मी लिहिलेली पत्रे -१

Submitted by संतोष वाटपाडे on 18 July, 2016 - 07:31

प्रिय मनू,

रागावली आहेस का गं खरंच? माझ्या मागच्याही पत्राला तू उत्तर नाही दिलेस...मी लाडाने जाडे म्हणालो होतो गं तुला...प्लीज न...अशी रागावू नकोस माझ्यावर..इतका कसला राग आला तुला की तीन महिन्यात एकदाही पत्र लिहावे वाटले नाही मला..

सद्ध्या पुन्हा चौकी लागलीय मला...चीन बॉर्डरवर आहोत आम्ही...इथल्या कडाक्याच्या थंडीत खुप आठवण येतेय गं मनू...तुझा आवाज ऐकण्यासाठी,तुझे शब्द वाचण्यासाठी जीव अगदी व्याकूळ होतोय... तापही आला होता थोडा...सगळे मित्र हसत होते मला...आपला एकनाथ आवारे माझ्याच बटालियनमधे आहे...त्याने मेडिसिन आणुन दिले होते...काळजी करु नकोस वेडुबाई....मी ठीक आहे आता...

अगं परवा पहाटे रनिंग करताना तुझी खुप जास्त आठवण आली होती..रस्त्याच्या कडेला नुकतीच फ़ुलून आलेली हिरवी रोपटी आणि त्यांना बिलगलेल्या निळ्या फ़ुलांच्या कळ्यांचे गुच्छ जसेच्या तसे टिपून तुला पाठवावे वाटत होते...दूरदूरपर्यंत पसरलेल्या बर्फ़ाच्या डोंगरात तुझा रडवेला चेहरा शोधताना चालणे जीवावर आले होते...थकून एका खडकावर बसलो आणि डोळे भरुन आले ...लग्नानंतर आपण महाबळेश्वरला गेलो तेव्हा असेच खडकावर बसून एक फ़ोटो काढला होता ना!...एकनाथ खुप समजावतो मला नेहमीच...तो एकटाच तर आहे मला समजून घेणारा जिवलग मित्र ...

ए मनू तू पत्ता तर बरोबर लिहितेस ना गं पत्रावर? तुझे पत्र का येत नाहीये मला अजून....निदान पीसीओवरुन एखादा कॉलतरी कर ना... मी आपल्या गावच्या पोष्ट ऑफ़िसवर अनेक वेळा कॉल करुन पाहिला पण नंबर चुकीचा म्हणतेय ते...काय करावे सुचत नाही गं....

तुझी खुशाली कळली तरी मी इकडे आनंदी असतो मनु...खरं सांगू? पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत तुझा चेहरा डोळ्यासमोर ठेवून वावरत असतो मी...अगदी यंत्रासारखा झालोय मनु...कदाचित पुढच्या हप्त्यात सलीम तडवी सुट्टीवर येतोय... त्याला बोललोय मी तुझी भेट घ्यायला..शक्य झालेच तर काही लिहून पाठव त्याच्याकडे..

मनू एकटं एकटं वाटतं गं खूप...हतबल असल्यासारखे वाटते मला...माझ्या हाका तुला का ऐकू जात नसतील...तू नेहमीच म्हणायचीच ना कि मनापासून मारलेली हाक कितीही दूर अंतरावरुन ऐकू जाते...मग माझ्या हाका का ऐकु येत नाहीयेत तुला... आजवर आलेल्या तुझ्या सर्व पत्रांची पारायणं करुन झालीत...तीन महिन्यापुर्वी आलेलं तुझं तीन पानी पत्र मी खिशात घेऊन फ़िरतो सतत...त्यातला प्रत्येक शब्द,तुझ्या हाका,तु सांगितलेल्या घरातल्या गमती यांचा आधार वाटतो गं मला..

चौकीवर असताना सुन्न शांततेत दगडाला पाठ टेकून ते पत्र पुन्हा पुन्हा वाचून मी रोज मनाची समजून घालतो...पण ते नाहीच ऐकत मनू ...बदामात तुझ्या तिरप्या अक्षरानी लिहिलेले माझे नाव किती भोळेपणाने लिहितेस तू ! शनिवारी टपाल आले तेव्हा धावत गेलो होतो मी...माझीही चिठ्ठी आली असेल या आशेने खुप आनंद झालेला मला...सर्वात आधी अक्खी टपाल उलथपालथ करुन पाहिली पण तुझे पत्र नाही दिसले...सगळे मित्र आपापली पत्र घेऊन गेले आणि मी मात्र तुझे जुनेच पत्र काढून पुन्हा वाचत बसलो...

मागच्या पत्रातही मी विचारले होते तुला...तू दवाखान्यात गेली होतीस नं? काय म्हणाले डॉक्टरकाका? मळमळ थांबलीय का खरंच? ए मनू तब्बेतीची काळजी घे प्लीज.. ऐक न..यावर्षीची दिवाळी आपण गावी जाऊन साजरी करु या...सगळी स्वप्नं मी रंगवून ठेवली आहेत मनू...तुझा खळखळून हसतानाचा चेहरा बघण्यासाठी डोळे आतुरलेत माझे...

आई-नानांना सांग माझी काळजी करु नका...मी अगदी मजेत आहे...तब्बेत सुधारलीय म्हणावं आता...सलीमच्या हातच्या भाकरी खुप जाड असतात..अगदी तुटत नाहीत पण भूक इतकी लागलेली असते की काय खातोय हेही कळत नाही...स्वैपाकाला आम्ही चौघे असलो कि खूप धमाल येते..तू शिकवलेल्या भाज्या आणि फ़ोडणीचा भात केल्यावर सर्वांना खूप आवडतो..तुझ्या नावाने चिडवतात मला इथले मित्र...

मनू ..तू हाताने विणून दिलेले स्वेटर पोटावर थोडे विरलेय...थंडीत तेच घालतो मी...तुझ्या मिठीची ऊब जाणवते त्यात...रात्र रात्र कंदिलाच्या उजेडात आपल्या एकरुप झालेल्या सावल्या तंबूच्या पडद्यावर शोधताना तुझी कुजबूज कानावर जाणवू लागते...मनू काल एक गोळी गेली कानाजवळून...पाठीमागच्या खडकात खोलवर रुतलेली ती गोळी मी तळहातावर घेऊन बराच वेळ बघत राहिलो...तुझा प्रेमाचे मजबूत कवच अंगावर असल्याने गोळीही शिवू शकली नाही मला...मनू एक शेर आठवला होता त्याक्षणी..

" कधी हे दुःख नव्हते की मरावे लागले होते मला
मनाला खंत होती की रडावे लागले होते तुला..."

तुझ्या पत्राची मी वाट बघतोय मी .. वेळ नसेल मिळत तर किमान एकपानी पत्रतरी लिही मनु...आणि आई-नानांना सांभाळ...त्यांची औषधं संपली तर वेळेवर मागवून घे... चौकीवर जायची वेळ झालीय ... I Love you

तुझा..फ़क्त तुझा
संतोष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users