आमचं कोकणातल घर आहे जुन्या पदध्तीचं..... कौलारु.... ओटी, माजघर, देवघर, सैपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठ असलं तरी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच आहे खोली. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार पाच पायर्या खालच्या लेवलला आहेत.
या खोलीला माजघरातुन आत जायला दार आहे. एका बाजुला ओटीची भिंत आणि एका बाजुला माजघराची भित असल्याने हिला फक्त एकाच बाजूने दोन छोट्या छोट्या खिडक्या आहेत, ज्या उघडल्या तरी खोलीत फारसा प्रकाश येत नाही.माजघराच्या दारातुन प्रकाशाचा काय कवडसा येइल तेवढाच प्रकाश. पूर्वीच्या काळी काही घरातुन बाळंतीणीची खोली अशी असे काळोखी. पण ही आमची खोली बाळंतीणीची नाहिये. बाळंतीणीची दुसरी स्वतंत्र खोली आहे. ही खोली फारशी मोठी ही नाहिये. असेल आठ नऊ फूट रूंद आणि दहा अकरा फूट लांब. अश्या लांबोडक्या, बोळासारख्या रचनेमुळेच हिला बोळाची खोली हे नाव पडले असेल. तशातच माजघरतुन माळ्यावर जाणार्या जिन्याने ही ह्या खोलीचा काही भाग व्यापला आहेच.
ह्या खोलीत आहे एक माचा, ज्यावर वर भरपूर गाद्या रचुन ठेवलेल्या असतात. त्यामुळे एक छोटीशी उडी मारल्या शिवाय ह्या माच्यावर बसता येत नाही ( स्मित ) . एका भितीच्य कडेला एक छोटसं कपाट आणि एक मोठसं फडताळ आहे . एका छोट्या लाकडी स्टुलावर एक भरपूर आवाज करणारा टेबल फॅन आहे. ह्या खोलीची जमीन आम्ही कित्येक वर्ष सारवणाचीच ठेवली होती आग्रहाने, पण अलीकडेच ह्या खोलीला ही फरशी बसवून घेतली आहे. आणि हो बाकी उजेडाच्या दृष्टीने उजेडच असल्याने उजेडा साठी एक पिवळ्या प्रकाशाचा बल्ब आहे . एकंदर खोलीच्या सजावटीला तो शोभुन दिसणाराच आहे.
ह्या खोलीच्या मध्यवर्ती स्थानामुळे माझे तिकडे रहाणारे सासरे दुपारी ह्याच खोलीत झोपत असत. त्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवणे सोपे जाई. पण आता ते गेल्या नंतर मात्र घरातल्या बायकांनी दुपारच्या विश्रांतीसाठी हिचा ताबा घेतला आहे. दुपारी जेवणं झाली की आम्ही सगळ्याजणी ह्याच खोलीत आडव्या होतो. एक दोघी जणी माच्यावर, दोघी़ जणी खाली चटईवर, एखादी त्यांच्या पायाशी ........ कधी कधी न झोपता हळू हळु आवाजात मस्त गपा ही रंगतात आमच्या. हं पण पुरेसा उजेड नसल्याने वाचत वाचत झोपण्याचे सुख मात्र इथे मिळत नाही. उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर मात्र एरवी बाहेर आडव्या होणार्या ही ह्याच खोलीत झोपायला धडपडतात कारण उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात उबदार असते ही खोली. तसेच पावसाळ्यात कोकणात कितीही काही ही केलं तरी माशांचा उपद्रव असतोच. आणि त्यात लाईट गेलेले असले तर पंखा ही नसल्यामुळे तर जास्तच त्रास देतात माशा. पण ही खोली मात्र याला अपवाद आहे कारण काळोखामुळे इथे माशा जराही नसतात.
एखाद लहान मुल खूप मस्ती करायच्या नादात सैराट झाल असेल आणि झोपायच नाव घेत नसेल तर ह्या खोलीत नेऊन झोपवल की हमखास झोपत ते खोलीत असलेल्या काळोखामुळे आणि गारव्यामुळे. आमच्याकडे अजूनही सुट्टीत दुपारी मुलं डबा ऐसपैस किंवा लपंडाव खेळतात. बोळाची खोली म्हणजे मुलांचा लपण्याचा हुकमाचा एक्काच. इथल्या फडताळातत ठेवलेल्या डब्यातले दाणे, गूळ वैगेरे मस्त पैकी चरत लपून बसलेली असतात मुलं ह्या खोलीत. आम्ही कोणी त्याच वेळी खोलीत गेलो आणि दिवा लावला तर मात्र त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी भिती आश्चर्य आणि " ही आत्ता का आलीय इथे " असे भाव उमटतात आणि आपसुकच तोंडावर बोट ठेउन "प्लिज, सांगु नकोस" अशी न बोलता विनंती वजा आज्ञा ही केली जाते. कोणी सर्दी तापाने वैगेरे आजारी असेल तर त्याचे ही अंथरुण ह्याच खोलीत पडते. मुख्य घराला जवळ असल्याने सतत लक्ष रहाते आणि आजार्याचं हवं नको पहाणं ही सुलभ होतं.
आमचं खूप मोठं कुटूंब आहे कोकणात. नेहमी माणसांची वर्दळ असते घरात. आणि आगरात गडी माणसं ही वावरत असतात सतत . एवढ्या माणसात नवीन लग्न झालेल्या आमच्या मुलांना शहरात मिळतो तसा मोकळेपणा नाही मिळत. पण इथे ही बोळाची खोली त्यांच्या मदतीला धावून येते . ( स्मित)
घरात काही मंगल कार्य असेल तेव्हा मात्र ह्या खोलीच रुपच बदलुन जात. खोली रंगीबेरंगी आणि एकदम कलर फुल दिसायला लागते. निरनिराळ्या प्रकारच्या रेंगीबेरंगी साड्या, दागिने प्रसाधनं , अत्तरं , फुलांचे गजरे, गप्पा, हास्याचे चित्कार यांनी खोली भरुन जाते. कारण अशा प्रसंगी बायकांची ड्रेसिंग रुम बनते ही खोली. त्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात सगळ्यांचा नट्टापट्टा चाललेला असतो. सगळा जामानिमा झाला की हल्ली एखादा सेल्फी ही काढला जातो खोलीतुन बाहेर पडायच्या आधी. शंभरहुन अधिक वर्षापूर्वी हे घर जेव्हा बांधलं तेव्हा भविष्यात हे असं काही होईल अशी पुसटशी कल्पना तरी केली असेल का ह्या खोलीने?
एकदा एका मे महिन्यात आमच्या घरी खूप पाव्हणे मंडळी जमली होती.त्यात माझ्या एक नणंद बाई ही होत्या. दुपारच्या जेवणाची वेळ होती. आधी मुलांची पंगत मग पुरषांची आणि मग आम्ही बायका अशी पद्ध्त आहे आमच्याकडे . जेवायला वेळ होता म्हणून त्या बोळाच्या खोलीत आडव्या व्हायला गेल्या होत्या. बायकांच्या पंगतीसाठी ताटं घेताना अगदी आठ्वुन आठवून, मेळ घालत, कोण जेवलं कोण राहिलय अशी बोटं मोजुन ताटं मांडली . आम्ही जेवायला सुरवात केली . माझ्या एक सासुबाई आम्हाला अन्न गरम करुन द्यायला उभ्या होत्या गप्पा मारत मारत सावकाशपणे आमची जेवणं चालली होती. आणि अचानक ह्या माझ्या नणंद बाई येऊन उभ्या राहिल्या. आमचं तर बोलणच बंद झाल. " असे कसे ह्यांना विसरलो " ही अपराधी पणाची भावना प्रत्येकीच्या चेहर्यावर उमटली. पण त्यानीच सावरुन घेतल. ह्या गोष्टीचा अजिबात इश्यु केला नाही. माझ्या सासुबाईनी त्यांना पटकन ताट वाढुन दिल आणि त्यांनी ही काही झालचं नाहीये असं दाखवून हसत खेळत जेवायला सुरवात केली. पण तेव्हा पासुन जास्त पाव्हणे असले की शेवटच्या पंगतीच्या वेळेस बोळाच्या खोलीत कोणी नाहिये ना याची खातरजमा करुन घेण्याची सवय आमच्या अंगवळणी पडली आहे.
अशी ही आमची बोळाची खोली . माणसाच हृदय कसं त्याच्या शरीराच्या आकाराने मानाने लहानच असत तसच ही खोली ही एकंदर घराच्या आकराच्या मानाने लहान असली तरीही आमच्या घराच ह्रूदयच आहे जणु.......
आभार सर्व प्रतिसादकांचे.
आभार सर्व प्रतिसादकांचे. नताशा, तुला आमच्या घरी येण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण . रिसॉर्ट मध्ये घरी येते ती मजा नाही
असली घरं कीतीही प्रिय वाटली तरी कोंदट वाटतात,विषेशतः कोकणातल्या कुंद आणि दमट वातावरणात >> सिंथेटीक जिनिअस , आम्हाला तरी आमच घरं पावसाळ्यात ही अजिबात कोंदट वाटत नाहित. चांगलं मोकळच वाटत. एवढच कशाला अगदी वर वर्णन केलेली खोली ही प्रकाश फार नसला तरी कोंदट नाही वाटत आम्हाला तरी. चांगली उबदार आणि कोझी वाटते
पण घरे अशीच का बांधत? हवेशीर उजेडाच्या खोल्या नसतच का? केरळ किंवा गोव्यात वगैरे कोकण सारखी हवा असते पण तिथली घरे मोठी, हवेशीर असतात. उजेडाची कमी नसते. >>> अमा, अंजूने लिहील्या प्रमाणे < कोकणात असतात की मोठ्या मोठ्या खिडक्या. एखादी खोली अंधारी असते. बाहेरच्या पडवीला तर पुढे सर्व ओपन आणि लाकडी दांड्या असतात मोठ्या. असतात हवेशीर घरं. पुढे- मागे मोठं अंगण असते बऱ्याच ठिकाणी. > माजघरात ही आणि इतर ठिकाणी ही प्रकाशा साठी काचेची कौलं बसवलेली असतात. केरळ आणि गोव्याच मला नाही माहित पण आमची कोकणातली घरं ही आम्हाला तरी मोकळी आणि हवेशीरच वाटतात. हां घरांची उंची असते कमी कोकणातल्या घरांची पण ती कोंदट नाही वाटत अजिबात वरील कारणांमुळे. उलट खूप शांत ,गार आणि सुदिंग वाटतात मला तरी.
ती काचेची कौलं मला खूप
ती काचेची कौलं मला खूप आवडायची पाहायला, विशेषतः माजघरातल्या काचेतून आत येणारा प्रकाश बघायला गम्मत यायची. पूर्ण खोली थोडी काळोखी आणि त्यात मध्येच पडणारा तो कवडसा, सैपाकघरातुन आलेला धूर त्या कवडश्यात दिसायचा, अजून कित्ती काही हवेत तरंगत असायचे ते त्या पट्ट्यात दिसायचे आणि सगळ्यात गम्मत म्हणजे जसा दिवस पुढे सरके तसा तो पट्टा सारकायचा. आताही घरात असतील हे पट्टे, पण लक्ष जात नाही.
खूप सुरेख! तुझ्या प्रत्येक
खूप सुरेख! तुझ्या प्रत्येक लेखात कोकण, तुझं घर/ वाडी बद्दल चा जिव्हाळा, आपुलकी शब्दांकन शब्दातून थेट पोचते, भावते अन तुमच्या कुटुंबाशी, कोकणाशी नातं जडलंय....
नेहमीप्रमाणेच खूप छान
नेहमीप्रमाणेच खूप छान लिहीलंयत. आवडलं.
मंजू, आशिका धन्यवाद. साधना,
मंजू, आशिका धन्यवाद.
साधना, काचेच्या कौलांविषयी सगळेच पटले.
फार सुंदर ! फोटोची गरज नाही
फार सुंदर ! फोटोची गरज नाही इतकं चित्रदर्शी ! मजा आली वाचताना .
फारच सुंदर लेख, आवडला. आपण
फारच सुंदर लेख, आवडला. आपण एखादया खोलीविषयी एवढं लिहू शकता हे पाहून खरंच आपल्या प्रतिभेचे कौतुक वाटते.
धन्यवाद नाव. सचिन काळे
धन्यवाद नाव.
सचिन काळे प्रतिसाद खूप आवडला खूप खूप आभार .
आपले नेहमीच स्वागत आहे!!!
आपले नेहमीच स्वागत आहे!!!
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
खुप मस्त
खुप मस्त
वा! मस्त ममो. बहुतेक
वा! मस्त ममो.
बहुतेक कोकणातल्या सगळ्या मोठ्या घरांमध्ये अश्या काळोख्या खोल्या असतात. त्यावर बहुतेककरून बायकांनीच आपला हक्क प्रस्थापित केलेला असतो.
Rj तेजस, निशा राकेश आणि
Rj तेजस, निशा राकेश आणि मंजुडी खूप खूप आभार प्रतिसादाबद्दल.
हा लेख आजच्या वास्तुरंग मध्ये
हा लेख आजच्या वास्तुरंग मध्ये आला आहे . त्याची ही लिंक . धन्यवाद मायबोली .
http://www.loksatta.com/vastu-lekh-news/story-of-room-1342070/
Pages