असेही 'लकी' इच्छामरण..

Submitted by अजातशत्रू on 5 August, 2016 - 08:59

काही लोक जिवंत असताना आपल्या मरणाविषयीच्या इच्छा व्यक्त करतात अन त्यांची मरणाविषयी तितकी उत्कट तीव्रता असेल तर त्यांना तसे मरण येते देखील...आपल्या माजी राष्ट्रपतींनी ए.पी.जे. कलाम दि ग्रेट यांनी इच्छा व्यक्तवली होती की, 'त्यांचे मरण मुलांना शिकवत असताना किंवा त्यांच्यासमोर बोलत असताना यावे..' अन त्यांचे दुःखद निधन तसेच झाले होते.....
'गॉडफादर'च्या लेखन प्रेरणांची माहिती घेत असताना एक अद्भुत माहिती जो मासेरीया याच्या बद्दल मिळाली अन मरणाच्या इच्छा काय काय असतात अन कशा पूर्ण होऊ शकतात याविषयी आणखी एका नावाची भर पडली..

जो मासेरीया हा १९ व्या शतकातला एक माफिया बॉस होता.
'डॉन' फेमस होण्याच्या आधीचा न्यूयॉर्कचा पहिला मोठा बॉस !
१८८६ मध्ये सिसिलीत जन्मलेल्या जोचे कुटुंब अमेरिकेत आले. अमेरिकेतल्या मार्सला शहरात त्याची ओळख मोरेलो या गुन्हेगारीत न्हाऊन निघालेल्या कुटुंबाशी झाली अन तो जणू त्यांचाच होऊन गेला. हे कुटुंब गुन्हेगारीत मुरलेलं होतं. हार्लेम हे त्यांच्या गुन्हेगारीचे केंद्र होते.आपल्याकडच्या दाऊद आणि गवळी टोळीसारखे जो मासेरीयाचे तिथल्या प्रतीस्पर्धी साल्वेटोर डीकिलच्या टोळीशी खुनशी हाडवैर सुरु झाले. दोघांनी एकमेकाच्या टिप्स पोलिसांना देणं सुरु केलं त्यातून जोला जबरी दरोडयाच्या गुन्ह्यात अटक देखील झाली. डीकिलकडे गनमेन्सची मोठी फौज होती. त्यातीलच एक होता युम्बेरो वेलेंटी ! या वेलेंटीकडे डिकिलने जो ला खलास करण्याचे काम दिले. ९ ऑगस्ट १९२२ जो मासेरीया त्याच्या घराबाहेर पडून शतपावली करून परतत असताना वेलेंटी आणि त्याचा साथीदार त्याच्या मागावर होते. आपल्यावर पाळत ठेवली जात्येय हे चाणाक्ष जो ने ओळखले, तो वेगाने तिथून जवळ असलेल्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये पळून गेला. जो वर फायरिंगच्या तीन राऊंडस झडल्या. तो शिताफीने स्टोअरच्या पलीकडच्या दाराने बाहेर पडला, मात्र रस्त्याच्या त्या दिशेला तयार कपडे बनवणाऱ्या रेडीमेड कपडा उद्योगातील महिला कामगारांचा मोर्चा येत होता, वेलेंटीने त्याची क्रुझर विरुद्ध दिशेने त्या मोर्चाच्या समोर आणली अन त्याने जोच्या दिशेने अंदाधुंद फायरिंग सुरु केली. या गोळीबारात जोला काही झाले नाही मात्र रस्त्यावरच्या एका घोडयासह सहाजण मरण पावले. लोकांची मोठी पळापळ झाली, रस्त्यावर सर्वत्र अफरातफरी माजली. (या घटनेचा नंतर अनेक इंग्रजी / हिंदी चित्रपटात जसाच्या तसा सीन उचलण्यात आला आहे.)

जो या हल्ल्यातून वाचला मात्र पुढच्या काळात पोलिसांनी याहून अधिक जवळच्या अंतरावरचा पॉईंट ब्लॅन्कवरून हल्ला त्याच्यावर केला. तो त्याच्या बेडरूममध्ये असताना पोलीसांनी हा गोळीबार केला होता मात्र इथेही तो पलायन करून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र या हल्ल्यात त्याच्या हॅटला गोळीची दोन छिद्रे पडली. हि हॅट तो अनेकवेळा मोठ्या अहंकाराने वापरत असे. या घटनेमुळे जो मासेरीया मात्र आणखी प्रकाशझोतात आला. 'द मॅन हु कॅन डॉज बुलेटस' अशी त्याची सर्वत्र ख्याती पसरली. त्याचा परिणाम असा झाला की डिकिलच्या टोळीला आपला कारभार आकसता घ्यावा लागला.

त्याच्या पुढच्याच महिन्यात एक मोठी घटना घडली. कारागृहातून मोठी सजा संपवून येणारया मोरेलो कुटुंबाचा म्होरक्या गिसेप्पो मोरेलो आणि व्हेलेंटी यांच्यासोबत जोने एका रेस्त्रोमध्ये बैठक बोलावली आणि माफियाराजचा नवा 'बॉस' कोण होणार आहे यावर चर्चा केली जाईल असा निरोप त्याने पाठवला. ठरल्याप्रमाणे व्हेलेंटी आणि मोरेलो त्यांची विश्वासू तीन तीन माणसे घेऊन रेस्त्रोमध्ये दाखल झाले. बराच वेळ झाला तरी जो काही तिथे आला नाही. त्या माणसांचे संशयास्पद वागणे बघून व्हेलेंटीला संशय आला की इथं काही तरी शिजते आहे. तो गन लोड करून हळूच बाहेर आला. बाहेर पाहिल्यावर त्याला लक्षात आले की, जोच्या माणसांनी रेस्त्रोला घेरले होते. एव्हाना रेस्त्रोच्या आत देखील फायरींग सुरु झाली अन व्हेलेंटीला रस्त्याच्या दिशेने धावणे भाग पडले. यातच त्याच्या वर्मी गोळी बसली अन तो तिथेच संपला. व्हेलेंटीला गोळी घालणारा होता चार्ल्स ल्युसियानो !

या घटनेमुळे मोरेलोचे मोक्याचे दुश्मन खलास झाले अन त्याला आणखी गुन्हे करण्यासाठी जोचा खमका मुखवटा मिळाला शिवाय त्याची पोलिसांची ब्याद बाहेरच्या बाहेर गेली. जो मासेरीयाने या घटनेनंतर चार्ल्स ल्युसियानोला आपल्या लकी मित्राचा दर्जा दिला ! तो त्याला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या वा जोखमीच्या कारागिरीवर जाईनासा झाला. तो त्याचा लकी जेम ठरला. इकडे मोरेलो पडद्यामागे राहू लागला अन जगाच्या समोर, पोलिसांच्या रेकॉर्डवर बघता बघता जो मासेरीया तिथल्या गुन्हेगारीचा 'द बॉस' झाला !

ऑक्टोबर १९२८ मध्ये दिवसा ढवळ्या तोतो डीकिलला इस्पितळात तपासणी करायला जाताना मोरेलोने जवळून गोळ्या घालून मारले अन त्यांच्या अखेरच्या दुश्मनाचा खातमा केला. यामुळे न्युयॉर्कमधील माफियाविश्व हादरून गेले . सगळीकडे मोरेलो आणि जोचा दबदबा वाढला. या दरम्यान मोरेलो कुटुंबात अंतर्गत संघर्ष पेटता ठेवण्याचे काम जोने सुरु केले होते. हा त्याचा नवा अध्याय सुरु झाला. त्यातूनच जो आणि गिसेप्पो मोरेलो यांच्यात 'द बिग बॉस' वरून काटशहाची लढाई सुरु झाली. यात न्यूयॉर्कसह सर्व माफियांनी जोच्या पारड्यात आपले वजन टाकले अन जो मासेरीयाने मोरेलोंची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. हे सर्व करताना अर्थातच त्याच्या खांदयाला खांदा लावून होता चार्ल्स उर्फ 'लकी' ल्युसियानो ! असे असले तरी मोरेलो आणि जो यांच्यात शीतयुद्ध जारी राहिले. याची तीव्रता इतकी प्रचंड होती की, युनियन सिसिलियन राष्ट्राध्यक्ष फ्रांकी मार्लो यांची हत्या झाली. यात सामील असणारया येल आणि कार्फेनो यांच्याशी जोने तात्काळ संधान बांधले अन आपला पसारा आणखी वाढवला. यामुळे तो 'जो द बिग बॉस' या नावाने मशहूर झाला. पण त्याच वेळेस त्याचे दुश्मन पावलागणिक वाढत गेले. स्त्रियांच्या शोषणाचे गुन्हे सोडून सर्व प्रकारचे अपराध जो मासेरीयाने मोठ्या प्रमाणात आरंभले. या सर्व भानगडी करत असताना तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात वेळ काढून तो आपला आवडता कार्ड गँम्बलींगचा खेळ खेळी. त्या बावन्न पत्त्यांचे त्याला प्रचंड वेड होते. पत्त्याच्या डावावर त्याची मजबूत पकड असे. तो अट्टल जुगारी नव्हता मात्र अट्टल पत्तेबाज होता. तो बऱ्याच वेळा बोलून जाई की 'मला कुठल्या सौंदर्यवतीच्या कुशीत मरण आले नाही चालेल पण मरताना मात्र माझ्या हाती पत्ते असावेत !"

आपले साम्राज्य वाढल्यावर जो ची हाव आणखी वाढली त्याने सिसिलीच्या सर्वात मोठ्या माफियावर केसलमार्सर्सवर आपला पंजा कसायला सुरुवात केली. त्याच्या सुदैवाने या ग्रुपचा तत्कालीन म्होरक्या निकोलो शिरो उर्फ 'कोला' (आपल्याकडे जसे हनीफ टुंडा किंवा अजहर सोडा असतो तसाच हा निकोलो कोला !) हा थोडासा भित्रट होता. त्याने जो ला आपल्याला लपण्याची मुभा मिळावी म्हणून चक्क दहा हजार डॉलर्स त्याकाळात देऊ केले होते. मात्र त्या दिवसानंतर त्याचे नेमके काय झाले हे कुणालाच कळाले नाही. यामुळे शेफारलेल्या जो मासेरीयाने सिसिलियन निवडणुकीत जो पेरीनो याला उमेदवार म्हणून मैदानात उतरवले. मात्र या पेरीनोची देखील लवकरच एका रेस्त्रोमध्ये हत्या करण्यात आली. पोरेनोच्या पश्चात निवडून आलेल्या साल्व्हेटोर मेरेन्झोनोच्या हत्येचा फतवाच जो मासेरीयाने काढला अन तो जगाच्या बातम्यात झळकला ! जो च्या या आगाऊपणाने मेरेन्झोनोची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने जोच्या विरोधात असणारे सर्व माफिया एकत्र केले अन डिसेंबर १९३० मध्ये बोस्टनला एक बैठक बोलावली. त्या बैठकीत जो मासेरीयाच्या अनुपास्थितीत त्याच्या जागी बिग बॉस म्हणून बोस्टनच्या माफियाची निवड केली गेली. यातून जोचा दरारा कमी झाला अन त्याच्या टोळीतही गृहकलहाचे वारे वाहू लागले. अन त्यातूनच त्याचा शेवट झाला.

५ एप्रिल १९३१ ला कोनी आयलॅंडमधल्या न्युओवा व्हिला इथल्या रेस्त्रोमध्ये जो मासेरीया त्याच्या 'लकी' ल्युसियानोसह चार साथीदारांसोबत पत्ते खेळत बसला होता. अर्थातच त्याचा आवडता तीन पत्तीचा डाव तिथं रंगला होता. आजूबाजूला लक्ष ठेवायला जो चे चार बलदंड अंगरक्षक तैनात होते. त्यांचे काही डाव खेळून झाले, तेव्हढ्यात त्या रेस्त्रोच्या पार्किंगमध्ये एक अलिशान कार आली. त्या कारमधून उतरलेले साहेबी थाटातले दोन तरुण सावकाश टेहळणी करत आत दाखल झाले. आत गेल्यावर ते काही वेळ शांत उभे होते. नेमक्या याच काळात चार्ल्स ल्युसियानो लघुशंकेसाठी टॉयलेटला गेला अन तेव्हढ्या दोन मिनिटात जो मासेरीया होत्याचा नव्हता झाला. जोच्या कपाळातून एक गोळी आरपार गेली होती अन चार गोळ्या पाठीच्या उजव्या बाजूस लागल्या होत्या. पॉईंट ब्लॅकवरून .३२ आणि .३८ कॅलीबरच्या रिव्होल्व्हरमधून गोळ्या झाडल्याने जो ला हात हलवण्याचीसुद्धा फुरसत मिळाली नाही. जो पत्ते खेळता खेळता मरण पावला. तो मेला तेंव्हा त्याच्या उजव्या हातात इस्पिकचा एक्का त्याच्या अंगठा आणि तर्जनी या दोनबोटांमध्ये पडून होता. जणू काही तो ते पान टाकून डाव जिंकणार होता. त्याच्या टेबलवर बसलेले इतर तिघेही मारले गेले. मात्र बंदुकीच्या आवाजाने ल्युसियानो बाहेर येण्याआधी हल्लेखोर तिथून अलगद पसार झाले होते. आश्चर्य म्हणजे घटना घडली तेंव्हा तिथे उपस्थित असणारे जोचे अंगरक्षक त्या दिवसानंतर कुठही दिसून आले नाहीत. एनवायपीडीने नंतर ल्युसियानोची कसून चौकशी केली पण त्याला खरोखरच यातील काहीच माहिती नव्हते !

जो मासेरीयाच्या हत्येच्या मोठ्या बातम्या न्यूयॉर्क टाईम्स व न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्युनने फोटोसहित छापल्या. गँगवॉरमधून जोची हत्या झाली हे खरे पण त्याला नेमके कोणी मारले हे गुलदस्त्यात राहिले. २०१० मध्ये 'न्यूयॉर्क गँगलॅंड' या पुस्तकात तत्कालीन घटनेच्या प्रत्यक्षदर्शीचा हवाला देऊन खुलासा केला आहे की या घटनेत त्या व्हिलातील रेस्त्रो मालकाचा मोठा हात होता अन गोळीबार होताना तो समोर उभा होता. आपल्याकडे गुन्हेगारी जगतातल्या माणसाच्या अनेक दंतकथा जशा प्रचलित होतात तशा जोच्या जन्माच्या अन मरणाच्या देखील दंतकथांना अमेरिकेत तेंव्हा अक्षरशः ऊत आला होता. १९७३ मध्ये 'लकी ल्युसियानो' नावाचा सिनेमाच जो च्या जीवनावर आला होता तर १९९० मध्ये आलेल्या 'मॉबस्टर्स'मध्ये जोची भूमिका अँथोनी क्वीन या दिग्गज अभिनेत्याने केली होती. आजही जो मासेरीयाच्या जीवनात घडलेले अनेक सत्यप्रसंग वेगेवगळ्या मुलामा लावलेल्या हिंदी / इंग्लिश सिनेमात पहायला मिळतात. इतकं नाट्य त्याच्या जीवनात ठासून भरलेलं होतं...

जो मासेरीया मेला पण ल्युसियानोवरदेखील काही लोकांनी या कटात सामील असल्याचा संशय घेतला. पण तसं कधी सिद्ध होऊ शकलं नाही. मात्र ल्युसियानोच्या जीवाला खंत लागून राहिली की, आपण दोनेक मिनिटासाठी तिथून गेलो अन आपला जिवलग दोस्त आपण गमावला. आपण त्याला तिथे सोडून जाणे या भावात पडेल हे माहिती असते तर आपण गेलो असतो का ? आपण आपल्या मित्रासाठी खरेच इतके लकी होतो का ?

जगाच्या दृष्टीने चार्ल्स ल्युसियानो हा जो साठी 'लकी' ठरो वा अनलकी ठरो पण जो मासेरीया त्याला हव्या असलेल्या अवस्थेत म्हणजेच पत्ते खेळत मरण पावला होता, तेही उजव्या हातातल्या इस्पिकच्या एक्क्यासह !
ल्युसियानो हा जोच्या जगण्यासाठीच नव्हे तर त्याच्या इच्छामरणासाठी देखील लकी ठरला होता असं मला वाटते ...

- समीर गायकवाड.

(पोस्टसोबतचा फोटो जो मासेरिया याचाच आहे. हाच फोटो हत्येच्या दुसऱ्या न्यूयॉर्क टाईम्सच्या मुखपृष्ठावर झळकला होता )

आणखी विविध वाचनासाठी ब्लॉगला भेट द्या खालील ब्लॉगपत्त्यावर ..
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_5.html

JO.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users