धोदणी मार्गे माथेरान, पेब किल्ला आणि बरचं काही.. !

Submitted by Yo.Rocks on 28 August, 2016 - 13:46

पावसाच्या सरी नभातून बरसू लागल्या की ओल्या मातीचा सुगंध दरवळतो... गार वारे वाहू लागतात.. मातकट पिवळ्या रंगाचे रान आता गर्द हिरवे होउन जाते.. झाडं-फुले अगदी टवटवीत दिसू लागतात.. वाहत्या पाण्याचा खळखळाट सुरु होतो.. !! निसर्ग जणू आनंदाने सर्व सृष्टीला या वर्षाउत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी विनवू लागतो... !

पावसाच्या सरी नभातून बरसू लागल्या की निसर्गाची ही विनवणी आमच्या मनापर्यंत पोहोचते.. डोंगरदर्‍या-गडकिल्ले डोळ्यासमोर दिसू लागतात... सॅक तयार ठेवूनच सवंगडयांना हाक दिली जाते... 'चल जाऊ' म्हटलं की मन चिंब करण्याच्या आतुरतेने पावलं डोंगराच्या दिशेने वळतात.. !

जुलै महिन्याचा पाऊस म्हणजे अगदी बेभान...कसलेही तारतम्य न बाळगता कोसळणारा... अश्या मोसमात फक्त निसर्गाचा आस्वाद घेणे हे मुख्य उद्दिष्ट.. थरारक वगैरे व्याख्यात बसणार्‍या आडवाटेला जायचे नाही हे मनोमन ठरवून बाहेर पडलेलो... !

पहाटेच्या मोबाईल- गजरला पहिल्यांदाच 'मान' दिला नि ठरल्यावेळेला पनवेल गाठणे शक्य झाले.. घरात इतरजण साखरझोपेत असताना फारसा आवाज न करता 'डबा-विधी', 'चहा' इति सोपस्कार पार पाडून अगदी घराबाहेर पडताना दार अलगद खेचणं हे सगळं भलतच अवघड असत.. या गोंधळात उशीर झालेला.. मग सुनसान रस्त्यावर मोकाट श्वान-टोळींचा डोळा चुकवून बसस्टॉप गाठण.. बस नसेल तर रिक्षा पकडणं.. मग धावत- पळत ट्रेन.. जल्ला नसता खटाटोप.. ! म्हणून हल्ली आदल्या रात्रीच निघण सोयीस्कर समजतो.. पण ही धावपळ देखील आमच्या वेडया मनाला कधीतरी हवीहवीशी..!

मी व सोबतीला 'विनायक' हा नवा गडी.. ट्रेक करण्यास उत्सुक अश्या या नव्या गडीला ट्रेकचा आस्वाद कसा घ्यायचा यासाठी आवर्जुन बोलवलेले.. त्याच्यागाठी एकच अनुभव आमच्याच बरोबर केलेला 'पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड' ! म्हटलं चल पुन्हा.. पावसाळी ट्रेकचा धडा देतो.. Wink तसही सध्याच्या घडीला जोखीम घेऊन कसलीही माहिती हाताशी न घेता ट्रिपच्या नावाखाली ट्रेक करणारं फेसबुक पब्लिक वाढतय नि अपघाताच्या नको त्या बातम्या कानी पडत आहेत.. तेव्हा ट्रेकसाठी आवश्यक त्या बाबींची पुर्वसूचना देउनच प्रात्यक्षिकासाठी त्याला घेउन आलेलो.. आम्ही दोघं पोहोचलो खरे पण आजच्या दिवसाच्या भटकंतीचे जनक - माझा नेहमीचा साथीदार- 'रोमा'चा पत्ता नव्हता.. सकाळच्या 'त्या' खटाटोपात त्याची ट्रेन हुकली नि मग अपेक्षेप्रमाणे पनवेल एस्टी स्टँडजवळील ट्रेकर्स- प्रसिद्ध 'विसावा' हॉटेल ची मिसळ खाण्याचा कार्यक्रम रद्द झाला.. पण उपाशीपोटी पनवेल सोडावे लागले म्हणून रोमाला लाखोली वाहण्याचा कार्यक्रम एसटीत बसल्या बसल्या सुरु केला.. !

दोन्ही बाजूला ओल्या पानांमुळे चकाकणारी झाडं... झाडांमागे दिसणारी हिरवी-पोपटी पसरलेली कुरणं... त्या कुरणांमधून खळखळाट करणारा एखादा वाहत्या पाण्याचा पाट.. नि या हरितसृष्टीमागे ढगाच्या धुक्यात गुरफटलेले डोंगर... इति सुंदर नजारे दाखवत धरणाच्या काठाने जात जात आमची एसटी आता धोदाणे गावात पोहोचली.. 'धोदाणे' हे नाव पनवेल एसटी स्टॅण्डला असलेल्या वेळापत्रकामुळे कळले.. नाहीतर आम्ही एव्हाना 'दोधणी' 'दूधावणे' 'दुधाणे' अशी नामावळ करून बसलो होतो..

या गावाच स्थान एकदम बेस्ट... समोरच दिसणाऱ्या अजस्त्र पहाडावरुन झेप घेणारी शुभ्र फेसाळती धार वाऱ्याच्या तालावर डुलताना दिसत होती.. एकीकडे पेब किल्ल्याची डोंगररांग तर दुसरीकडे माथेरान डोंगररांग.. ढगांचे घोळके या डोंगररांगेवर फेऱ्या मारत होतेच.. गावातली घरं बऱ्यापैकी नीटनेटकी.. याचपैंकी एका घरात नाश्ताच्या आशेवर होतो.. आवाहन पोह्यांचे होते पण मिरच्या संपल्यामुळे काकूंनी मॅगी व चहावर भागवले.. साहजिकच मिसळीला मिस करत पुन्हा रोमाच्या नावाने खडे फोडले.. ! मंदिरासमोरच दुकानाला लागून असलेल्या या घराच्या अंगणात चहापान करताना गर्दी घेऊन येणार्‍या टमटम बघत होतो.. या गर्दीला पाहूनदेखील आम्ही निश्चिन्त होतो.. कारण हे सगळे जवळच्या धबधब्यावर रॅपलिंगसाठी आलेले.. तर कोणी नुसतं डुंबायला - मौजमस्ती करायला आलेलं..

आमची वाट मात्र वेगळी होती.. आमचं उद्दिष्ट होत माथेरान चढून जायचं..! माथेरान हे थंड हवेचे ठिकाण ही ख्याती अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो.. पण कधी जाण्याचा योग आला नव्हता.. पण आता अगदी पाउलवाटेने डोंगर चढून जाणार होतो.. ! सर्वसामान्यांना माथेरान म्हणजे नेरळपासून दस्तुरी नाक्यापर्यंत वा अमन लॉज पर्यंत गाडीने जाणे वा टॉय ट्रेनने जाण परिचित.. पश्चिम घाटच्या डोंगररांगेवर वसलेले हे 'माथेरान' समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर उंचीवर.. हिरवे घनदाट जंगल, वैविध्यपुर्ण वनस्पती,फुलं नि प्राणिजीव या सर्व कुटूंबाला आपल्या कुशीत घेउन असलेला हा 'असामान्य' डोंगर आता मात्र अगदी पर्यटनस्थळ म्हणूनदेखील 'सामान्य' पंक्तीत पोहोचला आहे.. तरीसुद्धा जवळ नि सोयीस्कर पडत म्हणून गर्दी असतेच.. त्यातही धांगाडधिंगा गर्दी नसेल तर नवलच.. ! पर्यटकांची गर्दी ही माथेरान डोंगरानजिक गावांमध्ये राहणार्‍या गावकर्‍यांसाठी उपजिविकेचे साधन.. आणि यातूनच 'माथेरान' डोंगरावर जाण्यासाठी पुर्वीपासून वापरात असणार्‍या बर्‍याच वाटा आहेत.. या वाटा आम्हा भटक्यांना खुणावत असतातच.. त्यातलीच ही एक धोदणी मार्गे चढून जाणारी सहजसोप्पी वाट.. !

आमचे नाश्तापाणी होईपर्यंत आमच्या मागूनच आलेला एक सहा-सात भटक्यांचा ग्रुप नाश्तापाणी करुन पुढे गेलादेखील.. आम्ही तिघ मात्र 'ये आराम का मामला है' थाटात उशीराने चालायला घेतले.. गावामागूनच वाट चढत जाते.. वाट चढून आम्ही मोकळ्या पठारावर आलो नि पावसाची एक मोठी सर येउन गेली.. व्वा म्हणेस्तोवर ऊनदेखील पडल.. !! पण सभोवताली पावसाच्या सरीत नुकतच न्हाऊन गेलेल्या सृष्टीच चकाकत दृश्य पाहून थांबावच लागलं... त्यात रोमाने नविनच निकॉन घेतलेला मग कासवछाप चाल सुरु होती त्याची..

काही अंतरावरच आम्हाला आमचे लक्ष्य दिसले.. ते म्हणजे माथेरानचा सनसेट पॉइंट.. जेमतेम तासभराचे अंतर आहे असा अंदाज आल्यावर आम्ही भलतेच सुस्तावलो... अगदी रमत गमत.. शेतकुराणातून वाट काढत पुढे सरकलो.. आता ठळक असणारी पाउलवाट वृक्षदाटीमधून थेट माथेरानवर नेणार होती.. सहजसोप्पी वाट नि खुललेला निसर्ग... मागे वळून पाहिलं तर धरणाच्या पाण्याचा दिसणारा छोटा फुगवटा नि त्यात पडणारे ढगांचे प्रतिबिंब.. उजव्या बाजूला पेब किल्ल्याच्या डोंगरावर ढगांचा सुरु असणारा धुमाकुळ तर डावीकडच्या डोंगररांगेतून आमच्यावर वाटचाल करत येणारे ढगांचेच विशाल पडदे.. ! वाटेत पाण्याचा एकच छोटा झरा आडवा जातो नि मग ते झुळझुळत पाणी तोंडावर मारून ताजतवानं बनाव लागतच..

पाऊस पडला तसा निसर्ग खुलला..

वाट हळुहळू फार नाही पण बर्‍यापैंकी चढणीला लागते.. झाडीझुडूपातून जाणारी पण ठळक अशी वाट.. त्रास फक्त डास.. पावसाळी ट्रेक म्हटला की जंगलातून चालताना उभ राहून थोडं दम घ्यायच म्हटल की हे रक्तशोषक टोचायला हजर.. पटापट वर जायच तर रोमा थकलेला.. मागे मागे राहीलेला... निकॉन कॅमेर्‍याच्या वजनाने की बरेच दिवसांनी भटकंती म्हणून.. खर कारण त्यालाच ठाऊक... पुढे एक छोटी देवळी लागली.. बर्‍यापैंकी मोकळा परिसर.. नि सभोवताली वृक्षछाया.. आता गरज नव्हती.. पण उन्हाळ्यात ह्याच जागेत मात्र एक वामकुक्षी नक्कीच घेतली असती.. आता जंगल मागे सारून आम्ही जवळपास कडयापाशी पोहोचलो.. अचानक ढगांचे जथ्थे आमच्या वाटेला भिडू लागले तसा परिसर मिनिटभरांत अदृश्य झाला.. थंडगार वारे जाणवू लागले... माकडाची एखादी हूप हुप कानावर पडत होती.. पण या मदहोश वातावरणात भरीस भर म्हणायचं तर मंजुळ आवाजात शिळ घालणारे कस्तुर पक्षी.. एकाच वेळी दोन- दोन पक्षी शिळ घालत होते.. साधारण या मोसमातच ट्रेक करताना ह्या पक्ष्याची बरेचदा शीळ ऐकलेली.. पण हा पक्षी कधीच स्पष्ट दिसला नव्हता.. आताही ढगाच्या धुक्यात शक्य नव्हते.. शोधत नव्हतो.. त्या मंद-धुंद वातावरणात फक्त तल्लीन होउन ऐकत होतो... !

आम्ही आता शेवटच्या टप्प्यात आलोय याची चाहूल लागली होतीच.. म्हणता म्हणता पोहोचलो देखील... इतका सहजसोप्पा सुंदर ट्रेक..! आता अगदी पॉइंटजवळ...पायाखाली माथेरानची लालभडक माती.. वातावरण अगदी थंड.. धुकं वार्‍याच्या तालावर ये-जा करतय.. पाऊस केव्हाही येइल अस वातावरण.. पर्यटकांचे दोन -तीन ग्रुप आपापले फोटो काढण्यात मशगूल.. समोरच एका झाडाखाली मकेवाला बोलवतोय.. साहाजिकच तिकडे वळालो.. मका खाताना दोन- तीन जण मागोमाग एका बाजूने चालत-पळ्त जाताना दिसले... जल्ला मग कळले की कोणीतरी शर्यत ठेवलीय..! आमचा मका खाउन होइपर्यंत पावसाची एक सर येउन पण गेली.. एका बाजुला असलेल्या टपरीवर चहा घेतला नि पॉईंटवर सरकलो... पाऊसही आता दुसरीकडे सरकलेला.. वातावरण अगदी फोटोजनिक... कड्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या रेलिंग पलिकडे खोल दरी.. एकीकडे धोदाणे गावाकडचा परिसर तर उजवीकडे फक्त 'आहाहा' उद्गार निघतील अस दृश्य.. मध्येच ढगांचा पडदा येतो काय.. त्या पडद्याच्या फटीतून पातळ धबधब्याच्या दोन शुभ्र धारा काय दिसतात.. दरीत घुमघुमणारा पाण्याचा खळखळाट काय ऐकू येतो.. माथेरानपासून ते अगदी पेबच्या किल्ल्यापर्यंत गेलेली डोंगररांग काय दिसते.. व्वा.. दिल खुष हुआ.. !!

- - -

आम्ही ठरवल्याप्रमाणे आमचा ट्रेक झालेला.. आता पुढच काही ठरवल नव्हतं.. हाश्याच्या पट्टी या वेगळ्या वाटेने पुन्हा धोदाणे गावातच उतरुन धबधब्याकडे जायचं की माथेरान बघत दस्तुरी ना़क्यावरुन टॅक्सी करुन नेरळ गाठायच या विचारात होतो.. तोच रोमाने बाँब टाकला.. 'पेब किल्ला करु.. वाट सरळ आहे.. मॅपवर पाहिलय.. वगैरे वगैरे'.. बघू कस काय ते म्हणत मी कानडोळा केला.. त्या मकेवाल्याला विचारल तर त्याने दुजारा दिला की लांब आहे पण वाट ठळक आहे.. सरळ चालत रहा.. पुढे मार्केटजवळ रेल्वेची पटरी लागेल.. तिथून पुढे अगदी कड्यावरचा गणपती दिसेपर्यंत चालत रहायच.. दिड दोन तास लागतील.. !

आम्ही चालायला घेतले... लाल मातीच्या पायघडया घातलेली वाट... दुतर्फा असलेले भले मोठे वृक्ष... अधुनमधून लागणारे धुक्याचे साम्राज्य.. नि त्यात रानकिटकांची सततची चालू असणारी किर्रर्र पिपारी.. बाकी सगळ शांत... एखाद दुसर जोडपं वा फॅमिली ग्रुप सनसेटपॉइंटकडे जाण्यास निघालेला... अन्यथा आम्ही तिघचं.. कदाचित दुपारची वेळ म्हणुन कोणी फिरकल नसेल..

- - -

काही अंतरावर डिजेचा आवाज ऐकू आला तसा पार मुडच बदलून गेला.. त्या शर्यत आयोजकांनी डिजे सुरु ठेवला होता.. असो पुढे मार्केट येइपर्यंत पुन्हा धुक्यातला रस्ता.. मार्केट आले तसं दुकानांची रांग सुरु व आमचा खाण्यासाठी हॉटेल शोध सुरु.. रविवार तेव्हा कोंबडीशिवाय पर्यायच ठेवला नाही.. हॉटेल'रुचिरा' मध्ये हंडी मस्तपैंकी हादडली नि तृप्त ढेकर दिला.. म्हटल बस्स झाला.. आता थोडसं फिरुन घरी.. ! पण रोमा तो रोमा.. पेब करुयाच म्हणू लागला.. विनायक पण आग्रह करु लागला.. म्हटल 'दोन वाजुन गेलेत.. भारी पडेल.. एकतर मस्त जेवलोय.. !' पण रोमा फॉर्मात.. होइल म्हणून.. फक्त एका सोप्याश्या ट्रेकचा अनुभव गाठीशी असुनही विनायक पण जाऊच म्हणत होता.. त्याला म्हटलं जल्ला या रोमाच्या नादी लागू नकोस.. तुलाच भारी पडेल.. !! शेवटी काय खूप धावपळ होणार म्हणत नाईलाजाने चला जाऊ म्हटले.. !!! काय करणार जल्ला अजूनही हंडी चे ढेकर देत होतो..

मार्केट सोडण्यापुर्वी रोमाला प्लॅस्टीकच तात्पुरता रेनकोट नि आम्हाला दोन गोल टोप्या 'इतकी' शॉपिंग केली.. घोडेवाले विचारत होते किधर जाना है.. आता काय त्याला विचारायचं पेबला नेणार म्हणून..

एव्हाना ट्रेनच्या टपरीवरुन झपाझप पावलं टाकत सुटलो.. मघाशी सनसेट पॉइंट्वरुन येताना दिसलेलं गर्दीवजा माथेरान नि इथल गडबड-गोंधळ करणार्‍या गर्दीने ओसंडून वाहणार माथेरान.. किती तो फरक.. ! धुक्याचा प्रभाव नव्हता पण पावसाळी काळोख जाणवत होता.. अधुन- मधून एखादी सर येउन जात होती..

वाटेत भेटलेली टोळी..

ह्या ट्रेनच्या मार्गावरुनच आम्ही पेब किल्ल्याच्या वाटेला जाउन मिळणार होतो म्हणुन निश्चिंत होतो.. पण वेळ कमी होता.. आमच्या आडवी येणारी गर्दी ही फक्त अमन लॉज वा दस्तुरी नाक्यापर्यंतच असणार होती..! झालही तसच.. तिथवर आलो नि गर्दी सरली.. पण पावसाची भली मोठी सर येउन गेली.. !

आता रुळाच्या पटरीवर फक्त आम्ही तिघच नि सोबतीला चिंब निसर्ग.... झाडांमधून पावसाच्या टिपटिपणार्‍या थेंबांचे साग्रसंगीत फक्त सुरु होत.. त्या घनदाट झाडीतून रेल्वेरुळाचा मार्ग लवकरच उजेडात येताना दिसला.. समोरच एका बाजूला आजारी असलेला बिचारा घोडा तसाच सोडून दिलेला दिसला.. ! फोटोसाठी चांगल वाटल होत पण तो आजारी आहे ते जवळ गेल्यावर कळल..

- - -

आता अगदी नयनरम्य सफर सुरु झालेली.. ट्रेनचे ते छोटेखानी रूळ डोंगरकड्याला मस्तपैकी वळसे घेत घेत पुढे जात होते.. कधी ढगांच्या धुक्यातून तर कधी भर पावसात आमचं मार्गाक्रमण सुरु होत.. भवताली हिरवाकंच निसर्ग.. डाव्या बाजूच्या दरीत घुसळणारे ढग.. तर उजव्या बाजूच्या कडयावरुन कोसळणारे शुभ्र पाणी... प्रत्येक टप्पा थांबून आस्वाद घ्यावा असा.. मनात आलं की पेब किल्ला नाही झाला तरी चालेल.. पण आस्वाद मन भरेपर्यंत घ्यायचा..! आमचा फंडाच तो..

- - -

- - -

त्यात भर म्हणून गर्द निळ्या जांभळया रंगाचे पक्ष्याचे जोडपे बागडताना दिसले.. हाच तो शिळकरी कस्तुरी.. इतकी वर्षे सदैव हुलकावणी देत असलेला हाच तो पक्षी.. योगायोग म्हणावा तर धुकसुद्धा आजिबात नव्हते.. अगदी स्पष्टपणे त्यांची हालचाल दिसत होती.. जवळपास घरटं असावं कदाचित.. आता पुन्हा अंधारून आलेले.. पुन्हा एक मोठी सर.. सुकलेलं अंग पुन्हा चिंब.. पण आम्ही चालतच होतो.. हवं तिथे मनसोक्त थांबायचं नि मग वेगात पुढचं अंतर गाठायचं.. असच काहीस सुरु होत..

आता पाऊस नुकताच थांबलेला.. आकाशाला पहिल्यांदाच ढगांपासून थोडी फुरसत मिळालेली.. पण ढग मात्र फिरस्ते बनून आजूबाजूच्या डोंगररांगेवर रेंगाळत होते.. संध्याकाळचा सूर्यप्रकाश अगदी ताजातवाना भासत होता.. त्यातच आमचे लक्ष दरीच्या पल्याड दिसणाऱ्या डोंगराकडे गेले.. एक टोक ढगांच्या फटीतून बाहेर आलेले...

हाच तो माथेरानचा सनसेट पॉईंट. सकाळी त्या टोकावर होतो आणि आता इथवर मजल मारलेली.. त्या डोंगराच्या मागेच मग कलावंतीण व प्रबळगड यांच्या मधला V दिसू लागला... बरीच उघडीप मिळाली म्हणून वातावरण स्पष्ट होत चाललेले.. म्हटलं मस्त.. पुढे काही अंतरावरच अचानक बाप्पा समोर आले.. ! इथला प्रसिद्ध कड्यावरचा गणपती निसर्गराजा.. !!

- - -

अरे काय ती कलाकृती.. उभ्या कातळकड्यालाच तसा आकार देऊन रंगरंगोटी करून हा भलामोठा बाप्पा साकारलेला.. ! हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे बाप्पा खूपच गोड वाटत होते..! बरं तुम्ही पुढे चालत गेलात तरी बाप्पा तुमच्याकडेच लक्ष ठेवून आहेत असच भासत.. बाप्पापुढे नतमस्तक होण्यासाठी आम्ही वाट सोडून खास खाली उतरलो नाही.. इथूनच दर्शन घेत पुढे निघालो.. पुढे एक वळण पार केले व पेब किल्ल्याचा डोंगर समोर आला.. तिथून थकलं भागलेलं पब्लिक वर चढत येताना दिसलं..

पेबचा किल्ला आता समोर उभा.. त्या डोंगरावर तर ढगांना उधाण आलेले.. माथा दिसत नव्हता.. आमची उत्सुकता ताणलेली.. आतापर्यँत धरलेली रुळाची वाट सोडली नि खालच्या बाजूस जाणाऱ्या वाटेने उतरायला घेतले.. पावसामुळे वाट ओली निसरडी होती.. पण वेळेवर सारख नजर ठेवून होतो.. उघडीप असल्याचा फायदा घेत शक्य तितके पटापट अंतर कापायच ठरलेलं.. सुरवातच शिडी उतरण्यापासून होती..

- - -

- - -

शिडी उतरुन थोड खाली गेलो की कडयाला लागूनच वाट पुढे पेब किल्ल्याचा डोंगर व माथेरानचा डोंगर यांच्यामध्ये आणून सोडते.. तिथे पलीकडच्या दरीत तर ढगांना पुर आलेला.. वाफाळलेले ढग अगदी मुक्त विहार करत होते.. वार्‍याचही धुमशान सुरु होत.. त्या वाऱ्याच्या तडाख्यामुळे पेब माथ्यावरच्या ढगांचा मुक्काम हलला व नव्याने बांधलेल्या मंदीराचा कळस नजरेस पडला.. कसलं अप्रतिम दृश्य वाटलं... अगदी फिल्मी.. !!

आमची ओढ आणखीन वाढली.. अडथळा फक्त समोरुन येणार्‍या थकल्या भागल्या जीवांचा... आम्हाला केविलपणे विचारत होते 'और कितना दूर है दस्तुरी नाका..' आणि आम्ही आता पेब करुन नेरळच्या बाजूने उतरणार ऐकून पण आश्चर्यकारक भाव देत होते. !

पुढे गेलो..पेब किल्ल्याच्या डोंगराला हात घातला देखील.. कुठल्याही क्षणाला पाऊस येइल अस वातावरण होत.. डोंगराच्या एका बाजूची दरी ढगांनी तुडूंब भरलेली होती.. थोड वर चढून मागे वळून पाहिल तर माथेरानचा हिरवा डोंगर पश्चिमेकडून येणार्‍या सुर्यकिरणांनी उजाळला होता.. ऊन- पाऊस यांचा सुंदर मिलाफ साधला जात होता..

आता आमची वाटचाल डोंगराच्या दुसर्‍या बाजूने म्हणजे जिथे ढग येउन धडकत होते तिथून होती.. कातळकड्याच्या बाजूने.. पुन्हा अचानक अंधारून आले.. अगदी अडचणीच्या ठिकाणी जोरकस पाऊस सुरु झाला.. जिथे वाट अगदी कड्याला बिलगून.. अरुंद अशी व पुढे तटबंदीवर चढून जाण्यास बुरुजाच्या आधारावर एकावर एक अश्या दोन शिडया बसवल्या आहेत..

काही क्षणातच पावसाचा जोर ओसरला नि आमच्या पथ्यावर पडले.. आता कुठे सुकत असंणारे कपडे पुन्हा चिंब चिंब.. ! गंमतच सुरु होती.. एव्हाना आमच्या कंपुतला विनायक या वातावरणात वारंवार होणारा बदल, शिडयांची वाट हे सगळे बघून भारावून गेला होता.. थोडा गंभीरही झाला होता.. !! शिड्या पार.. चढण पार.. नि आम्ही पेब किल्ल्यावर.. !! पेब माथ्यावर बांधलेल्या मंदीराकडे जाण्यास फारसे उत्सुक नव्हतो.. कारण आतापर्यंतच्या वाटचालीत निसर्गरुपी देव दिसतच होता.. !

अंगावरचे ओले कपडे, विंडचिटर, सॅक अस सगळ काढून शरीर हलक करुन आम्ही शांत बसलेलो.. समोर असणार्‍या तटबंदीपलिकडचा माथेरान डोंगर अगदी नाकासमोर.. पण अर्ध्याहून अधिक भाग शुभ्र मेघांनी गिळंकृत.. बेभान वार्‍यात आम्हीदेखील बेहोश होउन गेलेलो... !


(यांतच आमचा देव, धर्म, सुख-समाधान, शांती वगैरे दडलेलं... !! )

जेवल्यानंतर सुरु केलेली घोडदौड इथवर येइपर्यंत सुरुच होती.. इथेच मग पेटपुजा करुन घेतली.. नाही म्हटल तरी रोमा व मला जास्त आनंद झालेला.. दोन वर्षापुर्वी एका छोट्या चुकीमुळे आमचा पेब किल्ला हुकला होता.. धबधब्याच्या वाटेने जाऊन सुरवातीलाच चुकलो होतो.. आणि आज अगदी मोठा पल्ला पार करुन आलेलो.. इथेच मग रोमाच्या नविन मोबाईलमधून वाया सेल्फी ग्रुप फोटो झाला..

आटपायला घेता घेता रोमा म्हणाला मंदीरापर्यंत जाऊ.. पण मी तो प्रस्ताव सरळ धुडकावून लागला.. आता वेळेला महत्व होते.. संध्याकाळचे साडेपाच वाजुन गेले होते चक्क... !! अंधार पडायला एक तास पकडून चाललो तोपर्यंत पलिकडे उतरण गरजेच होत.. पाऊस अधुनमधून डोकं वर काढत होता.. त्याने अंधारुन आणल तर आमची पंचाईत होणार होती.. रोमाने नकाशा बघून ठेवलेला आणि पलिकडच्या म्हणजेच नेरळहून येणार्‍या वाटेचा अर्ध्यापर्यंत तरी आम्हाला वाटेचा अंदाज होता तेव्हा तिथपर्यँत पोहोचण्यासाठी पटापट लेटस गो केल..

निघताना कडेला एका बाजूस बैल दिसला.. आम्ही गांगरुन गेलो बैल इथवर आला कसा.. ! म्हटलं आम्ही आता जिथून उतरणार होतो त्या वाटेने आला असेल.. पण या वाटेलासुद्धा शिडी व एक छोटा कातळटप्पा लागतो.. असुदे.. आम्हाला जास्त डोकेफोड करायला वेळ नव्हता.. आम्ही आता माथ्याच्या डाव्या बाजून पुढे सरकलो.. नशिबाने पावसाने विश्रांतीचा वेळ लांबवलेला.. सुर्याने आता पश्चिम क्षितीजपटलावर उतरायला घेतलेले.. त्याच्या किरणांनी आजुबाजूचे चिंब डोंगर मस्तच चमकत होते.. वाट संपुर्ण कडयाच्या एका बाजूने वेगवेगळे नजारे दाखवत पुढे नेत होती.. काही अंतरावरच उजव्या बाजूला गडावरील पडक्या वास्तूचे अवशेष दिसून आले.. सारं काही हिरवी वस्त्र नेसून नटलेलं..

- - -

अजुन पुढे आलो नि डोंगररांगेचा पसारा नजरेत भरला...वाटेचे स्वरुप ओलाव्यामुळे थरारक वाटत होते.. कोरलेल्या पायर्‍या.. वरुन घरंगळणारे पाणी... एका बाजूला पाण्याचे टाके.. नि एका उभ्या तटबंदीवरुन उतरायला काटकोनात असलेली भक्कम शिडी.. !! शिडीवरुन पाणी पडत होतेच.. तेव्हा उतरताना पुन्हा सुक्याचे ओले झालो.. या क्षणाला विनायक तर एकदम चाट पडला होता.. म्हटलं एन्जॉय !!

- - -

वाट दिसतेय का ??

- - -

- --

याच वाटेवर एक गुहा आहे पण आता वेळेअभावी टाळून आम्ही त्या गुहेखालच्या वाटेने गेलो.. त्या वाटेवर थर्माकोल, प्लास्टीक बॉटल वगैरे कचरा बघून त्या गुहेत गेलो नाही तेच बर झालं अस वाटून गेलो.. कितीतरी वेळेने असा दिसणारा कचरा एकदम खटकून गेला..

ढगांनी पुन्हा आसमंत व्यापून टाकला.. अंधारुन आल तस आमच थोड टेंशन वाढलच.. अजुन एक कातळटप्पा लागेल मग पटापट घोडदौड होइल असा अंदाज होता.. शेवटी तो कातळटप्पा आला.. अंगावर येणारा कातळ पुढे आल्याने चढता उतरताना थोडस अवघड होउन बसत.. पण एक दोरखंड बोल्ट मारुन लावून ठेवलाय तेव्हा काळजीपुर्वक उतरले की सोप्प होउन जात.. पाउस कोसळण्याअगोदर आम्ही तोही टप्पा उतरुन घेतला नि एकदम हायस वाटलं...

आता खिंडीत येउन पोहोचलो तेव्हा खूपच अंधारुन आलेल.. सरळ वाटेने न जाता आम्ही उजवीकडच्या वाटेला उतरलो.. !! नि धुमशान पाऊस सुरु झाला.. ! अंधाराच संकट जाणवू लागल.. टॉर्च होती सोबतीला.. पण पावसात जंगलातून खडकाळ वाट उतरताना अंधार नसलेला बरा म्हणून आटापिटा सुरु झाला.. काही करुन वाट चुकवायची नव्हती नाहितर वेळेच समिकरण चुकल असत.. नि अंधारात फसायला झाल असत.. मोबाईल, कॅमेरे सगळ बंद करुन फक्त वाटेवर ध्यान देत उड्या मारत पटापट खाली उतरायला घेतले.. इथून पुढची सरळ अशी वाट नव्हती.. झाडी-झुडुपांतून, खडकांमधून मार्ग काढत उतरत होतो.. आमच नशिब चांगल होत की नवख्या विनायकने दम सोडला नव्हता.. थोडा स्लो होता पण सातत्य होते.. (एव्हाना कशाला रोमाच्या नादी लागलो म्हणत असणार).. वाट शोधण्यात वेळ जाउ नये म्हणून मी पुढे जाउन वाटेचा अंदाज घेत रोमाला कॉल देत खाली सरकत होतो.. वाटेतच एक ओसंडून वाहणारा धबधबा लागला.. रोमाला ठाउक होते तो ओलांडून वाट आहे.. बस्स.. तिकडेच आता चुकण्याची शक्यता उरली होती.. धबधबा ओलांडून गेलो नि बर्‍यापैंकी म्हणावी अशी पायाखालची वाट सुरु झाली.. नि सुटकेचा निश्वास टाकला.. पावसानेही धुमशान आवरते घेतले होते.. अखेरीस आम्ही दिडवर्षापुर्वी जिथवर येउन मागे फिरलो होतो त्याच पठारावर पोहोचलो... अंधार पडण्याआधी न चुकता इथवर येण गरजेच होतं तेव्हा सर्व अनुभव पणाला लावून उतरलो होतो.. डोक्यावर आलेलं दडपण अचानक नाहिस झालं.. ! आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन दोघांना लाखोली पण वाहिली.. हवा होता ना पेबचा ट्रेक.. घ्या ! खर तर कुठली अडचण न होता ट्रेक होइल याची खात्री होती.. पण कुठलीच चिंता,त्रास न घेता खर तर मला आरामशीर ट्रेक करायचा होता.. ठरलेही तसच होत.. पण रोमाचा उत्साह नि विनायकची उत्सुकता.. कामाला लावलं.. जल्ला पोटातल चिकन हंडी पण कधीच पचली..!! असो या ट्रेक निमित्ताने रोमा व माझ्याकडे असलेल्या अनुभवाची एक उजाळणी झाली.. तर विनायकला आतापर्यँतची वाटचाल अविश्वसनीय वाटत होती..

आम्ही आता कुठेही न थांबता सरळ उतरायला घेतले.. नाही म्हटलं तरी अजून बरंच खाली उतरून जाण बाकी होत.. परत तिथून वाहन मिळालं तर ठीक नाहीतर असह्य तंगडतोड पक्कीच.. काहीही म्हणा हा शेवटचा टप्पा खूप रटाळवाणा ठरतो.. अंधुकश्या प्रकाशात उर्वरीत टेकाड उतरेपर्यंत सात वाजून गेले.. मागे वळून पाहिले तर पेब किल्ल्याच्या डोंगरावर ढगांनी मुक्काम ठोकला होता.. काहीच दिसत नव्हतं.. दिवसभर दिलेली साथ कमी म्हणून की काय आता पाऊस गावापर्यंत सोडायला आला.. सर्वांग त्या मुसळधार पावसात चिंब होऊन गेलं.. म्हटलं अश्या पावसात आता वाहन मिळणं पण मुश्किल.. अंधारही पडला.. गावात इथं तिथं फिरताना अचानक रिक्षा सामोरी आली व जीव भांड्यात पडला..

तिघंही तसेच सॅक न काढताच दाटीवाटीने बसलेलो.. बाहेर पावसाचं धुमाशान सुरूच होत.. या पावसापुढे सुके कपडे सॅक मध्ये असुनही बदलता नाही आले.. रिक्षामध्ये बसल्या बसल्याच त्या चालकाचे आभार मानले.. त्याच्याशी गप्पा सुरु झाल्या तेव्हा कळले त्या गावापुढेच जवळ धबधबा आहे तिथे रिक्षावाले उभे राहतात.. आम्ही गडावर गेलेलो समजल्यावर त्याने गडाच्या गप्पा सुरु केल्या व विचारले वरती बैल दिसला का.. ? आम्ही पण चमकून विचारले 'हा तो तिकडे कसा आला शिडी वगैरे असताना..' तेव्हा कळले वासरू असतानाच त्याला वरती नेलेले व तिकडेच ठेवलं.. तो मारक्या बैल आहे, जवळ गेलात तर अंगावर धावून येतो ही अतिरिक्त माहिती मिळाली... वाईट वाटलं.. मारक्या होणार नाही तर काय. एकटा जीव त्या डोंगरावर फिरून फिरून किती फिरणार.. त्याचे सवंगडी नाही वा कुणी नाही.. मग चिडचिड्या होणार नाही तर काय होणार...

आमची रिक्षा आता नेरळ स्टेशनाजवळ पोहोचलेली.. प्रत्येकी फक्त वीस रुपये घेतले.. भलतंच स्वस्त नि मस्त पडलं. कारण आमची अवस्था बघता त्याने रु. २००/- मागितले असते तरी दिले असते..रात्री ८.१० ची सीएसटी फास्ट लागली होती.. अंगावरच्या ओल्या कपडयातच तिकीट काढून फलाटावर आलो.. आणि चाटच पडलो.. गर्दी असेल अंदाज होता पण एवढी पहिल्यांदाच बघत होतो.. धक्काबुक्की करत कसतरी पुढे आलो.. सगळा पिकनिक ग्रुप नि हा कावकाव गोंधळ.. म्हटलं काही खरं नाही.. रोमाला तर घरी (ठाण्याला) जाऊन कामावर नाईट शिफ्ट ला निघायचं होत.. भिवपुरी, कर्जतच्या पिकनीक व ट्रेक पब्लिकनेच भरुन आलेल्या दोन ट्रेन आल्या व गेल्यापण.. आमच्या फलाटावरील गर्दी तशीच.. कुणाला साध लटकता पण आलं नाही... शेवटी सगळा पब्लिक समोरच्या फलाटावर कर्जतला जाऊन परत येण्यासाठी गेला.. ट्रेन आली व गर्दीतही आम्हा तिघांना अगदी एकत्र बसायला।मिळाले.. कपडे बदलायला संधी मिळालीच नव्हती व आता ओल्या कपडयातच परतीचा प्रवास सुरु झालेला.. उशीर झाल्यामुळे रोमा तर थेट अश्या अवतारातच कामावर जाणार होता. जल्ला किती ती मस्ती.. ! विनायकला एव्हाना कळून चुकलं होत ही भटकंतीसाठी झपाटलेली भुतं आहेत..!

करायला गेलेलो आरामशीर भटकंती पण झाला नेहमीसारखा टिपिकल एकदिवसीय ट्रेक.. पाऊस, धुकं यामुळे मात्र काय म्हणतात ते thrilling प्रकार थोडाफारं वाढलेला... लांबचा पल्ला केल्याने चांगलाच व्यायम घडला.. पण या ट्रेकमुळे पूर्णतः समाधानी झालो होतो.. फक्त ट्रेकच नाही तर बरच काही अनुभवलं.... निसर्गाच्या सौंदर्यात तर अगदी हरखून गेलो होतो.. सोबतीला पाऊस.. पुन्हा एकदा कसलेही उद्दिष्ट न ठेवता इथे भटकायला यायला पाहिजे असं मनात आलं..मग लक्षात आलं की अजून हाश्याची पट्टी, उंबरडेेवाडीतून येणारा शिवाजी लेडर रुट, गार्बेट पॉईंट, वन ट्री हील इति माथेरान चढून जाणाऱ्या अनेक वाटा पालथ्या घालायच्या आहेत.. ! सो पुन्हा येऊ लवकरच.. !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलंय (नेहमीप्रमाणेच)

योग्या काही फोटो दिसत नाहीत.>>>>> हो रे, ५-६ च फोटो दिसत आहेत. Sad

ट्रेक वर्णन अतिशय आवडले,
मात्र पहिला सोडून एकही फोटो दिसत नाही. :

यो, फोटो गंडले रे...
आम्ही पेब केला तेव्हा आम्हाला पहिल्या शिडिवरुन परत यावे लागले होते....भरपुर Landslide झाला होता...२६ जुलै च्या पावासामुळे....

यो भारी लिव्हलयस...चाबुक..
फोटो दिसत नसले तरी तुझ्या लेखणीने आणि अनुभवले असल्यामुळे डोळ्याम्होरं समद उभ राहिल.

उलट ट्रेक बरा पडतो.अगोदर पेब नंतर माथेरान.फोटो असे माथेरानचे खास येत नाहीत कारण डोंगरास विशिष्ट आकार नाहीये.अनुभवयाला मात्र छान आहे धोधाणी ट्रेक.

आता दिसतायत सगळे फोटो . मस्त लिखाण आणि वर्णन ही. हे असे लेख वाचले कि हे सगळं न अनुभवल्यामुळे आपण किती काही मिस केलय आयुष्यात अस वाटत पण त्याच वेळी अशा लेखांमधून प्रत्यक्ष नाही पण निदान वाचनानंद घेऊ शकतो त्याचा. धन्यवाद यो . असेच अजून सजून लेख येऊ देत .

सुंदर लेख आणि फोटो.

असे लेख वाचले कि हे सगळं न अनुभवल्यामुळे आपण किती काही मिस केलय आयुष्यात अस वाटत पण त्याच वेळी अशा लेखांमधून प्रत्यक्ष नाही पण निदान वाचनानंद घेऊ शकतो त्याचा. धन्यवाद यो . असेच अजून सजून लेख येऊ देत>>>>>>>>.+१

मस्तच लेख. फोटोपण भारी...
सोसाट्याच्या पावसाळी वार्‍यात झुकलेले झाड बघून हॅरी पॉटरच्या Whomping Willow ची आठवण आली..
तो फोटो भन्नाटच.....

Pages