शक्शुका

Submitted by निसर्गा on 5 July, 2016 - 02:28

लागणारा वेळ:
१५ ते २०मिनीटे

लागणारे जिन्नस:
२-३ चमचे तेल
४ अंडी
४-५ बारीक चिरलेले टोमॅटो
१ छोटा कांदा उभा चिरून
१ चमचा बारीक चिरलेला लसून/ पेस्ट
२ चमचे तिखट
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धनेपूड
१ चमचा साखर
हळद
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
चाट मसाला
चीज (मोझ्झरेला/पर्मेसन)

क्रमवार पाककृती:
हे नाव वाचताना जरा सांभाळून, नाही म्हणजे ...मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला तेव्हा जीभ अडखळून शुकशुक्शुका झालं आणि मराठी टायपताना तर काय हाल झाले विचारू नका... Proud
शक्शुका हा इस्रायली पदार्थ आहे. अरेबीक आणि लेबनीज खाद्यातही या पदार्थाचा समावेश होतो. हा कॉफी, ब्रेड सोबत खाल्ला जातो. यात अंडी हा मुख्य घटक असतो. लाल/ हिरवी ढब्बू मिरची, पालक या भाज्याही यात वापरल्या जातात. इथे टोमॅटो प्युरी वापरतात, त्यामुळे पातळ करी सारखा शक्शुका पण मिळतो आणि त्यात काळीमीरी/ पॅपरीका व मीठ वापरतात. मी त्यात बरेचसे बदल करून आवडेल असं भारतीय व्हर्जन बनवलयं. ब्रंच म्हणून भारी, पोटभरीचे आणि झटपट होते.

१. पसरट खोलगट पॅनमध्ये किंवा कढईत २-३ चमचे तेल तापवून घ्यावे. त्यात लसून परतून कांदा घालावा.
२. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा आणि त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घाला.
३. त्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर टोमॅटो शिजवून घ्यावेत. (आवडत असेल तर रेडीमेड टोमॅटो प्युरी ही घालू शकता.)
४. त्यात साखर, तिखट, हळद, धनेपूड-जिरेपूड आणि मीठ टाकून एकजीव करून घ्यावेत.
५. त्या मिश्रणात अंड्यांकरता ४ ठीकाणी जागा करावी. त्यात एक-एक अंडे फोडून त्यात टाकावे. प्रत्येक अंड्यात एकसारखे अंतर राहू द्यावे.
६. झाकण ठेऊन शिजू द्यावे.( अर्धे शिजवलेले पण मस्त लागते)
७. वरून थोडे मीठ, चाट मसाला, किसलेले चीज आणि कोथिंबीर टाका.

IMG-20160705-WA0007.jpgIMG-20160705-WA0006.jpg

(गार्निश करण्याआधीचा फोटो)

वाढणी/प्रमाण:
२-३ माणसांना पुरेल…
नुस्तही खाता येत किंवा साधा ब्रेड/ चपाती सोबत…

अधिक टिपा:
1. हे माझ्या इथल्या महाराष्ट्रीयन मैत्रिणीने शिकवलय. तिने साधं तिखट वापरून सब्जी मसालाही टाकलेला. मसाल्यानुसार तुम्हाला हवे तसे बदल करा. मी घरचं कोल्हापुरी तिखट वापरलयं. जास्तीत जास्त लाल रंग आला की मस्त दिसत आणि चवही मस्त येते.
2. अंडी टाकल्यावर हालवू नये. वाढताना केक सारखे भाग करून वाढावे.
३. मीठ फक्त कांदा- टोमॅटोच्या मिश्रणाच्या चवी पुरते वापरावे. अंड्यांसाठी वरून थोडेसे टाकावे. नाहीतर खालचा भाग जास्त खारट लागतो.

माहितीचा स्रोत:
महाराष्ट्रीयन मैत्रिण (काही माझे बदल)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ते शुक्शुका वाचले आणि त्यावरुन कोणालातरी शुक शुक करुन बोलावण्याचा ललित पाडलेला लेख वाटला. Proud
गृपमध्ये पाकृ वाचले म्हणून इंटरेस्टने वाचली. Happy

सोपी दिसतेय पाकृ आणि तोंपासू पण.

असाच पदार्थ ठाणे रायगड भागात पाहिला आहे. त्याला तिथे अंड्याचं भुजणं म्हणतात. ही शक्शुकाची अगदीच साधी वर्जन. अगदी बारीक चिरलेला जरा जास्त कांदा (तीन मोठे कांदे) जास्तशा तेलात चांगला परतून घ्यायचा, मीठ घालायचं आणि कच्चट वास गेल्यावर त्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीची पेस्ट चांगल्यापैकी परतायची. मिश्रण गोळा होऊन तेल सोडू लागलं की थोडी हळदपूड घालून लिंबू पिळायचं, पुन्हा परतून आणि भांड्यात पसरून नंतर वरच्या रेसिपीसारखी चार अंडी एक एक करून फोडून चार बाजूंना ओतायची. पाण्याचं झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यायची. करपता कामा नये. कारण करपलेली अंडी भयाण लागतात अशी टिप मिळालेली. खाऊन बघितलं नाही पण रंग मात्र पिवळसर हिरवा छान आला होता. त्या लोकांनी तेल जरा जास्तच घातलं होतं. करपू नये म्हणून. कुठल्या तरी मासळीच्या तुकड्यांचंही असंच भुजणं करतात असंही संगितलं होतं. आता नाव आठवत नाही.

छान आहे प्रकार.. याचे आणखी काही प्रकार मी बघितलेत / केलेतही.

हीरा, भुजणी हा एका विशिष्ठ समाजातला पदार्थ आहे. काहि वेळा कांदा कच्चा चुरून, त्यात मिठ मसाला घालून, त्यात तेल मासे वगैरे घालून एकत्र शिजवतात. बोंबलाचे वगैरे करतात पण इतर मासेही वापरतात.

आम्ही करतो हा प्रकार. याचं मूळ नाव माहीत नव्हतं पण माझ्या काकीनं आम्हाला हा पदार्थ शिकवला म्हणून आम्ही त्याला 'शकुकाकीचं' असं म्हणतो ते नेमकं मूळ नावाच्या जवळचंच निघालं की! Biggrin

यात आम्ही फक्त कांदे,टॉमेटो आणि पावभाजी मसाला घालतो. चीज वगळतो. भारी लागतं.

अरे वा!!
मी आधी ही रेसिपी शोधली पण मिळाली नाही... आता खूप सारे वेरीएशन्स मिळाले की... आता प्रत्येक वेळी यातली एक करून बघेन... Happy
'शकुकाकी'>>:हाहा:

हीरा, भुजणी हा एका विशिष्ठ समाजातला पदार्थ आहे >>> हा पाठारे प्रभूंचा खाद्यप्रकार आहे. पण ते असे नसते. कांदा-टोमॅटोचा रसा असतो. मग बटाटा, अंडी, कोळंबी, बोंबिल अशी वेरिअशन्स असतात.

दिनेश, माझ्या साबा पठारे प्रभु आहेत म्हणून मला माहित आहे Happy

त्यांचे काही खास मसाले असतात. ठरविक दुकानात मिळतात. म्हणून पदार्थ खासच असतात Happy

दिनेश, मामी, rmd,, मी नताशा, विठ्ठल सर्वांनी भुजणं/भुजणीची अनेक वर्जन्स सांगून एक्स्प्लेन केल्याबद्दल आभार.