घर कुठेय?

Submitted by विद्या भुतकर on 26 July, 2016 - 12:37

मागच्या आठवड्यात भारतात पोचले. ४-५ दिवसांत बरीच सेट्ल झाले. मला तिकडून निघायला अजून एक आठवडा होता तेव्हा एका टीम-मेटने सोमवारी सकाळी एकदम आनंदाने विचारलं,"अरे तू आहेस होय अजून? मला वाटलं तू निघून गेलीस आणि मला बाय पण करता आलं नाही." तिच्या या वाक्याने मला थोडा का होईना आनंद झाला. आम्ही निघायच्या आधी अजून एक मैत्रिणी घरी येऊन गेली. मी हक्काने तिला नाश्ता करून आणायला सांगितलं आणि तिनेही मस्त उपमा, मेदू वडा बनवून आणले. निघायच्या दिवशी शेजारच्या काकूंनी आठवणीने विचारून डब्यात पराठे बांधून दिले. एक दोन मित्रांनी विचारलेही की एअरपोर्टला सोडायला येऊ का? एकाने सोडलेही.

हे सर्व सांगायचं कारण म्हणजे, गेले वर्षभर एका नवीन जागी, नवीन घर, नवीन नोकरी, नवीन लोक या सर्वात मिसळून जाण्याचा हळू हळू प्रयत्न करतच होते. पण असं कुणी बोलल्यावर, केल्यावर वाटतं की खरंच आपण असल्याने किंवा नसल्याने कुणाला फरक पडतो हि कल्पना किती आनंददायक आहे. इथे पुण्यात आल्यावरही शेजाऱ्यांना, घरच्यांना आणि भेटायला आलेल्या मित्र मैत्रिणींना पाहून हा आनंद द्विगुणित झाला. 'काय गं, कधी आलीस?' असं केवळ विचारल्याने किती फरक पडतो नाही? गेले वर्षभर आपण नव्हतो यानेही कुणाला फरक पडला हे पाहून छान वाटले.

आजपर्यंत आम्ही इतक्या जागी फिरलोय आणि राहिलोय, प्रत्येकवेळी नवीन जागी गेल्यावर मागे राहिलेल्या लोकांची आठवण, वाटणारा एकटेपणा या सर्वांमुळे आपण घेतलेला निर्णय योग्य होता का असे वाटत राह्यचे. त्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे एखादी छान भाजी केली की शेजारी देऊन येण्याची इच्छा होणे आणि ती त्यांनी आवडीने खाणे यातही एक प्रकारचा आनंद असतो. किंवा आपल्या घरी एखादी नवीन वस्तू आणली, मग ती कितीही छोटी असू दे, ती शेजाऱ्यांना दाखवणे आणि त्यांनीही 'पार्टी कधी?' असं म्हणणे हाही एक अनुभव असतो.

ऑफिसला गेल्यावर, एखादा नवीन ड्रेस घातला असेल तर "अरे वा !" असं म्हणणारी एखादी मैत्रिण. कधी मूड नसेल तर,'काय झालं? ठीक आहेस ना?' असं म्हणणारं कुणीतरी तिथे असणं. आपण ना सांगता सुट्टी टाकली तर,"बरं नाहीये का? ' असं विचारणारं कुणीतरी असणं. आपल्या रोजच्या आयुष्यात या किती छोट्या असणाऱ्या पण तरीही नवीन जागी गेल्यावर त्यांची आठवण होणाऱ्या गोष्टी असतात. एखाद्या ठिकाणी त्या मिळाल्या की मग ते कुठेही असो, मन रमून जातंच. आणि त्या नसतील तर, तो आपला देश असला तरी तिथे करमत नाही.

अनेक जण नोकरी, घर किंवा देश बदलायला तयार होत नाहीत. बरेचदा त्रास होत असूनही त्याच ठिकाणी राहतात. 'बाकी सर्व ठीक आहे ना? मग नको बदलायला' असा विचार करतात. त्यामुळे अशा अडकलेल्या लोकांना पाहून त्यांना माझे अनुभव सांगायची इच्छा झाली. आमच्या अनेक अनुभवांवरून मी आता हे नक्की सांगू शकते की, माणूस म्हणून जुळवून घेण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यानुसार मग आपण त्या त्या ठिकाणी सामावून जातोच. त्यामुळे कुठलाही बदल कितीही अवघड वाटला तरी हळूहळू सोपा होऊन जातो. आणि त्यातून जुने आणि नवीन मित्र जोडले जातात हे वेगळेच. असो. सध्यातरी मी थोडे दिवस पावसाळ्याचा आणि इथे राहण्याचा पूर्ण आनंद घेत आहेच. Happy

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users