निसर्ग, पर्यावरण आणि आपण १०: काही कटु प्रश्न आणि काही कटु उत्तरे

Submitted by मार्गी on 28 June, 2016 - 03:56

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ८: इस्राएलचे जल- संवर्धन

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ९: जगातील प्रमुख देशांमधील पर्यावरणाची स्थिती

काही कटु प्रश्न आणि काही कटु उत्तरे

पर्यावरणाविषयी चर्चा करताना आपण अनेक मुद्दे बघितले. जंगल, पाणी आणि अन्य नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाच्या अनेक प्रयत्नांची संक्षेपात चर्चाही केली. अनेक व्यक्ती, गाव आणि संस्था ह्या दिशेने चांगलं काम करत आहेत. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या विषयाचा एकत्रित विचार करतो, तेव्हा आपल्यासमोर अनेक अप्रिय प्रश्न उभे राहतात. आधीच्या लेखामध्ये म्हंटल्याप्रमाणे एक झाड कापल्यानंतर मार्केटमध्ये मिळणारा मोबदला हा झाड लावण्याच्या लाभापेक्षा जास्त असतो. त्यामुळे आपण कितीही झाडं लावली किंवा वन संवर्धन केलं तरी ते तोडलं जाण्याची गती जास्तच राहील. ह्या लेखात अशाच काही कडु प्रश्नांविषयी व कडु उत्तरांविषयी बोलूया.

आधी बघितल्याप्रमाणे पर्यावरणामध्ये आज असेच देश प्रगत आहेत जिथे निसर्गावर मानवाचं बर्डन कमी आहे. अर्थात् अपार नैसर्गिक संपदा आणि कमी लोकसंख्येचे देश. ह्यामध्येच एका अर्थाने ह्या सर्व समस्येचं मूळही आहे आणि त्याचं उत्तरही आहे. आपली लोकसंख्या आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हा एक अप्रिय प्रश्न आहे. तसंच कोणीच ह्यावर बोलूही इच्छित नाही. उलट आज प्रत्येक समाज आणि राजकीय नेते आपापल्या समाजाच्या लोकांना सतत संख्या वाढवा असंच सांगतात. पण आता वस्तुस्थिती फार विपरित होते आहे. एकावेळी 'हम दो हमारे दो' किंवा 'हम दो हमारा एक' अशा गोष्टी ठीक होत्या. पण आज निसर्गावर मानवामुळे होणारा परिणाम बघता अशा कपल्सचा सन्मान केला जायला पाहिजे जे आई- बाबा होऊ इच्छित नाही आहेत. केवळ सन्मानच नाही तर सरकारकडून अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर पुढे येणा-या पिढ्यांना काहीही उरणार नाही. एके काळी जेव्हा आक्रमक सत्ता जगावर आक्रमण करायच्या, त्याच प्रकारे आज मानव पूर्ण पृथ्वीवर आक्रमण करत जातोय. त्यामुळे जर काही खरोखरचं परिवर्तन आणायचं असेल, तर मानवाचं निसर्गावर होणारं हे आक्रमण थांबवायला हवं आणि त्यासाठी लोकसंख्या कमी करणे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.

पण आज सरकार असं काम कधी करणार नाही. कारण लोकशाहीचा पायाच असा आहे की, सरकार व्यापक जनसमूहाच्या विरोधात जाऊच शकत नाही. लोकांना जे आवडत नाही किंवा जे समजत नाही, तशा कोणत्याही कामाविषयी सरकार बोलूसुद्धा शकत नाही. आपल्या कित्येक महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक चुकाही दिसतात. जिथे गुण असणार तिथे दोषही असणार. जसं गांधीजी महान होतेच; पण त्यांनी त्यांचा मुलगा हरिदाससोबत जे केलं ते अगदी अनुचितच होतं. गांधीजी म्हणायचे की, हिंदु- मुस्लीम भाऊ भाऊ आहेत आणि गीताइतकंच कुरआन पवित्र आहे. पण जेव्हा त्यांच्या मुलाने मुस्लीम धर्म स्वीकारला, तेव्हा त्यांनी त्याला घरातून काढून टाकलं. कोणी गांधीवादी हे बोलणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर सरकार बोलूसुद्धा शकत नाही. आज आपल्या देशात अनेक ठिकाणी पर्यावरणावर अत्यंत तणाव आहे. सर्व महानगरांमध्ये मानवाचा निसर्गावर अतिशय जास्त दबाव आहे. आणि मानवाचा मानवावरसुद्धा जास्त दवाब आहे. त्यामुळे जर सरकारला जर खरोखर लोकांचं भलं अभिप्रेत असेल, तर सरकारने सांगायला हवं की, आता मोठ्या महानगरांच्या लोकसंख्येवर बंधन असेल. त्यामुळे आता कोणी तिथे राहायला येऊ शकणार नाही. पण सरकार असं म्हणूही शकत नाही. कारण लगेचच वेगवेगळ्या सामाजिक संस्था व मानव अधिकारवाले आरडाओरडा सुरू करतील. आणि लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला काहीही करण्याचा जणू हक्कच आहे. कायदा आणि व्यवस्थेची यंत्रणा असली तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येपुढे ती तोकडीच ठरते. पण जर सर्व लोकांचं हित लक्षात घ्यायचं असेल, तर काही निर्बंध तर ठेवावेच लागतील. जर झाडाची वाढ उंच होऊ द्यायची असेल, तर त्याच्या फांद्यांचा विस्तार कमी करावा लागतो. अराजक मान्य करता येत नाही. आज आपण पर्यावरणासोबत जे करतो आहोत, ते अराजकच आहे. आणि आपल्यालाही खरं तर ते कळत असतं. हळु हळु आपल्याला पाण्याची खरी किंमत कळते आहे. लवकरच झाडाची किंमतही कळू लागेल.

पण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गुंतगुंतीच्या होतात. जसं वरवर बघताना वाटू शकतं की सायकल अतिशय इको फ्रेंडली आहे. पण त्यामध्येही अनेक अंडर करंटस असतात. सायकल चालवणं इको फ्रेंडली असतं, पण सायकल बनवताना प्रदूषण होत नाही? असे अंडरकरंटस अनेकदा जास्त असतात. त्यामुळे आपल्याला फार सजग राहायला हवं. फक्त वरवर दिसणारंच नाही, तर त्याच्या आतमध्ये जे आहे, तेही बघण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्येही अप्रिय वाटले तरी दीर्घ कालावधीमध्ये लाभदायक ठरतील असे बदल करायला हवेत. मानवाचं निसर्गावर होणारं बर्डन कमी करण्यासाठी लोकसंख्या कमी करण्याबरोबरच ती ठराविक जागी जास्त प्रमाणात एकत्र होणं थांबवावं लागेल. भारतातल्या सर्व मेट्रो सिटीज आज एक्स्झॉस्ट झालेल्या आहेत. तिथे राहणा-या लोकांच्या जीवनातही अतिशय तणाव आहे. आणि सगळे लोक येऊन एकाच शहरामध्ये राहतात ही बाबही अजिबात क्रिएटिव्ह नाहीय. त्यामुळे विकासाचं मॉडेल काही ठराविक शहरं असण्याच्या ऐवजी अशी अन्य शहरे आणि प्रगत गावं सगळीकडे वाढावीत, तयार केली जावीत हा दृष्टीकोन हवा. आणि हे होईल. कारण हळु हळु मेट्रोज बंद होत आहेत. नवी लोकसंख्या तिथे मावूच शकत नाही. आणि उपजीविका आणि विकासाच्या संधी सगळीकडे उपलब्ध करणं हळु हळु शक्य आणि सोपं होतं आहे.


सूर्यास्त का सूर्योदय?

आज आपण अशा जागी आहोत, तिथे एका बाजूला सगळी आव्हानं आहेत; सर्व प्रकारचे ताण आहेत आणि धोकेसुद्धा. पण त्याशिवाय आपल्याकडे प्रत्येक समस्येविषयी उपायसुद्धा आहे. आज आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. थोडी परिपक्व समज असेल, तर विज्ञानाच्या आधारे आपण ह्या समस्येवर मातसुद्धा करू शकतो. आज विज्ञान, इंटरनेट, मोबाईल क्रांतीच्या काळात मेट्रो सिटीजवर असलेली डिपेंडिबिलिटीसुद्धा कमी होते आहे. जेव्हा पूर्ण पृथ्वी खेड्यासारखी कनेक्टेड आहे, तर दूरवर विकासाचा प्रकाश पोहचणं फार लांब नाही. थोडी सजगता आणि थोडी समज असेल तर आपण आत्ता असमान असलेला विकास दूरवर पसरवूसुद्धा शकतो. आणि हीच गोष्ट पर्यावरणाविषयीसुद्धा लागू आहे. मानवामुळे आज कित्येक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्या तरी मानवच त्यांना वाचवूसुद्धा शकतो. आज ते तंत्रज्ञान व ती‌ साधनं उपलब्ध आहेत ज्यामुळे पर्यावरणही वाचवता येऊ शकतं. कारण गोष्टी नेहमी पृथक- पृथक कधीच नसतात. जर पर्यावरणाला नुकसान पोहचवू शकेल इतकं विज्ञान विकसित झालं आहे, तर तेच विज्ञान त्याला वाचवण्यासाठीसुद्धा उपयोगी पडू शकतं. आज जर युवा पिढीपुढे कित्येक डिस्ट्रॅक्शन्स आणि कृत्रिम गोष्टी आलेल्या असल्या, तरी त्यासह त्याच विज्ञानाने आज युवा पिढीला खूप मोठं ज्ञानाचं भांडारही खुलं करून दिलं आहे. गरज आहे ती फक्त थोड्या प्रगल्भतेची आणि सजगतेची. तसं झालं तर आपण दिशा सहज बदलू शकतो. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणामधलं सगळ्यात मोठं पाऊल मानवाची प्रगल्भता आणि सजगता वाढवणं हे असेल. त्याविषयी पुढच्या लेखात चर्चा करूया.

पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ११: मानव हाच प्रश्न आणि मानव हेच उत्तर

माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणामधलं सगळ्यात मोठं पाऊल मानवाची प्रगल्भता आणि सजगता वाढवणं हे असेल. >>> लाखाची गोष्ट सांगितलीत.

पर्यावरणाचे रक्षण - साधी गोष्ट. आमच्या ऑफीसच्या भल्यामोठ्या cafe मधे आम्ही बायका जेवतो तेव्हा मी प्लास्टिक चमचे हटकुन कचराच्या बादलीशेजारीच ठेवलेल्या रिसायकल बादलीत टाकते किंवा प्लास्टिक झाकणे वगैरे. १ वर्षापासुन माझ्या बरोबरच्या बायका पहातात हे. गप्पांत रिसायकल करणे चांगले असा विषयही निघतो पण एकही बाई, एकदाही चमचे वगैरे रिसायकल मधे टाकत नाही. तरी १-२दा सांगितले पण भीडभाड बाजुला ठेऊन, शेजारीच डबा आहे त्यात टाका चमचे वगैरे पण तरीही टाकत नाहीत. Sad इतकी बेपर्वा वृत्ती असते की बास. फुकट मिळतात म्हणुन जेवताना चमचा स्टंडवरुन ४-४ चमचे सर्व बायका आणतात आणि न वापरलेल्या चमच्यांसकट सर्व कचर्‍यात जाते. इतकी फक्त स्वतःपुरती पहायची वृत्ती का? काय करु काही समजत नाही.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

@ सुनिधी जी, चालायचंच. आपण निदान आपल्या बाबतीत तरी काळजी घेऊ शकतो. पण हेसुद्धा बघितलं पाहिजे की, एका स्तरावर व्यवस्थित ठेवलेला कचरा पुढच्या स्तरावर नीट प्रोसेस तरी होतोय का. नाहीतर रिसायकल बिनमधून परत तसाच निसर्गात जाईल. असो. धन्यवाद.

>>एका स्तरावर व्यवस्थित ठेवलेला कचरा पुढच्या स्तरावर नीट प्रोसेस तरी होतोय का. नाहीतर रिसायकल बिनमधून परत तसाच निसर्गात जाईल.>>
सीएनएन च्या वेबसाईटवर या संबंधी एक क्लीप बघितली
https://www.cnn.com/videos/opinions/2021/08/13/how-much-recycling-gets-r...