उगाचच ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 August, 2016 - 13:22

काल परवाची रविवारची गोष्ट..
मित्राबरोबर भटकंती चालू होती. रिमझिम पावसाळा, थंडगार वारा, पायात पावसाळी फ्लोटर्स, हाता शोभेच्या छत्र्या.. थोडा वडापाव खाल्ला, थोडे कणीस हादडले.. चहाची तल्लफ भागवायला एक टपरी गाठली. योगायोगाने तिथे मित्राला ऑफिसचा एक सहकारी भेटला. चालू झाल्या त्यांच्या गप्पा. शेअरमार्केट काय बोलतेय, कुठून काढू, कुठे लावू.. मला त्यातले ढिम्म समजत नाही. जाणून घ्यायची तर त्याहून इच्छा नसते. मग मी माझी नजर लावली आपल्या नेहमीच्या कामाला. थोडा जवळचा कॉलेजच्या पोरांचा ग्रूप न्याहाळला. पण बघण्यासारखे काहीच नव्हते. आजूबाजुची दुकाने पाहिली. पावसाच्या रिपरिपीने मरगळलेली वाटली. रस्ता लांबवर ओला होता, ना त्यावर गाडी ना चिटपाखरू,. ना भटकी कुत्री. चालताना हेच वातावरण फार रम्य वाटत असते. पण थांबून सुस्तावताच तेच भकास वाटू लागते. जसे चहाच्या टपरीवर माश्या..

मग एक नजर सहज जवळच्या अपार्टमेंटवर पडली. असं कुठेतरी अनोळखी ठिकाणी, लोकांच्या घरात डोकावणे होत नाही. प्रशस्तही वाटत नाही. पण हॉलची भलीमोठी सताड उघडी खिडकी आणि भिंतीवरच स्पष्ट दिसणारा कलर टिव्ही. नजर अडकलीच. एक वृद्ध जोडपे मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते. मुंबईत मराठी माणसे आताशा अल्पसंख्यांकात गणली जातात का याची कल्पना नाही. पण कोणी मराठी आहे हे पहिल्याच फटक्यात समजले की एक आपलेपणाची भावना मनात दाटून येते. तश्याच भावनेने त्यांना न्याहाळू लागलो. आजोबा मागे सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. रुक्ष असावेत. आजीबाई मात्र टोकाच्या रसिक असाव्यात. टीव्हीचा अगदी समोर, खुर्चीत बसून हातवारे करत गायन कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. माझ्या कानापर्यंत पोहोचणारा आवाज शून्य होता. तरीही थोड्यावेळाने गाण्याचा टेंपो वाढला हे मला त्यांच्या हातवार्‍यावरून समजून येत होते. पुढे पुढे तर जरा जास्तच. गाणे संपल्यावर दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवत मनसोक्त दाद दिली गेली. है शाब्बास! आणि ईथे माझा मित्र अजून त्याच्या सहकार्‍यासोबत मार्केटच्या कंटाळवाण्या गप्पात अडकला होता. एक संपवून त्यांनी दुसरी सिगारेट शिलगावली. अन समोर नृत्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आता आजीबाईंची मान देखील डोलू लागली. हातांनीही भरतनाट्यम नृत्याच्या वेळी धरतात तसा ठेका धरला. आजोबा उगाचच पाठीमागे येरझार्‍या घालू लागले. एवढा वेळ त्यांनी त्या टिव्हीकडे साधे ढुंकनही पाहिले नव्हते. दोन भिन्न आवडी जोपासणारे हे जीव अरेंज मॅरेज या प्रकारात अडकून कसे तीस-चाळीस वर्षांचा संसार करत असतील हा प्रश्न पडलाच. मात्र आजोबा चुकूनही आजी आणि टिव्हीच्या समोरून फेरी मारत त्यांच्या रसग्रहणात बाधा आणत नव्हते. कदाचित हेच त्यांच्या संसाराचे रहस्य असावे. नृत्य जसजसे रंगात येत होते, तसे आज्जीही धमाल मूडमध्ये येत होत्या. थोड्याच वेळात त्या उठून खुर्चीवर उभे राहत, शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत नाचताहेत की काय असे मला वाटू लागले. तोच आजोबा पाठीमागून आले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. ईथे कदाचित त्यांचे खाजगी क्षण आपल्याला जपायला हवे म्हणत मी नजर हटवली.

उगाचच अति डोकावून पाहणे प्रशस्त वाटत नव्हते. पण आजूबाजुला बघण्यासारखे काहीच नव्हते. किंबहुना मला त्यात रस ऊरला नव्हता. कि बस्स उत्सुकता, आता पुढे काय ..

पुन्हा नजर खिडकी आत गेली. नृत्याचा कार्यक्रम आटोपला होता. जाहीराती सुरू झाल्या होत्या. आजोबांनी सोफ्यावरचा रिमोट उचलून टिव्ही बंद केला. आणि आजींची खुर्ची ढकलत ढकलत आत नेली. एवढा वेळ लक्षात नव्हते आले, पण व्हील चेअर होती ती.. उगाचच काळजात काहीतरी तुटल्यासारखे झाले.

मी पुन्हा नजर फिरवली, पण आता मला कश्यातच रस नव्हता. परतताना मित्र एकटाच बडबड करत होता, मी शांत चालत होतो..

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजी आनंदात बघून रस गेला? का व्हीलचेअर वरची माणसं इतकी आनंदात कशी म्हणून काहीतरी तुटले?
का पायावर चालता येत नाही तर केविलवाणे जगणे इत्यादी अझ्युम करून घाऊक अश्रू ढाळायचेत?
प्लीजच ! जगा आणि जगू द्या.

साती, हो मायबोलीवर टिकून राहायला अधूनमधून थोडे चांगलेही लिहावे लागते.

राजसी, हो नक्कीच Happy

अमितव, म्हणूनच लेखाचे शीर्षक आहे, उगाचच.. नाही व्हायला हवे होते तसे ना..

व्हीलचेअरवर होत्या म्हणून काळजात तुटलं आणि अंतर्मुख झाल्यामुळे उथळ गप्पांमध्ये रस उरला नाही - असं असावं ते अमित. Happy

हो अमित, मलाही तसंच वाटतंय. एव्हढ्या उत्साही आणि जीवनाचा मनापासून आस्वाद घेणार्‍या आजींच्या आयुष्यात काहितरी कमतरता आहे असं वाटलं म्हणून तुटल्यासारखं झालं.

आणि अमितला बहुतेक असं म्हणायचं आहे की त्या व्हीलचेअर वर होत्या म्हणून आपण वाईट का वाटून घ्यावं. असा विचार करणं योग्य नाही. जर त्या भरभरून त्यांच्या जीवनाचा आनंद घेत आहेत तर आपण वाईट वाटून घेणारे कोण? Happy

फिजिकली च्यालेज्ड व्यक्तीला सहानुभूती, दया, कीव नाही तर नॉर्मल, समान वागणूक हवी असते.
सशल, कमतरता आपल्याला वाटते. उद्या मला असं काही झालं आणि कोणी सहानुभूतीने माझ्याकडे बघितलं, उगाच मदत केली तर मला सगळ्यात जास्त तिटकारा येईल.

अमित मला तुझं म्हणणं ही पटतंय पण हे ही तितकंच ठाऊक आहे की अशी एखादी व्यक्ती समोर आली तर पहिला विचार हाच असेल की असं का? पण दुसर्‍याच क्षणाला ह्याचीही जाणीव होईल की तो विचार आपल्यापुरताच मनात गाडून टाकावा नाहीतर समोर असणार्‍या चैतन्याचा तो अपमान असेल.

ऑलिम्पिक्स चालू होतं तेव्हा एन् बी सी वर कायम यु एस् पॅरालिम्पिक्स ची अ‍ॅड असायची. अ‍ॅड बघून सगळ्यात आधी हेच वाटायचं की माझ्यात हिम्मत नाही पॅरालिम्पिक्स बघायची.

>>की तो विचार आपल्यापुरताच मनात गाडून टाकावा नाहीतर समोर असणार्‍या चैतन्याचा तो अपमान असेल.>> +१
मनात येतं खरंय. पण गाडून टाकावा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं.

छान लिहीलेय ! पण प्रत्यक्ष डोळ्यानी पाहील्या नंतर हे लिहीले आहे असे नाही वाटत. काही दिवसापूर्वी अशी आजी आजोबांची कथा वाचनात आली होती . ते आजोबा स्वतः आजारी असतान आपल्या व्हिलचेअरवर असलेल्या पत्नीची सेवा करण्यासाठी स्वतःचे आजारपण विसरून डॉ. लवकर डिस्चार्ज मागता. या कथेवरुन हे लिखान सुचले असेल असे वाटत आहे
चु.भु. दे. घे.

राग नको धरु ॠन्मेष

मुक्तेश्वरजी, राग कसला.
एखाद्या लिखाणावरून लिखाण सुचणे हि देखील माझ्यामते एक कलाच आहे. खास करून असे एखादे ललित ज्यात मलाच हे पहिला सुचले म्हणून मिरवावे अशी नवीन काही आयडीया नसते..
तरी मी हे प्रत्यक्ष पाहिलेल्या वरूनच लिहिलेय. आता प्रत्यक्ष मी काय पाहिले आणि त्यात माझ्या मनाचे काय जोडले हे माझ्याकडेच ठेवतो Happy
लिखाणाला छान म्हटलंत त्या बद्दल धन्यवाद.

कधीतरी काहीतरी वेगळंही लिहितो म्हणून आपण लोक माझे ईतर लिखाणही सहन करता आणि जेव्हा काही बरं वाईट वाटते ते प्रामाणिकपणे सांगता, हिच माझी ईथली कमाई Happy

Pages