काल परवाची रविवारची गोष्ट..
मित्राबरोबर भटकंती चालू होती. रिमझिम पावसाळा, थंडगार वारा, पायात पावसाळी फ्लोटर्स, हाता शोभेच्या छत्र्या.. थोडा वडापाव खाल्ला, थोडे कणीस हादडले.. चहाची तल्लफ भागवायला एक टपरी गाठली. योगायोगाने तिथे मित्राला ऑफिसचा एक सहकारी भेटला. चालू झाल्या त्यांच्या गप्पा. शेअरमार्केट काय बोलतेय, कुठून काढू, कुठे लावू.. मला त्यातले ढिम्म समजत नाही. जाणून घ्यायची तर त्याहून इच्छा नसते. मग मी माझी नजर लावली आपल्या नेहमीच्या कामाला. थोडा जवळचा कॉलेजच्या पोरांचा ग्रूप न्याहाळला. पण बघण्यासारखे काहीच नव्हते. आजूबाजुची दुकाने पाहिली. पावसाच्या रिपरिपीने मरगळलेली वाटली. रस्ता लांबवर ओला होता, ना त्यावर गाडी ना चिटपाखरू,. ना भटकी कुत्री. चालताना हेच वातावरण फार रम्य वाटत असते. पण थांबून सुस्तावताच तेच भकास वाटू लागते. जसे चहाच्या टपरीवर माश्या..
मग एक नजर सहज जवळच्या अपार्टमेंटवर पडली. असं कुठेतरी अनोळखी ठिकाणी, लोकांच्या घरात डोकावणे होत नाही. प्रशस्तही वाटत नाही. पण हॉलची भलीमोठी सताड उघडी खिडकी आणि भिंतीवरच स्पष्ट दिसणारा कलर टिव्ही. नजर अडकलीच. एक वृद्ध जोडपे मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते. मुंबईत मराठी माणसे आताशा अल्पसंख्यांकात गणली जातात का याची कल्पना नाही. पण कोणी मराठी आहे हे पहिल्याच फटक्यात समजले की एक आपलेपणाची भावना मनात दाटून येते. तश्याच भावनेने त्यांना न्याहाळू लागलो. आजोबा मागे सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. रुक्ष असावेत. आजीबाई मात्र टोकाच्या रसिक असाव्यात. टीव्हीचा अगदी समोर, खुर्चीत बसून हातवारे करत गायन कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. माझ्या कानापर्यंत पोहोचणारा आवाज शून्य होता. तरीही थोड्यावेळाने गाण्याचा टेंपो वाढला हे मला त्यांच्या हातवार्यावरून समजून येत होते. पुढे पुढे तर जरा जास्तच. गाणे संपल्यावर दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवत मनसोक्त दाद दिली गेली. है शाब्बास! आणि ईथे माझा मित्र अजून त्याच्या सहकार्यासोबत मार्केटच्या कंटाळवाण्या गप्पात अडकला होता. एक संपवून त्यांनी दुसरी सिगारेट शिलगावली. अन समोर नृत्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आता आजीबाईंची मान देखील डोलू लागली. हातांनीही भरतनाट्यम नृत्याच्या वेळी धरतात तसा ठेका धरला. आजोबा उगाचच पाठीमागे येरझार्या घालू लागले. एवढा वेळ त्यांनी त्या टिव्हीकडे साधे ढुंकनही पाहिले नव्हते. दोन भिन्न आवडी जोपासणारे हे जीव अरेंज मॅरेज या प्रकारात अडकून कसे तीस-चाळीस वर्षांचा संसार करत असतील हा प्रश्न पडलाच. मात्र आजोबा चुकूनही आजी आणि टिव्हीच्या समोरून फेरी मारत त्यांच्या रसग्रहणात बाधा आणत नव्हते. कदाचित हेच त्यांच्या संसाराचे रहस्य असावे. नृत्य जसजसे रंगात येत होते, तसे आज्जीही धमाल मूडमध्ये येत होत्या. थोड्याच वेळात त्या उठून खुर्चीवर उभे राहत, शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत नाचताहेत की काय असे मला वाटू लागले. तोच आजोबा पाठीमागून आले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. ईथे कदाचित त्यांचे खाजगी क्षण आपल्याला जपायला हवे म्हणत मी नजर हटवली.
उगाचच अति डोकावून पाहणे प्रशस्त वाटत नव्हते. पण आजूबाजुला बघण्यासारखे काहीच नव्हते. किंबहुना मला त्यात रस ऊरला नव्हता. कि बस्स उत्सुकता, आता पुढे काय ..
पुन्हा नजर खिडकी आत गेली. नृत्याचा कार्यक्रम आटोपला होता. जाहीराती सुरू झाल्या होत्या. आजोबांनी सोफ्यावरचा रिमोट उचलून टिव्ही बंद केला. आणि आजींची खुर्ची ढकलत ढकलत आत नेली. एवढा वेळ लक्षात नव्हते आले, पण व्हील चेअर होती ती.. उगाचच काळजात काहीतरी तुटल्यासारखे झाले.
मी पुन्हा नजर फिरवली, पण आता मला कश्यातच रस नव्हता. परतताना मित्र एकटाच बडबड करत होता, मी शांत चालत होतो..
- ऋन्मेष
मॅगी सई भरतनाट्यम करतेय ,
मॅगी

सई भरतनाट्यम करतेय , आणि आजी ' टोकाच्या रसि़क' आणि आजोबा ' सई स्क्रीनवर ' असुनही ढुंकुनही पहात नाहीत . अबाबाबा ! लई मोठा घोटाळा दिसतोय
सई 'भरतनाट्यम' करते म्हणूनच
सई 'भरतनाट्यम' करते म्हणूनच पुढच्या घटना घडल्यात!
Otherwise क्रम उलट असता
श्री, तो झी मराठीचा लोगो मी
श्री,
तो झी मराठीचा लोगो मी स्वप्नातही एक डोळा मिटून ओळखू शकतो. घरी सदानकदान तेच चालू असते. माझ्याच का, आपल्या सर्वांच्याच घरी रोज संध्याकाळी सातनंतर तेच चालू असावे. कोणाच्या घरी नसेल तर बोला, उद्यापासून मी ऑफिस सुटल्यावर चार घटका विश्रांती घ्यायला तुमच्या घरी येत जाईन
आमच्याकडे ये ऋन्मेष.
आमच्याकडे ये ऋन्मेष. डोंबिवलीत यायला लागेल. झी मराठी काय, आठ वाजेपर्यंत टीव्ही बंदच असतो बरेचदा. ८ वाजता रजनी कांत लावते.
डोंबिवली तर मराठमोळं आहे ना.
डोंबिवली तर मराठमोळं आहे ना. तिथे झी मराठी सोडून थेट येण्णा रास्कला रजनीकांत
असे कसे हो तुम्ही, तुम्हाला त्या लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेल्या बाईची चिंता खात नाही का ?
ऋन्मेऽऽष, छान लिहले आहे. हे
ऋन्मेऽऽष,
छान लिहले आहे. हे वाचुन आमच्या घरातले चित्र डोळासमोर आले. माझ्या आईला (ती सध्या ह्या जगात नाही) मराठी संगिताची त्यात खास करुन नाट्यसंगिताची खुप आवड. असे कार्यक्रम लागले की ती अगदी तल्लीन होउन बघायची. बाबाना मात्र ह्यात जरापण रस न्हवता त्याना पॉलिटिक्स, सास-बहुच्या सिरियल यात रस, जे आईला नाही आवड्याचे. . त्यामुळे एक जण टीव्ही बघत असताना दुसरी व्यक्ती हॉल मध्ये असली तरी पेपर वाचेल किंवा दुसरे काम करीत राहिल आणि टीव्ही कडे ढुंकनही पाहाणार नाही.
हल्ली कधी कधी वडिल संगीताचे कार्यक्र्म लागल्यास तो बघत बसतात, जरी त्यातले काही कळते नसले तरी....
ऋन्मेष, आता धाग्याला वेगळं
ऋन्मेष, आता धाग्याला वेगळं वळण नाही लावायचंय, इतकं चांगलं लिहीलंयस तर. बाय द वे तो रजनीकांत पण मराठी आहे आणि मी बघते ती रजनी कांतचं काम करणारीपण मराठी आहे सिरीयल हिंदी असली तरी.
चिंतेचं म्हणशील तर और भी गम है जमानेमे सिरीयलके सिवा, त्यामुळे बघितलीच नाही तर फुकाची चिंता का कराना. हा आठवडा साडेनऊला झी मराठी लावतेय आणि दुसरं मराठी चॅनेल झी युवा बघतेय दोन सिरीयल. असो.
लागल्यास तो बघत बसतात, जरी
लागल्यास तो बघत बसतात, जरी त्यातले काही कळते नसले तरी....>>
हेच ते ऋन्मेषच्या एवढ्या मोठ्या लेखाचं सार आहे!
साहिल, टचिंग पोस्ट.
साहिल, टचिंग पोस्ट.
साहिल, टचिंग पोस्ट. .. ह्मम
साहिल, टचिंग पोस्ट. .. ह्मम खरेच
अन्जू, हो वेगळे वळण नकोच. पण तसेही धागा चर्चेचा विषय या हेतूने काढला नव्हता. जे पाहिले, त्यावरून जे मनात विचार आले, ते कागदावर उतरवले.. ईतकेच
साहिल साती 'आमच्या xxxला बघा
साहिल

साती 'आमच्या xxxला बघा कसं सग्गळळ सग्गळं कळतं. त्याने बघा ते आधीच लिहून ठेवलं होतं' अशा विरोधी पार्टी मूड मध्ये गेल्या बहुतेक.
अमितव, जरा कधीतरी नॉर्मल
अमितव,
जरा कधीतरी नॉर्मल बोललात तर आम्हीपण एक दोन गागु घेऊ!
:दिवे घेऊ नका:
Pages