गाथा महावीरांची - शिवा काशिद आणि बाजीप्रभू देशपांडे !

Submitted by अजातशत्रू on 14 July, 2016 - 09:44

अंधारी काळरात्र होती, धो धो पाऊस कोसळत होता.अधून मंधून कडकडाट करत वीजा चमकत होत्या. काळजात धडकी भरेल अशा मेघगर्जना होत होत्या. पावसाच्या धारा वारयावर सैरावैरा हेलकावे खात होत्या. त्या मंतरलेल्या रात्री पावसाने ओलेचिंब झालेले भोई कर्दमलेल्या मुरमाड मातीतून,दगड धोंड्यातून. काटया कुट्यातून मार्ग काढत वेगाने पावले टाकत होते, जणू वसुदेवाने श्रीकृष्णास अलगद टोपलीत घालून न्यावे तसे आपल्या पावलांचा आवाज न करता आपले आजवरची सर्वश्रेष्ठ कामगिरी फत्ते बजावण्यासाठी पायात प्राण आणून ते वायूगतीने मजल दरमजल करत होते. त्याचवेळी अशीच एक पालखी गडावरून खाली मलकापूरच्या दिशेने रवाना झाली तिचे भोई मात्र आपला ऊर फुगवून त्या चिखलमातीच्या पहाडातून खाली उतरत होते. या पालखीचा मेणा मात्र राजेशाही थाटाचा होता. तिला किनखापी वेलबुट्ट्या केलेल्या रेशमी कापडाच्या झालरी होत्या, आतून चिकाचा पडदा होता. पालखीच्या बाहेरील बाजूस कलाकुसर केलेले भरजरी लालबुंद कापड त्या रात्रीच्या उजेडात मधूनच चमकत होते. आत बसलेल्या दाढीधारी व्यक्तीच्या चेहरयावर अलौकिक प्रसन्नता होती. दोन्हीही दिशेच्या पालख्या बिनबोभाट सुटल्या होत्या. रोंरावणारया वारयात झाडांची सळसळ स्पष्ट ऐकू येत होती, रातकिड्यांची किर्र आवाजातली भूणभूण दर पावलागणिक वाढत होती. वाटेत लागलेल्या अर्धवट पेंगेत असलेल्या यवनी सैनिकांच्या वेढ्यातून एक पालखी अलगद पुढे निघून आली. पालखीत बसलेल्या व्यक्तीने घसा खाकरून खुण केली आणि पालखी थांबली. पालखीचा पडदा सरकवून आतल्या साध्या कपड्यातील तेजस्वी व्यक्तीने मान वेळावून मागे राहिलेल्या गडाकडे डोळे भरून पाहिले अन दुसरयाच क्षणी त्यांनी मुठी आपल्या तलवारीची म्यान एका हाताने गच्च पकडली. आता त्यांच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या होत्या. त्यांनी इशारा केला अन निमिषार्धात पालखी पुढच्या रस्त्याने चालू लागली. नागिणीने सळसळा माग काढावा तशी ती पालखी अन तिच्या बरोबरचे भोई अंधारात गुडूप झाले अन गड जसजसा मागे पडत गेला तसा पालखीतून इतका वेळ दाबून धरलेला हुंदका बाहेर पडला. त्या सरशी पालखीच्या भोयांचे डोळे देखील पाणावले. त्या पालखीत शोकाकुल झालेले व्यक्ती म्हणजे आपले शिवाजी राजे होते अन दुसरया पालखीत होते ते शिवा काशिद ! त्यांच्याच साठी राजांचा जीव तीळतीळ तुटत होता. काही प्रहरापूर्वी शिवा काशिदबरोबर झालेली अखेरची भेट अजूनही राजांच्या डोळ्यापुढून जात नव्हती. शिवाजी राजांची वस्त्रे शिवा काशिदच्या अंगवार चढवली आणि महाराज त्याच्याकडे दिग्मूढ होऊन पहात राहिले. जगदंब ! साक्षात आपले प्रतिबिंब ! जणू आपन एखाद्या आईन्यात न्याहाळत आहोत असं राजांना वाटले. राजे त्याच्याकडे निशब्द होऊन पाहत राहिले आणि आपल्या लाडक्या राजाच्या आशीर्वादासाठी शिवा काशिद खाली वाकले. त्या सरशी भानावर येऊन महाराजांनी त्यांना कवटाळले.
"उठा शिवा, वाकू नका असे ! आज हा राजा तुमच्या समोर आहे तो तुमच्यासारख्या दिलेर माणसांच्या पराकोटीच्या त्यागामुळेच ! हे स्वराज्य अशा अनेकांच्या पावन रक्ताने उभं राहिलेलं आहे. तुम्ही मला कुर्निसात करू नका. तुम्ही आम्ही एकच आहोत. !"
राजे शिवा काशिदांना जवळ घेत बोलले आणि त्यांना उरास कवटाळले. त्याच क्षणी सह्याद्री गहिवरला, तुळजाभवानी शहारून गेली, पंचगंगेच्या प्रवाहांवर तरंग उठले, अवघ्या दख्खनेतले गडकोट थरथरले, रायगडाच्या मस्तकात वेदनेची एक तिडीक येऊन गेली अन आऊसाहेबांच्या समोरील दिव्याच्या वाती तरारून गेल्या, भूमंडळातील पंचतत्वे हरखून गेली. पन्हाळ्याचे श्वास थबकले अन उपस्थितांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.
न राहवून राजे शिवा काशिदांना म्हणाले. " तुम्ही शिवाजी राजे म्हणून पालखीतून जाताय खरे मात्र पुढे काय प्रसंग येणार आहे याची तुम्हास जाणीव आहे का ?"
आपल्या राजाचा कातर झालेला स्वार शिवा काशिदांनी लेगच ओळखला आणि चेहरयावर स्मितहास्य आणत ते उदगारले -
"राजे, मला ठावूक आहे ! मी शिवाजी राजे म्हणून जन्मास आलो नाही तरी शिवाजी राजांच्या जागी मरेन. याचे भाग्य मला लाभले याहून अधिक काय हवं ? माझे अनेक जन्म स्वराज्य उभारणीच्या कामी आले तरी ते कमीच आहेत. राजे आता आज्ञा द्या ! मला निघाले पाहिजे!"
राजांनी डोळे भरून त्याच्या चेहरयाकडे पाहिले अन नजरेनेच इशारा दिला. त्या सरशी शिवा काशिद मोठाल्या ढांगा टाकत पाठमोरे मागे सरले अन डोळ्याचे पाते लवण्याआधी पालखीत जाऊन बसले देखील. त्यांच्या पालखीच्या भोयांनी एकदा शामियान्याकडे नजर टाकली अन पुढच्याच क्षणाला स्वराज्याच्या पालखीचे ते भोई मार्गस्थ झाले. ते सारे जण काही प्रहरात पकडले जाऊन मारले जाणार होते. त्यांची खांडोळी होणार होती. आपण मारले जाणार आहोत हे माहिती असूनही निधडया छातीची ती माणसे आपल्या देहाचा, जीवाचा, घरादाराचा, बायकापोरांचा वा जमीनजुम्ल्याचा कशाचाही विचार न करता आपण होऊन मृत्युच्या जबड्यात चालले होती.
मार्च १६६० पासून राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहने सिद्दी जोहरला शिवाजीराजेंविरूध्द धाडले होते. दि २ मार्च १६६० साली,सुमारे २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ घेऊन सिद्दी शिवरायांवर चालून आला. त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते. सिध्दीने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला. महाराज गडावर अडकून पडले. तिकडे शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात तळ ठोकून होता.स्वराज्यावर मोठे संकट आले होते. पुढे पावसाळ्याचे दिवस होते आणि पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते कारण राजेंना स्वराज्यात धुडगूस घालत असलेल्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करावयाचा होता.

यातून मार्ग काढायचा कसा यावर अनेक खलबते झाली. यातीलच एक धाडसी सूचना शिवा काशिद यांची होती. हुबेहूब छत्रपतींच्या सारख्या दिसणार्‍या शिवा काशिदांनी राजांकडे हट्ट धरला आणि राजेंनी काळजावर दगड ठेवून त्याच्या प्राण पणाला लावण्याच्या हट्टास मंजुरी दिली. आता पन्हाळ्यावरून निसटण्याचा मनसुबा जवळपास पक्का झाला होता. हिरडस मावळातील शूर अशा बांदलाचा सहाशे जणांचा जमाव राजेंनी निवडला. पालखीसाठी भोई सुध्दा खासे निवडले. सिद्दीस तहाचा समझोता धाडून राजेंनी त्यास गाफील ठेवले. अन राजे सही सलामत या वेढ्यातून निसटले. या अस्मानी अन सुलतानी संकटातून राजांना बाहेर पडणे शक्य झाले ते शिवा काशिदमुळेच ! गडाच्या एका बाजूने राजेंच्या वेशात वीर शिवा काशिद यास पालखीत बसवून मलकापुरच्या दिशेने पाठविले गेले. तर राजेंची पालखी म्हसाई पठाराच्या दिशेने गेली. मुसळधार पावसाचा फायदा घेत राजे पन्हाळ्यावरून रातोरात निसटले. सिद्दी जोहरला गडावरून पालखी निघाल्याचा थांगपत्ता लागला. त्याने पाठलाग करून एक पालखी पकडली. शिवाजीराजे आपल्या ताब्यात आल्यामुळे सिद्दी खुशीत होता पण लवकरच त्याला कळून चुकले की आपण दुसऱ्याच कुणाला तरी पकडले आहे.

पकडलेल्या शिवा काशिदांच्या दंडास हात घालत फ़ाजलखान म्हणाला, "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ", तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले, "हॉं मै ही शिवाजी महाराज हूं". एव्हाना त्यांच्या डोक्यावरचे जिरेटोप आणि मुंडासे खाली काढण्यात आले. आता शिवा काशिदांचे केस मोकळे झाले होते. अंगावरचे कपडे चिखलात माखले होते पण त्यांच्या चेहरयावर तेज विलसत होते. अफझलखान वधाच्या वेळेस कृष्णाजी भास्कराने केलेला वर्मी घाव हीच राजांची खरी खुण आहे हे फाजलखानाच्या डोक्यात पक्के बसले होते. त्याने शिवा काशिदांच्या मस्तकावरील केस कट्यारीने छाटून काढले. पण कुठे घावाचे चिन्ह दिसेना.
तसा तो मोठ्याने ओरडला, 'हुजुर दगा ! हुजुर दगा ! घात झाला, हमे फसाया गया ! शिवाजी भाग गया !!"
वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती. तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही. काळा कभिन्न सिद्दी जोहर क्रोधाने बेभान झाला, त्याच्या डोळ्यात रक्त उतरले. त्याचे सर्वांग रागाने थरथरू लागले. त्याने पुढे जाऊन शिवा काशिदांची मान आपल्या मजबूत हाताने करकचून पकडली. त्याला एव्हाना कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे. आपण पकडलेला माणूस आहे तरी कोण याचा त्याला भेद करावा असे देखील वाटले नाही. त्याने जळजळीत नजरेने न्याहाळत काशिदांना विचारले, "तू छत्रपती शिवाजी महाराज नाहिस तर कोण आहेस ?"
यावर शिवा काशिद हसत म्हणाले, "मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,"
यावर कुत्सितपणे हसत सिद्दी म्हणाला "हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ?"
संतापलेला सिद्दी छद्मी स्वरात म्हणाला, "मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जोहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’
शिवा काशिद जोहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले,’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत. आता हाती लागणे शक्य नाही.छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत.जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत."
सिद्दी जोहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, "तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा, आणि तू ? त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल."
सिद्दी जोहरने ओकलेली ही गरळ ऐकून शिवा काशिद संतापान लालेलाल झाले आणि जोहरच्या नजरेला नजर भिडवित ओरडले, "खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवाघूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही, तुझं बोलणं तसलंच आहे. ते कशापायी ऐकायचं ? चल चालव तलवार !"
"माझा राजा, शिवाजी राजा !: त्यांची सर तुझ्यासारख्याला यायची नाही. तू पोटार्थी हबशी, तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे,पोशिंदा आहे. माझ्या सारखे लाख मरोत पण माझा राजा जगो, असंच मी म्हणणार! आता उशीर करू नकोस, तुझे विषारी बोल ऐकून घायला मी बांधील नाही. "
हे सारं ऐकून सिद्दी जोहर गांगरला. थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला, "वैसाही होगा......मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ?"
शिवा काशिद हसत म्हणाले, "मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही. स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो. सारे मावळे त्यासाठी तयार आहेत. मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही. मेला तरी स्वराज्यासाठी मरण हेच आमचे स्वप्न आहे! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ?"
कानात तापलेले शिसे ओतावे तसे शिवा काशिदांचे शब्द सिद्दीच्या कानातून थेट मेंदूत गेले अन राजे तर हातून गेले. शिवाय ह्या एका कफल्लक माणसाकडून आपल्याला जिव्हारी लागेल असं ऐकून घ्यावं लागतंय याचा त्याला भयंकर राग आला. तो पिसाळून गेला.स्वतःवरचा ताबा सुटलेला सिद्धी आपली तलवार सरसावत पुढे झाला. तरी देखील शिवा काशिद हे शांतपणे न डगमगता ठाम उभे होते. जोहरच्या सैनिकांनी शिवा काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले. शिवा काशिद खाली कोसळले; त्यांच्या छातीत भाले खुपसल्याने रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ते रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. तशा रक्तबंबाळ अवस्थेतही आपेल राजे आता कुठंपर्यंत पोहोचले असतील याचा शिवा काशिद शांतपणे अंदाज बांधत होते. प्राण सोडण्यापुर्वी शिवा काशिद म्हणाले. ’अरे वेड्यांनो! सोंग घेणारया शिवाजीची पाठ पाहता आली नाही. खरया शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या, आपले हात जोडत शिवा काशिदांनी प्राण सोडला. त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले.
इकडे शिवा काशिदांनी अखेरचा श्वास घेतला अन तिकडे राजांना एक अनामिक लहर अंगातून सणसणत गेल्याचा भास झाला. हा दिवस होता १३ जुलै १६६०चा !

शिवाजी महाराज निसटल्याचे समजल्याबरोबर जोहरने दिलेर सिद्दी मसूदला राजांच्या पाठलागावर पाठविले. तोपर्यंत काही अवधी निघून गेला होता. शिवाजी राजांनी योजलेली रणनीती पाहून सिद्धी जौहर आणि त्याचे सैन्य कमालीचे संतापले होते. त्यांनी शिवाजी राजांना पकडण्यासाठी मोठ्या त्वेषाने पाठलाग सुरु केला. विशाळगडापर्यंतचे अंतर खूप असल्याने मावळ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती. परंतू सर्वांचीच जिद्द कायम होती. विशाळगडापासून आठ मैल अंतरावर असणारया गजापूर जवळील घोडखिंडीत छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आले, त्यावेळी त्या खिंडीतच शत्रुशी लढ्यासाठीची तयारी शिवरायांनी दाखवली.मात्र बाजीप्रभूंनी शिवाजी राजांना पुढे निघून जाण्यास सांगितले. आपण काही सैन्य घेऊन ही खिंड लढवतो. "शरीरात प्राण असेपर्यंत एकाही गनिमास पुढे जाऊ देणार नाही" असे बाजींनी सांगितले. राजे शहारून गेले. काही वेळापूर्वी आपण आपला एक मोहरा पणाला लावला आणि आता हा काळजाचा तुकडा ! हा देखील आपल्यापासून विलग व्हायचे म्हणतोय ! तेही कशासाठी तर आपले श्वास चालत राहावेत, स्वराज्य अबाधित रहावेत म्हणून हा सगळा खटाटोप ! हे सगळे आपल्या प्राणाची बाजी लावताहेत अन आपण त्यांचे नेतृत्व करतो आहोत या भावनेने राजे हवालदिल झाले.बाजींनी राजांच्या मनात सुरु असलेले द्वंद्व ओळखले आणि स्वतःची शपथ घातली ! "राजे तुम्ही सुखरूप गडावर गेल्यावर पाच तोफांची सलामी द्या तोवर हा बाजी काळजाचा कोट करून ह्या खिंडीत उभा राहील ! त्या शिवाय श्वासाची माळ तुटणार नाही. राजे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माझी आण आहे !"
शेवटी शिवाजी राजांना बाजीप्रभूंच्या हट्टापायी तिथून निघावे लागले विशाळगडावर जावे लागले. तथापि शिवरायांनी विशाळगडावर गेल्यागेल्या ५ तोफ़ा उडविल्या जातील अशी ग्वाही दिली. मात्र त्यानंतर ही लढाई थांबवून बाजीप्रभूंना ताबडतोब विशाळगडाकडे सर्व सैन्य घॆऊन कुच करण्यास सांगितले.

बाजीप्रभूं निवडक सैन्य घॆऊन घोडाखिंडीत मसुदला रोखण्यासाठी थांबले. काही वेळातच शत्रू निकट आला, निकराची लढाई सुरु झाली, त्या चिंचोळ्या खिंडीत बाजी, त्यांचे भाऊ फुलाजीप्रभू आणि त्यांचे रणमर्द मावळे प्राण हाती घेऊन, जीवावर उदार होऊन लढत होते. अंगभर जखमा झालेले बाजी, देहाची लक्तरे झाली तरी अनन्वित त्वेषाने लढत होते. त्यांचा पराक्रम बघून शत्रू चकित झाला. बाजीची तलवार शत्रूंची शिरे उडवित होती. अखेर बाजीप्रभू मसुदशी लढता लढता धारातिर्थी पडले. आता त्यांचा लहुलुहान झालेला देह मातीवर कोसळला. मात्र त्यांचे सगळे प्राण गडावरून येणारया तोफांच्या सलामीकडे लागून होते. गात्रे शिथिल झाली होती, प्राण कंठाशी आले होते मात्र प्राणपाखरू देहातून बाहेर पडायला तयार नव्हते कारण त्यांना विशालगडावरील तोफांचा आवाज ऐकायचा होता. काही घटिकातच शिवाजी महाराज विशाळगडावर गेल्याच्या ५ तोफांचे आवाज त्या आसमंतात घुमले. तो ध्वनी ऐकल्याबरोबर बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर स्मित उमटले अन त्या महावीराने प्राण सोडला..

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे वीर बाजीप्रभू आणि वीर शिवा काशिद हे स्वराज्यनिष्ठ मावळे होते. नंतरच्या काळात शाहिस्तेखानावर हल्ला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी तह करून पन्हाळा २२ सप्टेंबर १६६० रोजी सिद्दी जोहरला दिला. यानंतर सुमारे १३ वर्षानंतर पन्हाळगड पुन्हा ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फ़र्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने स्वराज्यात जिंकून घॆतला. शिवाजी राजांनी या गडाचा कारभार महाप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांवर सोपविला होता.

रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्याग करणारया प्रतिशिवाजी शिवा काशिद यांच्या घरी कालांतराने शिवाजी राजे दस्तूरखुद्द स्वतः गेले. शिवा काशिद यांच्या पत्नी पारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले. शिवा काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारी पदी नेमले. शिवा काशिद यांचे नेबापूरला स्मारक उभारले. सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले. बाजीप्रभूंच्या कुटुंबियांचे देखील राजांनी सांत्वन केले.

इतिहास ह्या शूर मावळ्यांचा पराक्रम कधीच विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद आणि बाजींसारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. महाराष्ट्र निर्मितीनंतर शिवाजी राजांचे प्रतिरूप घॆणारे शिवा काशिद व घोडखिंड आपल्या रक्ताने पावनखिंड बनविणारे बाजीप्रभू देशपांडे या दोन्ही शूरवीरांचे पुर्णाकृती पुतळे कोल्हापूरातील पन्हाळगडावर बसविण्यात आले आहेत.

वीर शिवा काशिद आणि वीर बाजीप्रभूंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा ……….
जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय भवानी ! जय शिवराय !!

- समीर गायकवाड.

ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_13.html

 शिवा.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!

पावनखिंडीतील बाजीप्रभुंचा पराक्रम, लिओनिडास ह्या ग्रीक वीराच्या Thermopylae खिंडीतील पराक्रमाच्या तोडीचा आहे, ह्या घटनेवर ३०० सारखा सिनेमा देखिल येऊन गेला. मात्र आपल्या इथे असा एकादा सिनेमा बनवायचे धाडस कोणीही करताना दिसत नाही.

याच प्रसंगाचे अतिशय स्फूर्तिदायक वर्णन बाबासाहेब पुरंदरेंनी केले होते, त्याची आठवण झाली.आपली लेखनशैली अशीच खिळवून ठेवणारी आहे.

छान लेख. उण्यापुर्‍या ३५० वर्षांपूर्वी ही अशी माणसे महाराष्ट्रात होती...
अन गेल्या पन्नास वर्षात काय दिसते आहे? असो.

वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी..... त्रिवार मुजरा त्या जाणत्या राजाला..
आणि विनम्र अभिवादन त्या मावळ्यांना.

होय तनुची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमीवरी

सरणार कधी रण प्रभो तरी
हे कुठवर साहु घाव शिरी

खरच काटा आला अंगावर वाचताना...सुरेख लिहिलय...धन्य तो राजा न धन्य ती माणसं
मानाचा मुजरा.... !!!

( लहुलुहान हा शब्द जरा खटकतोय वाचताना... बदलता आला तर बघा प्लीज )

सरसरुन काटा आला अंगावर..जस काही डोळ्यापुढच घडतय सार.
मात्र आपल्या इथे असा एकादा सिनेमा बनवायचे धाडस कोणीही करताना दिसत नाही.>>> +१

स्वराज्य निर्मितीची गाथा ही अश्याच अनेक कर्तबगार आणि स्वामीनिष्ठ शुरवीरांच्या बलिदानाने लिहिली गेली आहे. त्या सर्व वीरांना शतशः प्रणाम. लेख वाचताना खरंच सर्व काही डोळ्यासमोर घडतेय असेच वाटले.

तुमच्या लेखात >>>>>रायगडाच्या मस्तकात वेदनेची एक तिडीक येऊन गेली<<<<<< असे एक वाक्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी राजगड ही स्वराज्याची राजधानी होती.

जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय भवानी ! जय शिवराय !!

खरच काटा आला अंगावर वाचताना...सुरेख लिहिलय...धन्य तो राजा न धन्य ती माणसं
मानाचा मुजरा.... !!! >>>>>+११११११११

<<<<वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी..... त्रिवार मुजरा त्या जाणत्या राजाला..
आणि विनम्र अभिवादन त्या मावळ्यांना>>>>+१००००

खरच काटा आला अंगावर वाचताना...सुरेख लिहिलय...धन्य तो राजा न धन्य ती माणसं
मानाचा मुजरा.... !!! >>>>>+११११११११