरमेलने (विमानाने) येत असत. एअरमेलच्या पाकिटांचे दर्शन घेणेही फार औत्सुक्यपूर्ण वाटत असे. >>>>
सचिन, एकदम सही ! जुन्या आठवणी जागृत झाल्या.

कुरियर सेवेची मर्यादा आणि टपाल सेवेची सर्वसमावेशकता दाखवून देणारा मला आलेला हा अनुभव.

मला कर्नाटक मधील जिल्ह्याच्या मुख्य शहरात एका शैक्षणिक संस्थेला पाकीट पाठवायचे होते. त्यासाठी जवळच्या DTDC कुरियर कडे गेलो. पत्ता पाहिल्यावर ते म्हणाले की तुम्ही पिनकोड चुकीचा लिहिलेला दिसतो. मग मी त्यांना जालावरुन शोध घेऊन तो बरोबर असल्याचे दाखवले. मग ते म्हणाले की तुमची संस्था शहराच्या टोकाला आहे. त्यामुळे तिथे आमची सेवा पोहोचत नाही. फार तर त्या शहरातील आमच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही तुमचे पाकीट ठेवून देऊ. मग ते संस्थेच्या लोकांना येऊन घेऊन जावे लागेल.

शहरातील एखाद्या मोठ्या संस्थेला देखील कुरिअर पोहोचू शकत नाही हे माझ्यासाठी आश्चर्य होते.

मग सरळ पोस्टात गेलो आणि स्पीडपोस्ट केले. एरवी पोस्टातील रांगांना ( व ठराविक वेळाना) घाबरून आपण कुरियरला जवळ करतो. सध्या सुदैवाने ज्येष्ठ नागरिक घरी थांबून आहेत. त्यामुळे पोस्ट अगदी मोकळे वाटले. पोस्टात चक्क माझा पहिला नंबर लागून पाच मिनिटात काम झाले.

टपाल ते सेलफोन,इंटरनेट यांचा प्रवास छान लिहिलाय.
लेखाचा शेवट हि अगदी छान केलाय.

लिहिणे विसरू नये म्हणून मी नियमित डायरी लिहिते. लिहायला काही सुचले नाही कि निदान कुठल्याही आवडलेल्या दोन ओळी तरी लिहिते.(अगदी सिनेमातल्या सुध्दा)

मृणाली,
लिहिणे विसरू नये म्हणून मी नियमित डायरी लिहिते.
>>>
छान सवय. नियमित दैनंदिनी मी बंद केली. आता मी वहीत हाताने निवडक असे लिहितो :

१. आवडलेली वाक्ये
२. आवडत्या कविता
३. वाचलेल्या पुस्तकाचा सारांश
४. पाहिलेल्या नाटक वा चित्रपटाचा सारांश
५. भाषेतील मनोरंजक गोष्टी, आणि
६. संकीर्ण