चांदणचकवा .....

Submitted by अजातशत्रू on 24 August, 2016 - 07:56

धुरकटलेला चंद्रगोल काजळडोहाच्या थिजलेल्या प्रतलावर येऊन विसावतो,
तेंव्हा हलकेच तू येतेस,
आसमंतातील चैतन्याला चांदणचकवा देऊन,
दिठीतले गंधभारित निर्माल्य घेऊन !
भेगाळलेल्या पावलांचे ठसे न उमटवता चालत पुढे पुढे जात राहतेस.
कातडी सोलून निघालेले डोहाकडे टक लावून बसलेले भोवतालचे
अपराधी जरठवृक्ष तेंव्हा डोळे मिटून घेतात.
म्लान रुधिरफुले, कुरतडलेली पांगळीपाने आणि अर्धोन्मिलित मृदुलकळ्या
आ वासून बसतात.
घरट्यात लपलेली चिमणीपाखरे तुझ्या चाहुलीने अर्धीकच्ची जागी होतात,
अन पुन्हा चोची मिटतात.
डोहाकाठचे छिन्नचराचर तुला पाहून मूक आक्रंदन करत राहते,
संथगतीने तू डोहाच्या काठाशी येतेस.
तरंगावरचा चंद्रगोल तुझ्यामायेच्या स्पर्शासाठी जणू आतुरलेलाच असतो,
तो सवयीने छद्मी हात पुढे करतो !
त्याचे आवतन तुझ्या देहात झंकारते, काळजात खंजीर खुपसावा तसे
तू डोहात अल्वार उतरतेस !
तुझ्या हालचालींचे जादुई कोमलतरंग
कळकटल्या डोहाच्या शांत प्रवाहावर पिसे फिरवू लागतात,
लखलखत्या सौदामिनीला साक्षीस ठेवून पिसाळलेला डोह
तुला सर्वशक्तीनिशी खाली खेचू लागतो.
तुझ्या नाकातोंडात पाणी जाते,
भकास उघडे डोळेही पाण्याआड जातात.
तू खोल खोल डोहाच्या तळाच्या दिशेने जात राहतेस,
खाली जाताना अनामिकासाठी तू अखेरचा हलवलेला तुझ्या हेमांगरंगी
झीजलेल्या हाताचा तळवा डोहावर तरंगताना दिसतो.
तुझा आरसपानी देह कर्दमून जातो अन
अधाशी डोह पुन्हा साळसूद होतो.
त्या सरशी काजळडोहावर रेंगाळत बसलेला खिन्न चंद्रगोल
तिथून उठून वटवाघुळांच्या थव्यात लीन होत पुढे निघून जातो.
दर पुनवेला तुझे हे असेच चालू असते कित्येक वर्षापासून त्याच गतीने !
तू अशीच येतेस अन काहीही न बोलता,
आक्रोश देखील न करता...
अश्रूंची धार डोहातल्या पाण्यात विरघळवून तू वैदेहीसारखी
मातीच्या गाभ्याशी जाऊन सत्व शोधतेस.

ओघळलेला चेहरा घेऊन तोही तिथेच उभा असतो अन बर्फाळलेल्या डोळ्यांनी
काळीज विस्फारून तुझ्याकडे बघत असतो.
जिवाभावाच्या माणसाला डोहात बुडवून मारलेल्या बातम्यांची कात्रणे हाती धरून तो उभा असतो.
त्याची यातून सुटका नाही.
वीसेक वर्षापूर्वीच चित्रगुप्ताने त्याला सांगितलंय,
"जोवर ती या डोहात येत राहील तोवर तुला तिन्ही लोकाची दारे बंद आहेत !,
तू असाच अधांतरी लटक, तू केलेल्या विश्वासघाताची सजा मी देत नाही तुझेच कर्म देतेय !"
तेंव्हापासून या काजळडोहाजवळ तो पायात खिळे ठोकल्यागत उभा आहे.
देहाची चिपाडे घेऊन, डोळ्यांच्या खोल विहिरीत,
तुझी भग्न प्रतिमा घेऊन उभा आहे !
खोल गेलेले पोट, खचून गेलेली वाकलेली पाठ आणि
शिरावर मेंदूतल्या आठवणींच्या जखमांनी व्यापलेले विशालकाय भेंडोळे घेऊन तो उभा आहे ....
कुजलेल्या हाताची शिसवीबोटे जोडून तो उभा आहे तुझ्या माफीच्या प्रतिक्षेत !
जोवर तू माफ करत नाहीस,
तोवर तरी असेच 'अधांतरी' राहावे लागेल त्याला ......

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_24.html

4.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users