गावाकडची माणसं ...

Submitted by अजातशत्रू on 24 June, 2016 - 21:56

गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहरयाला कल्हई केलेली नसते. माणसे जशी असतात तशीच राहतात अन तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसे घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केव्हढे असते ? शे दोनशे ते पाचशे उंबरा इतकी त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारताना प्रत्येकाला एकमेकाचा बाप माहिती असतो.जसे की गणा भोसलेचा किसन महणजे किसन गणपत भोसले, महादू भोसल्याचा इष्णू म्हणजे विष्णू महादेव भोसले. तेथे औपचारिकता ही औषधालाही सापडणार नाही. फॉर्मेलिटीचे आपल्याला भारी कौतुक, तर त्याना त्याचे वावडे. हाका मारताना देखील ते हात अन आवाज राखून मारणार नाहीत, जोरात आवाज असणारच. रानात ओरडायची सवय असल्याने हळुवारपणा ते जपणार नाहीत, पण मुक्या प्राण्याची माया असो व घरातल्या म्हतारया माणसाची हेकेखोरमागणी असो ते तेथे हळुवार होतील. जेंव्हा ते हाका मारतील, जवळ येतील. बसतील, आधी इकडचे तिकडचे चार शब्द बोलतील. अर्थातच त्यात पिक पाणी अन पाऊसवारा हा असणारच. सुखदुःखाची देवाण घेवाण करतील. नडलेल्या गोष्टी सांगतील.....

पण कधी कधी हे देखील बिथरतात, भावकी अन गावकीचा विषय सोडून बोल म्हणतील. कुठेतरी कधीतरी कोणी दुखावलेले असते त्याचा राग वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेला असतो त्याचा वचपा यांनाही काढायचा असतो. शेवटी ही देखील हाडा मासाचीच माणसे, फक्त फरक इतकाच की आपणदेखील हाडामासाचेच असतो पण ते मातीचेही असतात. त्यांची मातीशी नाळ घट्ट असते. आपल्यापैकी काहींची तर आपल्या जन्मदात्या मायबापाशीदेखील नाळ घट्ट राहत नाही. आपला राग पोटात ठेवून माया लोभ मात्र ते खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतील. “अरे त्याने माझी गाय कापली म्हणून का मी त्याचे वासरू मारू ? देव अक्कल वाटत असताना तो शेण खायला गेला असेल म्हणून का मी त्याच्या गतीला येऊ ? त्याने त्याचा जिम्मा निभावला नाही म्हणून काय झाले ? देवाने मला मोप दिलया, मी समाधानी आहे. त्याचे कर्म त्याचे त्याच्यापाशी. त्येला पांडुरंग बघून घेईल.” असे म्हणत म्हणत त्यांची प्रत्येकाची गाडी विठू चरणी येऊन विसावते. राग कितीही असला तरी ते कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत, मात्र एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्याला अशा माणसाला चार गोष्टी ऐकवूनच मदत करतील, पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत.....

डोक्याला वेगवगळया रंगाचे फेटे घालून इथे तिथे बसलेली म्हातारी माणसे हे यांचे खरे हाकारे असतात. गावातला सर्वात जेष्ठ म्हतारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरुद्ध शक्यतो कोणी जात नाही. गावात विशेष मान असतो अशा वठलेल्या माणसाला. गावातली टाळकरी अन भजनी मंडळी ही सर्वांच्या आदरस्थानी असतात. त्यानंतर असतो तो गुरव अन बामण. त्यांच्यावर यांची अपार श्रद्धा. अबीर, गुलाल, बुक्का हाच यांचा ब्रम्हदेव, विष्णू अन शंकर. चिरमुरे, लाह्या,बत्ताशे हाच इथला महाप्रसाद. आत्ताच्या घडीला देखील घरी टीव्ही फ्रीज नसणारी अनेक घरे गावात सापडतील पण गुलाल बुक्का नसणारे घर गावात सापडणार नाही. आषाढीला उपवास अन नवरात्रात व्रत वैकल्ये, शिवाय ज्याचे त्याचे कुलदैवत अन कुलाचार हा त्यांचा श्रद्धेचा धार्मिक विषय. याशिवाय गावातली दर सालची जत्रा अन त्यातले याना येणारे उफाण हे देखील अनुभवण्यासारखे.

याचा अर्थ गावात सर्व माणसे अशीच असतात असे नाही काही माणसे इब्लीस अन बेरकी देखील असतात. प्रत्येक गावात अशी काही माणसे असतातच. बांधाच्या कोरभर तुकड्यासाठी नरडीचा घोटघेण्यापर्यंत कधीकधी इथला माणूस घसरतो तेंव्हा सारा गाव हळहळतो, आयुष्याच्या पारंब्या तुटतील असं कोणतेही नाते ताणू नये हे इथले मुळामुळातले तत्वज्ञान, आईबहिणीला कडला जाईपर्यंत बघावे अन भावकीला थुकावे असेही इथले रक्तात भिनलेले भाव..

आपआपली सुखदुखे अन स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसे. कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो आजकाल क्वचित कोणी जीन्सवाला तरणा पोरही येथेहटकून दिसतो..नऊ वारीचा डोक्यावरून पदर घेऊन वेस चुकवून बारीक कुजबुज करत लगबगीनेचालत जाणारया बायका पाहताना लाल,हिरवे,पिवळे.तांबडे ठिपके थवा करून चालल्यासारखे वाटते.पायात फुफुटा उडवत जाणारा रस्ता अन त्यावर तळपायाला चिरा पडलेली काळपट चपला घालून चालणारी चालणारी माणसे. सावलीचे ज्ञान याना अधिक उत्तम ठावूक, पर्यावरण पर्यावरण म्हणून छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात अन पानाफुलात आयुष्य घालवतात. इथल्या मळकटलेल्या रस्त्यांच्या कडेने घराघरातून वाहणारे मोरीचे पाणी उघड्या गटाराला मिळते जिथे माशा अन डास चिलटांचे स्वतंत्र विश्व असते. फिरत फिरत हे गटार गावातल्या ओढ्यापाशी जाते. दरसाली ओढ्याला वरुणदेवाच्या कृपेनुसार वेगवेगळे रुपडे मिळते. ओढ्याजवळच्या पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचेच झाडातले जल्म असे लहानपणापासून ऐकलेले. त्यामुळे त्या पानवेलींची पाने कोणी तोडत नसे. या दृढ समजाला कारणही तसेच असते, सर्रास बहुतेक गावात स्मशानभूमी नावाची वेगळी रुक्ष जागा नसते. गावातली घाण अन पावसाचे दान पोटात घेऊन नदीला मिळणारा ओढा गावातली माणसे देखील आधी त्याच्या मातीतल्या कणा कणात कालवतो अन मगआपल्या पोटाशी धरून नदीला घेऊन जातो. मग ती चंद्रभागा असते नाही तर गोदावरी,कृष्णा, पंचगंगा. पण तिचे पाणी आपल्याला समिंदराला नेते अशी धारणा. म्हणून गावात कोणाची मयत झाली की गावाबाहेरच्या ओढ्यावर त्याचे क्रियाकर्म ठरलेले असायचे. पुढे हीच माणसे तिथल्या पानवेलीत जन्म घेतात अन गावातल्या माणसाना भेटतात असे सगळे म्हणायचे.

गावात असते वेशीजवळचे मारुतीचे मंदिर, एखाद्या उभ्या आडव्या आळीला विठोबाचे मंदिर. क्वचित नमाजासाठी मातीचे मिनार. ही सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या गावकरयांची श्रद्धास्थाने. इथले उत्सव अन उरूस हा त्यांचा घरचाच जलसा असतो. तर गावतली चावडी ही मुळातच बोलभांड असते. अनेक घटनांची ती मूक साक्षिदार असते, गावातले अनेक निवाडे अन वाद, संकटे अन त्यांचे निवारण याचे ती दार्शनिक असते. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास अन निश्वास यांचे उसासे ऐकू येतील, गावातला खरा इतिहास चावडीच्या कणाकणात मिसळून गेलेला असतो. इथला पार म्हणजे तर आपल्या हजारो बाहूंनी जगाला आपल्या बाहूत सामावूनघेणारा विश्वनिहंताच जणू. जसा गाव तसा पार असतो. वडाचे झाड असणारा पार म्हणजेस्वर्गच जणू. क्षणभराच्या उसंतीत विचारलेली ख्याली खुशाली ते निवांत आपल्या सासूरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणी ते आईवडिलांचे आजारपण या सर्वांवरच्या गावगप्पा येथे होतात.कोणाच्या घरी पाहुणे आलेत इथपासून ते कोणाच्या घरी देवदेव आहे इथपर्यंतची पहिली खबर पारावरून गावात पसरते. पाराने गावातली पंचांची पंचायत बघितलेली असते अन त्यातआलेले आसू आणि हसुचे हजारो भावानुभव आपल्यात साठवलेले असतात. लहान मुलांच्या अनेक विट्या पाराने अलगद झेललेल्या असतात तर कधी कटून आलेला एखादा पतंग वडाच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो. पारावरचा कट्टा हा गावाच्या सांस्कृतिककार्यक्रमांचे मंच म्हणून जेंव्हा जगत असतो तो तेंव्हा अभिजात प्रतिभेचे नवनवोन्मेषाचे अगणित हुंकार बनतो. कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्या पाराभोवती गोळा झालेले असतात तर कधी पावसाळी दिवसात तिथ साठलेल्या पाण्यात खेळणारी पोरे पाराने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्याशी मस्ती केलेली असते. गावातला पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ अन प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत अन शिस्तीत चाललेला आहे याचे ते प्रतिक असते. तर पाराभोवती कचरा साठलेला असेल अन पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्येय कुणीतरी गेलेय याची ती चाहूल असते. पार हा गावातल्या रग अन रंगेलपणाचाही अंदाज बांधत असतो.मिशीवर पीळ देत दिली घेतलेली आव्हाने अन जीवावर उदार होऊन लावलेल्या पैजा याचे अनेक स्पर्श तिथल्या पारंब्या शिवता क्षणीच मस्तकातून भिनतात. पारात कैद असतात अनेक अपेक्षा अन उपेक्षाची जीवघेणी गाऱ्हाणी ती मात्र पार फक्त आपल्या एकट्याच्या अंतःकरणात ठेवून असतो त्याचे शेअरिंग नसते. पाराचे ते असहाय दुःख असते, त्याच्या अबोलव्यथांचे प्रकटन कधी करत नाही.

गावाबाहेरचे तळे म्हणजे अनेक आख्यायिकांचे आगार असते. पावसाचे तांडव आपल्या पोटात साठवून तळ्याचेपाणी कधी तळाला जावून विचारमग्न होते तर कधी पाळी फोडून गावदेवाच्या पायरया शिवून आपलाही रामराम घालते. तळ्याच्या हालणारया पाण्यात अनेक प्रतिबिंबे दिसतात. तर तिथल्या प्रत्येक तरंगात तळ्याकाठच्या जीर्ण झाडांची हिरवी पिवळी पाने पानगळीतला आपला मरण सोहळा साजरा करत फिरकी घेत नाचत नाचत पाण्याशी अनुष्टुभीत होऊन आपली झाडाची गाणी गात असतात. तळ्याकाठची झाडे म्हणजे गावातल्या पोरांचा जीव की प्राण ! सूर पारंब्या पासून ते लंगडी पर्यंत अनेक खेळांचे अनेक डाव इथे मांडलेले. उंबराच्या झाडाची लालसर मऊ गोड उंबरे खात झाडावरचा डिंक अन लाख गोळा करताना चावणारे लालकाळे तिखट मुंगळे, अन त्यांचा कडक डंख वर याला पोरांच्या गलक्याची जोड असायची. या सर्वांच्या कोलाहलात आपला सुर मिसळणारे सकळ विहंगगण ! एक जादुई माहौल असायचा तिथे. तळे कोरडे पडले की मग मात्र गावच उदास भासे, मेलेल्या माणसाची आतडी कातडी बाहेर यावी तसा तळ्यातला गाळ कोरडा झाल्यावर पोटातले मोठाले दगड धोंडे वर घेऊन यायचा. सलग दोन तीन वर्षे जर तळे आटले की देवाला भाग बांधला जायचा, सारा गाव अनवाणी राहून उपास तपास करायचा. पुढल्या पावसाळ्यात बक्कळ पाऊस पडला की आधी देवळाला काव आणि पिवडीच्या रंगाचे दोन हात ठरलेले असायचे. तळ्यातल्या पाण्यावरून जुनी माणसे वेगवेगळ्या दंतकथा रंगवत बसत. तळ्याचे पाणी कोणा एकाच्या घरचे नसूनही ते सर्वांच्या डोळ्यात असायचे, चरायला गेलेली अख्ख्या गावाची गुरे गावात परतताना तिथे आळीपाळीने पाणी प्यायची तेंव्हा त्यांच्या जिभेचा लप्लाप आवाज अन त्याच वेळेस त्यांच्या हलणारया गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज ऐकताना मावळतीचा लालपिवळा सूर्य तळ्यातल्या पाण्यात कधी बुडून जायचा काही कळायचे नाही...

गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था जो दुःखाचे अवडंबर करत नाही अन सुखाचे उत्श्रुंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते, ओढ्यातल्या पाण्यातही गावाचे अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा ! गाव असतो माणुसपणाचा उरूस, देणारया हातांचे हात घेणारा अन त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा ! गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी अखंड उर्जा देणारी सावली ! गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली ! गाव म्हणजे काही वस्ती,वाडी वा घरे नव्हे गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भूमीपुत्रांच्या ठायी विसावलेले !! गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल रुखमाई, गाव म्हणजे आकाशाची निळाई अन निसर्गाची हिरवाई, गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा.
सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरीत्रीच्या चरणी अर्पण करणारया शेकडो माणसांचा एकसंध देह असतो !!

- समीरबापू गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2015/07/blog-post_18.html

bapu village mens.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुरेख लिहिता, इतके की शेवटचे चित्र नसेल तरी चालेल. कारण त्याची गरजच नसते

अजुन लिहित रहा

चांगले लिहिलय,
थोडे "गुडी गुडी" भासतय, पण तरीही शहरिकरणाच्या "व्यावहारिक्/स्वार्थी" रेट्यापुढेही गावाचे गावपण "का टिकुन" राहू शकते /शकेल याचे वर्णन आहे असे वाटते.

सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरीत्रीच्या चरणी अर्पण करणारया शेकडो माणसांचा एकसंध देह असतो !! >>>> हे फार भावले ....

सुरेखच लिहिलंय ...