कल्पवृक्ष...

Submitted by अजातशत्रू on 16 August, 2016 - 02:43

बघता बघता पावसाच्या बातम्या हळूहळू कमी झाल्यात, कवींच्या कविता करून झाल्यात... आणि बघता बघता पाऊस थबकलाय देखील... इकडे काळ्या मातीने सगळे पाणी अधाशासारखे गटागटा पिल्येय... काही ठिकाणी कोवळे हिरवे कोंब आलेत तर मातीच्या सांदीत दडून बसलेल्या चुकार बीजाला कुठे तरी अंकुर देखील आलेत.. वाळून काडी कामटी झालेल्या खोडाला पालवी देखील फुटलीय... पण हे सारं कुठं होतंय ? .. हे सारं लगोलग फक्त काळ्या मातीतच होतंय... मात्र बरड रानात, मुरमाड जमिनीत हे इतकं सहजासहजी होत नाहीय....

आज तर ऑक्टोबर हिटसारखं उन्ह आहे...दुपारचे एक वाजताहेत, डोईवर सूर्य आलाय. कडक उन्हाच्या तीव्र झळा लागताहेत, माळराने स्थितप्रज्ञ होऊन मान गुडघ्यात घालून बसलीत.. तर दुसरीकडे माझे लाडके बरड, मुरमाड मातीचे रान तसेच आहे कोरडे ठक्क ! त्याच्यात जेमतेम दोन बोट इतकीच ओल आहे बाकी खाली सगळं रान तसंच आहे ऊर धपापलेलं !.... या मुरमाड रानात कुठंही काहीही हिरवं पिवळे उगवलेले नाही.. सारं जैसे थे ! कोरडवाहूचा शाप माथ्यावर घेऊन आपलं अश्राप जीणं जगणारी ही मुरमाड जमीन मला बापासारखी वाटते तर थोड्या पावसाने जिच्या कुशीतले अवखळ बीज तरारते ती काळी जमीन मला माझ्या आईसारखी वाटते.

बाप जसा नुसता आयुष्यभर राबराबतो मात्र आपली हौस मौज क्वचितच पूर्ण करतो. मन मारण्यात त्याचा हात कुणी धरणार नाही. जगाच्या लाजे खातर कधीतरीच तो अंगाला नवं कापड लावतो तसं या बरड जमिनीचे आहे. बापाला कितीही यातना दया तो सोसतो. तो गाऱ्हाणे सांगत बसत नाही. दुःख वेदनांचे कढ कंठात रिचवत राहतो, संतापाच्या कळा मेंदूत विरघळवतो अन अपमानाचे घोट विनातक्रार पित राहतो. कधी तरी मात्र तो एकटाच बांधाच्या कडेला बसून हमसून हमसून रडतो तसं या बरड जमिनीचं आहे. हिच्यावर कितीही उन्ह पडू दयात हीचा ना रंग बदलेल ना हीचा पोत बदलेल ना हीचा कस कमी होईल ना वाढेल. सर्व जैसे थे ! कितीही सोसाटयाचा वारा येऊ दयात ह्या माळरानातली माती दगडा मुरमा सह उडणार नाही. ती मातीच्या खालच्या थरावर आपल्या देहाचे आवरण करून पडून राहील. या मातीला ऊन वाऱ्याचे जणू सोयरसुतकच नसावे, तिला त्याचा फरक पडत नाही. या रानात दंड घाला वा बांध घाला वा वाफे अंथरा त्याला पाझर फुटणार नाही. ही माती सहजासहजी कुणाच्या प्रलोभनाला बळी पडत नाही त्यामुळेच की काय हिच्या पोटातलं बी सहजासहजी रुजत नाही. तिथं लवकर काही पिकत नाही अन जर पिकलंच तर सरत नाही. कारण तिचा कस तसाच आत टिकून असतो. ही माती नैसर्गिक संकटाला भीक घालत नाही. बापही तसाच असतो, कितीही संकटे येऊ दयात तो घरादारासाठी छातीचा कोट करून उभा असतो, पंचतत्वाचे सगळे वार रणमर्दाप्रमाणे छातीवर झेलत असतो.

काळ्या मातीचे तसे नसते, उन्ह वाढले की तिच्या अंगाची लाही लाही होते, तिचा चेहरामोहरा बदलतो अन ती काळपट करडी वाटू लागते. आईचे तसेच असते, घरादारावर संकटे आली की तिचा जीव कासावीस होतो. घरादाराला छळणारयाच्या जीवाचे तळपट व्हावे असे तिला वाटत राहते. आईचे तसेच असते, घरादारावर संकटे आली की तिचा आत्मा मुळासकट तळतळून उठतो अन ती संतापात कधी समोरच्याला राख करते नाहीतर स्वतः दग्ध होऊन जाते. या काळ्या मातीचे तसेच असते.

थोडाफार पाऊस पडला तरी काळी माती पावसाच्या त्या बिनबरभावशाच्या जलतुषारांना गोंजारते, उदरात सामावून घेते, गर्भातल्या बीजाला नवं रुपडं देते. वाळून गेलेल्या गवताच्या काडीला आधार देते तिला नवी उभारी देते. वठलेल्या झाडाला पालवी फुलवते, खोल काळजात असलेल्या अचेतन मुळ्यांना नवी संजीवनी देते. ती सगळ्यांच्या सगळ्या चुका माफ करते, सर्वांना नव्या रुपात सजवते अन त्यांचा वाढलेला भार आपल्या देहावर झेलत राहते. पाऊस थोडा जास्त झाला तर तिला अधिकच उधाण येतं अन अंगभर अंकुरांची हिरवी किनखापी नक्षी मिरवते. जर अतिवृष्टी झाली तर ही पाऊसवेडी माती त्याच्याबरोबर बांधांना फोडून ओढ्या नाल्यातून वाहत जाते इतकी देहभान ते विसरते. पण ती आत्ममग्न नसते कारण ती जिथेही जाते तिथे तिचा गुणधर्म बदलत नाही.

बरड जमिनीचे तसे नसते, काही वर्षाच्या लपंडावानंतर पडलेल्या पावसाला पहिल्या हंगामात इथं काहीच हाती लागत नाही. दाराबाहेर वाट बघत बसलेल्या अभ्यागतांप्रमाणे त्याला बरड मातीच्या पोटात जिरावे लागते अन काही पोटपाणी पिकते का याची प्रतीक्षा करत बसावे लागते. पावसाची दोन तीन नक्षत्रे तर अश्शी जातात, या मातीचे आपले तोंड वासलेले ! आसुसल्यागत मनसोक्त पाणी पिऊन झाल्यावर मग कुठे थोडी ओल धरू लागते. मग एखादा हौशी बळीराजा तिथं दुसरीकडची काळी माती आणून टाकतो, क्वचित शेणखतही टाकतो. मग उडीद,तूर, मूग, सोयाबीन नाही तर तीळ लावून बघतो. त्याची मेहनत बघून त्याच्या पदरात दान टाकतो. बापही असाच असतो, मेहनती पोराच्या पाठीवर भरभरून थाप टाकतो. रग्गील अन रंगेल पोराच्या हाती कुठलाच बाप धत्तुराही देत नाही. काळी माती असं करत नाही, ती सरसकट तिच्या पोटात जे काही येऊन पडलेलं असते त्याला फुलवत राहते, तिची माया ही जणू आईची नितळ अन भाबडी माया असते. थोडासा पाऊस पडला तरी सुखावते अन उदरातल्या बीजगर्भाला आकार देते !

काळ्या मातीच्या बांधावर देखील आंबा, उंबर, चिंच, पळस, कडुलिंब वाढत राहतात तिच्यावर मायेची पाखर घालत राहतात. तिने त्यांना पाजलेल्या पाण्याचे ऋण फेडत वर्षानुवर्षे उभे राहतात, त्यांच्या अंगाखांदयांवर पानं फुलांची बहारदार नक्षी आकार घेते. त्यांच्या डवरलेल्या फांदयांवर पक्षांची सुबक घरटी बांधली जातात अन त्यात त्यांची नवी पिढी जन्म घेऊ लागते. आईची कुस उगवण्याचे काम असे अव्याहतपणे सुरुच असते. स्त्रीला मिळालेल्या सर्वात अपूर्व आणि अतुल्य देणगीचे दान काळी माती तिच्यात तरारून उभ्या राहिलेल्या वृक्ष वेलींना देते. आणि चराचरातले सृष्टीचक्र सुरु राहते.
इकडे मुरमाड मातीच्या बांधावर उगवणारी झाडे मात्र काळ्या मातीतल्या झाडासारखीच असतील याचा भरवसा देता येत नाही. त्यावर उगवतात बाभळी, बोरी, सुबाभूळ, निलगिरी, खेर, कदंब आणि सुबाभूळ ! त्यातही बोरी बाभळीच जास्त येतात. पोरींची माया वडिलांवर जास्त असते, त्याच्या एका एका शब्दाला जपत असतात त्या ! विनातक्रार, कुठलाही वाटा न मागता त्या बापाच्या पायाशी लीन होत असतात.फार अपेक्षा न ठेवता ही झाडे जगतात. पाणी कितीही कमी असो ही झाडे तग धरतात, पाण्याअभावी जळून जात नाहीत. ऊन, वारा, वादळ याला तोंड देत उभी राहतात. पाऊस कमी पडो वा जास्त यांना फरक पडत नाही. बापाचे बापपण या झाडांत असते जणू, सुंदर दिसणं किंवा छान छान फुलांनी डवरणं यांच्या गावी नसतं. अंगी असलेल्या काटया कुटयाची तमा न बाळगता ते बापुडवाणे बिचारे फुलत जातात, ना डेरेदार सावली न मोठाले रसरशीत स्वादिष्ट फळ त्यांना लाभते. इतकं होऊनही वेडीवाकडी कुऱ्हाड याच झाडांवर चालते. घराच्या आढयापासून ते दरवाजाच्या फळकुटापर्यंत अनेक ठिकाणी यांच्या खोडाचा - फांदयांचा वापर होतो. वेळी अवेळी तुकडे पडतात. पण ही झाडे बापासारखी जिद्दी अन कष्टाळू असतात. यांना पुन्हा फुटवे फुटतात. कुठून हा गुणधर्म त्या झाडांत येत असेल ? नक्कीच त्या मुरमाड मातीतून, जिथं ही उगवतात, वाढतात, तोडली जातात अन पुन्हा वाढतात !

काळी माती आईसारखीच हळवी असते, तिची शक्ती मुरमाड मातीपेक्षा कमी असते. कुणी जोरात दाबले तरी तिची ढेकळे फुटतात. नांगराचा फाळ सहज खोलवर घुसतो अन तिच्या देहावर वाफ्याच्या रेषा काढतो ! मुरमाड जमिनीचे तसे नसते. ती बापासारखी ओबड धोबड असते. चालणाऱ्याच्या पायाला रुतते. तिच्यात कुदळ नीट चालत नाही तेंव्हा नांगर कसा नीट चालणार ? ती आपल्याच हिशोबात वागत असते. तिला स्वतःचे विचार असतात. पाणी मात्र मुरमाड जमिनीत जास्त लागते अन लागलेले पाणी टिकून राहते कारण या जमिनीच्या अंतःकरणाशी असतो राखाडी काळा खडक, जो संकटकाळी पाझरू लागतो अन त्याच्या झऱ्यातून विहीर भरू लागते. आयुष्यभर पिलेले पाणी जणू त्या विहिरीच्या रूपाने ही माती पुढच्या पिढीला परत देत असावी. हा बापाचा गुणधर्म आहे. आयुष्यभर कष्ट करून कमावलेली दौलत हसतमुखाने पुढच्या पिढीला स्वाधीन करणारा बाप आणि ही मुरमाड माती यांच्यातले हे साम्य मला भारावून टाकते. खोड्या काढून घरात पळून आलेल्या चुकार पोराबाळांना आई जशी ऊराशी कवटाळून उभी राहते तसेच काळ्या मातीचे वागणे असते. इतरत्र कुठेही न उगवणारे कुठलेही रानटी झुडूप सुद्धा ती खुशीने अंगावर वागवते.

शेतजमीन मग ती काही गुंठे असो वा काही हेक्टर असो, पण ती जमीन असलेला माणूस माझ्यासाठी जगातला श्रीमंत माणूस आहे कारण त्याला जन्माला घालणाऱ्या आईवडीलांच्या जोडीने हे मातीतले मायबाप देखील आयुष्यभर प्रामाणिकपणे साथ देतात....
कृतघ्न तर माणूसच असतो तोच आपल्या गरजा संपल्या की ज्याप्रमाणे जन्मदात्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून येतो तद्वत आपल्या आर्थिक निकडी वाढल्या की आईबापासमान असलेली जमीन विकून टाकतो ..........
आता मी इथे आहे. या मातीच्या कणाकणात अन इथले अणुरेणु आहेत माझ्या प्रत्येक श्वासात ! जगण्याची प्रेरणा देणारी अन आपल्या पायाच्या बोटाशी गुजगोष्टी करणारी ही माती मला रोज काहीतरी नवीन शिकवते अन मी त्यातून घडत जातो, कल्पवृक्षासारखा !

- समीर गायकवाड.

bapu 12.jpghttp://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_16.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users