अर्धओला पाऊस ...

Submitted by अजातशत्रू on 22 July, 2016 - 23:50

अर्धवट पाऊस पडून जरी गेला तरी गावाकडचे वातावरण बदलते, थोडे कुंद ढग अन मधूनच येणारी शिरवळ यांचा खेळ सुरु होतो. अखिल चराचरात बदल घडू लागतात अन सगळे सजीव निर्जीव आपापल्या नव्या विश्वात दंग होऊन जातात. परिपूर्ण नसले तरी सृष्टीचे हे अर्धोन्मिलित रुपडे मनाला भावते, त्याचेच एक छोटेखानी वर्णन. तुम्हाला गावाकडची अर्ध्या कच्च्या पावसाची सफर घडवून आणेल ..........

गावाकडे आता नाही म्हणलं तरी थोडा थोडा पाऊस सुरु झालाय. पडावे की न पडावे हा पावसाच्या डोक्यातला गुंता मात्र अजून पुरता सुटलेला नाही. मात्र जेव्हढा काही पाऊस पडून झालाय तेव्हढ्यावरच काळ्या आईने कुशीतल्या बियांना कोंब कसेतरी फुटावेत यासाठी बळीराजाच्या मनावर पाखर घालायला सुरुवात केलीय. शेतातल्या बांधाजवळून पुढच्या आडरानात जाणारा बैलगाडीचा रस्ता आता हिरवा झालेला. रस्त्याच्या दोन्ही कडेला चौफेर तण माजलेले. तर झाडांची पालवी हिरवीकंच झालेली. पाऊलवाटेतून बैलगाडीची चाके जाणारा भाग अजून मातीचाच आहे. त्याच्या मधोमध एक नागमोडी हिरवाई त्या चाकांची साथ आता सोबतीला आहे. खांद्यावर जू असणारे बैल मात्र या रानटी गवताला तोंड देखील न लावता आपल्याच एका तंद्रीत पुढे जातात. बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज झाडातल्या पाखरांना मोहून टाकतो. पानापानावर पावसाचे थेंब हलके ओझे टाकून गेलेत. त्यांच्यावरची नक्षी आता जास्त गडद जांभळी झालेली आहे. निरनिराळ्या रंगाच्या अन वाणाच्या बारीक किड्या- अळ्यांना अजून म्हणावा तसा जोम आलेला नाही, एव्हाना म्हशीच्या पाठीपासून ते वडाच्या शेंड्यापर्यंत त्यांची बारीकसारीक कसल्या न कसल्या रागातली मैफल ही भरलेली असते. नाकतोडे पाना मागे निवांत दडून अंग मोडून पडलेले आहेत. ओल्या पिचकलेल्या लिंबोळ्याचा खच आता पडवीत पडलेला आहे. त्याच्यावर माशा घोंगावतायत. परसातले सगळे सारवण ओल्या कोरड्याचिखलात मिसळून गेलेलं, शेणाने सारवल्याच्या खाणाखुणा शेणकुटाच्या खपल्यातून कुठेकुठे नजरेस पडतात. गोठ्याच्या भोवतालच्या दगडी कुंबीतनं एक ओलसर ओशट वास येऊ लागलाय. भिंतींवर वेगवेगळे वाटोळे आकार काढणारी ओल हळूहळू नजरेस येऊ लागलेली अन छताच्या पत्र्यातून गळणारया थेंबाचे एकसुरी संगीत सुरु झालेले. पुर्वी दरवर्षी येणारा आणि 'पेर्ते व्हा, पेर्ते व्हा' असे सांगणारा पावशा मात्र आता आडसाली येतोय ; यंदा तो आलेला नाही. टिटव्या आणि भोरड्याना मात्र पार ऊत आलेला आहे. आभाळाकडे तोंड वर करून पडलेली ढेकळे एव्हाना हिरमुसून माना आत खुपसून बसलीत, थोड्याशा पावसाने त्यांची धग मात्र चांगलीच वाढलीय.ओढ्यातले खडक कोरडे खडंग आहेत, त्यांच्या तळाशी थोडी ओल आहे पण कधी काळी खेकडे असायचे ते दिसत नाहीत.दयाळ आणि वटवटे अख्ख्या माळावर दिसत नाहीत.

रानातून पाणी येण्याइतका पाऊस काही अजून झालेला नाही त्यामुळे वाफसाच नाही तर पुढे तिफण कशाची धरायची हा आपला नेहमीचा जिकिरीचा प्रश्न ! शेतात औतं लावून पाळी घालून कुळकुळीत झालेलं रान अजून म्हणावं तसं भिजलेलं नाही हे तेच तेच गाऱ्हाणं जन्माला लागंल की काय अशी भीती आता वाटत्येय. इरली आणि घोंगडी काढून तयार ठेवलीत पण म्हणावं तसं आभाळ पडतच नाही त्यामुळे बोडक्या डोक्यानेच बाहेर जाणेयेणे चालू आहे.ओढ्याला पाणी येउन जेंव्हा त्यात जागोजागी 'येरुळे' दिसू लागतात तेंव्हाच खरा पावसाळा झाला असं गावातलं एक सर्वमान्य सूत्र ! आता पडणारं हे असलं भूरंगट किती जरी पडलं तरी त्याचा काही उपयोग नाही हे पावसाचे लोकांनी केलेले भागाकार. त्याला अजून तरी कोणी छेद देऊ शकले नाही. पाझर तलावाच्या अंगाला असलेलं मुरुमाचे रान मात्र अजून तापत्या अंगाचेच आहे. गावाच्या पांदीत असलेली वडा पिंपळाची झाडे एकमेकाला विळखा घालून सदैव झिम्मा खेळत असतात पण दरसाली कमी होत चाललेल्या पावसाने त्यांचे चेहरे पिवळट होत चाललेत, त्यांच्या बुंध्यावरनं पळणारया खारुताई आजकाल थोड्या बावरून गेल्यागत वाटतायत. थोड्या थोड्या पडणारया पावसाने झाडावरची साल देखी निम्मी अर्धी ओली सुकी झालीय. त्यांच्या सालींवर सूरपारंब्या खेळणारे तिखट मुंगळे अजूनही एकाच रांगेत चालताहेत.मन ताठ करून बसलेले हिरवे पिवळे सरडे भक्षासाठी केंव्हाचे दबा धरून आहेत अन बेडकांचे घसे अजून ओले झालेले नाहीत, सुगरणीचे विहिरीतले खोपे अर्धे बांधून झालेत पण तिची पुढची तयारी तिने बंद केलीय. विहिरीतल्या कड्या कपारया ओसाड झाल्यात, तळाला गेलेले पाणी मात्र किंचित वर आले आहे. उनाड साळुंख्याना कळेनासे झालेय की पावसाची वीण उसवलीय का त्यांचा हंगाम चुकलाय ? कावळ्याने बांधलेले घरटे मात्र अजून शाबूत आहे तर येड्या बाभळी त्यांच्या माना टाकून बसल्या आहेत. चिलारीची मात्र चंगळ झालीय अन धोतरासुद्धा दरदरून फुटलाय. बिनकामाचे तण जागोजागी आलेय, अर्धवट वाफसा होऊन आलेलं पिक मात्र अजून पिंडरीतच अडकलंय. उंदरांची बिळे मात्र पहिल्यांदाच बांधाच्या कानाकोपरयात झालीत, मागे खूप घुबडे यायची शेतात ; आता घुबडे नाहीत पण त्यामुळे उंदरांचा सुकाळ झालाय.

शेरडांच्या अंगात अडकणारे केचवे वाढलेत, गायी म्हशींच्या अंगावर गोचिडांचा आट्यापाट्याचा खेळ सुरु आहे. खड्ड्यातल्या चिखलातून जेव्हा म्हशी बाहेर यायच्या तेंव्हा हळूच येउन त्यांच्या अंगावर बसणारे बगळे यंदा गेल्या सालापेक्षा कमी आहेत. श्रावणात बेफाम उगवणारे घास अजून कोवळंच आहे. दर्ग्याच्या घुमटापाशी बसून मिनाराभोवती फिरणारे पारवे अजून अबोलच आहेत. शिवाराच्या वाटेला असलेलं चिरे निसटलेलं, एकाकी विजनवासातलं नागोबाचे देऊळ मस्तकावर अजून अविरत पडणारे पावसाच्या सलग धारा अजून कशा आल्या नाहीत म्हणून फणा काढून काढून ताठून गेले आहे. तिथल्या अरुंद, अंधारया गाभारयातल्या पाकोळ्या मागेच निघून गेल्या त्या फिरून परतल्याच नाहीत. रातसारी विहिरीजवळच्या रानात फिरणारे काजवे अजून आलेले नाहीत, रातकिड्यांनी मात्र अजूनही विश्रांती घेतलेली नाही.साप इच्चू काटे अजून उफाणलेले नाहीत. पहाटंचे पिंगळे थोडे नरम पडलेत. मला खात्री आहे की एक ना एक मौसम पाऊस मन लावून पडेल, त्याचं काय दुखणे आहे ते तोवर सर्वांच्या कानीकपाळी होईल.त्याला सुद्धा काही तरी सांगायचे आहे, अजूनही शिवाराच्या मधोमध तो ढगांची जमवाजमव करतो, क्षणात अंधारून आणतो. पाने शहारून उठतात. पाखरे कल्ला करतात, गायी म्हशी कातडी थरथरवून उभ्या राहतात, बांधाबांधातुन सुसाट वाहणारे वारे सुद्धा त्याच्यासाठी चिडीचूप होते, सगळ्यांच्या नजरा वर खिळतात. अन तो चेष्टा केल्या सारखा भुरूभुरू पडून जातो.पावसाच्या भेटीसाठी आतुर होऊन कडकडलेले ऊन मुकाटपणे निघून जाते, मान खाली घातलेली निस्तेज शिरवळ तशीच राहते. हे असच चालू आहे, गावातली म्हातारी माणसे म्हणतात, "माणसाची नियत बदलली मग परमेश्वराने तर का बदलू नये ? पेराल तेच उगवणार !". ते अस बोलले की सगळे कासावीस होतात.ढेकळात आलेले अर्धे मुर्धे कोंब हिरमुसून पिवळे होऊन जातात, माणसे मात्र सूर्यफुलासारखी होतात जिकडे आभाळ गोळा होईल तिकडे तोंड करून बसतात.....

शेतात अंधारून येताना काका मावळतीकडे तोंड लावून बसतात ; मला वाटते ते बहुतेक जन्मदात्यांचे स्मरण करत असावेत. अंधार अंगावर येताच त्यांनी मन लावून कंदिलाची काच पुसून लख्ख करून ठेवलीय, तुळशीच्या देवळीत काकीनी मंद वातीचा दिवा लावला आहे.गोठ्यातली हालचाल हळूहळू मंदावली आहे, कणगी आता तळाला गेलीय. सगळं कसं अर्धवट वाटतंय. बाजेवर पडून आभाळातल्या चांदण्या मोजताना त्यांची नक्षत्रे सुध्दा आता तुटक तुटक दिसू लागली आहेत. पहाटेची चित्रे आत्ताच मध्यरात्री डोळ्यापुढे येतायत, पांडुरंग काळ्या ढेकळात मूर्च्छा येऊन पडलेला आहे अन काकड आरतीला उधाण आलेलं ! काय करावे काही सुचत नाही. अर्ध्या कच्च्या - अर्ध्या पिकल्या, थोड्या गाभूळल्या- थोड्या सुकल्या, थोड्या गोड थोड्या आंबट चिंचे सारखे आयुष्य झालेय सगळं बेभरवशाचं ! अशा वेळेस दिगंताच्या टोकाला तरळत असणारया तांबूस काळ्या आभाळात वडिलांची छबी दिसते अन चेहऱयावर नकळत एक समाधान येते. झोप कधी लागली काही कळत नाही. उद्याचा दिवस काय घेऊन उगवणार आहे ते अजून विज्ञानाला कळलं नाही हे एक बरे आहे कारण आशेच्या लाटांवर तरंगूनच वैफल्याचे किनारे पार करता येणे अजूनही शक्य आहे…….

- समीर गायकवाड.

ब्लॉगला भेट देणार ?....भेटा खालील ब्लॉगपत्त्यावर ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_23.html (repost)

vaat.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय . बऱ्याच दिवसांनी पावसोत्सुक हिरवाळत्या वाटांवरून मन भटकंती करून आलं .

बऱ्याच दिवसांनी पावसोत्सुक हिरवाळत्या वाटांवरून मन भटकंती करून आलं .>>>> य्ये हुई न बात!:स्मित: सेम हिअर.

इतकं नैसर्गीक वर्णन किती वर्षानी वाचायला मिळालय. अप्रतीम लिहीता तुम्ही.