७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक

Submitted by मनोज. on 28 June, 2016 - 13:12

भाग १ - तयारी

सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले.

दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या. थोडे फोटोसेशन झाले.

बॅगांची बांधाबांधी सुरू असताना...

.

तयारी झाली...!!!!

.

सर्वांचा निरोप घेतला. बॅगा गाडीला नीट बांधल्या आहेत याची खात्री केली आणि आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर वाकडजवळ एके ठिकाणी पेट्रोल भरून घेतले. आता पुढचा थांबा लोणावळा असणार होता. सोबत घ्यायच्या खाद्यपदार्थांमध्ये चिक्कीची खरेदी लोणावळ्याला ओरिजिनल मगनलाल कडे होणार होती.

तासाभरातच मगनलाल कडे पोहोचलो. खरेखुरे (ओरिजिनल.!) मगनलाल चिक्कीवाले माझ्या एका मित्राचे मित्र आहेत. ते भेटले. त्यांनी सामान लादलेल्या गाड्या आणि आमचा एकंदर अवतार बघून सगळी चौकशी केली आणि चिक्की थोडी आणखी काळजी घेवून पॅक करून दिली व महत्वाचे म्हणजे एकावर एक अशा दोन-तीन कॅरीबॅगमध्ये पॅक करून दिली.

लोणावळा, खंडाळा, एक्प्रेसवेचा लहानसा सेक्शन असे करत करत पनवेलला आलो आणि रस्ता चुकलो. मुंब्र्याच्या भाऊगर्दीतून आणि वैतागवाण्या ट्रॅफिकमधून शेवटी ठाण्याच्या घरी पोहोचलो. वाटेत रस्ता चुकल्याने तासभर उशीर झाला होता.

ठाण्याला पोहोचल्यावर महत्वाचे काम केले म्हणजे माझ्या खचाखच भरलेल्या बॅगेमधून कधीतरी लागेल, बॅकपचा बॅकप असे सोबत घेतलेले बरेचसे सामान कमी केले. माझ्या बॅगा जातानाच ओसंडून वाहत होत्या त्यामुळे तेथे खरेदी केलेले सामान कोठे ठेवणार हा प्रश्न होताच. शेवटी सामानात बरीच काटछाट केली. उदा. संपूर्ण ट्रीपसाठी ३ ड्रायफिट टीशर्ट आणि बर्फात घालण्यासाठी दोन पूर्ण हातांचे टीशर्ट इतकेच कपडे सोबत घेतले.
थोड्या वेळात बाहेर पडलो. माशांची खरेदी केली आणि संध्याकाळी विजय व रोहितने झकास फिश फ्राय बनवले. Happy

**************************************

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठलो. सगळे आवरले व साडेचारच्या दरम्यान बाहेर पडलो. आज शक्य झाले तर उदयपूर गाठण्याचा मानस होता. ठाण्यातून सकाळी सकाळी घोडबंदर रोड आणि वसईच्या पुलावरून NH8 चा प्रवास सुरू केला. मुंबई बाहेर पडल्यानंतर एके ठिकाणी पेट्रोल भरून घेतले. मी उत्तरायणच्या वेळी याच रस्त्यावरून प्रवास केल्याने हा रस्ता एकदम भारी आहे व काहीच अडचण येणार नाही असे अपेक्षित होते. त्याप्रमाणे एका लयीत प्रवास सुरू झाला.

.

सुरत जवळ एके ठिकाणी हॉटेल मध्ये थांबलो. इडली वडा आणि सामोसा असा नाष्टा केला. महत्वाचे म्हणजे इरसाल बुवांना फोन केला आणि आमचे स्टेटस सांगीतले व सध्या रस्त्यांची काय परिस्थीती आहे आणि पुढे कोणता रस्ता घ्यावा याचा सल्ला घेतला. इरसाल बुवांनी फोनाफोनी करून मला हलोल-गोध्रा हाच सोयीचा रस्ता आहे असे कळवले.
आमचा प्रवास सुरू झाला...
लेह आणि काश्मीर परिसरात जास्तीत जास्त वेळ घलवावयाचा असल्याने आम्ही लवकरात लवकर गुजरात-राजस्थान-हरियाणा पट्टा पार करणार होतो त्यामुळे वाटेत कुठेही फारसे थांबे होत नव्हते.

नॅशनल हायवे ८

.

थोड्या वेळात गाड्यांचा वेग आपोआप कमी झाला कारण पुढे भलेमोठे ट्रॅफिक जाम दिसत होते. रस्त्यावर पुढे ट्रकची मोठी रांग दिसत होती. आंम्ही ट्रकच्या बाजुबाजुने हॉर्न देत देत थोडे अंतर कापले. ट्रकची रांग संपतच नव्हती. पुढे एके ठिकाणी एका गाववाल्याने आंम्हाला थांबवले व "हाईवे से बहुत टाईम लगेगा आप यहां मुडके गांव से होकर जावो" असा सल्ला दिला. मी पूर्वी एकदा आणंद ते बडोदा प्रवासात असा उद्योग केल्याने त्याच्या सल्ल्यावर विश्वास ठेवला व एका गावाच्या दिशेने गाडी वळवली. थोडे अंतर कापताच आणखी एक जण भेटला ज्याला असेच पुढे हायवे ला जायचे होते. मग त्याच्या मागे मागे १०/१२ किमी अंतर कापून आंम्ही पुन्हा हायवेला आलो. येथे नवीनच स्टोरी. ट्रकची रांग होतीच, मात्र पोलीसांनी आंम्हाला सरळ हायवे पार करून येणार्‍या रस्त्याला समांतर असणार्‍या एका शेतातल्या रस्त्यात घालवले. आता तेथून तापलेल्या मातीतून आणि कच्च्या रस्त्यावरून प्रवास सुरू झाला. हळू हळू पुन्हा १०/१२ किमी अंतर शेतातून पार केल्यानंतर शेवटी एकदाचे हायवेला आलो.

वडोदरा आले आणि इरसाल बुवांनी सांगीतल्या प्रमाणे ट्रॅफिक वाल्या अहमदाबाद रस्त्याला टाटा करून हलोल-गोध्रा कडे गाड्या वळवल्या.

.
(फोटो अंतर्जालावरून साभार..)

या रस्त्यावर वेगळेच नाटक होते. सामान्यतः दुचाकी म्हटल्यावर आम्हाला नेहमी एकदम बाजुची, डावीकडची लेन घ्यायची सवय आहे. तशीच येथेही डावीकडची लेन घेतली तर टोल नाक्यानंतरचा रस्त्याचा डिव्हाईडर संपलाच नाही. सलग ७-८ किमी अंतर कापले तरी आंम्ही सर्व्हिस रोडवरच्या खाचखळग्यात कूर्मगतीने जात होतो आणि इतर वाहने बाजुनेच गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट धावत होती. शेवटी एकदाचा मुख्य रस्त्याला लागणारा चौक आला आणि तेथे एका घोळक्याने आंम्हाला अडवले.

घोळक्यातला एक जण : रिसीट ले लो भैय्या.

मी : काहेकी रिसीट?

तो भला माणूस : टोल है.

मी : टू व्हीलर के लिये टोल??? रिसीट दिखाओ. (खोटे पावती पुस्तक छापून पैसे गोळा करणारी मंडळी पाहिली आहेत त्यामुळे माझा सावध पवित्रा)

तो भला माणूस : ये लो.. देखो.
(मी पाहिले तर ओरिजिनल वाटावी अशी पावती होती.)

मी : ठीक है. ये लो. असे म्हणून पैसे दिले.

तोपर्यंत विजयने त्यांना गार पाणी आहे का असे विचारले आणि व्हॅनमधून गार पाणी भरलेल्या बाटल्या आमच्याकडे सुपूर्त झाल्या.

तितक्या वेळात त्या घोळक्यातल्या लोकांचे कुतुहल जागृत झाले होते.

घोळक्यातून सवाल आला : कहाँ जा रहे हो?

रोहित : लेह-लदाख जा रहें हैं.

दुसरा सवाल : ये कहाँ है?

रोहित : कारगिल के पास हैं.

यावर त्यांना वाटले आंम्ही सैनीक आहोत. गाड्या, एकसारखे जॅकेट आणि एकसारखे बुट असेही कारण असेल.
माझ्याकडून टोल घेणारा आता समोर आला. "पहले बता देते तो हम आपसे पैसा ही नहीं लेते. आप तो हमारे लिये वहाँ जा रहे हो. आपकी वजह से तो हम यहाँ आराम से रहते हैं - माफ करना भाईसाहब गलती हो गई हमसे.."

मला प्रचंड अवघडल्यासारखे झाले. शेवटी त्याने केलेले बरोबर आहे अशी त्याची समजुत घातली आणि आंम्ही फिरायला चाललो आहे असे त्याला पटवल्यावर तो बाबाजी शांत झाला.

वडोदरा-हलोल हा अप्रतीम रस्ता आणि तसाच पुढे हलोल-गोध्रा रस्ता पार केल्यानंतर मोडासा जवळ आलो आणि एका सिंगल रस्त्याने शामलजी नामक एका गावात पोहोचलो. येथे आंम्ही पुन्हा नॅशनल हायवे ८ वर येणार होतो. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. एक झकास ढाबा बघितला आणि दाल मखणी रोटी वगैरे ऑर्डर दिली.

..

गुजरात-राजस्थान-हरियाणा आणि पंजाब मध्ये मिळणारे जेवण निव्वळ लाजवाब असते असे अनेकदा ऐकले होते. ते तसे का असते याचा अनुभव येत होता.

जेवण झाल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. गुजरात आणि राजस्थानातल्या जमीनीचा पोत आणि हायवे शेजारी दिसणारे डोंगर वेगळेच दिसत होते. रखरखाट सुरू झाला होता. प्रचंड उन्हात गाड्या चालवताना गरम हवेच्या झोतांनी अंग अक्षरशः भाजुन निघत होते. बलक्लावा, मास्क, ग्लोव्ह्ज अशी सगळी आयुधे गार पाण्यात भिजवून परिधान केली तरी पाचव्या मिनीटाला सगळे वाळून जायचे व गरम हवेचा तडाखा पुन्हा सुरू होत होता. परिस्थीती इतकी वाईट होत होती की हेल्मेटची काच आणि गॉगल असतानाही बारीक धुळ डोळ्यांमध्ये जात होती, डोळे ती धूळ बरोब्बर नाकाजवळ जमा करत होते आणि कांही वेळाने गरम हवेच्या झोताने त्या धु़ळीमधले असेल नसेल तितके पाणी गायब होवून ते सगळे प्रकरण खड्यांसारखे घट्ट होत होते व टोचत होते. हा अनुभव नवीन होता. त्यामुळे थांबल्यानंतर डोळे साफ करणे गरजेचे झाले होते.

असाही एक राजस्थान मधला रस्ता..

.

प्रचंड ऊन आणि गरम हवेवर उतारा म्हणून मी पाण्याने भरलेली व टोपण काढलेली बाटली जॅकेटच्या आत ठेवली. गाडी चालवताना गरम व्हायला लागले की ती बाटली बाहेरून थोडी दाबायची. टीशर्ट आणि जॅकेटवर पाणी पसरले जायचे आणि तात्पुरता गारवा तयार व्हायचा.. तेव्हढेच बरे वाटत होते.

संध्याकाळी सातच्या सुमारास उदयपूरला पोहोचलो. वाटेत बायपासजवळच एक हॉटेल मिळाले. तेथे सामान टाकले. फ्रेश झालो. आज इतक्या गरम हवेतून प्रवास केला होता की सॅकमधले कपडे, खाद्यपदार्थ इतकेच काय तर पाऊचमधील फेसवॉश, तेल वगैरे सगळे गरम झाले होते.
हॉटेल मधल्या मॅनेजर मुलाने जवळच्या एका ढाब्याचा पत्ता दिला व तेथे फोन करून "हमारे मेहमान है" अशी खास सिफारिस केली. त्या ढाब्यावर अप्रतीम दाल-बाटी खाल्ली.

आजच्या दिवसात आंम्ही ७४० किमी च्या आसपास अंतर पार केले होते.

**************************************

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. आवरले. माझा नेमका उजवा हात, त्यातही मनगट दुखायला लागले होते. उदयपूरहून निघाल्यानंतर थोड्या वेळात नाष्ट्याला थांबलो. हाताचे दुखणे वाढतच चालले होते. अ‍ॅक्सलरेटर पिळून पिळून बहुदा मनगटाचे स्नायू दुखायला लागले होते. एके ठिकाणी आलू पराठ्याचा नाश्ता केला व पुन्हा दिल्ली कडे कूच केले.

राजस्थान मधून जाताना आता सतत मोठाल्या संगमरवराची वाहतूक करणारे ट्रेलर दिसू लागले होते. आपल्याला नेहमी दिसणारे आयशर, 407 सारखे ट्रक दिसण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले होते.

.

विश्रांती

.

असाच एक टोल नाका..

..

राजसमंद-ब्यावर-अजमेर अशी ठिकाणे एका लयीत मागे पडत होती. कंटाळा आला की थांबणे, मिळेल ती खादाडी करणे, उसाचा रस, सरबत वगैरे पोटात ढकलून उन्हाळ्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू होते.

अजमेर बायपास रस्त्यावरून जाताना एके ठिकाणी आंम्ही थांबलो होतो तोच एक लाल रंगाची सँट्रो आमच्या शेजारी कचकचून ब्रेक मारत थांबली. गाडी रस्त्यावरच सोडून गाडीचा ड्रायव्हर आणि शेजारचा उतारू गडबडीने उतरले

त्या हिरोने गाडी अशी थांबवली होती.

.

तो उतरला माझ्याकडे आला.

"मै अमुक अमुक क्राईम ब्रांच जोधपूर."

मी : (मनातल्या मनात - आँ..?????) बोलिये सर.

क्राईम ब्रांच जोधपूर :
क्या बात है.. कहाँ जा रहें है आप? बहुत अच्छी बात हैं.. आपका एक फोटो लेना हैं मुझे. (हे सगळे एका दमात.)

मी : (अविश्वासाने) आप क्राईम ब्रांचसे हो?

क्राईम ब्रांच जोधपूर : हाँ जी.

मी : (शांतपणे..) आपका आयडी दिखाओ.

त्या "क्राईम ब्रांच जोधपूर" चा चेहरा पडला. सोबतच्या साथीदाराला म्हणाला. "अपणा आयडी लेलो जरा"

मी आयडी बघितला तर हे साहेब प्रिझन्स डिपार्टमेंटचे कॉन्स्टेबल होते. मग त्यांना आमचे फोटो काढायला परवानगी दिली.

..आणि अचानक आमच्या पुढे साहेबांनी बाँब टाकला.

मै वैसे कविताएं भी करता हूं.. फलाणा फलाणे के साथ स्टेजपे जा चुका हू.. आणि असे बरेच काही बोलून साहेबांनी स्वतःची महती सांगितली.

आपको कुछ पंक्तियाँ सुनाना चाहता हूं..!!

त्यानंतर राजस्थानातल्या गरम वातावरणात, टळटळीत दुपारी, अजमेरच्या रस्त्यावर कविसंमेलन सुरू झाले.

आवेशपूर्ण कविता ऐकताना विजय आणि रोहित

..

या एकंदर प्रकरणात मला हसू आवरत नव्हते त्यामुळे मी क्लिकक्लिकाट करत आवाज न करता हसत होतो. Lol

शेवटी त्या साहेबांना वाटेला लावून आंम्ही पुन्हा गाडीवर स्वार झालो.

दुपारनंतर जयपूरजवळ आंम्ही एका वेगळ्याच प्रदेशात प्रवेश केला. कुंद वातावरण होते आणि सगळीकडे धूळच धूळ भरली होती.

..

त्या धुळीच्या ढगात प्रवेश केल्यानंतर थोडे अंतर सावकाश गाडी चालवली. नंतर तो ढग मागे पडला.

.

रस्ता खूपच चांगला होता.. फक्त लहान गाड्या कमी प्रमाणात होत्या. ट्रकचे राज्य सुरू झाल्यासारखे सगळीकडे ट्रकच ट्रक दिसत होते.

..

थोडा वेळ गेला की पुन्हा पुन्हा विश्रांती साठी थांबत होतो. अत्यंत चांगल्या रस्त्यांमुळे अंतर मात्र लवकर पार होत होते.

विश्रांती.

.

यथावकाश रेवारी नंतर डावीकडे वळण घेतले व झज्जर कडे गाड्या वळवल्या. दिल्लीतील वाहने आणि ट्रॅफिकला टाळण्यासाठी आंम्ही हरियाणाच्या खेड्याखेड्यातून प्रवास करणार होतो.

रेवारी-झज्जर-रोहतक रस्ता कल्पनेपेक्षा चांगला निघाला.

.

दिवस कलल्यानंतर झज्जर पार केले आता मुक्काम कुठे करायचा वगैरे बोलणे सुरू होतेच. अचानक रोहतकच्या दिशेने जाताना काळ्याकुट्ट ढगांची दाटी दिसली. रस्ता आंम्हाला बरोब्बर तिकडेच नेत होता. आमच्या डोक्यावर निरभ्र आकाश आणि समोर एखाद्या बोगद्यात जावे तसे ढगांच्या बोगद्यात आंम्ही जाणार होतो. दहा-पंधरा मिनीटातच आंम्ही त्या काळ्या ढगांच्या बोगद्यात प्रवेश केला. दिवसा उजेडी अंधारल्यासारखे वातावरण झाले होते त्यात भर म्हणजे त्या ढगांमधून अव्याहतपणे विजा कडकडत होत्या. आंम्ही शक्य तितक्या वेगाने अंतर कापण्याचा प्रयत्न करत होतो.. आता प्रचंड वेगाने वारा सुरू झाला. इतका वारा मी कधीही अनुभवला नव्हता. आमच्या गाड्या रस्त्यावरून बाजुला फेकल्या जावू लागल्या. आंम्ही कसेबसे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु शक्यच होत नव्हते.
शेवटी पजेरो आणि फॉर्च्युनर सारख्या गाड्या बाजुला थांबलेल्या बघुन आंम्हीही मुकाट एका धाब्याजवळ गाड्या थांबवल्या. धाबामालक एकदम दयाळू होता त्याने आंम्हाला गाडीसकट आत घेतले आणि टेबले खुर्च्या हलवून गाड्यांसाठी जागा करून दिली.

.

यथावकाश वादळ संपले. आंम्ही जेवण आटोपून धाब्यावरच मुक्काम करणार होतो. मात्र थोड्यावेळाने तेथे हळूहळू गिर्‍हाईके येवू लागली आणि मग आंम्हाला साक्षाकार झाला की हा २४ तास चालणारा धाबा आहे. आपल्याला झोप मिळण्याची सुतराम शक्यता नाही. शेवटी त्या मालकाचे आभार मानून रात्री दहा नंतर बाहेर पडलो व प्रचंड पावसात व ठीकठाक वार्‍यात १५-२० किमी प्रवास करून रोहतक मध्ये पोहोचलो.

रोहतकमध्ये हरियाणवी खातीरदारीचा वेगळाच नमुना बघायला मिळाला.

तेथे पोहोचल्यानंतर एके ठिकाणी पानपट्टीजवळ तीन चार जण उभे होते, मी त्यांच्यासमोर गाडी थांबवली व "रहनेका इंतजाम" विचारला.

त्यातल्या एकाने दोन पावले मागे जावून माझ्या गाडीचा नंबर नीऽऽऽट बघितला आणि एकदम विचारले.

महाराष्ट्रसे आएं हो??

मी : जीं हाँ, वो आँधी-बारीश में फस गएं थे इसलिये लेट हो गएं. कोई हॉटेल बता दो.

मग त्यांच्यातल्या त्यांच्यात चर्चा झाली. तीनो खुल्ले तो है.. काहेको महंगा हॉटेल? अशी त्यांच्यात परस्पर चर्चा सुरू झाली. तितक्यात माझ्या गाडीचा नंबर बघणारा बोलता झाला.

तो : देखो भाई, अपणा एक घर ऐसेही पडा हुआ है. कोई रहता नही है. सब कुछ इंतजाम हैं. क्यों हॉटेल में जाते हो.. मेहमान लोग हो.. चलो अपणे घर.

मी : नहीं भाई साहब, बारीश कीचडसे बहोत गंदे हो चुके है.. घर में कैसे आएंगे? आप हॉटल बता दो.

तो : अरे चिंता मत करो. चलो हमारे साथ. कुच उन्नीस बीस हुआ तो हमे माफ भी कर देना..

मी : नहीं भाई साहब, बहोत शुक्रिया.. लेकिन आप हॉटलही बता दो.

मग शेवटी त्याने पुन्हा घोळक्यात बोलून थ्रीस्टार वगैरे हॉटेलचा पत्ता न देता. एका चांगल्या AC हॉटेलचा पत्ता दिला.

यथावकाश ते हॉटेल सापडले व भन्नाट घडामोडींनी भरलेला दुसरा दिवस संपला होता.

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय . कविता ऐकवण्याचा किस्सा भारी आहे. आयतं गिर्हाईक सापडलं Proud Lol

मस्त वृत्तांत , पुढील भागाच्या प्रतीक्षेत

असले लेख टाकताना ईनो च्या पुड्यापण फ्रिमध्ये देत जावा,साला ,प्रचंड जळजळ होते पोटात.

त्यानंतर राजस्थानातल्या गरम वातावरणात, टळटळीत दुपारी, अजमेरच्या रस्त्यावर कविसंमेलन सुरू झाले. >> Rofl

सहीच जमला आहे हा भाग.