बादलीयुद्ध

Submitted by जव्हेरगंज on 31 July, 2016 - 00:35

"केवड्याला दिली ओ ही बादली?"
"सत्तर रुपये"
मी क्यान्सल केली. एकतर सत्तर रुपये ही एक अवाढव्य रक्कम होती. एकरकमी एवढा प्रचंड खर्च करणे तेही एका बादलीसाठी मला अजिबात आवडले नव्हते. दुसरं म्हणजे शंभराची नोट मोडणे माझ्या जिवावर आले होते. खिशात शंभर रुपये असणे ही काय किरकोळ बाब नव्हती. शंभर रुपयात मी इथल्या मॅटीनी थेटरात किमान दोन महिने पिच्चर बघू शकलो असतो. गेलाबाजार शाबुद्दीनच्या गाड्यावर महीनाभर नाष्टाही करु शकलो असतो, पण त्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे लागले असते. जे की मी ठरवलेच होते.

बादली क्यान्सल करुन मी न्यू राजस्थान स्वीटमध्ये जाऊन अंडा पॅटीस खाल्ले. नव्हे त्यासाठीच तर एवढ्या लांबवर आलो होतो. सॉस बरोबर पॅटीस खाल्लं की आमच्या मेंदूच्या तारा झंकारायच्या. आहाहा काय तो स्वाद!
सोबतीला ढोकळ्याचीही एक प्लेट दाबली अन गावात आल्याचं मी सार्थक केलं.

मग जरा बाजारात फिरलो. उगाचच. सवयच आहे तशी. एकदोन जुनी कॅसेटं विकत घेतली. तीस रुपयाला दोन. छंद आहे आपला. बोलून चालून अलिशा. कसली गाणी म्हणते यार.
मग बसस्टँडवर लस्सी पिलो. दोन गल्ल्या ओलांडून थेटराकडं चक्कर टाकली. भारी भारी पोस्टर बघून घेतले. मग डबल अंडापाव तिथंच दाबला.

मग मात्र निघालो. अर्थात फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक 'मग' तेवढा विकत घेतला. एका 'मगा'त आंघोळ उरकणे हे एक दिव्य काम होते.
वाटेत खिसे चापचले. तीस रुपये उरले होते. मूडच गेला. पण वळणावर तो चायनीजचा गाडा दिसला. आणि...

-----------------------

तर नेहमीप्रमाणेच फाटक्या खिशाने मी रुमवर पोहोचलो. बरीच रात्र झाली होती. जेवण नावाची गोष्ट मी रविवारी करतच नसतो. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हताच.

चिंटूछाप राजेश समोर बसला होता. कायम जीन्समध्येच. झोपायचाही तसाच. एकदा कँटीगला नाष्टा करायला गेलतो याच्याबरोबर. एकशेदहा रुपयांचं मंच्युरीयन खाल्लं साहेबांनी. वळणावरच्या गाड्यावर पंचवीस रुपयाला मिळतं. याच्यापेक्षा भारी. दणक्यात आदर दुरावलाच. शेवटी बॉम्बेगाय.

तर अशा या हाय प्रोफाईल पोराची बादली मागणे म्हणजे साक्षात गंगू तेलीनं राजा भोजला पोरगी मागण्यासारखं होतं. म्हणून मी ती कधीच मागितली नव्हती.
त्याची बादली कॉटखाली ठेवलेली असायची. गुबगुबीत हिरव्या रंगाची उठावदार बादली. अगदी धष्टपुष्ट वाटायची. भरल्या अंगाची.
रोज सकाळी जेव्हा मी उठायचो, तेव्हा राजेशची आंघोळ अगोदर झालेली असायची. अगदी फ्रेश.
कॉटखाली न्हाऊन निघालेली बादली दिमाखाने मिरवायची. आतमध्ये सोपकेस, कपडे धुण्याचा ब्रश, आणि अंगाला लावण्याची कसलीतरी जाळी असायची. एकंदरीत ती एक समृद्ध आंघोळ होती.

मी मात्र गोरखनाथ नावाच्या माझ्यासारख्याच एका कंगाल पोराच्या बादलीच्या शोधात असायचो. पोचे आलेली जर्मलची बादली. तिला सतराजण वापरायचे. आणि सोबतीला होता तांब्या चक्क. तोही असाच पोचे पोचे आलेला.
खरंतर मला बादली आणण्याची गरजच पडली नसती. पण या गोरखच्या बादलीसाठी रांगा लावल्या जायच्या. नंबर लावले जायचे. काहीजण तर पॉलटिक्सच करायचे. मी मात्र उशीरा उठत असल्याने माझा नंबर सगळ्यात शेवटी. कित्येकदा माझा पहिला तास या बादलीमुळेच बुडालाय.

-----------------------

तर त्या दिवशी राजेश माझ्या 'मगा'कडे बघून न बघितल्यासारखा करत म्हणाला,
"उद्या डॅड येणारायत"
खरंतर डॅड त्याचे येणार होते पण आनंद मला झाला. इव्हन झाला नसला तरी दाखवावा लागतो एवढी फॉर्म्यालीटी मला समजली होती. तीही त्याच्याकडून. शेवटी तो बॉम्बेगाय.
आम्ही आपले खेडवळ. खाटंवर छापड्या हातरुन झोपणारे. खरंतर गादी मलाही घ्यायचीच होती. पण स्वस्तात मिळेपर्यंत मी छापड्या हातरुनच झोपायचं ठरवलं होतं. तसंही आमचं निम्मं होस्टेल छापड्या हातरुनच झोपायचं.

"व्हय का? म्हंजे तू ऊद्याच जाणार का?"
"हो..." त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य मावत नव्हतं.
"आडमिशन मिळालं म्हण की तुला तिकडं"
"हो... अरे पण सामानाचं काय करु? खूप त्रास होईल रे न्यायला, तुला देऊ?"
"चालेल, कितीला देणार?"

तर त्या दिवशी आम्ही जेवण करुन आल्यावर नक्की तो काय काय मला विकणार याचा आढावा घेऊ लागलो.
"बोल, या गादीचे किती लावणार?"
"मला माहित नाही रे, तुच सांग"
"कितीला घेतली होती"
"माहित नाही रे, मम्मी ने घेतली होती"
"बरं, पन्नास रुपय देतो मी, चालेल?"
"ओके, चालेल"
"गादीसोबत ऊशी, बेडशीट फ्री असतं माहित्ये ना?"
"हू..."

राजेश जरा जास्तच बावळट निघाला. याला व्यवहाराचं जरासुदीक ज्ञान नाही.

"हि पुस्तकं, किती लावणार याचे?"
"नाही नाही, अरे पुस्तकं लागतील ना मला तिकडे" हे एक मोठं नुकसानच झालं मला. आता झेरॉक्स काढूनच अभ्यास करावा लागणार.
"बादली?"
"हू..."
"वीस रुपयं"
"चालेल"
"बादलीसोबत सोपकेस, ब्रश, जाळी फ्री"
"ठिक आहे, चालेल"
"हँगर?"

घेतलेल्या एकेका वस्तूंची लिस्ट केली. शेवटी बेरीज लागली दिडशे रुपयांची. ती चक्क मलाही फार कमी वाटली. उगाचच गिल्टी का काय वाटायला लागलं. पण मी लूटमार थोडीच करत होतो.
रोख रक्कम देऊन मी सौदा फायनल केला. आणि सुखाने छापडीवर झोपलो. त्यानंतर मला कधी छापडीवर झोपल्याचं आठवत नाही.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजवरुन परत आलो, तेव्हा राजेशला त्याच्या डॅडनं झाप झाप झापलं होतं, असं एकदोघांकडून कळालं. पण त्यांनाही समजलं नव्हतं नक्की का? आणि विशेष म्हणजे मी यायच्या आत ते दोघे रिक्षाने निघूनही गेले होते स्टेशनवर.
टेन्शनमध्येच मी रुममध्ये आलो. कॉटवर गादी दूमडून ठेवली होती. लिस्टप्रमाणे सगळं सामानही दिसत होतं. दिसली नाही ती फक्त बादली.
मी सगळी रुम धुंडाळली. पोटमाळ्यावर चढून बघितलं. सगळी बाथरुमं पालथी घातली. पण बादली कुठेच सापडली नाही.

होस्टेलवर येऊन आता कुठं पंधरा दिवस झाले होते. आणि माझी बादली चोरीला गेली होती.
-----------------------

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच आवडली कथा.
'समृद्ध आंघोळ'....!
विनोदाच्या अस्तरातलं कारुण्य भिडलं अगदी.
येऊंदेत आणखी.

छान

फारच छान रंगवली आहे कथा.
हॉस्टेल वर राहिले की अनेक गोष्टींची किंमत कळते.

जव्हेरगंज जियो !! कितीतरी दिवसांनी कँटिंग शब्द वाचला. आमच्या मित्राच्या काकाचे गावातल्या थेटर मध्ये कँटिंग होते. मग कधे मधे आम्हाला पण पिक्चर फुकट पहायला मिळायचे. भारी दिवस!
होस्टेल मधली बादली आणि सोपकेस ! ४ वर्ष वापरली एक बादली. आता खरंच वाटत नाही की अगदी अशीच कॉटखाली असायची. Happy

हास्टेलातली बादली. जिव्हाळ्याचा विषय. लै भारी जव्हेरगंज.
लस्सी पिलो वाचून घरी गेल्यासारखे वाटले!

मस्तयं
हॉस्टेलची बालटी म्हटले की मला आंघोळीपेक्षा त्यात हिटर टाकून उकडलेली अंडीच जास्त आठवतात Happy

पुढला भाग येऊ द्या लौकर

मस्त. बादली आणि इतर आठवणी आठवल्या.
हॉस्टेलवर कुणाला भेटायला पोरगी येणार असली की होणारी इतरांची धमाल धावपळ, जेवायला जाता येता होणारे चेहेरे, पीए सिस्टीमवरून होणाऱ्या घोषणा आणि बरंच काही!!

Pages