सांज ...

Submitted by अजातशत्रू on 30 June, 2016 - 00:26

गावाकडे सांज होताच

आभाळाची निळाई मातीत उतरते.

मातीतली पेंग गोठयात रांगत रांगत जाते,

गाईच्या डोळ्यात जाते.

आभाळातले चांदणे देव्हाऱ्यातल्या

निरांजनात अधिक चकाकून उठते.

समईतल्या वातींची ज्योत शांतशीतलतेने जळू लागते.

पडवीतला पाचोळा धडाडून उठतो.

लख्ख पुसलेल्या कंदिलाच्या काचेत

चंद्र चेहरा न्याहाळतो.

सांज होताच वासरे बिलगतात गाईला

अन लेकरे आपुल्या आईला.

सांज कुरवाळते थकलेल्या झाडांना, वेलीना, पानांना अन सुकल्या फुलांना.

उमलणारया कळ्यांना रात्रभर ती सोबत करते.

परसातल्या घरधन्याच्या अंगावर आभाळाचे पांघरूण घालते.

सांज चुलीच्या पोटात शिरते अन पेटून उठते.

चुलीवर ठेवलेल्या मातीने सारवलेल्या पातेल्यात मायेने झिरपते,

गरीबाच्या ताटातले दोन घास सांज अमृताचा करून जाते.

सांज दमल्या जीवाला झोप देते, वासरांना माय देते

मायेला आसरा देते, आसऱ्याला देवास आणते,

देवाला माती दावते, मातीला निळ्या आभाळाची भेट घडवते.

सांज मिलन घडवते !

सांजेला माणसाची विठूरायापुढे दंडवते.

सांज पोथीत स्वतःला शोधते,

आजीच्या गोष्टीत हरवून जाते.

आजोबांच्या चंचीत लपून बसते,

बाजेवर अंग टाकून पाठ मोकळी करते.

आरशात न्याहाळणाऱ्या सासूरवाशिणीच्या गजरयात घुमते,

रिकाम्या ताटातून अर्धभरल्या पोटात जाते,

पोटातून डोळ्यात येते, डोळ्यातून गालावर ओघळते.

सांज हसवतेही अन रडवतेही...

सांजेला आकाशाकडे बघताना झोप कधी लागते काही कळत नाही.

रात्र गडद झाल्यावर सांज परत फिरते,

जाताना स्वप्नात मायबापांचे हसरे सांगावे सोडून जाते..

- समीर गायकवाड .

ब्लॉगवर भेटा ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/04/blog-post_28.html

saanj_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अता ठराविक लिखाण वाटतय तोचतोचपणा आलाय, काहितरी वेगळे ट्राय करा
लिखाणात दम आहे तुमच्या