आमचे घड्याळ पुढे आहे...

Submitted by विद्या भुतकर on 15 August, 2016 - 03:35

परवा हॉस्पिटलमध्ये गेले होते. निघायच्या वेळेला घड्याळ पाहिले आणि लक्षात आले ते एकदम 'राईट टाईम' होते. तसे घर सोडले की बाकी ठिकाणी घड्याळे योग्य वेळच दाखवतात. पण घरात प्रत्येक घड्याळ ५-१० मिनिटे पुढे करून ठेवायची सवय लागली आहे. त्यामुळे कुठेही घड्याळ पाहिले की ते योग्य वेळ सांगतच असेल अशी सवयच राहिली नाहीये. तरी त्यातल्या त्यात आजकाल मोबाईल वर कॅर्रीएर कडून येणारी वेळ जी दिसते तीच योग्य आहे असे समजून चालते. निदान आपण चुकलो तर आपल्यासोबत बाकी फोन वापरणाऱ्या लोकांचेही घड्याळ चुकीचे असेल. Happy

तर, आपल्याकडे किती घरांमध्ये घड्याळात एकदम बरोबर वेळ दिसते? प्रत्येकाचे घड्याळ थोडे पुढे किंवा मागे असतेच. किती मिनिट ते ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे. बरं, ही गरज तरी काय असते? कुठेही जाताना आपण घड्याळ बघून निघत असू तर निदान १० एक मिनिटे तरी आधी निघणे होईल हा त्यातला हेतू. पण ही वेळ कुणी दुसऱ्या माणसाने सेट केली तर ठीक आहे, पण आमच्या घरी मीच ते घड्याळ लावणार. मग मला माहीतच असते घड्याळ १० मिनिट पुढे आहे, तर त्याचा उपयोग काय ना? तरीही आमच्या घरातले एक दोन घड्याळे १० मिनिटे का होईना पुढे असतातच. सकाळी घाई घाईत आवरताना तोच एक दिलासा असतो की अजून आपल्याला १० मिनटं आहेत.

सर्वात त्रास याचा होतो की प्रत्येक रूममध्ये असणारे घड्याळ वेगवेगळ्या वेळेसाठी पुढे करून ठेवलेले असेल. म्हणजे सकाळी उठले की पहिले काम करावे लागते ते म्हणजे गणित. किती मिनिटे पुढे आहे त्यावरून अजून पाच मिनिटे झोपायचे की १०. दुसऱ्या रूममध्ये गेले की वेगळे गणित. नुसता डोक्याला त्रास. त्यामुळे मला आता नियमच केला पाहिजे प्रत्येक खोलीतील घड्याळ एकच वेळ दाखवायला हवे. बरं १० मिनिटे तरी मोजायला पुढे-मागे करायला सोपे आहे. ७ किंवा ८ मिनिटे घड्याळ पुढे केले तर गणित करत बसायला किती त्रास होईल? म्हणजे घड्याळात ९.१५ झालेत, तर प्रत्यक्षात किती वाजले असतील? करा गणित. चिडचिड आहे की नाही? आणि हो हातातील घड्याळे वेगळीच. प्रत्येकाचे वेगवेगळे टायमिंग. आज काळ तर मला 'डे लाईट सेव्हिंग' मुळे बरीच रिस्ट वॉचेस एकेक तास पुढे मागेही आहेत. शिवाय एखादे अगदीच न वापरलेले भारतातली वेळही दाखवत आहेत. असो.

१० मिनिटे वगैरे ठीक आहे, पण काही लोकांकडे अर्धा तास घड्याळ पुढे असलेले पाहिले आहे. म्हणजे ३० मिनिटे आवरून आधीच कुठे जाऊन बसणार आहे? असो. पण या घड्याळ पुढे असण्याने एक चांगले होते. कुणी मित्र- मैत्रीण आलेत. गप्पा मारत बसलेत मस्त. कुणी घाई करू लागले की म्हणू शकतो, "बस रे, आमचे घड्याळ पुढे आहे". तितकाच अजून १० मिनिटे मिळाल्याचा आनंद होतो की नाही? आणि समजा कुणी नावडता पाहुणा आहे, तो घाईने निघूनही जाईल, वेळ बघून. हो की नाही? Happy मला एक कळत नाही, पुढे घड्याळ करण्याचे कारण अगदी समजून घेतले तरी मागे ठेवण्याचे काय कारण असेल? मला उशीर झाला असेल आणि घड्याळ मागे असेल तर मी अजून १० मिनिटे उशिरा निघेन ना घरातून. म्हणजे अजूनच उशीर. कदाचित ऑफिसमध्ये लोक ठेवत असतील का मागे? म्हणजे लोक तेव्हढेच १० मिनटं जास्त काम करतील? जाऊ दे. कुणाला माहित असेल तर मलाही सांगा.

आणि सगळीच घड्याळे अशी बदलून जी मूळ वेळ पाळायची आहे ती आहे तरी कशाची, ऑफिसची, शाळेची, ट्रेनची, बसची की अजून कशाची? मला एकदा बघायचे आहे, फक्त आपण भारतीय लोकंच हे असे घड्याळ पुढे करून ठेवतो की बाकी पण करतात? ही पद्धत कुणी सुरु केली असेल याचा इतिहास बघायला हवा एकदा. आणि हो, इतके करूनही आपण कुठेही वेळेत पोहोचत नाही असे का होते? प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतेच. आणि त्यात मीही आहे. अगदी त्या fireworks च्या वेळीही सर्व अमेरिकन लोक पाहण्यासाठी वेळेत आलेले असतात आणि आम्ही मागून जाऊन लोकांच्या मध्ये अंधारात धडपडत असतो.

किती वेळा मी ठरवते वेळेत करायचं सर्व पण तरीही उशीर होतोच. अगदी शनिवारी संध्याकाळी काहीही काम नाहीये आणि ६ वाजता पार्टीला जायचे आहे कुठेतरी, तरीही वेळेत का पोहोचत नाही. त्यासाठी लागणारे गिफ्ट घेणे असो किंवा ट्राफिक काही ना काही कारण मिळतेच. त्यामुळे प्लॅनिंग मधेच गडबड आहे. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर त्यासाठी योग्य ती तयारी वेळेत करून ठेवली पाहिजे. किंवा वेळेत जाणे जमणार नसेल तर आधीच स्पष्ट सांगितले पाहिजे तसे. जमेल तितके सध्या करत आहे प्रयत्न दिलेली वेळ पाळायचा. घड्याळ पुढे करण्यापेक्षा आहे त्या वेळेत आणि वेळेवर करायची सवय लागायला हवी, होय ना?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घरातले घड्याल मी डोळे बंद करून पुढे सरकवतो. म्हणजे नेमके किती पुढे आहे हे कळत नाही. तसेही सकाळी बस पकडण्यासाठी घड्याळ २ मिनिटे पुढे असले तरी भागते. त्यामुळे मला चालतेय सगळे.

लेख नेहेमीप्रमाणेच छान आहे!

आमच्याकडे अगदी उलट प्रकार. प्रत्येक घड्याळ अगदी बरोब्बर लावलेले. रिस्टवॉच तर मिनीट्भरजरी पुढे गेलं तर मी त्याला खेचून ताळयावर आणून ठेवतो. तेच सोपं पडतं वेळ पाळायला. सकाळी लवकर कुठे निघायचं असेल तर दोन किंवा तीन अलार्म्स फोनमध्ये लावून ठेवायचे.
१०/१५ मिनीटं पुढे करायचा उपद्व्याप करून झालाय ऑलरेडी; माझंही तेच व्हायचं- आहेत की अजून १० मिनिटं! आणि पुढे प्लान बिघडायचा... सो ते बंदच केलं मग.