अंबुर चिकन (म्हणजे नॉन व्हेज उर्फ सामिष) बिर्याणी

Submitted by अमेय२८०८०७ on 22 August, 2016 - 13:40

आठवडाभरापूर्वी बेंगलोरवारी झाली. ऑफिसला जातायेता अनेक ठिकाणी अंबुर बिर्याणीचे बोर्ड दिसले (Ambur Dum Biryani, Ambur Chicken Biryani इत्यादी). ड्रायव्हरसाहेबांना विचारले तर त्यांनी मुखरस सांभाळता सांभाळता "उनको माहीत नसल्याचे" जाहीर करून टाकले (ड्रायव्हर अलाहाबादी असल्याने त्याला तिथल्या सदर बाजारातील 'रामासरे के समोसे' अथवा 'आलू पूडी' वगळता बाकी जगातील यच्चयावत पदार्थ केवळ उदरभरणार्थ असा एकूण अविर्भाव दिसला). असेल एखाद्या हॉटेल चेनचे नाव म्हणून मीही उत्सुकता जिरवून टाकली.

दोन दिवसांनी ओला कॅब ड्रायव्हरने मात्र हे तामिळनाडूमधील एका गावाचे नाव आणि तेथील बिर्याणी बेंगलोरात हल्ली लय फेमस असल्याचे ज्ञानार्जन केले. खरेच बोलला असेल बिचारा.
वेळ कमी असल्याने याखेपेस बेंगलोरमध्ये बिर्याणीची चव घेता आली नाही, पण उत्सुकतेपोटी नेटवर रेसिपी पाहून घरी करून पाहिली, आवडली. पुढच्यावेळी गेलो की हॉटेलशी चव कम्पेअर करून बघेन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

साहित्य :
चिकन अर्धा किलो मिडीयम साईज पीसेस (हवे असल्यास आले लसूण पेस्ट वगैरे लावून मुरवत ठेवा)
तांदूळ दोन वाट्या धुवून अर्धा तास भिजत ठेवा
दीड कांदा उभा चिरून, टोमॅटो दोन मिडीयम उभे चिरून, कोथिंबीर + पुदिना मिळून एक वाटी बारीक चिरून
दही पाऊण वाटी
मसाला वेलदोडे, वेलची, लवंग, दालचिनी (अंदाजे प्रमाण)
आलं लसूण पेस्ट दीड चमचा
सुक्या मिरच्यांची अगदी थोड्या पाण्यासोबत जाड पेस्ट दोन ते अडीच चमचे (तिखटाची प्रत बघून कमी जास्त करता येईल)
लिंबाचा रस एक टेस्पून
मीठ, तेल

कृती:
दोन तीन टे स्पून तेल तापवून त्यात खडे मसाले घाला, थोड्या वेळाने आले लसूण पेस्ट घालून चांगले परता
कांदा गुलाबी होईस्तोवर परता, मिरची पेस्ट घालून परता, टोमॅटो आणि कोथिंबीर पुदिना घालून टोमॅटो एकजीव होईपर्यंत परता, मीठ घाला
आच मिडीयम मंद करून दही फेटून घाला, तेल सुटेपर्यंत परता.
Ambur 1.jpg

चिकन घालून पीसेस कोट करून ढवळून थोडा वेळ शिजवा
तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालून झाकण लावून चिकन 75 टक्के शिजेपर्यंत (साधारण दहा बारा मिनिटे) शिजवा
Ambur 2.jpg
दुसऱ्या गॅसवर पाण्यात किंचित जिरे, मिरी, दालचिनी आणि एक दोन लवंगा घालून (साहित्यात हे पदार्थ धरलेले नाहीत) चांगली उकळी आणा, त्यात भिजत घातलेले तांदूळ निथळून घाला.
तांदूळ कटाक्षाने अर्धे कच्चेच शिजवायचे आहेत.

तांदूळ अर्धे शिजले की लग्गेच पाण्यातून काढून निथळवा.
चिकनचे झाकण उघडून लिंबाचा रस घालून ढवळा.
तांदूळ वरून थर लावल्याप्रमाणे अलगद लावा, अजिबात ढवळू नका.
Ambur 3.jpg
झाकण घट्ट लावून (हवे तर वजन ठेवा) वीस मिनिटे अथवा तांदूळ शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा.

झाकण उघडून वाफ गेल्यावर हलक्या हाताने शिते न मोडता तळातून वरपर्यंत बिर्याणी मिक्स करा
खावा
Ambur 4.jpgAmbur 5.jpg

टीपः-
(तांदूळ चिकन ग्रेव्हीत घालण्याआधी ग्रेव्हीतील पाण्याचा अंदाज घ्या, माझ्यासारखे ढ असाल तर 'घरच्या स्पेशालिष्टला' किचनात बोलवा, जी विजयी मुद्रेने तुच्छतेने बघत का होईना योग्य सल्ला देईल आणि बिर्याणी पाण्याअभावी जळण्यापासून अथवा अतिपाण्याने खिचडी होण्यापासून वाचवेल Happy मी आधी एक वाटी जास्त पाणी घातले होते)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! मस्त दिसते आहे रेसिपी.

एकदा जे झेपेल ते (चिकन, बिर्याणी साठी अयोग्य बोनलेस, स्किनलेस, व्हाईट मीट चिकन, पनीर, बटाटे, भाज्या इत्यादी) घालून करून बघायला हवी ही रेसिपी Happy

'श्रावणात' घन नीळा बरसला की ही बिर्याणी खायला मज्जा येणार!
Wink

दम द्यायचा नसल्याने बिर्याणी खाण्यासाठी फार वेळ 'दम' धरून बसावे लागणार नाही हा मोठाच फायदा.

शेवटचे दोन फोटो फार टेंप्टींग आहेत बरं.
या रविवारी करून पाहिन .

श्रावणात काय ब्वा तुम्ही नॉनव्हेज रेसिप्या टाकता?! दिवाळी बिवाळीपर्यंत दम धरा की वाईच. Wink
(शिर्षकात नॉनव्हेज लिहिलंय तरी आम्ही येणारच)

सायो Happy
साती, सशल....थँक्स. नक्की करून पहा, मुलं खाणार असतील तर तिखट सांभाळावे लागेल जरा.
वत्सला, व्हेजही छान लागेल कारण मोजकेच पदार्थ असले तरी मसाला चविष्ट होतो एकदम.

सुदैवाने हे आम्ही घरी करत नाही. आमचा बिर्याणीवाला अमेझिंग बनवतो. Happy दोन तास आधी ऑर्डर केली तर चिकन - मटण ऐवजी बीफ बिर्याणीपण बनवून देतो.

चेन्नईमध्ये दिंडीगुल, अंबर आणी असे बरेच बिर्याणीचे प्रकार मिळतात. हैद्राबादीपेक्षा बरीच तिखट आणी मसालेदार असते. शिवाय दम नसतो, त्यामुळे ही बिर्याणी बरीच मायाळू असते.

व्हेज अंबूर बिर्याणी करताना त्यात चिकन ऐवजी वांगी वापरतात.
काही लोक्स तर चिकन बिर्याणीतही थोडी वांगी घालतात.
एकदा खाल्ली, पण वांगी पाहून नंतर अंबूर बिर्याणीचा कायमच अनुल्लेख केला.

हैद्राबादी अथवा अवधी बिर्याणी बरी.

रच्याकने, कोच्चीमधे तीन ठिकाणी (कँटीन, साधं रेस्टॉरंट अन ५ स्टार रेस्टो) बिर्याणी खाल्ली. सगळीकडची बिर्याणी गोड चवीची होती. म्हणाजे भातात खडामसाला होता. पण चिकन गोड.

मस्तच रे अमेय!
मी खाल्लेल्या अंबर बिर्याणीत तांदूळ आपापल अस्तित्व वेगळ दाखवणारे ( लॉन्ग ग्रेन , मोकळा भात) नव्हते, आंबेमोहोर , जिरग्या प्रकारातले मिळून मिसळून वागणारे होते. Lol

हो इन्ना,
मूळ रेसिपीत जिरगा सांभार राईस (आपल्या जिरगा किंवा आंबेमोहोराचा दक्षिणी भाऊबंद असणार) वापरला होता.
माझ्याकडे बारीक तांदूळ नव्हता, पण हे तांदूळही लांब असले तरी छान मॉइस्ट झाले होते.
आता आंबेमोहोर, मिनी मोगरा वगैरे वापरून करेन कधीतरी.

छान रेसिपी. बिर्याणीसाठी चिकनपेक्षां मटणालाच अग्रक्रम देत असलो तरीही हा प्रकार करून बघणार,
रेसिपीच्या शेवटीं दिलेली टिप तर आत्यंतिक महत्वाची; कांहीं बिघडलंच तर ''घरच्या स्पेशालिष्ट'वर दोष लकटायला बरं !!! Wink

वॉव..मस्तं आहे हा प्रकार बिरियानी चा...

छानै रेसिपी, फोटो तर अति तोंपासु.. आधिक टिपा तर खास Rofl

इन्ना.. Lol

अहो दम धरा दम धरा..
श्रावण चालू आहे हो.. आणि लगोलग देव देवी देवत्या सगळचं.. एक दोन दिवसाच्या वेळात सार अ‍ॅडजस्ट करन म्हणजे काय खायचं काम आहे.. रेस्प्पी नंतर वाचण्यात येईल.. फोटो पाहुनच जीवाचा तडतडाट झालायं Sad ..
कुफेहेपा...

मी साधी बिर्याणी अशीच करते त्यात फक्त टोमॅटॉचा रसही घालते. आणि त्या मिरची ऐवजी मसाला घालते. आता मी तिला अंबुर चिकन बिर्याणी म्हणायला मोकळी. साधी पेक्षा काहीतरी नाव असल की कस भारी वाटत. Lol
छान आहे रेसिपी.

जागू, तू जागू बिरयाणी नैतर उरण बिर्याणी म्हण.
अगदीच भारी नाव द्यायचं असेल तर 'बिरियाणी- ए -रायगड' नाव दे .
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला (!) प्रितीभोजनाला बोलावले तेव्हा हीच बिरियानी बनवली असा काहीतरी ऐतिजासिक संदर्भ लिहा.