७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू

Submitted by मनोज. on 25 August, 2016 - 02:49

************************

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

भाग ३ - पानिपत

भाग ४ - चंदिगड आणि मनाली

भाग ५ - रोहतांग आणि केलाँग

************************

गॅरेजवाल्याने नीट निरीक्षण केले आणि बोलता झाला...

"आपकी तो टंकी फट गई है..!!"

मी : ऑ..??????? आता काय करायचे..??

यावर तोच म्हणाला.. कोई चिंता नही.. ठीक करवाएंगे. एमसील लगाएंगे तो ठीक हो जायेगा. पिछले हफ्ते दो गाडीयां ऐसीही आयी थी.. टंकी का प्रॉब्लेम है बुलेट को. और आप टंकी फुल करके चलाये हो रोहतांग में.. हो जाता है कभी कभी..

मी बर्र म्हणालो. (दुसरे काही म्हणण्यासारखे नव्हतेच.)

त्याने गॅरेजमधल्या बाटल्या आणि कॅन शोधून शोधून सगळी टाकी रिकामी केली. नंतर टाकीचे लीक चेक केले आणि गॅरेजमध्ये एमसील शोधू लागला. बराच वेळ एमसील सापडले नाही म्हटल्यावर रोहित एमसील घेवून आला.
टाकीला एमसील लावले आणि "डेड घंटेमे उसका पत्थर होनेके लिये" टाकी आणि गाडी त्याच्याकडे ठेवली व परतलो.

दीड तासांनंतर रात्री साडेदहाच्या दरम्यान त्याच्याकडे एक चक्कर मारली तर गॅरेज बंद..!!! गाडीही दिसत नव्हती. त्याला फोन केला तर म्हणाला "अब तक सुखा नही हैं.. कल देखेंगे" मग पुन्हा हॉटेलवर परतलो आणि उद्या काय ते बघू असा विचार करून झोपलो.

सकाळी उठलो.. आवरले, सामान रात्रीच आवरून ठेवले होते. पहिला गॅरेजवाल्याला गाठले तर पठ्ठ्या पुन्हा गायब. फोनही बंद. नंतर थोड्या वेळात साहेब उगवले. टाकी झाली म्हणून सांगितले. गाडीला टाकी जोडली. मी पण आनंदात सामान गाडीवर लोड केले सहज म्हणून टाकीखालून हात फिरवला तर पेट्रोलचे थेंब पुन्हा हजर होतेच.

परत त्या हिरोला शोधले आणि टाकी नीट झालेली नाही असे सांगितले.

आता जे होईल ते होईल असा विचार करून लेह गाठायचे तिघांनी ठरवले. फक्त वाटेतला सरचू किंवा जो असेल तो थांबा वगळून सरळ लेहला जावूया असाही प्लॅन झाला.

केलाँगमधील सकाळ..

..

निरभ्र, स्वच्छ, प्रदुषणाचा लवलेशही नसलेले वातावरण..

.

केलाँग मधून बाहेर पडल्यानंतर लगेचच ट्रॅफिक जाम लागले. Wink

.

स्टिंगरी किंवा जिस्पाचा चेक नाका..

.

तेथून दिसणारा पुढचा रस्ता..

.

रोहतांग ते लेह हा रस्ता म्हणजे एक प्रकारचे मेडीटेशन आहे.. हा रस्ता थोड्या थोड्या वेळानंतर एका उंचीवरच्या "ला" जवळ नेतो. (ला म्हणजे खिंड)
खिंड चढताना वातावरणात बर्फाळ रखरखाट असतो. खिंडीत सोसाट्याचा वारा आणि सभोवताली सफेद बर्फ. एकंदर या रस्त्यावर आजुबाजूला मातीचे डोंगर आणि दगडधोंड्यांशिवाय काहीही नसते आणि यात भर पडते ती खराब रस्त्याची. मैलोन्मैल आपले सोबती सोडले तर मनुष्यवस्तीची चाहूलही दिसत नाही. चुकून काही झाले आणि रात्री तेथे मुक्काम करावयाची वेळ आली तर शेकोटीसाठी जळणही मिळणे शक्य नाही इतका खडतर परिसर.
अरे हो.. आम्ही सोबत असावेत म्हणून नेलेले सिगरेट लायटर तेथे पेटलेच नाहीत. ऑक्सीजनची कमतरता इतकी होती की शेकोटीसाठी नेलेले ते लायटर तसेच परत आले..

आम्ही चेकनाक्यावर नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू केला..

.......

हिमालयात प्रवास करताना सकाळी जितक्या लवकर प्रवास सुरू करू तितके चांगले असते कारण सुर्यकिरणे बर्फावर पडली की बर्फाचा वरचा थर वितळतो आणि ते बर्फाचे पाणी रस्त्यावर येते.

असाच एक पाण्याचा टप्पा पार करताना - विजय

.

आणखी पुढे..

.

या पाण्याच्या टप्प्यांमधून जाताना पायावर पाणी उडणे टाळता येत नव्हतेच.. त्यातही बर्फाळ वातावरण आणि गारठलेले पाय यांमुळे पायाच्या संवेदना जावू लागल्या. शेवटी एका ठिकाणी मी गाडी थांबवली व बुट आणि मोजे काढून पायाला प्लॅस्टीक पिशव्या घातल्या.. त्यावर मोजे व त्यावर बुट घातले.

असाच एक टप्पा पार करताना शेजारून आर्मीची जिप्सी जोरात गेल्याने विजयला बर्फाळ पाण्याने आंघोळ झाली होती. त्यानेही भिजलेले कपडे बदलले.

थोडे पुढे आलो तर एका जवानाने हात केला. थांबा म्हणून.. काम सुरू असल्याने हा रस्ता बंद होता.

BRO चे जवान अथक परिश्रम करतात म्हणून तेथून गाडीतरी जावू शकते अन्यथा तेथील लोकांची काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करू शकत नाही.

.

येथे बंदोबस्तावर असलेल्या जवानाकडे बघत गाडी थांबवली तर साहेबांनी शिवाजी महाराजांचे चित्र छापलेले आणि "जय जगदंब लिहिलेले जर्किन घातले होते..

मी सरळ मराठीतच "कुठले गांव साहेब..?" अशी सुरूवात केली. ते अकोला साईडचे होते. नंतर टँकर बाजूला होईपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारत बसलो.

खाली फोटोमध्ये लाल स्विफ्ट दिसत आहे ती पण आमच्या मागे येवून थांबली होती. MH 14 पासिंग म्हटल्यावर बाकरवडीचा पुडा तसाच हातात घेवून विजय तिकडे गेला. त्या काकांची ओळख झाल्यावर निव्वळ हेवा वाटला.

भिडे काका, वय वर्षे ६८. त्यांच्या पत्नीसह लेह ला चालले होते. दोघेच..!!
हाईट्ट म्हणजे ते पुण्यातून बाहेर पडून ४५ दिवस झाले होते आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ते पुण्यात परतणार होते.

__/\__

.

अशाच एका ठिकाणी..

.

अशा रस्त्यावर गाडी चालवायला जाम मजा येत होती...

.

विजय आणि रोहित..

.

थोड्या वेळाने आर्मीचे अजस्र ट्रक समोरून येवू लागले.

.....

दिपक ताल..

.

मेडीटेशन कंटिन्यूड...

..............

थोड्या वेळानंतर गाटा लूप्सची सुरूवात झाली..

....

येथे कोणीतरी प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या जमवून ठेवल्या होत्या.

.

गाटा लूप्स मध्ये शॉर्टकट मारताना विजय. वर डाव्या कोपर्‍यात रोहित.

.

विजयच्या मदतीला गेलेला रोहित. येथे विजयची गाडी मातीत अडकून बसली. ती निघेपर्यंत आमची सर्वांचीच भरपूर दमछाक झाली.

.

यथावकाश पांगला पोहोचलो. पांगला अंड्याच्या मॅगीवर ताव मारला. येथून पुढे रस्ता चांगला आहे असे कळाले होते.
तेथे पण एक मजा झाली. पांगच्या थोडेच अलिकडे एक BRO चे अजस्त्र मशीन ट्रकवर चढवून ठेवले होते. त्याच्याशेजारी एक जण उभा होता. मी आपसूकच शेजारून जाताना हात केला, त्यांनीही हात केला. गाडी तेथून पुढे जाताना त्या बर्‍यापैकी वेगात होती तरी त्यांनी हात उंचावून दिलेल्या शुभेच्छा ऐकू आल्या.. "जय महाराष्ट्र"

मी गाडी ब्रेक मारून थांबवली आणि वळवून त्यांच्याकडे गेलो. ते साहेब बुलढाणा साईडचे होते. त्यांनीच नंतर रस्त्याबद्दल माहिती दिली.

पांग नंतर मूर प्लेन्स सुरू झाले. मूर प्लेन्स म्हणजे त्या उंचीवर सलग ४० - ४५ किमीचा सरळसोट रस्ता आहे. जो पुढे टांगलांगला जवळ संपतो.

...

मूर प्लेन्स मध्ये ऊन असले तरी प्रचंड थंडी होती. त्यात वार्‍यामुळे थंडीची जास्त जाणीव होत होती. हात बधीर झाले म्हणून शेवटचा उपाय म्हणून मी गाडीचा सायलेन्सर पकडून रस्त्यावरच बैठक मारली..

.

दिवसभरातली आणखी काही क्षणचित्रे..

......

यथावकाश संध्याकाळी उपशी ला पोहोचलो. तेथील चेकनाक्यावरच्या मुलाने आणखी १५ किमी पुढे, "कारू" ला जावा, तेथे मुक्कामाची सोय करून देतो असे सांगितले व आमच्या समोर हॉटेलमधल्या त्याच्या मित्राला फोनही केला.

..

कारूला पोहोचलो.. तेथे ठीकठाक रूम मिळाली, रोहित जेवणार नव्हता. मी आणि विजय बाहेर पडून राईस आणि डाळ पोटात ढकलून आलो.

आंम्ही जेथे राहिलो होतो तेथे अनेक उद्योग एकाच इमारतीत सुरू होते. मुक्कामासाठी खोल्या होत्या. एक रेस्टॉरंट होते, तेल कंगव्यापासून खेळणी बिस्कीटे विकणारे एक दुकान होते आणि ३ लोक चक्क ठक ठक करत चांदी घडवत बसले होते.

रात्री १०:१५ वाजले तरी त्यांची ठक ठक बंद होईना म्हणून मी सहज बाहेर डोकावलो तर एक आमच्यासारखेच एक टूरिस्ट काका दोन तीन जणांना सोबत घेवून त्या सगळ्या उद्योगधंद्यांच्या मालकाशी जोरजोरात वाद घालत होते. त्यात ते रोहतांग-लेह प्रवासाला वैतागलेले दिसत होते. "दिनभर पहाडी पार करके ये ठक ठक सुनने के लियें यहाँ आये है क्या??" अशी वाक्ये ऐकू येत होती.

काय सुरू आहे ते बघायला मी त्या काऊंटरकडे गेलो. त्यात मी राजमार्गाने न जाता खोल्यांच्या पॅसेजमधून मागच्या दारासारख्या रस्त्याने गेल्यामुळे धास्सकन काऊंटरजवळ पोहोचलो.

अचानक हा कोण आला अशा अर्थाची एक विचित्र शांतता पसरली. (आंम्ही रूम बुक करताना तो मालक तेथे नव्हता)

मी हळूच मालकाला विचारले.. "भाई ये ठक ठक कब बंद होगी..??"

अचानक एखाद्या धाग्यावर मोदींचे नांव यावे आणि प्रतिसादांचा धबधबा सुरू व्हावा तसे ते काका आणि त्यांचे सोबती उसळले.. "देखो देखो.. इनको भी तकलीफ हो रही है..!!" असा दंगा सुरू झाला.

...आणि शेवटी त्या ठकठकवाल्यांची हातोडी म्यान झाली. Lol

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. तुमची फोटो देण्याची शैलीही तुमच्या वर्णनाइतकीच बोलकी आहे.

आणि हो, मेडीटेशन चपखल शब्द आहे तुमच्या प्रवासाकरता.

मेडीटेशन चपखल शब्द आहे >> अगदी.

गाटा लुप्सला ज्या बाटल्यांचा खच दिसतो त्या स्पॉटवर एका ट्रक क्लिनरचा एका ऑक्टोबरच्या थंडीत भुक आणि पाणी न मि़ळाल्याने मृत्यू झाला होता. काही जणांचा दावा आहे की तो वाटेतील लोकांकडे पाणी मागतो. त्यामुळे बहुतेक वाटसरू तिथे पाण्याच्या बाटल्या सोडून जातात.. खखोदेजा.

सहीच लगे रहो.

ईद्रा- बाटल्यांचा खच बद्दल असेच काहीतरी वाचले होते.