शाळा म्हणजे तरी काय ?.......

Submitted by अजातशत्रू on 8 July, 2016 - 03:28

शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारती नसतात,
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.
फुटक्या तावदानांच्या खिडक्या अन कडी कोयंडे तुटून गेलेले दरवाजे,
कपचे उडालेला काळपट राखाडी फळा त्याच्या अवती भोवती तरंगणारे खडूचे शुभ्र कण.
फळ्याच्या कोपऱ्यात वळणदार अक्षरात लिहिलेली हजेरी अन रंगी बेरंगी खडूने लिहिलेले सुविचार !
फळ्याला लागुनच असणारे डगमगणारे लाकडी टेबल,
आणि चार पायापैकी एक पाय किंचित मोडलेली चुईटया उडालेली लाकडी खुर्ची,
टेबलाच्या ड्रोवरमध्ये पहुडलेला पिवळा डस्टर आणि त्याच्या पांढुरक्या 'राठ' स्पंजचा हवाहवासा मुलायम स्पर्श..
टोकदार कर्कटकाने लाकडी डेस्कवर काढलेली अनामिक 'गुहाचित्रे'.
प्रत्येक तासाला प्राण कानात आणून ऐकलेला घंटेचा आवाज,
अन मधल्या सुटीत अंगत पंगत करून खाल्लेला डबा .
जिन्याच्या कठडयावरची घसरगुंडी आणि पायरयांवरची शर्यत.
खेळाच्या तासाला केलेली मस्ती आणि 'पीटी'च्या तासाला केलेल्या खोडया,
ग्रंथालयात चांदोबा वाचताना स्वप्नांच्या तारांगणात हरखून गेलेले मन.
प्रयोगशाळेत देहभान हरपून केलेले प्रयोग अन नवनिर्मितीचे अनुभव,
नव्या वह्यांच्या पानाचा वास अन रंगीबेरंगी खोडरबर पेन्सिलचे तुकडे .
कंपॉसची जादुई दुनिया अन चित्रकलेच्या वहीतले न पाहिलेल्या डोंगराआडून वाहणाऱ्या नागमोड्या वळणाच्या नदीचे रेखीव चित्र ..
गंधित पुस्तकांना चढवलेले कुरकुरीत कव्हर आणि पुस्तकातील फोटोंना काढलेल्या दाढीमिशा !
वहीच्या पानात ठेवलेले रेषांचे जाळे वागवणारे पिंपळपान, फुलाच्या पाकळ्या अन चॉकलेटची वेष्टने,
दोनेक दिवसांत मळून जाणारा तो अनोख्या वासाचा कधी हवासा तर कधी नकोसा असा गणवेश !
गुरुजींनी उजव्या हातावर छड्या मारताना गच्च झाकलेले डोळे अन आवळून धरलेली डाव्या हाताची मूठ !
आजारी पडल्याची चिठ्ठी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन देताना मनावर आलेले मणामणाचे ओझे !
रविवारची आशा दाखवणारा अलौकिक शनिवार आणि रविवारच्या हिंदोळ्यावर तरंगणारा अस्वस्थ सोमवार.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रवासापेक्षा अद्भुत वाटणारा सहलीचा खेळीमेळीचा प्रवास,
झेंडावंदनाच्या वेळेस ताठ होणारी मान आणि प्रतिज्ञा म्हणताना येणारा आळस !
राष्ट्रगीत गाताना चढत्या चालीतला 'जय हे. जय हे. जय जय हे' चा रोमांचकारी जयघोष !
मित्राबरोबर केलेली भांडणे अन निरागस कट्टी फू नंतरचा मनमोकळा दोस्ताना !
शाळा सुटल्यावर घरी जाताना वाटेतल्या वृद्ध भिकाऱ्याच्या पुढ्यात रिकामा केलेला डबा अन आपल्या डोळ्यात कोरले गेलेले त्याचे अश्रूयुक्त तृप्तीचे स्मित ..
दिवाळीच्या सुटीनंतर मनाला नवा हुरूप देणारे दिवस ..
परीक्षा आणि अभ्यासाची धास्ती देत राहणारे नोटीसबोर्ड !
अकस्मात सुटीच्या सूचनेचा कागद गुरुजींनी वाचताच जगज्जेत्या सिकंदरासारखा होणारा तो आनंद !
प्रगतीपुस्तकाची हळवी प्रतिक्षा अन उन्हाळ्याच्या स्वप्नवत सुट्यांचे केलेले अंदाज.
दहावीच्या शेवटच्या दिवशी 'सेंडऑफ'च्या दिवशी हळवे होऊन चष्मा काढण्याचा बहाणा करून अलगद डोळे पुसणारे गुरुजी अन मिठी मारणारे शिपाई काका !
पाया पडण्याआधीच आशीर्वाद देणारी ती देवमाणसं !
शाळा एक अनमोल संस्कार, शाळा एक जीवाभावाचा मैत्र, शाळा एक आयुष्यभराची शिदोरी, शाळा एक अखंड शिक्षणाची शीतल ज्योत .......... !

आठवणीची सय दाटून आले की डोळ्याच्या कडा ओल्या करणारी अशी ही शाळा कधी संपत नसते,
तिथले वर्ग कधी सुटत नसतात,
आपले 'दप्तर' बदलत राहते आपणही बदलत राहतो.
शाळा मात्र नव्या दोस्तांसोबत तिथंच उभी असते अगदी स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत !
आपण जरी तिथं नसलो तरी शाळा मात्र आपल्या काळजात खोल खोल रुतून बसलेली असते.
शाळा म्हणजे तुमचा आमचा गतजन्मीचा पुण्यसंचय जो या जन्मात शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याची प्रेरणा देतो ...
म्हणूनच ही शाळा कधी सुटत नाही अन आपली पाटी कधी फुटत नाही ...

- (C) समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_8.html

school १.jpg
माझ्या सोलापुरातील श्री.सिद्धेश्वर प्रशालेतील व दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेतील सर्व गुरुजनांना, शिक्षकेतर कर्मचारयांना आणि सर्व वर्गमित्रांना ही पोस्ट समर्पित ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

शाळा म्हणजे पि.टी. चा तास. शाळा म्हणजे हाताच्या ओंजळीत पाणी पिण्याची टाकी, शाळा म्हणजे ऑफ पिरीयेड्ला सरांनी सांगितलेल्या गोष्टी, शाळा म्हणजे वर्षाच्या शेवटी सगळ्यांनी मिळून केलेली चविष्ट भेळ, शाळा म्हणजे एक पिरीयेड संपल्यावर दुसरा पिरीयेड चालू होईपर्यंत केलेला दंगा. शाळा म्हणजे उभे राहून एक साथ नमस्ते.

@ वावे, शेअर करायला हरकत असण्याचा प्रश्नच नाही, आपण नक्की शेअर करू शकता ....अभिप्रायासाठी धन्यवाद..