कर्मदरिद्री लोकांचा समृद्ध वारसा ....

Submitted by अजातशत्रू on 31 July, 2016 - 23:47

चिरे न ढासळलेल्या इथल्या बुरुजावरचा शिवछत्रपतींचा देखणा, भव्य अश्वारूढ पुतळा कुठूनही नजरेत भरावा असाच आहे अन इथे नुसते किल्ल्याचे संवर्धनच झालेय असेही नाही तर इथे आहे अभिनव शिवसृष्टी ! दोन बलदंड बुरुजांच्या मधोमध पश्चिमाभिमुख महादरवाजा. दाराशी दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन घोडेस्वार. माहुतासह एक हत्तीदेखील. दरवाजावर जरीपटका मिरवणारा नगारखाना- ज्यात शिंग, तुतारी आणि नगारा वाजवणारे. भोवती सैनिक-चौकीदारांचा पहारा.. हे कुठल्या ऐतिहासिक कथा-कादंबरी वा मालिकेतले वर्णन नाही तर एका ऐतिहासिक भुईकोटाचे हे वास्तव दर्शन आहे. हे वर्णन आहे माझ्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या किल्ल्याचे, शिवसृष्टीचे !

इतिहासप्रसिद्ध असा हा किल्ला इ. स. १२११ मध्ये यादवराजा सिंघन याने बांधलेला आहे. आदिलशाही, मोगल, मराठे आदी सत्ता इथे नांदल्या. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात इथे मुक्कामाला होता. या काळातच त्याला छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने अत्यानंदाने अकलूजचे नामकरण ‘असदनगर’ असे केले. छत्रपती संभाजी महाराज, दुसरे बाजीराव आणि ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचेही मुक्काम या भुईकोटाने अनुभवले. अशा या भुईकोटात शिवकाळ जागविणारी ही ‘शिवसृष्टी’ आकारास आली आहे.

१९७४ पर्यंत अकलूजचा हा भुईकोट अन्य ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच एक खिंडार बनले होते. पडलेले तट व बुरूज, माजलेली झाडे आणि प्रातर्विधीपुरता लोकांचा उरलेला संबंध अशी या वास्तूची दुरवस्था होती. परंतु तत्कालीन सरपंच आणि विजयसिंह मोहितेंचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी ही दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. ग्रामपंचायतीची मदत व श्रमदानातून काम सुरू झाले. ढिगाऱ्यांची सफाई झाली. तट-बुरुजांची दुरुस्ती झाली. मोकळ्या जागी बाग, कारंजी अवतरली. आणि मध्यभागी एका उंच टेहळणी बुरुजावर छत्रपतींचा अश्वारुढ पुतळाही उभारला गेला. पाहता पाहता या खिंडाराचे पुन्हा धारातीर्थ बनले. अकलूजच्या या धारातीर्थावर महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवकथेने १६ जून २००८ पासून पुन्हा एकदा आपला डाव मांडला आहे.
शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा हा प्रवास. २० शिल्पपट, शिवजन्म व राज्याभिषेकाचे दोन मोठाले देखावे, शिवरायांच्या गडांच्या प्रतिकृती यांतून ही शिवसृष्टी उलडगली आहे. या शिवसृष्टीचे अभि बेल्हेकर यांनी केलेलं वर्णन अंगावर रोमांच आणते.

शिवजन्म सोहळ्याच्या कल्पक देखाव्याने या शिवसृष्टीस प्रारंभ होतो. शिवनेरीवरील शिवजन्मस्थानाची ही प्रतिकृती. तिच्या अंतरंगात विविध शिल्पांतून साकारलेला शिवजन्मसोहळा. शालिवाहन शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०! अवघ्या महाराष्ट्राचा हा सुवर्णक्षण! तो अनुभवायचा आणि तटाच्या कडेने मांडलेली शिवगाथा पाहू लागायचे. ‘कुठलाही इतिहास पुस्तकापेक्षा दृश्य स्वरूपात, शिल्प-चित्रांच्या रूपात चिरंतन लक्षात राहतो. अशा इतिहासात गुंतायला होते!,’ हा या उपक्रमामागचा हेतू होय. पहिलाच शिल्पपट पाहताना याचा अनुभवही येतो. ‘शिवबाचे पहिले सूर्यदर्शन’ हा विषय ! अंधाऱ्या, बंद खोलीतून सूर्यदेवतेकडे पाहण्याचा तान्ह्य़ा शिवबाचा तो पहिला क्षण ! भोसल्यांचे कुलोपाध्याय मल्हारभट अर्विकर यांनी खास मुहूर्ती हा योग घडवून आणला. शिवनेरीच्या तटावर जिजाबाईंच्या तळहाती काजळ-तीट लावलेले, अंगडे-टोपडे घातलेले शिवबाचे ते कोवळे रूप साकारले आहे. त्याचा मुखडा पाहण्यासाठी सह्य़ाद्रीच्या आडून सूर्यनारायणानेही आपली मान थोडी वर केली आहे.

‘प्रभात समयी, शिव-सूर्य भेट झाली,
रंगून लाल पूर्वा झाली जणू गुलाली!’
या पहिल्या प्रसंगानेच दर्शक शिवकथेवर स्वार होतात. पुढे लुटुपुटूची लढाई, गड-किल्ल्यांच्या खेळात सवंगडय़ांसह रमलेले बालशिवाजी दाखवले आहेत. वीररसाचे हे गोडवे दुरून महाली जिजाबाईही निरखत असतात.
‘खेळातलीच राज्ये, खेळातल्याच मौजा
होणार का उद्यां हा विजयी स्वतंत्र राजा?’
बालशिवबा थोडे मोठे होतात. खेळातील खोटी शस्त्रे जाऊन खरी हत्यारे हाती येतात. बाजी पासलकर, माणकोजी दहातोंडे यांच्याकडून शस्त्रशिक्षण सुरू होते. शिवबांच्या हाती भाला आहे आणि बाजी, माणकोजी त्यांना जणू एकेक डावपेच सांगत आहेत. आपले शिवराय घडू लागतात..
पुढे शिवबांचा २८ जानेवारी १६४५ चा तो न्यायनिवाडा येतो. रांझ्याच्या पाटलाची अत्याचारी वृत्ती त्याचे हात-पाय तोडण्याचे हुकूम बजावते. शिवबांच्या करारी बाण्याने सारा दरबार चमकतो. रयतेच्या आदर्श राजाची बीजे जणू या शिल्पातून पाझरू लागतात.

एव्हाना स्वराज्याचे वारे साऱ्या मावळात वाहण्यास सुरुवात झालेली. ‘आमचे राज्य, आमचा झेंडा, आमची सेना’ हे सारे स्वराज्याची कल्पना घेऊन येते. या भावनावेगातच २३ मे १६४५ रोजी निवडक मावळ्यांसह रायरेश्वराच्या गिरीमंदिरी स्वराज्याची शपथ घेतली जाते. एका शिवाचे दुसऱ्या शिवाकडील हे मागणे. समोरचा शिल्पपट हा सारा प्रसंग जिवंत करत असतो.
एकेक शिल्पपट आणि सोबतच्या माहितीतून शिवकाळावरील चित्रपटच सुरू झालेला असतो..
पुढे ‘तोरण्याचे तोरण’ चढते आणि संत तुकारामांचा या स्वराज्याला आशीर्वादही मिळतो. स्वराज्य स्थापन तर झाले; आता त्याची खरी अग्निपरीक्षा सुरू होते. पहिलेच संकट येते ते अफझलखानाचे. शिवाजीमहाराज आणि अफझलखान यांच्या भेटीचा तो अद्भुत प्रसंग पुढच्या शिल्पपटात साकारलेला असतो. दृश्य भेटीचे, पण नजरेत कट-कारस्थान! पाठीत खंजीर खुपसणारा अफझलखान आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणारे शिवराय समोर अवतरतात. ‘आऽऽ! दगा ऽऽ दगाऽऽ’ म्हणून ओरडणारा खान, त्याच्या मदतीला धावणारा सय्यद बंडा आणि त्याला मागच्या मागे गारद करणारा जीवा महाला! प्रतापगडाच्या युद्धातील ही पात्रे आणि तो प्रसंग आजही हे काहीतरी अदभुत असल्याचेच सांगतात.

यानंतर पावनखिंडीची ती घनघोर लढाई तर या शिवसृष्टीत एक नवे वारेच भरते. १२-१३ जुलै १६६० ची ती मध्यरात्र! वरून आषाढसरी कोसळत आहेत आणि गजापूरच्या घोडखिंडीत सिद्दी मसूदच्या सैन्यापुढे बाजीप्रभू देशपांडे एखाद्या भिंतीसारखे आडवे आले आहेत. शेजारील दुसऱ्या प्रसंगात महाराजांची पालखी विशाळगडाकडे धावते आहे. दोन्ही हाती दांडपट्टे घेतलेल्या त्या नरवीराने शिवाजीराजांनाच नाही, तर आपल्या स्वराज्यालाच जणू सुरक्षित तीरावर पोहोचविले. बाजीप्रभूंची ही मृत्यू संचारलेली अवस्था पाहायची आणि म्हणायचे- ‘इथेच फुटली छाती परि ना दिमाख हरला जातीचा!’
ज्येष्ठ शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या शाळेत तयार झालेली ही सारी शिल्पं! प्रत्येकातील बोलक्या व्यक्तिरेखा, प्रमाणबद्धता, त्रिमितीचा उत्तम परिणाम आणि सोबतीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा इतिहास! सारे मिळून जणू वीररसाचा पोवाडाच गात आहेत.

‘शाहिस्तेखानाची फजिती’ हा पुढचा शिल्पपट. राजांच्या हल्ल्यातून बचावलेला खान गवाक्षातून बाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात, तर त्यावर त्वेषाने चालून जाणारे संतप्त शिवराय! या शिल्पकलेने स्थिर शिल्पांनाही जणू गती प्राप्त केलेली. इंग्रजांना शिक्षा, सागरी सत्तेची उभारणी, सुरतेवर स्वारी, औरंगजेबाच्या दरबारातील अपमान, आग्ऱ्याहून सुटका, हिरकणी बुरुज, गोवळकोंडय़ाची भेट आणि सेनापती हंबीरराव मोहिते.. असे एकेक विषय या शिल्पपटांतून उलगडत जातात. या भुईकोटाच्या साक्षीने जणू इतिहासच बोलत असतो. पुरंदरच्या लढाईतील मुरारबाजी देशपांडेंचा तो आवेश जणू वाऱ्यालाही स्तब्ध व्हायला लावतो. ‘आधी लगीन कोंढाण्याचं’ असे सांगणाऱ्या तानाजी मालुसरेंची निष्ठा स्वराज्याचे धगधगते यज्ञकुंडच समोर उभे करते. हे एकेक प्रसंग.. स्वप्न म्हणावेत की सत्य ? त्यांतून आश्चर्याची एकेक वादळे पुढय़ात उभी राहतात.

या साऱ्यांची फलनिश्चिती सांगत राज्याभिषेकाचा भव्य देखावा सामोरा येतो. छत्रपती शिवराय, त्यांना राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, अन्य ब्रह्मवृंद, राणीवसा, राजपुत्र संभाजी, राजपुत्र राजाराम, अष्टप्रधान मंडळ, असंख्य मावळे उपस्थित आहेत. मंगलवाद्ये वाजत आहेत. ध्वज उंचावले आहेत. छत्र-चामरे धरलेली आहेत. या साऱ्या धामधुमीत टोपीकरांचे नजराणे सादर होत आहेत.. आणि या दृश्यावर राजमाता जिजाऊंची कृतार्थ नजरही फिरते आहे. तब्बल १७२ शिल्पांतून साकारलेला ‘शिवसृष्टी’चा हा कळसाध्यय ! अकलूजच्या भुईकोटात तो रायगडाची अनुभूती देऊन जातो.

शेजारच्या दालनात रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, देवगिरी, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या दुर्गाच्या प्रतिकृतींची एक मोठी शृंखला शिवरायांचे स्वराज्य दाखवीत असते. तेव्हा इतिहास घ्यावा की भूगोल पाहावा, हेच कळत नाही.

आजकाल अनेक शिवकालीन किल्ल्यांची दुरवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी आता भग्न अवशेष राहिले आहेत,शासनाची दुर्गसंवर्धनातली आस्था किती खरी किती खोटी हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. जनप्रतिनिधी तर निव्वळ तोंडाची वाफ सोडताना आढळतात तर या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांची आर्थिक ताकद अगदी तुटपुंजी आहे, दुर्गसंवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांकडे मनुष्य बळ आहे मात्र आर्थिक कुवत तसेच पुरातत्व खात्याच्या नियमांचा अडथळा यामुळे तिथे किल्ल्याचे सदय स्वरूप जतन करणे देखील कठीण जाते आहे. गेली दोन दशके या विषयांवर शिवप्रेमी जनतेच्या भावना तीव्र असूनही कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर ही बाब नसावी ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. विशेष लक्षणीय बाब म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने मताचा जोगवा मागण्यात सर्वच पक्ष अग्रेसर असतात पण दुर्गसंवर्धनात सुरु असलेली अक्षम्य हेळसांड पाहून राजकारण्यांची किळस येते. असो ....

जेंव्हा एखादया गोष्टीचा ठाम निर्धार केला जातो तेंव्हा केवळ ग्रामपंचायत स्तरावर देखील किती अमुल्य, भव्य आणि आमुलाग्र बदल घडू शकतो याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे. फेब्रुवारी २०१४ पासून अकलूज ग्रामपंचायत नगरपालिकेत रुपांतरीत झालीय. त्यामुळे शिवसृष्टीची देखभाल पहिल्यापेक्षा अगदी नेटकी आहे. एकीकडे एक ग्रामपंचायत इतके सारे आशादायक बदल करु शकते तर दुसरीकडे अनेक मोठ मोठ्या नगरपरिषदा, तालुक्यांची मुख्य ठिकाणे, जिल्ह्याची मुख्य ठिकाणे, महानगरपालिका वा महानगरे मात्र हात झटकून बाजूला होतात. थातूर मातुर कारणे सांगत रडत राहतात. इच्छा असेल तर मार्ग निघतोच..... अरबी समुद्रातील शिवस्मारक होईल तेंव्हा होईल मात्र आहे त्या किल्ल्यांची नेमकी काय दुरवस्था झाल्यावर प्रशासन, राजकीय पक्ष आणि सरकार जागे होणार आहे हे कळायला मार्ग नाही. तोवर रोज खुल्या असणारया अकलूजच्या शिवसृष्टीकडे बघून त्रोटक समाधान मिळवायला काही हरकत नाही. लोकांनाही नुसत्या शिवजयंती साजऱ्या करण्यात अन मिरवणुका काढून डॉल्बीवर नाचण्यात धन्यता वाटते, याची गोम राजकारण्यांनी चांगली ओळखली आहे. सर्व दोष सरकार व पुढाऱ्यांच्या माथ्यावर मारण्यात तरी काय अर्थ आहे ? जनतेचे या महान वास्तूंप्रती काही उत्तरदायित्व आहे का नाही ? लोकांना याची जाण किल्ले नामशेष झाल्यावर येणार का ?

या शिवसृष्टीला अल्पसे तिकीटदेखील आहे कारण आपल्या देशात फुकट मिळणारया कोणत्याच गोष्टीची कुणालाच किंमत नाही. जर किंमत असती तर आपल्यासारख्या नतद्रष्ट कर्मदरिद्री लोकांना फुकटात मिळालेल्या अशा समृद्ध ऐतिहासिक किल्ल्यांचा अनमोल वारसा आपण आपल्या डोळ्यादेखत धराशायी होऊ दिला असता का ? सर्व प्रश्नांचे उत्तर आपणच आपल्या मनाला विचारायचं का नुसतंच जयभवानी, जयजिजाऊ, जयशिवराय याचा कोरडा जयघोष करत राहायचं हे ज्याने त्याने ठरवायचे आहे ...

- समीर गायकवाड.

शिवसृष्टीची सुंदर छायाचित्रे बघणार का ? मग खालील ब्लॉगपत्त्यावर भेटा ....
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post.html

(सूचना - या पोस्टवर जातीय / राजकीय / वैयक्तिक शेरेबाजी करू नये. )
53914373-e1462771770749.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users