बॅंक कर्मचारयांचा संप आणि मी ..

Submitted by अजातशत्रू on 30 July, 2016 - 00:46

सरकारला काही कळते का नाही ? काय चाललेय काय ?
तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या बॅंक कर्मचाऱ्यांची बाजू कोणी घेत नाही असे सरकारला वाटते का ?
अधूनमधून का होईना पण नियमितपणे संप करून सामान्य जनतेची मोठी सोय करणारया कर्तव्यदक्ष संपकरी बॅंक कर्मचाऱ्यांना शासनाने खरे तर चौदावा वेतन आयोग लागू केला पाहिजे ....
फार सोशिक आहेत हो हे लोक ! गळफास लावून मरणारया गोरगरीब भिकारचोट शेतकरयापेक्षाही यांच्यावर जास्त अन्याय होतो !
तरीदेखील नेटाने नोकरी न सोडता फक्त अधून मधून संप करतात ...
मग शनिवार रविवारला जोडून संप केला तर बिचारे थोडं फार आऊटींग का काय म्हणतात ते करू शकतात ...
राष्ट्रहितदक्ष बॅंक कर्मचाऱ्यांचे म्हणणे एकून न घेणारया या सरकारला काय म्हणावे ?
माझी सहानुभूती बॅंक कर्मचारयांसोबत नेहमीच राहील कारण बॅंकेत त्यांच्याकडून सामान्य जनतेला मिळणारी सौहार्दाची, सौजन्याची वागणूक मी कशी विसरेन बरे ?
चहा प्यायला देखील न जाणारे,
हातासरशी काम करणारे,
हेलपाटे मारायला न लावता एका दमात काम करून टाकणारे,
खातेदाराला बसायला खुर्ची देणारे,
फाईली चटकन हलवणारे,
तो पळून गेलेला मल्ल्या असो किंवा गावाकडचा आमचा मल्लिनाथ असो पण त्यांच्यात काडीमात्र भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देणारे,
सरकारी योजनांची माहिती अगत्यपूर्वक सांगणारे,
रागाचा कटाक्षदेखील न टाकणारे,
ग्राहकाला या टेबलावरून त्या टेबलावर न फिरवणारे,
एकाच वेळी साऱ्या कागदपत्राची माहिती देणारे
आणि अशी बरीच कामे करताना आपसात गप्पासुद्धा न मारणारे बॅंक कर्मचारी माझे जिव्हाळ्याचे आदर्श आहेत.....

त्यांना वारंवार संपास जाण्यास भाग पाडणाऱ्या शासनाचा कारण नसताना चेक बाउन्स होवो !
त्याच्या पैशात एटीएम मधून फाटक्या नोटा निघोत,
त्याच्या योजना कचरयाच्या टोपलीत जावोत,
त्याची फाईल जागोजाग अडून पडो,
त्याचे प्रकरण सगळं सही असूनही नामंजूर होवो,
त्याची सबसिडी अर्ध्या वाटेत अडकून पडो,
त्याची देय रक्कम प्रलंबित होवो, त्याची कागदपत्रे गहाळ होवोत,
त्याच्या कामाच्या वेळीच संगणक बंद पडोत,
वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरला काडी लागोत,
नोटा मोजणाऱ्या यंत्रात त्याच्या नोटा अडकून फाटोत,
त्याचे जर कुठले पासबुक फिस्बुक असेल तर त्याचे तेरा तुकडे होवोत,
त्याचे ऑनलाईन अकाउंट हॅक होवो,
त्याच्या खात्यातून पैसे गायब होवोत,
त्याचा पासवर्ड चोरीस जावा,
त्याचे क्रेडिट वाढीव व्याजावर मोजले जावे,
त्याला स्टेटमेंट देताना प्रिंटर बंद पडावा,
त्याला स्वाक्षरीसाठी करू देण्यासाठी एकाही कर्मचारयाकडे साधा पेनही जागेवर नसावा !
मग तरी ऐकशील का नाही रे बधीर शासना ?

तर अशा या दुष्ट शासनाचे पार तळपट होऊ देत ते परमेश्वरा !!
किती छळणार आहेस तू या निष्पाप, भोळ्या भाबड्या, पराकोटीच्या कर्तव्यदक्ष जीवांना ?
धिक्कार असो तुझाही, कारण तू देखील यांच्या संपात लक्ष घालत नाहीस ...
अरे दयाघना कसा फुटेना रे तुला पान्हा ?

आता अजून सहन करणे शक्य नाही ...
आता निर्धार करावाच लागेल,
बॅंक कर्मचारयांनी फालतू खातेदारांची भीड भाड न बाळगता सलग महिना दोन महिन्याचा संप केला तरी हरकत नाही पण आता माघार घेऊ नये ....

भिऊ नका रे बांधवांनो, सगळा देश तुमच्या पाठीशी आहे ...

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_30.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला..आम्हीही एका मोठ्या सरकरी ब्यांकेच ग्राहक...कायम गर्दी, कर्मचारी काम चोख करतात पण वागणं मात्र खूप तिरसठ.. फॉर्म मध्ये एखादी चूक आल्यास हाकलून देतात वय बगत नाहीत आन कुटून आलाय हे बगत नायत..