तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 July, 2016 - 00:06

तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥अभंगगाथा ३०२||

परमार्थात अंतःकरण शुद्धीला अनन्यसाधारण महत्व आहे. "मन करा रे निर्मळ येऊनि गोपाळ राहे तेथे" - असे बुवा जे म्हणत असतात ते यासाठीच. निर्मळ मनच भगवंताचे वसतीस्थान असते असे सारे संत परोपरीने सांगत असतात. त्यामुळे परमार्थात ज्या काही साधना सांगितल्या जातात त्या सर्व साधनांचा रोख अंतःकरण शुद्धीवरच असतो. जितके अंतःकरण शुद्ध तितका परमात्मा त्या व्यक्तिच्या अगदी सन्निध असे हे साधे-सोपे गणित.

ज्याचे अंतःकरण शुद्ध नाही अशा कुणा व्यक्तिची जरा कडक शब्दात कानउघडणी करताना बुवा दिसताहेत. इथे बुवा दोन उदाहरणे देत आहेत ----
१] अंध माणसाला स्वतः अंध असल्यामुळे बाकी सारेच आंधळे वाटतात. इथे अंधत्व हे अन्वयार्थाने घ्यायचे आहे - विषयाने अंध झालेला म्हणजे विषयांध असा खरा अर्थ. कारण विषयांध व्यक्तिला जगात फक्त विषयच दिसत असतात आणि ते भोगणे एवढीच इतिकर्तव्यता वाटत असते. परमात्मा न मानणे, संतांच्या शिकवणूकीचा अनादर याला कारण विषयांधता हेच असते. केवळ प्रपंचात मश्गूल झालेल्या आपल्यासारख्यांना संत जे वारंवार जागे करतात ते यासाठीच की हे विषय टाकाऊ अथवा घातक नाहीयेत तर ही अनावर विषयासक्ति आहे ती घातक आहे. विषय अति घातक असते तर आपल्याला जगताच आले नसते. पण विषयात गडबड नाहीये - गडबड आपल्यात आहे. विषय वाईट नाहीएत तर विषयांध होऊन अविवेकी जीवन जगणे फार घातक आहे.

भूक लागल्यावर आपण खाऊनच भूक भागवतो - पण तेच खाणे भूक संपल्यावही जर खाल्ले गेले तर ते अपचनालाच कारण होते तसे हे आहे. दुसरे असे कि या अनावर विषयासक्तिने ते विषय भोगताना त्याचा आनंद घेणे संपते व आनंद ओरबाडायला केव्हा सुरुवात होते हे कळतही नाही. पुढे तर असे होते कि जर कोणी या विषय भोगण्याच्या आड आला तर त्याचे पार जीवनही संपवण्यापर्यंत मजल जाते - याचेच नाव विषयांधता. एखादा जंगली प्राणी त्याचे खाद्य समोर दिसताच त्या खाद्याचा असा काही समरसून उपभोग घेतो कि त्याचा जातभाई जरी मधे आला तर ते त्याला अजिबात खपत नाही. अशा अनिवार विषयासक्तिने परमार्थ काय प्रपंचही सुखाचा होत नाही - हे आपण जाणतोच.

इथे बुवा डोळे वा दृष्टी नाही असे जे म्हणतात त्याचा अर्थ - विवेक नाही, विचार नाही. माणूस आणि पशूत मुख्य फरक नेमका इथेच आहे.
विचार पाहेल तो पुरुषु| विचार न पाहे तो पशु || पशूंमध्ये विवेक/ विचार नसतो पण माणसात तो असतो. म्हणूनच जेव्हा एखाद्या माणसाने अविवेकी कृत्य केले की आपण म्हणतो - पशूवत वागला अगदी..

अविवेकी विषयासक्त जीवन हे त्या माणसाच्या नाशालाच कारणीभूत होते. या विषयांध व्यक्तिचे अजून एक वैशिष्ट्य असे कि जगाबद्दल त्याची विपरीत खात्री पटते - कि इतर सारे माझ्यासारखेच विषयांध आहेत - मला काहीही करुन या सार्‍या मंडळींपेक्षा जास्तीत जास्त विषय भोगलेच पाहिजेत - अशा प्रकारचे पशूवत जीवन तो जगू पहातो.

२] दुसरे उदाहरण रोगी व्यक्तिचे दिलेले आहे - जो रुग्ण असतो त्याच्या जिभेला चव नसल्याने मिष्टान्न जरी त्याच्या समोर ठेवले तरी त्याला ते विषतुल्य वाटते. इथे मिष्टान्नात काही गडबड नसून त्या रुग्णाच्या जिभेला चव नाहीये हे मुख्य कारण आहे. सतत विषय भोगत राहिल्याने ती व्यक्ति एकप्रकारची मनोरुग्ण झालेली असते. त्या व्यक्तिला ईश्वरमूर्ति म्हणजे दगड, संत म्हणजे अविवेकी, अव्यवहारी असे जे वाटते ते वस्तुतः स्वतःच्या अंतःकरण अशुद्धीमुळेच.

असा जो अशुद्ध अंतःकरणाचा कोणी असेल त्याला प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन कितीही परमार्थ सांगितला तरी तो त्याच्या पचनी पडणार नाही कारण परमार्थात खोट नसून या व्यक्तिच्या अंतःकरणात खोट आहे - हे सार्‍या अभंगाचे सार आहे.

एकदा असे झाले कि एका सरोवरात अनेक कमळे फुललेली असतात. सहाजिकच अनेक भुंगे येऊन त्या कमळातील मकरंदाचा स्वाद ते घेत असतात. कमळ हे चिखलातच वाढत असल्याने त्या कमळाच्या आसपास जे पाणी-चिखल असते त्यात अनेक बेडुकही रहात असतात. या भुंग्यांना वाटते - हे बेडुक किती कमनशीबी - हा एवढा स्वादिष्ट-गोड मकरंद या कमळात असताना हे बिचारे तो घाणेरडा चिखल चाटत असतात. ते भुंगे त्या बेडकांना सांगतात - उद्या तुम्ही सारे त्या पाण्यातून बाहेर पडा व या कमळातील स्वादिष्ट मकरंद खाऊन पहा. तुम्ही तो कधीच चाखलेला दिसत नाहीये.
रात्री सर्व बेडकांची सभा भरते - त्यात तो 'कमळातील मकरंद खायला जायचा प्रस्ताव' मांडला जातो. सर्व तरुण बेडूक लगेच तयार होतात, पण जे जरा वृद्ध व अनुभवी बेडूक असतात ते म्हणतात - पण आपल्यातल्या कोणीही ते काय मकरंद वगैरे काय आहे ते कधीही खाल्लेला नाहीये - कुणाला माहित तो आपल्याला आवडेल न आवडेल !! त्यापेक्षा आपण असे करु या कि तिथे जाण्याआधीच पोटभर चिखल खाऊन मगच तिकडे जाऊयात. मग काय जिभेवर चिखलाचा स्वाद असतानाच हे सारे बेडूक तो मकरंद खायला जातात. त्या भुंग्यांच्या समाधानासाठी वरवर त्यांना म्हणतात - कि खरेच काय स्वादिष्ट आहे हे सारे, थँक्यू वेरी मच फॉर सजेस्टिंग अस सच अ नाईस फूड आयटेम ... Happy Wink
मात्र सर्व बेडकांच्या मनात हेच असते कि आपला चिखलच सगळ्यात सुंदर डिश आहे... Happy Happy

तसेच आपले आहे - संसारातील गोडी न सोडता आपण परमात्म्याला भेटायच्या गोष्टी करतो तर त्यात चूक आपलीच आहे. वस्तुस्थिती अशी आहे कि - सगळ्यात प्रथम अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध व्हायचा अवकाश - त्यात तो परमात्मा प्रकटणारच. जसे एखादा आरसा असावा - ज्यावर खूप धूळ साचलेली आहे. त्यात आपले प्रतिबिंब केव्हा उमटणार - तर जेव्हा ती सारी धूळ काढली जाईल तेव्हा लगेचच.
उपनिषदांनी तर कमालच केलीये - त्यांनी भगवंताला रसयुक्त म्हटले आहे - रसो वै सः - असा तो भगवत्-रस केव्हा चाखता येईल तर आपल्या जीभेवर काहीही नसेल तेव्हाच!! अंतःकरण शुद्ध झाले रे झाले ती गोडी अनुभवाला येणारच !! ती भगवत-गोडी आतच आहे, कुठून बाहेरुन आणायची गोष्टच नाहीये !!

पुढे बुवा जे म्हणतात - तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें - यावरुन महाभारतातील एक मार्मिक कथा आठवते. एका यज्ञप्रसंगी काही गुणवान ब्राह्मणांना काही दान करायचा प्रसंग येतो तेव्हा धर्मराज आणि दुर्योधन दोघांनाही सांगण्यात येते कि अशा ब्राह्मणांची यादी तयार करा. दुर्योधनाचा कागद कोरा असतो तर धर्मराजाकडे फारच मोठी यादी आढळते.
दुर्योधनाला विचारले असता तो म्हणतो एकही चांगला ब्राह्मण भेटला नाही - सारे एकजात लबाड, लुच्चे.
तर धर्मराज म्हणतो - माझ्याशी तुलना करता मला एकही दुर्गुणी ब्राह्मण भेटला नाही.
यावर श्रीकृष्णदेव हसून म्हणतात - आपली जशी नजर तसे जग दिसते.

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती | व्याघ्रही न खाती सर्प तया || असा जो बुवांचा एक अभंग आहे त्यातील मथितार्थ पाहिला तरी शुद्ध चित्ताचे अनन्यसाधारण महत्व आपल्या ध्यानी यावे.

आता हे चित्त शुद्ध होणार कसे, तर बुवांनी तेही मोठ्या कनवाळूपणे खालील अभंगात सांगितले आहे -
संतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय | - सत्संगाने वासनेचे बीजच जळून जाते, नष्ट होते. ही एकप्रकारे ताळा घेण्याचीच गोष्ट वाटते - ज्या संतांच्या संगतीत प्रपंच नकोसा होतो, परमात्म्याविषयी प्रेम वाढू लागते तीच खरी सत्संगती. त्यामुळे याउलट जिथे भगवत्प्रेम कमी होत होत लौकिकाची आवड वाढते ती सत्संगती नसून असत्संगतीच होय.

पुढे बुवा म्हणतात - मग रामनामी उपजे आवडी | सुख घडोघडी वाढो लागे ||
अशा शुद्ध अंतःकरणातच भगवत्प्रेम रुजते व वाढूही लागते. अष्टसात्विक भाव हे त्या भगवत्प्रेमाचे बाह्यलक्षण आणि अशा शुद्ध, प्रेममय अंतःकरणात भगवंत अगदी सहज प्रगट होतो. हाच परमार्थ, हीच मोक्षप्राप्ति....
कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥२॥
तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ||३||

तुकोबांच्याचरणी, ज्ञानोबांच्याचरणी पुन्हा पुन्हा कळवळून प्रार्थना करायची ती याच करता - तुम्हीच कृपा करा - त्याशिवाय हे अंतःकरण शुद्ध होणे केवळ अशक्य आहे हो...

----------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

कां कमलकंदा आणि दर्दुरीं | नांदणूक एकेचि घरीं | परि परागु सेविजे भ्रमरीं | येरां चिखलुचि उरे ||ज्ञाने.अ. ९-५८||
कमळाचा कंद | तळ्यामाजि असे | तेथेचि तो वसे | बेडुकही ||
परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि || अभंग ज्ञाने. - स्वामी स्वरूपानंद ||

विचार पाहेल तो पुरुषु| विचार न पाहे तो पशु | ऐसी वचने जगदीशु | ठायी ठायी बोलिला || दासबोध, द. १०, स.९, २८||
----------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे मनःपूर्वक आभार.... ___/\___

तुकोबांच्याचरणी, ज्ञानोबांच्याचरणी पुन्हा पुन्हा कळवळून प्रार्थना करायची ती याच करता - तुम्हीच कृपा करा - त्याशिवाय हे अंतःकरण शुद्ध होणे केवळ अशक्य आहे हो...

अतिशय भावपूर्ण. साधन सुलभ गोमटें असूनही आपण त्यापासून दूर राहातो हे दुर्भाग्य- किंवा पूर्वपुण्य नसणे.