दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी...

Submitted by अजातशत्रू on 19 July, 2016 - 00:25

सिनेमा, गाणी आणि नाटक यांचे वेड असलेल्या भारतीय माणसाला व्हेनिस या शहराबद्दल विचारले तर तो लगेच दोन उत्तरे देईल एक म्हणजे शेक्सपिअरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' आणि दुसरे आपले आवडते 'दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी' हे गाणे ! ४० वर्षांपूर्वी द ग्रेट गॅम्बलर (१९७६) हा सिनेमा मी आमच्या सोलापुरातील भागवत चित्रमंदिरमध्ये पाहिला होता. तेंव्हा यल्ला दासी नावाचे एक जबरदस्त चित्रकारद्वय सोलापुरात होते, ते कोणत्याही सिनेमाचे असे काही पोस्टर्स बनवायचे की नुसते पाहत राहावे असे वाटायचे. मला आठवते की माझे सिनेमा पाहणे कमी होते पण केवळ त्या पोस्टर्सपायी चित्रपट गृहाबाहेर रेंगाळणे जास्त असायचे. आजच्या सारखी रेडीमेड डिजिटल पोस्टर्स तेंव्हा नव्हती पण त्या पोस्टरमध्ये जो जिवंतपणा आणि रसरशीतपणा होता ती बात या छापील पोस्टर्समध्ये नाही. या द ग्रेट गॅम्बलरचे त्यांनी बनवलेले 'दो लफ्जोंकी...' चे पोस्टर आजही डोळ्यापुढे येते. खरे तर महानायक अमिताभचा 'द ग्रेट गॅम्बलर' हा सिनेमा एक तद्दन गल्लाभरू चित्रपट होता. पण शोलेपासून या माणसाने बॉक्स ऑफिसचा एकहाती कचरा केला होता त्याला तोड नाही.त्यामुळे हा सिनेमाही यशस्वी झाला.
do lafjonki.jpg

'द ग्रेट गॅम्बलर'मधला जय (अमिताभ बच्चन) हा असा नामी जुगारी आहे की ज्याने आजवर कधी एकही डाव हरलेला नाही. त्याने जुगार खेळायला सुरुवात केली की समोरचा माणूस कंगाल होणारच हे ठरलेले. अर्थात त्याच्या जुगाराचे फंडे वेगळेच असतात. त्याचे हे कौशल्य अंडरवर्ल्ड डॉन सक्सेनाचा(उत्पल दत्त) हस्तक रतन दासच्या (मदन पुरी) लक्षात येते. तो त्याच्याशी करार करतो आणि स्वतःसाठी काम करायला लावतो. जयने मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांशी जुगार खेळायचा आणि त्याना कंगाल करायचा एव्हढेच काम त्याने करायचे असे ठरते. जय ज्याना कंगाल करतो त्याना नंतर रतनदास त्यांना ब्लेकमेल करत असतो. असाच एक सापळा ते नाथ (जगदीश राज) साठी लावतात, नाथ हा लष्कराशी संबंधित सरकारी अधिकारी आहे. नाथ त्या जाळ्यात अडकतो, जय त्याला पार भिकेला लावतो. सक्सेना मात्र त्याच्या पैशाच्या गरजाअभावी त्याच्याकडून लष्करी कागदपत्रे आणि हत्यारे याची माहिती काढून घेतो. इकडे पोलिसाना याची भनक कानी पडताच ते इन्स्पेक्टर विजयला ( अमिताभ दुहेरी भूमिकेत ) त्याचा चेहरा हा हुबेहूब जयसारखा असल्याने या कामगिरीवर पाठवतात. याच्या मुळाशी जाऊन आधी जयला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. पण यात एक अडचण आहे, विजयचा चेहरा हा हुबेहूब जयसारखा असला तरी त्याला जुगार जयसारखा अजिबात खेळता येत नाही. योगायोगाने दोघेही एकाच वेळी रोम विमानतळावर उतरतात, आणि गोधळ होऊन जातो. जयकडे माला(नीतू सिंग) या श्रीमंत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे काम सोपवलेले असते, माला विजयलाच जय समजते. तर सक्सेनाने त्याच्या तपासावर आलेल्या इन्स्पेक्टर विजयला आपल्या मोहजालात फसवण्याची कामगिरी शबनम (झीनत अमान ) वर टाकलेली असते.पण शबनम मात्र जय या अट्टल जुगारयालाच इन्स्पेक्टर विजय समजते. पुढे यथावकाश सगळे गैरसमज दूर होतात. जयविजय दोघे मिळून दुष्टांचा खातमा करतात.

अगदीच लोकॉस्ट बजेटमध्ये सिनेमा तयार केला असल्याने आताच्या काळात हा सिनेमा पाहणे हे एक दिव्य ठरते. पण दिग्दर्शक शक्ती सामंताचे नशीब चांगले की यातला काही भाग परदेशात चित्रित झाल्याने सिनेमाची काही रिळे सुसह्य होतात. त्यापैकीच 'दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी' हे गाणे व्हेनिसमध्ये चित्रित झाले आहे. व्हेनिस हे तरंगते शहर म्हणून आजही प्रसिद्ध आहे. संपूर्ण शहर कालव्यांनी जोडलेले असल्यामुळे या शहरात आजही जलवाहतूक आहे. पर्यटकांच्या प्रमुख पसंतीचे हे युरोपातले एक मुख्य शहर आहे. या शहराचे सुखद दर्शन या गाण्यात होते. ७० च्या दशकात ज्या देखण्या अभिनेत्री होत्या त्यात हेमामालिनी, रेखा, झीनत अमन, परवीन बाबी यांची नावे अग्रस्थानो होती. 'द ग्रेट गॅम्बलर'च्या कालखंडाचे दशक म्हणजे अमिताभचे एकहाती दशक होते अन त्याचे या सर्व अभिनेत्रींसोबत हिट सिनेमे या काळात येऊन गेले. खरे तर हा सिनेमा टुकार या गटातला आहे. पण अमिताभचा सहज वावर, देखणी पार्श्वभूमी आणि कर्णमधुर गाणी याच्या जोरावर हा सिनेमा त्या वर्षीच्या हिट सिनेमांच्या यादीत गणला गेला.

जय आणि शबनम ( अमिताभ व झीनत अमन ) जेंव्हा खरया अर्थाने जवळ येतात, तेंव्हा ते एकमेकाच्या प्रेमात पडतात. दोघातले गैरसमज दूर होतात, दोघांमध्ये गहिरया प्रेमाचे सुंदर नाते निर्माण होते. व्हेनिसच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर त्यांचे प्रेम अधिकच खुलत जाते. व्हेनिस हे कालव्यांचे शहर, तिथे जे काही दळणवळण आहे ते होड्यांमधून, नावांमधून चालते. अशाच एका छोट्या होडीमध्ये हे जोडपे बसले आहे (स्थानिक भाषेत गोंडोला - होडी). चित्रपटातील या होडीचा नावाडी एक अगदी दर्दी रसिक माणूस असावा, कारण तो इटालियन भाषेत एक गाणं गुणगुणतोय. अमोरे मियो ( Amore mio - My love ) डोवे सै ट्यु (dove sei tu? = where are you? ) टी स्त्यो सेर्कन्डो (ti sto cercando = I am looking for you) टिसोरे मियो ( tesoro mio =my treasure or my darling) ला ला लाला ला …. तो अगदी सहजपणे अन मजेत गातोय. त्याचे हे बोल ऐकून जयचे कुतूहल जागे होते. गाणं म्हणणारया नावाड्याकडं बघत तो शबनमला विचारतो की हा काय गातोय. तर ती त्याचा अर्थ सांगू लागते की 'तो त्याच्या प्रेमाला साद घालतोय, तिची आठवण काढतोय … ' लगेच तो तिच्या ओठावर तर्जनी ठेवून सांगतो अंह असं नाही, गाणं म्हणून अर्थ सांग ! अन ती जे गाते, तेच हे सहजसुंदर गाणं, 'दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी….'

आजही कुठेही हे गाणं कानावर पडलं की आपणही सहज गुणगुणत जातो असं हे लोभस गाणं… फार मोठे आलाप नाहीत की अवघड तान यात घेतलेली नाही. साधंसुधं संवादी शैलीतलं हे गाणं आहे. गाण्यातली शबनम स्वतःवर नाराज आहे हे या गाण्यात लक्षात येते. गाणं मात्र अर्थपूर्ण आहे. हृदयाची कहाणी दोन शब्दांची आहे एक प्रेम आणि दुसरं तारुण्य यासाठीच जग वेडं होऊन जातं, आयुष्य फार मोठे नाहीये यात असे किती दिवस अन किती रात्री असतील माहिती नाहीये. प्रेमाचा ऋतू हाच मिलनाच्या भेटीचा बहारदार ऋतू होय. नाहीतर असे अनेक किस्से अन अनेक आठवणी घेऊन त्यावर जीवन व्यतीत करावं लागतं….
फुलांफुलांची नक्षी असलेला पिवळसर स्कर्टमध्ये गोबरया गालाची झीनत अमन या गाण्यात एकदम खुलुन दिसते, तर पांढरया ब्लेझरमधला हिप्पी स्टाईलचा अमिताभ तिला मस्त शोभून दिसतो. गाण्यामध्ये बरेच क्लोजअप्स आहेत. डॉन,लावारिस, दोस्ताना, महान, राम- बलराम, पुकार हे या जोडीचे काही मुख्य सिनेमे होत. या दोघांमध्ये कधी गॉसिप वा अफेअरच्या विशेष फैरया झडल्या नाहीत पण त्यांची जोडी पडद्यावर पाहणे प्रेक्षकांना रुचत होते हे नक्की, दोघांमधले हे ट्युनिंग गाणं पाहताना लक्षात येते. एका लयीत हे गाणं आहे. वाद्यांचा कर्ण कर्कश्श आवाज नाही की फार मोठा वाद्यमेळ नाहीये, बस्स एक शीळ वाजवत जावं तसं हे गाणं गुणगुणत असताना ते लगेच संपूनदेखील जातं. गाणं होडीबरोबरच पुढं सरकत राहतं, हेलकावे खात जाणारी होडी आणि व्हेनिसमधल्या देखण्या इमारती मागेपुढे होत राहतात. मस्त पिक्चरायझेशन आहे. ईव्हन आशाजींनी जेंव्हा याचे रिमिक्स बनवलं तेंव्हा त्याचा व्हिडीओ होडीत बसून शुट केला.…

दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी
या है मोहब्बत या है जवानी…

दिल की बातों का मतलब ना पूछो
कुछ और हम से बस अब ना पूछो
जिस के लिए है दुनिया दीवानी
या है मोहब्बत या है जवानी

ये कश्तीवाला क्या गा रहा था
कोई इसे भी याद आ रहा था
किस्से पुराने, यादे पुरानी
या है मोहब्बत या है जवानी

इस जिन्दगी के दिन कितने कम हैं
कितनी हैं खुशियाँ और कितने गम हैं

लग जा गले से रुत है सुहानी
या है मोहब्बत या है जवानी…….

आरडींनी हे गाणं कसं बसवलं याचा खुलासा आशाजींनी आरडी-रिमिक्स गोल्डन एरा या कार्यक्रमात करताना सांगितले होते की, ' पंचमजी रात्री बेरात्री उठून बसत आणि युरोपियन वा अरेबियन रेडियोज ट्यून करून बसत. त्यातलं एखादं वाद्य आवडलं तर त्यासारखं देशी वाद्य वा वस्तू वापरून तसा ध्वनी ते निर्माण करत. हे गाणं मुळात इटालियन गाणं नव्हतं तर एक रेडिओ जॉकी त्याच्या कार्यक्रमात याचे तुकडे करून गुणगुणत होता त्यावरून आरडीना हे गाणं सुचलं. अमोरेमियो हे जे गाणं प्रसिद्ध आहे ते वेगळं आहे अन त्याची चाल व रचना दोन्ही वेगळ्या आहेत.' गाण्याचा इतिहास काहीही असो, हे गाणं भूतकाळात घेऊन जाण्यास सक्षम आहे हे मात्र नक्की. आनंद बक्षींनी हे गाणं लिहिलंय, आरडींनी त्याला लयबद्ध संगीत दिलंय. अमिताभ व शरदकुमार यांच्या साथीने आशाजींनी हे गाणं अगदी दिलखुलास पद्धतीने गायलंय. याच सिनेमातलं आशाजींचं लडिवाळ शैलीतलं, 'पहले पहले प्यार की मुलाकाते याद है' हे गाणंही गाजलं होतं.

या अवीट गाण्यांची शिदोरी आपल्या जीवनात वेळोवेळी उपयोगी पडते आणि जीवन सुसह्य होऊन जाते….

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2015/09/blog-post_19.html

The-Great-Gambler.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या अवीट गाण्यांची शिदोरी आपल्या जीवनात वेळोवेळी उपयोगी पडते आणि जीवन सुसह्य होऊन जाते….>>>> + १०
छान लिहल आहे.

जुने हिंदी चित्रपट संगीत हे अजीब रसायन आहे. गीत, संगीत आणि गायन या तिनही प्रांतातले प्रतिभावंत मेहनत घेऊन सुंदर गाणी बनवायचे पण ती पडद्यावर सादर करताना कधी दिग्दर्शकाची प्रतिभा कमी पडायची तर कधी नायक नायीकेचा अभिनय.

मधुबालाला नाचता येत नाही हे ध्यानी घेऊन के असीफने लाँग शॉट्समध्ये डमी वापरून 'प्यार किया तो डरना क्या' बनवले. कितीही वेळा पहा, सुंदरच वाटते. पण जेंव्हा ही बाब दिग्दर्शक लक्षात घेत नाही तेंव्हा 'एक परदेसी मेरा दिल ले गया' पडद्यावर जराही बघवत नाही. केवळ चेहर्‍यावरचे हावभाव आणि हातांच्या हालचालींनी मीनाकुमारी 'चलते चलते' मध्ये पडदा जिवंत करते तर नर्तिका असूनही वहिदा 'भवरा बडा नादान'मध्ये जराही जान भरू शकत नाही. त्यामुळे जुनी गाणी पडद्यावर बघणे खूप कमी वेळा परवडते.

हे गाणे मात्र ऐकण्याइतकेच बघायलाही खूप आवडते. झीनत आणि अभिनय यांचा फार काही संबंध नव्हता. वर गाण्याच्या शब्दात 'जवानी'ला महत्व असतानाही तिने फक्त देहबोली आणि चेहरा यांच्याच जोरावर गाण्यात जान भरली आहे. आरडी आणि आशाने तयार केलेला तो एक ड्रिमी मूड तिने पडद्यावर आणखिनच गहीरा केलाय.

सक्सेना मात्र त्याच्या पैशाच्या गरजाअभावी त्याच्याकडून लष्करी कागदपत्रे आणि हत्यारे याची माहिती काढून घेतो>>

?

आजच विविधभारतीवर १२ च्या एसएमएस वर फर्माईश करण्याच्या कार्यक्रमात ग्रेट गॅम्बलर सिनेमा होता. आशा होती हे गाणं लावतील पण लावलं ते 'मेरा क्या नाम है... दिवाना'... मग ते दुसरं सुंदर गाणं कोणतं? असा विचार करत राहिले पण आठवलं नाही.... शेवटी गुगल केलं आणि मग माझे विचार थांबले.
हेच ते गाणं.... दो लफ्जोंकी है दिल की कहानी...

चित्रपट कसाही असला तरी कधी कधी त्यातलं एखादं गाणं फारच अपिलिंग असतं... या सिनेमात हे गाणं, यादों की बारात मध्ये, चुरा लिया.... अशी अनेक उदा. देता येतील.

गाणं अप्रतिम आहे यात शंका नाहीच, पुन्हा एकदा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.