कामाठीपुऱ्यातली आर्त प्रतिक्षा - जयवंती ...

Submitted by अजातशत्रू on 10 August, 2016 - 03:12

कामाठीपुरयाच्या ज्या 'आशियाना' मध्ये #हिराबाई राहायची तिथलीच ही एक छोटीशी नोंद जी त्या पोस्टमध्ये करायची राहूनच गेली. त्यावर हे चार शब्द.... १९७७ ला युपीच्या मुरादाबादमधून हिरा कामाठीपुऱ्यात आली. तिला दोन वेळा विकले गेले, तिचे कर्ज फेडण्यासाठी तिच्या मुलीला,ताजेश्वरीला 'लाईन'मध्ये आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र तिची रवानगी कोलकत्याच्या कामाठीपुऱ्यात - सोनागाछीत झाली. पण तिला आपल्या देहाचा कापूर करायची वेळ आली नाही. आपल्या मुलीसाठी पैसे जमवताना हिराबाईने १९९८ मध्ये जेंव्हा पहिल्यांदा आपल्या अंगावरचे कपडे उतरवले तेंव्हाची ही गोष्ट...

त्या रात्री जेंव्हा हिराबाईला मैफलीत गाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता अन तिची गंजून गेलेली ट्रंक शबनमने दाराबाहेर काढून ठेवली तेंव्हा तिच्या सर्वांगाला कंप सुटला होता. तिच्या पोटात सकाळपासून अन्न नव्हते, अंगावरची साडी दोनेक दिवसापासून बदलली नव्हती. केस पिंजारलेले होते, खोल गेलेले डोळे रडल्यामुळे सुकून गेले होते. डोळ्याखालची काळी वर्तुळे भेसूर दिसत होती, गालफाडे आत गेली होती, ओठांना चिरा पडल्या होत्या अन कपाळावर घामाचे तळे साठले होते. छातीशी हात कवटाळून ती अगतिकपणे दाराबाहेर उभी होती.
शेवटी मनाचा हिय्या करून ती शबनमला म्हणाली - "हां मै तैयार हुं !"
तिनं असं म्हणताच तिथं दारापाशी उभी असलेली वाहिदाची खास मर्जीतली नर्तकी असणारी जयवंती मध्ये पडली. तिने हातानेच हीराला अडवले. तिचा हिराने हे काम करण्यास विरोध होता. तिचा हिरावर जीव होता.

सारेजण तिला जया म्हणायचे. अंगाने भरलेली अन रग्गील असणरी पस्तिशीतली जया वाहिदा गेल्यापासून शबनमवर दात खाऊन होती, रागानं धुमसत होती ती. वीज कडाडावी तशी ती शबनमच्या दिशेने धावली अन काय होत्येय हे कळायच्या आत तिने तिच्या लुगडयाला हात घातला. बेसावध असणाऱ्या शबनमला काय होत्येय ते कळायच्या आत जयाने तिच्या निऱ्या फेडल्या होत्या. अन अर्वाच्च शिव्या देत तिने शबनमच्या केसांना इतक्या जोरात हासडा दिला की ती क्षणात आडवी झाली. मात्र पुढच्याच क्षणी शबनमने खाली उभ्या असणारया तिच्या दल्ल्यांच्या नावाने टाहो फोडला.
जयाला बाजूला ढकलत ती उठून उभारली, संतापाने तिचा गोरापान चेहरा लालबुंद झाला होता. ब्लाऊजची बटणे तुटलेली अन साडी फिटलेली अशाच अवस्थेत ती उभी होती. तिला कपडे नीट करण्याचे भान देखील राहिले नव्हते. समोर होत तिने जयाच्या कानफटात लगावली. तशी इतक्या वेळ तिथे उभी असणारी हिरा मध्ये पडली अन ती शबनमसमोर हात जोडून जयाला माफ करण्याच्या विनवण्या करू लागली. बाकीच्या मुली पुढे झाल्या अन त्यांनी जयाला मागे ओढले. इतक्यात शबनमने आरोळी दिल्यामुळे हजर झालेली रानटी पुरुषी श्वापदं आत शिरली अन त्यांनी काय झालेय याचा अंदाज घेत जया आणि हिराबाईला रिंगणात घेऊन लाथा बुक्क्याने तुडवून काढले. अशक्त हिराबाईचे दोन दात पडले, जबडा रक्तबंबाळ झाला. जयाने मनसोक्त मार खाल्ला पण हुं की चू केले नाही.

काही वेळाने जयाची फुलाफुलांच्या चित्रांनी रंगवलेली पत्र्याची ट्रंक बाहेर काढण्यात आली. त्या सरशी बाहेरच्या कललेल्या वऱ्हांडयाला रेलून उभी राहत तिने त्या माणसांना दम दिला. "अब अगर किसीने और चापलुसी की तो पुलिस के पास ** बैठूगी और फिर तुम सबकी चमडी ना उधेड दी तो मेरा नाम भी जयवंती नही !"
आपली साडी ठीकठाक करत शबनमकडे बघत जया इतक्या त्वेषाने अन मोठ्याने थुंकली की तिच्या थुंकीचे तुषार शबनमपर्यंत उडाले.
जाताजाता तिने सुनावले -"उसे क्यों धंदे पे बिठाती हो, खुद बैठ जाओ ना ! बहोत आयेंगे तेरे पे थूकने वाले !" बोलत बोलत तिनं ती जाडजुड ट्रंक उचलली आणि खालच्या मजल्यावर असणाऱ्या जगदेवीकडे ती तरातरा गेली सुद्धा. जगदेवी आणि शबनम यांच्यातलं जुनं वैर तिला चांगलेच ठाऊक होते त्याचा अचूक फायदा तिने घेतला. शिवाय तिच्या अंगावर देणं म्हणून शबनमची फुटक्या कवडीचेदेखील ओझे नव्हते. जिद्दी, भांडखोर आणि जहांबाज जयापुढे शबनमने जणू नांगी टाकली होती. या जयाचा राग पुढे हिरावर निघत राहिला हे वेगळे लिहायला नको. त्या ओढाळ रात्री स्वर्गीय गळ्याच्या हिराबाईचे शील कवडीमोल भावाने चमडीच्या बाजारात लुटले गेले.सगळी मुंबई, सगळी दुनिया झोपी गेलेली अन इथे जिवंत देह छिलून काढणाऱ्या गिधाडांचा, कोल्ह्यांचा अन गुदगुल्या करून ठार मारणाऱ्या अस्वलांचा बेधुंद बाजार माजला होता. पिवळ्या उजेडातल्या भकास रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांनाच काय ते इथले दुःख जाणवत असावे, ती सारी कुत्री रात्रभर विव्हळत असावीत ...

जयाला तिच्या बापानेच इथं आणून सोडलेले. ती बनारसची. घरात खाणारी तोंडे फार आणि बाप दारुडा. राघवसारखा असाच एक जण त्याला भेटला अन त्याने हा 'गुरुमंत्र' दिला. जयाला काही वर्षांनी तिचा बाप येऊन पैसे मागून भांडून गेला होता तेंव्हा तिने त्याला लाथाबुक्क्याने तुडवला होता. अगदी वहाण काढून त्याच्या तोंडावर फटाफटा मारले होते तिने. नंतर मात्र ती आपल्या गावाकडे अधून मधून सातत्याने पैसे पाठवत असे. हिराप्रमाणेच तीही कधी तिच्या गावी परतली नाही. आधी ती फक्त नाचायची, पण तिथं नाचगाणं बघायला येणारया एका धनिकाने तिला फसवले, तिच्याशी संबंध ठेवले. तिला भुरळ पाडली. आयुष्यभर साथ देण्याची वचने दिली. तिला लुटून झाल्यावर त्याने जे तोंड काळे केले तो परत आलाच नाही. जयाने तीन महिन्याचा गर्भ गुपचूपपणे पाडला. मात्र त्या दिवसापासून तिने स्वतःच्या शरीरावर सूड घ्यायला सुरुवात केली. दारू प्यायची, सिगारेट ओढायची, मनात आले तर साडी फेडून परकर पोलक्यावर बसायची. तिच्यासाठी कुणी 'कस्टमर' आला तर "वाहिदा के यहां ये सब चलता नही" म्हणत त्याला समोरच्या बाजूच्या तिच्या मैत्रिणींकडे घेऊन जायची. तिच्याकडे गांजा ओढायची चिलीमसुद्धा होती. वाहिदाला जया काय करत्येय हे माहिती असूनही कधी अडवले नाही. कारण ती जे काही करे ते तिच्या अपरोक्ष चाले. शिवाय जया मनाची चांगली होती. नाचण्यात तिचा हात कुणी धरत नसे. हिरा गाऊ लागली की जयाच्या पायी बांधलेल्या घुंगरांना चेव येई अन तिच्या पायात विजेच्या वेगाने हालचाली होऊ लागत. पण वाहिदा गेली अन सगळे गणित बिघडले.
ती बनारसची अन हिरा मुरादाबाद जवळची असल्याने तिला हिराबद्दल कणव होती. तिला ती आपली लहान बहिण समजत असे. हिराने 'धंदा' करू नये अशी तिची मनोमन इच्छा होती. .
हिराबाई देवाघरी गेल्यावर ताजेश्वरी जयाच्याच गळ्यात पडून धाय मोकलून रडली होती. ताजेश्वरी आणि अजहर या दांपत्याला बनारसमध्ये संगीतविदयालय सुरु करायला लावण्याची कल्पना जयाचीच होती. तिनेच तिच्या नातलगांकडून जागा वगैरे बघून देऊन या दोघांच्या आयुष्याला स्थैर्य मिळवून दिले होते. यथावकाश ताजेश्वरी बनारसला गेली अन या काळ्या दुनियेची सावली तिच्यावरून बाजूला झाली.

मी एकदा न राहवून जयाला विचारले होते,'तुला कर्ज नाही, आता घरी तुझ्या पैशाची गरज नाही. तरीही तू इथं का राहतेस ? घरी का जात नाही ? तुझ्या घरी तुझे स्वागतच होईल !"
यावर तिने दिलेल्या स्पष्टीकरणाने माझ्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या.
"मला कर्ज नाही हे खरे आहे, आता घरी पैशाची गरज नाही हेही खरे आहे पण म्हणूनच माझी कुणाला गरज नाही हे जास्त खरे आहे. मी घरी गेले तर ते माझे स्वागत करतील पण माझ्या तिथं असण्याचा त्यांना नंतर उबग येईल. त्यांना वाटेल की मी तिथं आले नसून माझ्यासोबत 'कोठा' घरी आला आहे !'
मी तिला एकदा तिच्या आयुष्यात येऊन गेलेल्या त्या धनाढ्य पुरुषाविषयी विचारले होते तेंव्हा खूप आढेवेढे घेऊन प्रचंड वेळ खाऊन झाल्यावर उत्तर दिले होते.

उत्तर देताना आधी तिने मलाच प्रश्न केला - "तुने 'राम तेरी गंगा मैली' देखा है क्या ? त्यात एक कॅरेक्टर आहे कुंजविहारीचे... जो हिरो नरेनचा मौसा असतो ना तोच तो कुंजविहारी.... तसाच माझा देखील कुंज होता.....त्याने मला तसेच घर करून देण्याचे स्वप्न दाखवले होते....पण तो पुन्हा आलाच नाही ...त्याची काय मजबुरी आली असेल माहिती नाही...पण तो तसा नव्हता..."
मी तिला अर्ध्यात तोडत म्हटले, "त्याचा नाद सोडून दे, दुसरे कुणीही स्वीकारेल तुला !'
"पण मी दुसऱ्याला स्वीकारायला पाहिजे ना !"
"मी का कुणाच्या जिंदगीत शिरून त्याची तकदीर खराब करू ? तुला परत एकदा सांगते, तू राम तेरी गंगा मैली माझ्यासाठी पुन्हा बघ... मै बहोत दफा देखी हुं, अपने ग्रॅन्ट रोड रॉयल टॉकीज और वो पुराना महल आल्फ्रेड टॉकीज में...बहोत बार ....जी भरके देखा हैं ...तू बघच पुन्हा अन तुला काय वाटते ते मला बोल" हे सांगताना तिच्या मंद डोळ्यात एक अद्भुत चमक मला जाणवली.
मी मान डोलावताच ती पुन्हा बोलती झाली. त्यात या कुंजचाच एक डायलॉग आहे - "बाजारू चीजोंसे घर सजाये जाते है, बसाये नही जाते !....मी तर बाजारातली घाण ...मला कोण जवळ करणार आणि कुणी जवळ केलेच तरी मला कुणाच्या घरात गंदगी करायची नाही...आपण इथंच मरणार..!"
असं बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते की राग नव्हता. होती फक्त हताशा, अगतिकता !
का कुणास ठाऊक पण मला असे वाटले की कदाचित तिला वाटत असावे की आपला कुंज एक ना एक दिवस आपल्याकडे येईल. त्या प्रतिक्षेची आर्त कणव तिच्या नजरेत जाणवत होती.

त्या नंतर मी जेंव्हा कधी 'राम तेरी..' पाहिला तेंव्हा मला हटकून जयवंतीचे हताश झालेले डोळे पडद्यावर दिसायचे. मात्र माझ्या डोक्यात सिनेमे पक्के बसत असल्याने यातलेच एक वाक्य जयवंती कसे काय विसरली याचा मला प्रश्न पडतो. सिनेमाच्या शेवटी 'गंगा' झालेली मंदाकिनी एकदाची त्या कुंजला गाठ पडते अन त्याच्या हातात नरेनचे मुल सोपवून आपल्या गावी परत जाण्याची इच्छा व्यक्त करते. त्या प्रसंगी कुंज तिला अडवतो अन म्हणतो, "तुम्हारी अग्नीपरीक्षा तो हो चुकी अब राम की बारी है, उसे भी ये अग्नीपरीक्षा देनी होगी. तुम तो यही रहोगी. क्योंकी गंगा बनारस से कलकत्ते जरूर आती हैं पर कलकत्तेसे बनारस नही जाती, न ही कभी जायेगी, क्युंकी गंगा कभी उलटी नही बहती..."

जयाला जो कोणी फसवून गेला तो गेलाच, पांढरपेशी जगात जिथं लोक धोका देतात तिथे त्या आभासी अन क्षणिक सुखाच्या दुनियेत कोण नातं निभावणार आहे ? कारण असा उलटा प्रवाहच आपल्याकडे वाहत नाही. नात्यांची, विचारांची अन वासनांची ही नदी एकदा पुढून गेली की पुन्हा वळून माघारी येत नसते हे गंगेकाठी जन्मलेल्या जयवंतीला कसे काय समजले नसावे याचा शोध घेता 'उम्मीद', 'आशा' या दोन शब्दांपाशी मी येऊन थांबलो.

प्रतिक्षेच्या तीन अक्षरांवर जगणारी जयवंती आता तिथेच आहे की आणखी कुठे याची मला माहिती नाही. मात्र कधी 'राम तेरी ..' मधला सैद जाफरीचा कुंजविहारी डोळ्यापुढे आला की आपल्या कुंजच्या दोन घटिकेच्या भेटीसाठी देहाचे चंदन झिजवत त्या भग्न बाजारातली जयवंतीच डोळ्यापुढे येते आणि समोरचा पडदा धूसर होत जातो ....

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_10.html

kamathipura 22.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी लिखाण!

तपशीलांमुळे ह्या लोकांसाठी काहीतरी विधायक काम करणारे आपण आहात ह्याची मनोमन खात्री पटते. कीप इट अप! सगळ्यांनाच नाही जमत हे! धन्यवाद.

कामाठी पुर्‍यातील धंदा करणार्‍यांच्या गल्ल्या कमी झाल्या आहेत व तो भाग रि डेव्हलप होतो आहे असे मध्यें वाचनात आले होते. मुंबईमिरर मध्ये. त्या भागात जमिनीच्या किंमती खूप असणार त्यामुळे. तसेच रीडेव्हलप होण्यामुळे त्या भागाचे स्वरूप बदलेल अशी आशा आहे.

http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Kamathipura-residents-wan...

http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Kamathipura-residents-wan...