मी मध्यममार्गी ..

Submitted by केदार जाधव on 25 August, 2016 - 01:11

मी मध्यममार्गी ..

बरेच दिवस झाले हे लिहायच होत , पण राहून जात होत . गेल्या काही दिवसात एक दोन घटना अशा घडल्या की लिहावस वाटल .

तर होतय काय की आजकाल बर्याच (सगळ्याच ? ) गोष्टींवर बहुतेकांची( ऑनलाईन असो की समोरासमोर) फार ठाम अन् अगदी काळी/पांढरी मत दिसतात . अन अशावेळी सगळ करड्/ग्रे दिसणारा मी मलाच वेगळा वाटू लागतो . अन असही नाही की मी काही विचारच करत नाही , इन फॅक्ट मला दोन्ही बाजूनी विचार तटस्थपणे करता येतो ( अस मला वाटत Happy ). उदाहरण द्यायच झाल, तर माझ्या गावी मराठा आरक्षण हे किती चुकीच आहे , आपली अधोगती आपणच करून घेतली आहे हे माझ्या चुलतभावांसमोर अगदी तावातावाने भांडताना एक वेळ खरोखरची भांडण व्हायची वेळ येते. पण त्याचवेळी पुण्यातल्या मित्रांची सगळे मराठे अगदी श्रीमंत , मस्तवान ही समजूत ( पवार काका पुतण्यांमुळे मोस्ट्ली) बदलताना मी त्यांच्याही विरूद्ध असतो . होत काय की कुणीही अगदी टोकाची भूमिका घेऊ लागला की मला पटत नाही अन मग मी सगळ्यांच्याच विरूद्ध असतो. Sad
एकाला मी भक्त असतो अन एकाला हेटर असतो . एकाला मी अगदी मराठा विरोधी अन दुसर्याला अगदी धार्जिणा असतो .

आणखी काही उदाहरणे : काही अगदी स्फोटक तर काही अगदी साधी Happy
१. दहीहंडी अन गणेशोत्सव यांचे बाजारीकरण झालय , यात वाईट गोष्टी प्रचंड प्रमाणात शिरल्या आहेत , हे मला पटत पण मग अगदीच सगळ बंद करून २० फूट अन १८ वर्षाची अट हेही पटत नाही (अगदी शाळेतल्या दहीहंडी सुद्धा बंद Sad )
२. सगळे मुस्लिम दहशतवादी हा मूर्खपणा आहे हे मला अगदी पक्क माहित आहे , पण अगदी दहशतवादाला धर्म नाही हा आंधळेपणा ही मला पटत नाही
३. मी स्वतः देव मानत नाही , कुठल्या देवाला नमस्कार करत नाही पण वारकरी म्हणजे रिकामटेकडे , देव मानणारे मूर्ख असही माझ मत नाही
४. मला स्वतःला मोदी आवडतात , मला त्यांच्याकडून बर्याच अपेक्षा आहेत , पण ते काहीच चुकू शकत नाहीत हे मला पटत नाही . त्याउलट केजरीवाल मला अजिबात आवड्त नाही , पण त्याला उगाच टारगेट केलेल ही आवड्त नाही
५. सचिन चा मी फॅन नाही , त्याला भारतरत्न देण हे मला फार आवड्ल असही नाही , पण उगाचच त्याच्या मागे लागणे , त्याने क्रिकेटसाठी दिलेल योगदान विसरण , तो स्वतःसाठीच खेळला वगैरे बरळणे हेही मला पटत नाही
६. मी स्वतः कट्ट्रर मांसाहारी आहे . पण मी शाकाहार्यांचा अगदी मनापासून आदर करतो , त्याचे कित्येक फायदेही मला माहित आहेत . पण शाकाहारी म्हणजे गवत खाणारे हा जितका मूर्खपणा तितकाच मांसाहार करणारा म्हणजे मनुष्यच नाही असे म्हणणे हा ही मूर्खपणा अस मला वाटत
७. आरक्षण ही संकल्पना मला अगदी मान्य आहे अन वर्षानुवर्षे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्याना ते देण ही बरोबर हे मला पटत . पण त्याचवेळी ते अगदी करोडपती लोकानाही देण पटत नाही (मी क्रिमि लेयर बद्द्ल नाही तर अगदी धनाढ्य बद्द्ल बोलतोय )

असंख्य उदाहरणे आहेत , कदाचित आठवतील तशी लिहित जाईन . पण सांगायचा मुद्दा इतकाच यात कुठेही मला सगळच बरोबर किंवा सगळच चुकीच वाटत नाही . आता मला हे आता आजच का वाटतय हेही लोक कदाचित विचारतील Happy ? पण खरच हा मुद्दा भाजप / इतर किंवा मोदी/इतर किंवा मराठा/ब्राम्हण/इतर नाहीच आहे . कदाचित अशा मुद्द्यावर मी समजू शकतो ही . पण शाकाहार , दहिहंडी , गोऱक्षक किंवा अगदी सचिन यावर इतक कट्टर असायची गरज आहे का ? की माझच काही चुकतय ? Sad
प्लीज आपली प्रामाणिक मते द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणीक मतं दुसरी तरी काय द्यायची?:अओ: हे सर्व अगदी माझ्या मनातलं लिहीलय. बाकी नंतर लिहीते. पण खरच छान आणी पोटतिडीकेने लिहील्याचे जाणवते. बाकीच्यांची मते पण जाणून घ्यायला आवडतील.

सगळेच बरोबर किंवा सगळेच चूक असे कधीच असत नाही. आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ह्यावर ठरत असावे.
शिवाय आपली मते ही आपलीच मते असतात, ती कालानुरूप बदलूही शकतात त्यामुळे ह्यात माझेच कुठे काही चुकतेय का? असे वाटण्याची गरज नाही.

अतिविचार वाईट, तो सोडता आला तर पहावे. दुसरी गोष्ट म्हणजे नुसता विचार करून काय होणार आहे... आंतरजालावर, काही समूहांमधे हिरीरीने घेतलेली भूमिका पुढे नेऊन समाजोपयोगी काही घडवता आले तर अर्थ आहे अगदी छोट्या प्रमाणात का होईना.

केदार,
तुमचे काहिही चुकत नाही.
उलट तुमच्यासारखे बरेच आहेत म्हणून देश तगलाय.

हा मध्यममार्ग सोडून लोक अतिउजवे /अतिडावे झाले तर देशाचे पाकिस्तान्/सिरीया नैतर रशिया होईल.

सो डोंट बी कन्फ्यूज्ड बट बी प्राऊड ऑफ युवर मध्यममार्ग!

सगळेच बरोबर किंवा सगळेच चूक असे कधीच असत नाही. आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ह्यावर ठरत असावे. >>> गडबड तेव्हा होते जेव्हा माझे मत बरोबरच आहे हा अट्टाहास बाळगला जातो.

गडबड तेव्हा होते जेव्हा माझे मत बरोबरच आहे हा अट्टाहास बाळगला जातो.

>>>

अट्टाहासला प्रतिउत्तर देणे म्हणजे परंपरा वादी, पुरोगामी विरोधी, अशी ओरड होते.

तेव्हा कोण काय करतो हे पाह्ण्यापेक्षा , मी कसा सुधारेल, हेच पाहणे उत्तम. Happy

इरावती कर्वे यांचा एक लेख होता एकेश्वरवादावर, त्याची आठवण झाली. अशीच काहीतरी कैफियत त्यात मांडली होती.

तुझे काहीही चुकत नाहीये, केदार.
तुझी भुमिका सुयोग्य आहे पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या जमान्यात मध्यममार्गी माणसे आपल्या बाजूला वळवण्यासाठी जी चढाओढ चालू असते किंवा टोकाची भुमिका घेणार्‍या दोन्ही बाजूंचा जो विरोध सहन करावा लागतो त्याकरता तयार रहायलाच हवं. खंबीर रहा पार्टनर. एकटा नाहीयेस तू Happy

केदार, खूप जणांचं असंच आहे असं मला वाटतं. आणि त्यात चूक काहीच नाही.
आमच्या एका व्हॉट्सॅपग्रुपवर काही जण म्हणतातही की ’माणसाने एकतर ही किंवा ती बाजु घ्यावी’. पण त्याची काहीच आवश्यकता नाही. उलट त्याने झुंडशाही वाढेल.

आणि तसेही सोशल मिडियाच नव्हे तर समोरासमोर गप्पांतही काही लोक लगेच रिअ‍ॅक्ट होतात. त्यांचे ते मत खरे / अंतिम असेल असे नाही. म्हणजे मला असे म्हणायचेय की आपल्याला जेवढे लोक एका ठाम- काळ्या/पांढर्‍या मताचे वाटतात तेवढे नसतात.

सो डोंट बी कन्फ्यूज्ड बट बी प्राऊड ऑफ युवर मध्यममार्ग! >>+१

खरेच माझ्याही मनातलं. पण गोची अशी असते कि विरोध करताना, जे आपल्याला चांगले वाटते, त्याचा उल्लेख केला, मग तुमचा विरोध फुसका मानला जातो.

केदार, मला वाटतय कि दुसरी बाजु पण त्याच वेळी मनाच्या एका कोपर्यात असते. त्यामुळे एकच भुमिका आपण घेत नाही.

माबो वरच्या प्रतिक्रीया वाचताना माझ्या मनात असंख्य बाजु निर्माण होतात. Sad Proud
त्यामुळे कुठलीतरी एक ठाम भुमिका मग चुक असो बरोबर माझ्याने घेणे होत नाही.मी मधेच असते.त्यामुळे मी ही मध्यममार्गी.

धन्यवाद सगळ्याना Happy
लिहिण्यामागे एक हेतू तर फक्त एकदा सगळ लिहून टाकण हा होता . पण त्याच बरोबर बाकीच्याना काय वाटत हेही समजून घ्यायच होत .

आणि तसेही सोशल मिडियाच नव्हे तर समोरासमोर गप्पांतही काही लोक लगेच रिअ‍ॅक्ट होतात. त्यांचे ते मत खरे / अंतिम असेल असे नाही. म्हणजे मला असे म्हणायचेय की आपल्याला जेवढे लोक एका ठाम- काळ्या/पांढर्‍या मताचे वाटतात तेवढे नसतात. >> हे फार आवडल . कधी कधी मलाही काहीतरी भूमिका आहे हे दाखवण्याच्या अट्टाहासात अन समोरचा अटीतटीने भांडतोय तर मीही भांडणार या आवेशात टोकाची भूमिका घेतली जाते अस मला वाटत.
मे बी शांतझाल्यावर आपण जास्त बोललो अस वाटत असेलही , पण आपला इगो माघार घेऊ देत नसावा

माबो वरच्या प्रतिक्रीया वाचताना माझ्या मनात असंख्य बाजु निर्माण होतात. >>> हो, त्यामुळे आपले विचार प्रगल्भ होत जातात. आपणांस जाणवते कि प्रत्येकाची आपलीही काही बाजू असू शकते. आपणांत चहुबाजूने विचार करण्याची क्षमता येते. आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आभारी आहे, मायबोली.

डोंट बी कन्फ्यूज्ड बट बी प्राऊड>>>>>

+१

जगात संपूर्ण चुकीचे आणि संपूर्ण बरोबर असे काहीच नसते.

टोकाची भूमिका घेणारे फक्त एकाच बाजूने विचार करून दुसरी बाजू नाकारत राहतात. तुम्ही मध्यममार्गी आहात म्हणजेच तुम्ही दोन्ही बाजूनी विचार करू शकत आहात.

केदार, चांगले लिहीले आहेस. तुला तुझी स्वतंत्र मते आहेत, पक्ष, प्रोपोगंडा या व्यतिरिक्त. तेच चांगले आहे. तसेच असायला हवे. सोशल नेटवर्क्स वर क्वचित दिसते. राजकीय उदाहरण द्यायचे तर एका बाबतीत भाजपला तर दुसर्‍या बाबतीत काँग्रेसला सपोर्ट केला, तर यात तुझाच काहीतरी वैचारिक गोंधळ आहे/भोंगळपणा आहे असे तुलाच म्हणतील :). पण तसे अजिबात समजू नकोस.

सो डोंट बी कन्फ्यूज्ड बट बी प्राऊड ऑफ युवर मध्यममार्ग! >> याबद्दल पूर्ण सहमत.

Stand like a rock in case of principles and flow like water when it comes to opinions!

केदार एक सांगतो.....
एखाद्या व्यक्तीशी किंवा ग्रूपशी एखाद्या विषयावर चर्चा करतांना दुसर्‍याच मिनिटाला त्या व्यक्तीने वा ग्रूपने मुद्द्याच्या कुठल्या टोकाची बाजू निवडली आहे हे कळते. एवढेच नाही तर त्यांची मते बनवणारा सोर्स, मिडिया, न्यूज चॅनल/पेपर, पुस्तक, भाषण एका सेकंदात कळते. किंबहुना तुम्ही सुरूवातीलाच हे जोखले पाहिजे.
अश्यावेळी एकही सेकंद वादविवादात किंवा आपली बाजू पटवण्यात वाया न घालवता, विषय बदलावा वा काढता पाय घ्यावा.
जोवर तुम्हाला तुमच्यासारखे मध्यममार्गी , तुमचे म्हणणे ऐकण्यास, विचार/अ‍ॅंगल समजून घेण्यास ऊत्सुक कोणी मिळत नाही (हे ओळखणेही स्कीलंच आहे) तोवर कितीही ईच्छा असली तरी रस्ता बदलावा. तुम्ही जेवढे विचार प्रवर्तक वा त्यांच्या ठामपणा मधला फोलपणा पटवून द्यायला जाल तेवढे ते अ‍ॅग्रेसिव होत जाणार.
बोलणारे फक्त त्यांना माहित असलेल्या गोष्टी बोलून दाखवणे आणि ह्याच खर्‍या आहेत हे सांगणे ह्या 'कंपल्सिव बिहेविअर' ने त्रस्त असतात. त्यांच्या ह्या मानसिकतेचा बळी तुम्ही होऊ नका.

जपानमध्ये? (कुठे का असेना) म्हण आहे
तुम्ही जेवढे कमी बोलाल तेवढे जास्त शिकाल आणि जेवढे जास्त शिकाल तेवढे जास्त कमी बोलाल.

हे नेहमी जमतेच असे नाही (न जमण्याचे नं १ कारण आपलाच ईगो) आणि हे सांगायला मीच किती बोललो, पण हे फक्त मला तुमच्या भावना कळतात आणि जमल्यास मदत करावी ह्या विचाराने.
स्वतःला त्त्रास करून न घेण्याचे प्रयत्न करत रहा.

Stand like a rock in case of principles and flow like water when it comes to opinions! >> सही फेरफटका.

केदार, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे अजून असंख्य लोक आहेत ज्यांना सारासारविचार करण्याची क्षमता आहे. एकच बाजू लावून धरणारे लोक हे मुद्दाम लोकांना चिथवून ध्रुवीकरण करण्याच्या धुर्त अजेंड्याने तसे करत असतात किंवा त्यांना कुणी तरी ब्रेनवॉश केलेले असते. ते तुम्हाला बरेचदा नेभळट, ठाम विचार नसणारे, मुर्ख वगैरे समजतात (किंवा तसं मुद्दाम म्हणून चिथवतात). तर अशांकडे दुर्लक्ष करणे उत्तम. आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक असणे एवढंच महत्वाचं आहे.

मला स्वतःला असे अनुभव सतत येत असतात. उदा. माझ्या कुटुंबात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. पण मी जर "लग्नाच्या नावाखाली धर्मांतरण चुक आहे" म्हटलं तर सोशल मिडियावर मला "हिंदुत्ववादी" असं लेबल चिकटवतात. तेच जर मी "लग्न करताना जात-धर्म बघू नये" असं मत मांडलं की लगेच मी "हिंदुत्व द्वेषी" ठरते. खरं म्हणजे या दोन्ही सेपरेट गोष्टी आहेत. लग्न करताना जात-धर्म बघु नये हे माझं ठाम मत आहे पण जर समोरची व्यक्ती तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करुन आपला धर्म बदलवायला लावत असेल तर ती व्यक्ती तुमच्यापेक्षा धर्मावर प्रेम जास्त करते म्हणून तशा लोकांपासून दूर व्हावे असंही माझ ठाम मत आहे. कारण मला मुळातच व्यक्तीपेक्षा धर्मावर प्रेम करणारे लोक पटत नाहीत.
पण आपण जेव्हा मत मांडतो तेव्हा ही पुर्ण पार्श्वभुमी मांडत नाही आणि समोरच्याला ती माहीत नसते. त्यामुळे ते तेवढे एकच वाक्य घेऊन बॅटिंग सुरु करतात. तर ती थोड्या प्रमाणात अशा चर्चांची मर्यादा आहे. तिथे आपण भाषण देणे अपेक्षित नसल्याने सगळ बोलत नाही अन मग झोडपून घेतो.

पण हरकत नाही. जे लोक दोन्हीला विरोध करतात किंवा दोन्ही बाजुंना आलटून पालटून सपोर्ट करतात, तेच समाजाला, देशाला पुढे घेऊन जातील असा माझा समज आहे. असे लोक नसतील तर कुठल्या तरी बाजुने तालिबानायझेशन झालेच म्हणून समजा.

प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकालाच वाटतं की स्वतः मध्यममार्गी आहे आणि समोरचा टोकाची भूमिका घेतोय

फेरफटका , Stand like a rock in case of principles and flow like water when it comes to opinions! >> मस्त

हायझेनबर्ग पटल अगदी Happy

Pages