उतरले निळे मोर ...

Submitted by भुईकमळ on 3 August, 2016 - 07:27

उतरले निळे मोर दूरवर डोंगरात
घनपिसारे रुळती खोलवर कपारीत ...

सोनियाची गेंदफुले वाऱ्यावरी हिंदोळत
परिमळला कदंब मेघावलीच्या कवेत .
सुमनाजुक रोमांच अंगी त्याच्या लपेनात ...

वारा शिंपी थेंबासव गोकर्णीच्या लयीवर
तान हिरवी मादक वेलांटली तटावर
शेवाळल्या लिपीतून शिलालेख बोलतात ...

लोळुनिया गेली सर तृणदाट शय्येवर
गंध हिरवा मातट हिसळतो रानभर .
निखळली पैंजणाची थेंबघुंगरे जाळीत ...

रास सोनटिकल्यांची झिळमिळे गवतात
रंगथवे पाकोळ्यांचे लवलवती उन्हात .
पाणी पहेनल्या वाटा झुळुझुळू चालतात .

सातारंगांचे गोंदण सोनसळी कायेवर
दिशा ओलेती गौळण झुकलेली जळावर
पंखस्पर्शाची जाणीव , डुचमळला एकांत ...

गेले ओठंगुनी स्वप्न- जळी तरंग आठव
देहांगणी पागोळयांचा ठिबकता थेंबरव
रेंगाळला झिम्मसुर मिटलेल्या पापणीत ...
......................माणिक वांगडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता, आवडली.
शेवाळल्या लिपीतून शिलालेख बोलतात.....सुरेख

फक्त ते 'पाणी पहनल्या वाटा' तेवढे विजोड वाटले इतर शब्दकळेशी

धन्यवाद! मनीमोहर सत्वर प्रतिसादासाठी .
खुप धन्यवाद अमेय ! 'फक्त ते 'पाणी पहनल्या वाटा' तेवढे विजोड वाटले इतर शब्दकळेशी >>>तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मराठमोळ्या शब्दांमध्ये तो एखादाच हिंदी शब्द विसंगत वाटतोय . पण मला असं म्हणायचंय की पाणी नेसलेल्या पायवाटांची लगबग सुरु झालीय .'पाणी पांघरून वाटा ' असं केलं तर त्यांना नीज येईल . पाणी पहेनलेल्या वाटा उत्सुक अभिसारिके सारख्या उत्फुल्ल वाटल्या मला .

धन्यवाद मॅगी ...एटिडि करताना जेव्हा आम्ही outdoorला पहिल्यांदाच landscape काढायला गेलो तेव्हा तिथे दिसणारया गवताळी लाटा पाहून मी इतकी हरखले की येताना पेंटिंग ऐवजी कवितेसारखं काही तरी लिहुन आलेले .. तुम्ही म्हटल्याप्रमाणे चित्रच पण शब्दांत चितारलेलं. outdoorच्या निमित्ताने बरयाच वर्षानंतर मी बाहेरचे जग पहिल्यांदाच बघत होते ,पुन्हा निसर्गाच्या इतक्या निकट येऊ शकल्याने असेल अशा निसर्गछंदी शब्दुलीशी माझे सख्य कायमचच जुळलं .

अप्रतिम...अप्रतिम शब्दरंग!

घनपिसारे,सुमनाजूक रोमांच,वेलांटली तान,थेंबघुंगरे...अजून बरेच काही!
वाचता-वाचता 'बगळ्यांची माळफुले' आठवून गेली अचानक!
सुंदर रचना! अभिनंदन!!

शेवाळल्या लिपीतून शिलालेख बोलतात ... इथेच खल्लास म्हणणार होत्ये, पण..
पाणी पहेनल्या वाटा झुळूझुळु चालतात आणि झिम्मसूर तर अहा!
डूचमळला एकांत!! _//\\_

सत्यजित... तुमच्या सुंदर प्रतिसादाने भारावुन गेले पण जरा दडपून गेल्या प्रमाणेही वाटले कारण तुम्ही वा. रा .कान्त यांच्या गीताशी तुलना केलीत. ' कमलापरी मिटति दिवस उमलुनी तळ्यात' अशा कमी शब्दांत सखोल अर्थ व्यक्त करणाऱया ओळी या जन्मी तरी माझ्या कवितेत कधी उमटतील काय देव जाणे ! ...
तरीही या कौतुकासाठी मनापासुन आभारी आहे .

चिन्नु , तुमच्या उत्कटशा प्रतिसादासाठीही मनापासुन धन्यवाद !

नितांत सुंदर चित्रदर्शी रचना ‌...
पण मलाही पहेनल्या , थेंबासव (थेंब+ आसव),हिसळतो हे शब्द खटकतात....
थेंबासव ऐवजी थेंबदव , थेंबघुंगरू सारखे
पाणी पहेनल्या - पाणी परिधानल्या वाटा
हिसळतो- दुस-याकडून जबरदस्तीने हिसकावतो असे वाटते, हा बोलीभाषेचा शब्द असेल तर ठीक...
हिंदळतो - हिंदोळनं--- लयीत चालताना पाण्याने भरलेला हंडा हिंदोळतो.
किंवा गंध हिरवा मातट उचंबळे/ओसंडतो रानभर
मला माहित आहे तुम्ही खूप विचारपूर्वक शब्दरचना केलीय पण राहवत नाही...माफी असावी...
एका सुंदर रचनेसाठी अभिनंदन

हिसळतो म्हणजे मला वाटतं हिंदकळतो.
पहेनल्या हा शब्दडानेकांना खटकलेला दिसतोय पण मला फारआवडला.